माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०१७

गुंता...!!!

कुणी कंगवा किंवा फणी देता का,
थोडंस नात्यांना विंचरायचंय...
कितीतरी गुंते झालेत,
थोडंस सोडवायचंय...


एक पदर सुटला की,
दुसरं गुंतत जातंय...
एक नातं सुटलं की,
दुसरं नवं नातं अडकत जातंय...


नात्यांना किती जपलं तरीही,
अधूनमधून नातं एकमेकांत गुंततंय...
एक टोक सोडवलं असं वाटत गेलं की,
दुसरं टोक हरवतंय...


सगळीच नाती हवी हवीत,
पण एक सोडवलं की दुसरं तुटतंय...
कितीही हळुवार गुंता काढायचं ठरवलं तरी,
सुटण्याऐवजी अधिकंच गुंतत जातंय...


एकदा कंगवा अन फणीनं विंचारलं की,
सगळं सुरळीत होईल वाटतंय...
थोडा वेळ कसंनुसं होईल,
पण गुंता हमखास सुटेल वाटतंय...

गणेशदादा शितोळे
(२४ ऑक्टोबर २०१७)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा