पाठीमागे वळून पहाताना....!!!
देव, धर्म, जात, पंथ अशा कोणत्याही गोष्टींपासून चार हात दूर राहणेच पसंत करतो. त्यामुळे आपसुकच सण संस्कृतीच्या नावाखालचा ढोंगीपणा माझ्या मानगुटीवर सहसा बसत नाही. कुणी नास्तिक, धर्मद्रोही अमुक तमुक अशी लेबलं लावत गेलं पण त्याचा अगोदरही कधी फरक पडला नाही अन नंतरही पडणार नाही याची खात्री आहे. अनेकदा या विचारांना घरूनही विरोध होतो. पण ते बदलतील याची शंकाही मला कधी वाटत नाही.
प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते. त्यामुळे सहाजिकच घरच्या आणि आप्त स्वकियांच्या मनावर जून्या प्रथा, परंपरा ह्यांच गारूड आहे. त्याला बदलण्याचा माझा कायमच प्रयत्न राहिलाए. लहानपणी पासून अगदी काल परवाचा महाविद्यालयीन काळ या दरम्यान या मंडळींकडून अनेकदा माझे मित्र कोण ह्याची चौकशी व्हायची. पण मुळ मुद्दा ते नंतर सांगायचे, अडनावावरून जात, धर्म कळला नाही तर विचारून घेतील. पण त्या त्या प्रत्येकवेळी त्यांना समाजावत गेलो. आणि तोच माझा काय़म प्रयत्न राहिलाय.
मी कायम म्हणत असतो आयुष्यात सगळ्या गोष्टी केल्या ज्या करून पहायच्या होत्या. गणेशोत्सवात पुढाकार घेऊन नाचणारा जसा मीच होतो तसा एक तांदुळ डोक्यावर लावून नशीबाची गुलामी करणाराही मीच होतो. पदविका अभ्यासक्रमादरम्यानची तीन वर्षे न चुकता विशाल गणपतीची भक्ती केली अन एका रात्री प्रचंड वेदना झाल्या तरी पन्नास किमी चालून मोहटा देवीला प्राथनाही केली. पण आयुष्यात एक अशी वेळ येती की ह्या सगळ्याचा वीट येतो आणि चिकित्सक बुद्धीतून अनेक थोतांड गोष्टी सुटल्या त्यापैकी ही पण एकचं. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यापलिकडे जाऊन वैज्ञानिकेतेची कास धरली गेली अन कर्मकांड सुटत गेली.
एका काळ असाही होता की हिंदु असल्याचा आणि त्यातही देशमुखी पण मिरवण्याचा माज होता. पण आय़ुष्यात असंख्य माणसं भेटली. सगळ्या जातीची अन धर्माची, अगदी माझ्यासारखीच. काहीच फरक नव्हता आमच्यात. पण जात,धर्म, पंथ ह्या जळमटांनी आम्हाला इतके दिवस वेगळे ठेवले होते. रक्ताने कधी रंग न बदलता जाती धर्म असा भेदभाव केला नव्हता. तर तो आपण करणे कसे चूक आहे हे लक्षात आल्याने ही धार्मिक गुलामगीरीही सुटली. माणूस म्हणून जन्माला आलो आहे. आणि माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न आहे. जगाला माणूस ह्या चष्म्यातून पाहिचे एवढंच माहिती आहे.
मुळात मला जमेल जितकं साधेपणा जपता येईल तितका साधेपणा जपण्याकडे कल असतो. त्यामुळेच जगण्यातला साधेपणा टिकवण्याकरता मी कायमच प्रयत्नशील राहिलोय. अमुक ब्रॅण्डच्या गोष्टी वापरल्याने कोणी लय भारी असल्या फालतू न्युनगंडाच्या गोष्टी कधा मनात आल्याच नाहीत. फार फार तर काय अशा ब्रॅण्डच्या गोष्टी वापरणारांच्या बैठकीत बसायला यायचं नाही एवढांच तो फरक. बहुतेक त्यामुळेच अनेक असे #ब्रॅण्डेड मित्र सुटले. पण त्याचं दु:खही नाही. माझ्यासारखी अनेक माणसं भेटलीच की. पार्ट्या, धांगडधिंगा कधी केला नाही असं मी म्हणणार नाही. ज्या वयात समज नव्हती तोपर्यंत सगळं काही केलं. पण आता समजदार वयात आपल्याला आपली प्राधान्यता जपता आली पाहिजे. अनेकदा त्यामुळेच मित्रांना टाळायलाही लागते. अनेकदा मित्र चेष्टेने म्हणतातही, "काय दादा, दरवेळी तुम्ही अशीच टांग मारता". पण त्याला नाईलाज असतो. एकीकडे नात्यांचे बंध असतात अन दुसरीकडे तत्वांची साथ दोन्ही जपायलाच लागतं.
अनेकदा आयुष्याचं धेय्य काय आणि तुमचा प्रवास कोणत्या दिशेने चाललाय असा प्रश्न विचारण्यात आलाय. आणि मी दरवेळी मी तेच सांगत आलो. आजवर आयुष्यात अनेक वेगवेगळ्या वाटांनी प्रवास केला. कधी शासकीय अधिकारी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत चाललो. कधी आपलं क्रिकेटच्या पंचगिरीच्या कौशल्याला वाढवण्याकरता त्या दिशेनेही दोन पावलं टाकली. गेल्या दोन वर्षापासून एस ए पी ह्या नव्या क्षेत्रातही पाऊल टाकलं. पण ह्यापैकी धेय्य असं काहीट नाही. ही तीनही क्षेत्र माझी कितपत असतील ह्यावर शंका आहे. एस ए पी हे केवळ काही काळापुरती अन घरच्यांच्या समाधानाकरता चाललेली वाट आहे. ती अर्ध्यावर थांबणार आहे हे निश्चित आहे. मुळात मी कायम बाबांच्या प्रकाशवाटेवर चालण्याच्या दृष्टीनेच प्रयत्न केले आहेत. ह्या वाटेचा प्रवास खडतर आहे याची जाणीवही आहे. त्यामुळेच अजून काही काळ प्रतिक्षा करतोय. पूर्णपणाने झोकून देेण्याकरता. तोपर्यंत बाकी वाटा चाचपडून पहायच्यात. शेवटी त्यातूनही मुळ वाटेवर जाण्याकरताच प्रयत्न सुरू आहेत. शासकीय सेवेतून बाबांच्या प्रकाशवाटेचा मार्ग साधता येईल असं वाटतंय. पुढील वर्षी नवी सुरवात करण्याच्या दृष्टीनेच आता पावले टाकली जात आहेत.
माझ्या बाबतीत चर्चेचा सगळ्या मित्रपरिवाराचा आवडता विषय म्हणजे माझा लेखन प्रवास. लेखक किंवा कवी होणे हे माझे कधीही धेय्य नव्हते नाही आणि नसणार. तो छंद होता आहे आणि छंदच रहाणार. आयुष्यात विरंगुळा म्हणून छंद जपायचे असतात तसाच तो मी जपतोय. त्यामुळेच ह्या वर्षी हे करू ते करू असे संकल्प मी करत नाही. वेळ मिळेल तसे आपले विचार मांडण्याचा हा प्रयत्न असतो. अनेकदा मला फेसबुकचं वेसन लागलंय असंही मित्र म्हणतात. कदाचित ते असेलही. कारण फेबुने मला व्यक्त होण्याचं माध्यम दिलंय. तेही क्षणात. फेबुमुळेच मी प्रतिक्रियावादी आलो हा मित्रांचा आरोपही तितकाच खरा आहे. जे पटेत तेही अन जे पटत नाही त्यावरही आपलं मत द्यायला फेसबुकनेच शिकवलं. आयुष्याकडे चिकित्सक पद्धतीने बघत दोन्ही बाजू बघण्याचा गुण फेबुनेच दिलाय, बाकी लेखन आणि त्यातही शब्दांच्या मोरपिसांचा प्रवास काल जसा चालू होता तसाच तो उद्याही चालूच रहाणार आहे. धेय्य आणि छंद ह्यांची सांगड घालत आयुष्य जगण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.
गणेश शितोळे
(०८ ऑक्टोबर २०१७)