स्टेटस म्हणजे काय...?
नुकताच मुंबई पुणे प्रवासात एका मैत्रिणीचा फोन आला होता. विशेष काही नाही बोलण्याचा विषय तोच होता. मुंबईत काम करायला गेलात म्हणजे तुम्ही मोठी माणसं झालात. तुमचं वेगळं स्टेटस असेल आता. आमची ओळख ठेवा अशी तिची तक्रार होती. तिच्या या तक्रारीपेक्षा मला स्टेटस हा शब्द अधिक खटकला. यावरच बरंचसं बोलणं झालं.
स्टेटस म्हणजे काय...?
आयटी कंपनीत नोकरीला म्हणजे वेगळं स्टेटस असं काय..?
यावर खोलवर चर्चा झाली तेव्हा या स्टेटस चा अर्थ लक्षात यायला लागला. स्टेटस म्हणजे हेच की आयटी कंपनीत नोकरी करता म्हणजे श्रीमंतीच एक वलय प्राप्त असते. त्यामुळे तुमच्या कडून काही अपेक्षा असतात. उदाहरणार्थ बोलायचंच झाले तर माॅल मधे जाऊन पैसे खर्च करणे. मित्रांसह कॅफेत जाऊन कोल्ड कॉफी पिणे. ब्रॅन्डेड कपडे, गाॅगल, शुज वापरणे, आठवड्यातून एकदा थिएटरमध्ये चित्रपट पहाणे, महागड्या गाड्या फिरवणे, पब, बार पार्लरमधे जाणे ही या आयटीएन्स च्या स्टेटस ची लक्षणे. या खोल चर्चेतून पुढे आलेल्या या लक्षणांपैकी एकातही मी बसणारा नाही. त्यामुळे मी फारकाळ या क्षेत्रात राहिल याची खात्री मीच काय कुणीही देऊ शकत नाही.
महाविद्यालयीन जीवनापासून मला या लाईफस्टाईलमधे ओढण्याचा प्रयत्न झाला. पण मुळातच मला यातलं एकही आवडत नाही. सामाजिक कार्याची आवड असल्याने पैसा कुठे कशाकरता आणि केव्हा वापरावा याची काळजी मी पहिल्यापासूनच घेत आलो आहे. माॅल संस्कृतीचा तर मला अगदी वीट येतो. निष्कारण पैसा वाय घालण्याचे धंदे म्हणजे माॅलमधे ब्रॅण्डेड वस्तूंची खरेदी करणे. बहुधा एसी केबिनमध्ये बसून काम करण्याची सवय असल्याने घामाची किंमत आयटीएन्स ला नसावी म्हणून स्टेटस अन ब्रॅण्डच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी करता येते. पण मला ते कधी जमलं नाही अन जमणार नाही. कारण उन्हात काम करणाऱ्या बापाच्या घामाच्या धारा मी पाहिल्या आहेत आणि त्या घामाच्या पैशाची किंमतही माहिती आहे. म्हणजेच या स्टेटस प्रकारत बसत नसल्याने अनेक मित्र माझ्या पासून चार हात अंतर ठेवून असतात.
आम्ही म्हणजे साधी माणसं. असेल त्यात समाधानी. जेवढं साधं रहाता येईल तेवढा साधं रहाण्याचा प्रयत्न असतो आमचा. लिननचा किंवा सियाराम चा कपडा घालण्यापेक्षा साधा कपडाच आमच्या अंगाला सवयीचा आहे. कोणाला तो अशोभनीय वाटत असेल. पण आम्ही त्यातच खुश आहोत. कपड्यांचा ब्रॅण्ड घालण्यापेक्षा आम्हाला विचारांचा ब्रॅण्ड अनुकरण्यात रस होता आहे आणि रहाणार. बाकी आमचं स्टेटस काय याच्या भानगडीत आम्ही पडत नाही.
गणेश दादा शितोळे
(३ मे २०१७)
(३ मे २०१७)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा