शासकीय तंत्रनिकेतनच्या निरोपाची ६ वर्षे
रोजचं रूटीन पाळता पाळता पाच मे कधी आला आणि निघून गेला समजलं नाही. परंतु रात्री झोपताना त्या दिवसांची आठवण झाली. शासकीय तंत्रनिकेतन, अहमदनगर चा निरोप घेऊन आता सहा वर्षे पूर्ण झाली. आजही तो दिवस आठवला की डोळ्यात थेंबभर का होईना पण उधारीच्या आनंदाचं आसू आलंच. आयुष्याला कलाटणी देणारी जागा ठरली ती आमचं वसतीगृह.
आजही कुणी विचारलं शासकीय तंत्रनिकेतन, अहमदनगर ने आयुष्यात काय दिले तर मनात प्रश्न उभा रहात नाही. या महाविद्यालयाने शिक्षणापलिकडे जाऊन जीवाला जीव देणारे मित्र दिले. माझ्या मधील लेखक, कवी घडवला. फरक इतकाच होता की त्याकाळी हे सगळं पडद्याआड होतं. माझ्या पुरतं मर्यादित. कोणाला आवडेल नाही म्हणून कधी सांगण्याचा प्रयत्न केला नाही. त्यावेळी ती भिती होती. याशिवायही अनेक आनंदाचे क्षण या महाविद्यालयाने दिले. डोळे मिटून इथल्या प्रत्येक ठिकाणी नजर फिरवली तरी विविध आठवणी जाग्या होतात. मग तो रोजचा कट्टा असो की क्रिकेट खेळणारं मैदान. भरगच्च आठवणींचा खजिना दिला या महाविद्यालयाने.
आजही तो दिवस आठवला. ५ मे २०१० रोजी आम्ही अधिकृतपणे शासकीय तंत्रनिकेतन चा निरोप घेतला होता. त्यावेळी रेल्वे स्थानकावर सोडायला आलेल्या राहुल आणि सागर यांचा निरोप घेताना अगदी अवघडल्यासारखं झालं होतं. जवळच्या माणसांचा निरोप घेतना डोळ्यात पाणी आलं तर नवल नव्हते. आणि तेव्हा सारखेच आज आठवलं तेव्हाही येतंय. त्या वेळी राहुल नसता तर कदाचित आज एक कान कायमचा बहिरा झाला असता. त्यानंतर मोठ्या भावासारखा पाठीशी उभा रहाणारा सागर आणि सोबत संतोष, नंदू ,स्वप्नील, महेश, बाळासाहेब असे कित्येक मित्र डोळ्यासमोर उभे राहिले की आजही नकळतपणे आसवे येऊन गेलीच. या मित्रांसोबच्या आनंदाची साठवण करणार्या आठवणी मी सविस्तर मांडेलचं.
तृतास इतकचं.
गणेशदादा शितोळे
५ मे २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा