माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

सोमवार, १६ ऑक्टोबर, २०१७


मी चालतोय एकट्यानेच माझीच वाट...



रस्ता मोकळाठाक आहे,
अगदी चिटपाखरूंही दिसत नाही. 
पण असं असतानाही,
मी चालतोय एकट्यानेच माझीच वाट...


वळणं येतायेत अन जातायेतही, 
अगदी आडोशाला काही दिसत नाही.
पण असं असतानाही,
मी चालतोय एकट्यानेच माझीच वाट...


संकटाचा सूर्य तेवत आहे इथंही,
सावलीला कुठं थांबावं असं ठिकाण नाही. 
पण असं असतानाही,
मी चालतोय एकट्यानेच माझीच वाट...

समोर क्षितिज वाकुल्या दाखवतंयही,
पण कवेत येईल इतक्या सहज वाटत नाही.
पण असं असतानाही,
मी चालतोय एकट्यानेच माझीच वाट...

शेवटी एकच आशा आहे लागेल असंही एक गाव,
जिथे भेटतील मला असंख्य हातांची साथ...
म्हणूनच असं असतानाही,
मी चालतोय एकट्यानेच माझीच वाट...



गणेशदादा शितोळे
(१६ ऑक्टोबर २०१७)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा