माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

सोमवार, १ मे, २०१७

 

पर्याय...!!!


                 आम्ही आयुष्यात कायम प्रत्येकाकरता पर्याय म्हणूनच उपलब्ध रहात गेलो. त्यामुळेच की काय मित्रमैत्रीणींच्या गराड्यात राहणार्‍या मला खास व्यक्ती म्हणून वागणूक कधीच मिळाली नाही आणि ती अपेक्षितही नव्हती. जिथे कमी तिथे आम्ही या उक्तीप्रमाणेच आजवरचा मैत्रीचा प्रवास झाला. त्यामुळेच की काय वैयक्तिक माझ्या आयुष्यातही कुणी खास व्यक्ती राहिल्याच नाहीत. म्हणजे मला जर कुणी विचारलं की तुझा जवळचा मित्र किंवा मैत्रीण कोण तर यादी उभा रहाते. कारण ही सगळी मंडळी माझ्या मैत्रीच्या एकाच कक्षेत आहेत. त्यामुळे त्यातून अमुक एक जवळचा असं मला कधी ठरवता आलं नाही.
                 एक काळ होता की माझ्या आयुष्यात अशी काही निवडक जवळच्या व्यक्ती होत्या. म्हणजे मी तरी तसे समजायचो. पण सुरवातीलाच म्हटल्याप्रमाणे मी त्यांच्या आयुष्यात कायम पर्याय म्हणूनच होतो आणि पर्याय म्हणूनच राहिलो. आजही त्यांच्या पैकी कोणाचाही एक फोन आला तरी एका पायावर मी तयार असतो. कारण अजूनही मनात त्यांच्या बद्दल एक विशेष ओढ आहे. मध्यंतरी त्यापैकी काहींची लग्न झाली अन ते आपापल्या आयुष्यात मग्न झाले. तसं मी फारसे कुणाच्या लग्नाला जात नाही. पण त्या प्रत्येकाच्या लग्नाला मात्र हजर होतो. 
                 आजही त्यांच्या पैकी कोणाचाही एक मेसेज आला तरी भरून आल्यासारखं होतं. आताही ही सगळी मंडळी भोवतालीच आहे. अनेकदा मनातून वाटतं कडकडून भेटाव आणि मनातलं सगळं बोलुन टाकवं. पण मन लगेच भानावर आणते आणि कोणत्याही नात्यात आपल्या वैयक्तिक भावनांना अटकाव करते. म्हणूनच की काय अधूनमधून खंत वाटते की, इतरांकरता पर्याय म्हणूनच उपलब्ध रहाताना आपल्याला कोणाच्यात आयुष्यात खास बनता आलं नाही. अगदी स्वतःच्या ही.



गणेश दादा शितोळे
(१ मे २०१७)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा