माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शुक्रवार, १२ मे, २०१७

कॉलेजकट्याचे अंतरंग 
(भाग ५) 
सबमिशन आणि दौंडकर मंडळींशी ओळख...

दिवाळी तोंडावर आल्याने कॉलेजला प्रत्येक शिक्षकांची अभ्यासक्रम संपवण्याची तयारी चालू होती. त्यातली त्यात आमचे विभागप्रमुख असणारे तोडकरी सरांचे रोज चार तासाचा लेक्चर असायचे. दोन तास अप्लाईड थर्मोडायनामिक्स आणि दोन तास प्रोग्रामिंगचे लक्चर असायचे. मला थर्मोडायनामिक्सचा पहिला, दुसरा लॉ सगळं गुंतागुंतीचं वाटायचं त्यामुळे दोन तास कंटाळाच यायचा. पण प्रोग्रामिंगला सुरवातीपासून मन लावून लक्ष दिल्याने कोणताही प्रोग्राम अगदी पाटदहा मिनिटात लिहून मोकळा व्हायचो. त्यामुळे प्रोग्रामिंगचंच लेक्चर दिवसभर असावं असंच वाटायचं. पूर्ण लेक्चरला सरांचं माझ्याकडे लक्ष असायचं. अगदी त्यांच्या गळ्यातला ताईत झालो होतो. एमपीचं वाघोडे सरांचं जीव तोडून शिकवलेलं लेक्चर तेवढं न चुकता करायचं. कारण त्यातच खूप रस होता. सगळं डिप्लोमाला झालं असल्यासारखंच वाटायचं. बाकी लेक्चर्सला दांड्याच असायच्या.
एफ एम चं पाय थेरम कळलंच नाही. मेटलरर्जीचं आयर्न कार्बाइड डायग्राम पर्यंत सगळे लेक्चर्स केले होते. नंतर किर्तन ऐकण्याची मानसिकताच होत नव्हती. तरीही वर्गात अजून कट्ट्यावर मैफिल जमावी अशी मित्रांशी ओळख झाली नव्हती. आणि ज्यांच्याशी ओळख होती ते सगळे अभ्यासू किडे असल्यासारखे सतत लेक्चर्सला बसायचे. वैभव, पंकज, सागर, रोहीत सगळे एकाच माळेचे मणी. त्यामुळे लेक्चर्स बंक केलं तरी बाहेर फिरायला यापैकी कोणी नसायचं. त्यामुळे मग एकटं दुकटंच फिरायचं. फारतर फार अहमदनगरला डिप्लोमाला असणारे काही मित्र होते त्यांच्या सोबत एखाद्या दिवशी कॉलेजचा फेरफटका व्हायचा. आणि तसाही फोन काही सुचून देत नव्हता. डोकोमोचा सातशे रूपयांचा बॅलंस उडवायला मग रोज कोणाला ना कोणाला तरी फोन हा व्हायचाच. उगाच त्याच अॅडमिशन आणि कॉलेजच्या गप्पा मारायच्या, आल्यावर भेटू म्हणायचं आणि फोन ठेवायचं हा रोजचा कार्यकर्म होता. सकाळी दहाला आलेली गाडी फार तर फार दुपारचे तीन पर्यंत कॉलेजमधे असायची. दुपारी तोडकरी सरांच लेक्चर नसले की निघायल मोकळे.
अॅडमिशनच्या दिवशी ओळख झालेला तो चेहरा कॉलेजला दिसायचा. पण त्याचा ग्रुप वेगळा असल्याने फारसा त्याच्याशी संबंध येत नव्हता. बाकी काही जणांची नावं माहित होत होती. वर्गात बरीचशी डिप्लोमा करून इंजिनिअरींगला आलेली मुलं असल्याने सगळी एकाच पट्टीतली होती. माझ्यासारखी तब्बेतवानही होती. अजून त्यांच्याशी ओळख झाली नव्हती. फक्त वर्गातल्या चर्चेदरम्यान त्यांची नावं ऐकली होती. मंगेश मोरे, श्रीकांत नागवडे, महेंद्र वायाळ. 
अधूनमधून पाऊस येणं जाणं चालूच होतं. कॉलेज ते मुख्य प्रवेशद्वार हा मार्ग म्हणजे आम्हाला चिखल नुसता आमंत्रण देत होता खेळण्याकरता. गाडी कशीतरी घसरत घसरत घेऊन जाणं मुश्किलीचं होतं. पण रोजच्या सवयीने सगळं पचनी पडलं होतं. अजून लॅपटॉप मिळाले नसल्याने पावसाची तशी भिती वाटत नव्हती म्हणण्यापेक्षा फिकीर नव्हती. आला काय अन गेला काय. असही भिजतच घरी जायच हे नित्याचंच होतं. पावसाचा मनसोक्त आनंद घ्यायचा. आणि पर्यायही नसायचा. कधी खूपच जोराचा पाऊस आला तर थांबायचं नाहीतर रिमझिम पावसात पाणी उडवत गाडी दामटणे म्हणजे आवडीचा खेळ. दुसरं एक म्हणजे रस्ता मोकळा सापडायचा. कॉलेजचं प्रवेशद्वार ओलांडलं की आपलंच राज्य. घरापर्यंत तसा बरा रस्ता होता. त्यामुळे पुन्हा चिखलात रूतण्याचा प्रश्न येत नव्हता. पुण्याच्या वरच्या भागात पाऊसानं थैयमान घातल्यानं घराकडे जाणारा रस्ता अधूनमधून सटवाईच्या ओढ्याला पाणी आले की बंद व्हायचा. एकंदरीत पावसाचा आनंद घेत कॉलेजची पहिली सेमिस्टर चालू होती.
ऑक्टोबर संपता संपता कॉलेजमधे सबमिशनची घाई सुरू होती. डिप्लोमाला मॅन्युअल भरून द्यायला तास खूप व्हायचा. त्यामुळे ड्रॉईंग व्यतिरिक्त फारसा ताण कधी पडलाच नाही. एखादी फाईल असली लिहायला तरी ती महिनाभर अगोदर फिरत फिरत यायची त्यामुळे सबमिशन काळात धावपळ नसायची. पण इंजिनिअरींगचं सबमिशनची ही पहिलीच वेळ होती.  त्यात तोडकरी सरांनीच उपलब्ध साहित्यातून बऱ्यापैकी प्रॅक्टीकल घेतले होते. त्यामुळे थर्मोडायनामिक्सचं टेन्शन नव्हतं. फ्लुड टायनामिक्सचं फक्त बर्नॉलिझ थेरम शेवटपर्यंत विनानिकालच झालं. मेटलर्जीला तर बहुतेक सगळे अभ्यास करण्याचीच प्रॅक्टिकल्स होती. त्यामुळे त्याचंही फारसं काहीच नव्हतं. त्यात उंडे सर म्हणजे एकदम निवांत माणूस. त्यामुळे त्याची काळजीच नव्हती. मॅथचे लेक्चरच केले नव्हते त्यामुळे टिटोरिअल्स कोणाचे तरी पाहून उतरावले होते. आणि त्यालाही मार्क्स नसल्याने काळजी नव्हती. एमपी ला काही ओरल, सबमिशन वगैरे नव्हते.
सबमिशनच्या तोंडावर एक चांगली बातमी मिळाली. उशिरा अॅडमिशन आणि कमी कालवधीमुळे कॉलेजने छापलेले मॅन्युअल दिले होते. फक्त त्यात रिकाम्या जागा भरण्याचा कार्यकर्म बाकी होता. मेटलर्जीला जरा आकृत्या होत्या. त्यामुळे तो प्रकार डिप्लोमा कॉलेजच्या एका मैत्रिणीला देऊन टाकला होता. बाकी ओरल असणारे दोन्ही मॅन्युअल एकमेकांचे पाहून पूर्ण करून दिले. सगळी हुशार मंडळी मित्र परिवार असल्याने त्यात कुठलीही समस्याच नव्हती. सरते शेवटी सगळं अडून पडलं एमडीसीजी वर. अगोदरच काळे सर आणि माझं मागे एका लेक्चर दरम्यान वाजलं होतं. त्यामुळे एमडीसीजीचं सबमिशन कसं होतंय त्याची चिंता होती. तोडकरी सर शिकवत असले तरी प्रॅक्टीकलचा कारभार काळे सरांच्या हाती. त्यामुळे निदान मला तरी एमडीसीजीचं सबमिशन नीट पूर्ण करावं लागणार होतं.
सबमिशनअगोदर घेण्यात आलेल्या पन्नास प्रोग्रामच्या लेखी परिक्षेत मी ५० पैकी ४७ प्रोग्राम बरोबर लिहीले होते आणि उरलेले ३ पण जे लिहिले होते तिथपर्यंत बरोबर होते. त्यामुळे काळे सरांशी जरा बरं झालं असल्याचं जाणवत होत. पण धोका नको म्हणून सगळं कसं शांततेत चालू होतं. अॅटोकॅड येत असल्याने आणि त्यात सगळी हुशार मंडळी सोबत असल्याने आम्हाला सरांनी ड्रॉईंग शीट काढण्याची जबाबदारी दिली होती. तसं ते वाटून दिलं होतं सगळ्या वर्गात. निम्म्या वर्गाला असेंब्लीचं एक शीट आणि उरलेल्यांना पार्ट डिटेल्सचं दुसरं शीट दिलं. असेंब्लीच्या शीटची जबाबदारी आम्ही सांभाळत होतो. सर म्हणतील ती पूर्व दिशा. सरही दौंडवरून अपडाऊन करत असल्याने दौंडवरून आलेल्या मुलांना सर बऱ्यापैकी ओळखत होते. त्यामुळे दुसऱ्या शीटची जबाबदारी त्यांच्याकडे होती. सोबतच प्रोग्रमच्या प्रिंटही काढायच्या होत्या. दौंडकर  मडंळीशी याअगोदर कधीही संबंध आला नव्हता. प्रोग्रमच्या प्रिंट काढण्याच्या निमित्ताने दौंडकर मडंळी ओळखीची झाली होती. दोन तीन महिन्यापासून एकाट वर्गात असूनही न भेटलेलो आम्ही खऱ्या अर्थाने त्यादिवशी पहिल्यांदा भेटलो. स्वप्निल साळुंखे, श्रीराम पवळे, रोहित साठे, अॅडमिशनच्या दिवशी ओळख झालेला रोहित ननावरे ही सगळी मंडळी माझ्या मित्र परिवारात जमा झाली होती.
ऐन सबमिशनची तारीख तोंडावर आली तरी शीट पूर्ण झाले नव्हते. कॉलेजला शीट प्रिंट काढण्याची सोय नसल्याने बारामतीवरून काढून आणायचे होते. सरही कॉलेजला बारामतीला असल्याने त्यांनी जे शीट झाले आहे ते तसेच बारामतीला प्रिंट काढण्याचं ठरवून आमच्या पैकी हुशार मंडळींपैकी पंकज आणि सागरला सोबत घेतलं होतं. बारामतीला सरांच्या एका मित्राच्या घरी शीट तयार करण्याचा हा कार्यकर्म चालू होता. सर आणि पंकज व सागर तिघे मिळून शीट तयार करत होते. दिवस मावळून रात्र निम्यावर गेली तरी काम चालूच होते. सर फोन करून सगळा राग माझ्यावर काढत होते. आणि मीही सबमिशनमुळे सगळं मुकाट्याने ऐकून घेत होतो. नाहीतर माझ्यावर असं कुणी ओरडल्यावर मी शांत बसलोय असं होण दूरापस्तच. माझ्याकडेही पर्याय नव्हता. मोठ्या तोऱ्यात अॅटोकॅड येत असल्याचं म्हटलो होतो म्हणून की काय सर  मला बारामतीला बोलावत होते. वर्गात डिप्लोमाचे बहुसंख्य मुलं असूनही एकही मुलगा आला नसल्याने बहुतेक सर रागावले होते. मी गेलो असलो पण मला घरी कोणी नसल्याने रात्री जाणं शक्य नव्हतं. माझी रिप्लेसमेंट म्हणून सरांची सगळी बोलणी खाऊन मी डिप्लोमाच्या तब्बेतवान मडंळीपैकी बारामतीचाच असणाऱ्या मंगेश मोरेचा नंबर दिला आणि मोठ्या जबाबदारीतून मोकळं झाल्यासारखा आनंद झाला.
सागर आणि पंकजने रात्रभर जागून शीट तयार केले. दुसऱ्या दिवशी सोमवारच्या साडेसातच्या ट्रेनला घ्यायला दौंडकर मंडळींसह मीही हजर होतो. रोहीतसह आणि स्वप्निलही आला होता. आमच्या तिघांच्या गाड्यांवर भला मोठा शीटचा रोल घेऊन तिघे बसले होते. कसेतरी सावरत आम्ही गाड्या चालवत होतो. सरांचा राग अजूनही शांत झाला नव्हता. अजूनही कोसणं सुरूच होतं. सगळा लवाजमा घेऊन आम्ही आठ - साडेआठ ला कॉलेजला पोहचलो. कॉलेजला सुरू व्हायला वेळ असल्याने चिटपाखरूही हजर नव्हतं. साफसफाई करणारी मंडळी येऊ लागली होती. ड्रॉईंग हॉल उघडून शीटचे तीनही रोल ठेवून पंकज आणि सागर यांना बरोबर घेऊन मी, रोहीत आणि स्वप्निल आम्हा तिघांवर वाटपाची जबाबदारी सोपवून निघून गेले. आम्ही तिघेही रोल मधून एक एक शीट कट करून वेगळे करत होतो. जसं जसे घड्याळाचा काटा नऊच्या पुढ्यात सरकला तशी कॉलेजला तुरळक गर्दी व्हायला लागली. आमच्या वर्गातील मंडळीही दिसायला लागली. ज्याला सबमिशन करायचं होतं तो ड्रॉईंग हॉलमधे येऊन आम्हाला मदत करत होता. शीट तर सगळे व्यवस्थित आले होते. पण कव्हर कमी आले होते. ज्यांना मिळाले त्यांना मिळाले. बाकीचे आमच्याशी भांडत होते आणि आम्ही सरांकडे जायला सांगत होतो. साडेदहाच्या सुमारास शेवटी शीट आणि प्रिंट आऊटचे वाटप झालं आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला. सरही नाश्ता वगैरे करून केबिनमधे बसले होते. एकेकाचं सबमिशन चालू होतं. सगळी धावपळ चालू होती. सगळ्यांचेच फ्लोचार्ट राहिले होते. सुरवातीला गेलेल्यांना हाकलल्यावर आम्ही सगळं व्यवस्थित पूर्ण करून सबमिशन केलं.
पीएल संपून परीक्षेचा काळ सुरू झाला होता. अॅप्लाईड थर्मोडायनामिक्सच्या ओरलला फारसा ताण जाणवला नाही. पुढच्या मागच्याला ओरलच्या दिवशीच मी पहिल्यांदा भेटलो. अधून मधून लेक्चर्सला दिसायचे. मी पुढे बसलेलो असल्याने कधी त्यांच्याशी संपर्कच आला नाही. पुढे निलेश शितोळे म्हणजे आमची भावकीच. आता तो कसा आहे हा काही अंदाज नसल्याने आपलं कोणी तरी जवळ आल्याचा आनंद मावळला. मागे संजय शेळके. एक्स्टर्नल ऐवजी बरेच प्रश्न तोडकरी सरांनीच विचारले. अवघड प्रश्नांची उत्तरं निलेश आणि संजयनेच दिली. सोपी सोपी काही उत्तर मला  देता आली. एफ एम च्या ओरलला एक्स्टर्नल म्हणून अहमदनगरचे प्राध्यापक आले होते. सर खूप कठीण प्रश्न विचारतात असे सुरवातीच्या मुलांचे अनुभव ऐकून मला तर भीती वाटत होती. नेमके माझ्या ओरलच्या वेळी सर बाहेर गेले आणि आमची ओरल गाडेकर सरांनी घेतली. सर बाहेर गेल्याने आमचं निम्म टेन्शन तर गेलं. गाडेकर सरांनी बेसिक बेसिक प्रश्न विचारून आम्हाला लगेच मोकळं केलं. एमडीसीजीचं प्रॅक्टीकलला आलेले दोन्ही प्रोग्राम अगदी तोंडपाठ होते. त्यामुळे पंधरा मिनिटात प्रोग्राम एक्स्टर्नल समोर रन करून झाला. लिमीट फिट टॉलरन्सच्या गणिताकडे मी कधी लक्ष न दिल्याने जरा अवघडच गेला. पण तासाभरात तोही सुटला. एकंदरीत ५० पैकी खुप नाही पण ४० मार्क्स पडण्याची तरी अपेक्षा होती. दोन्ही प्रोगामचे ३० आणि लिमिटच्या गणिताचे १०. फ्रि हॅण्ड स्केच हा प्रकार तसा पाहिला होता. पण नेमकं कितपत बरोबर आहे हे माहित नव्हते. एकंदरीत ओरल आणि प्रॅक्टिकल व्यवस्थित पार पडल्याने सराव सामना जिंकल्यात जमा होता.
ओरल आणि प्रॅक्टिकल नंतर खरा खेळ सुरू होणार होता. पहिलाच पेपर एम थ्री चा असल्याने इंजिनिअरींगच्या पहिल्याच चेंडूवर त्रिफाळाबाद होण्याची भीती होती. त्यात लेक्चर्स बंक केल्याने अजूनच बोंब. वर्गातील पुढच्या बाकावरची हुशार मंडळी आता संपर्कात नसल्याने सगळी हतबलताच होती. डिप्लोमा परिवारातला संभाजी चेमटे म्हणून एका मुलाकडे पाटील सरांनी नोट्स दिल्या असल्याची माहीती होती. पण माझा कसला संपर्कच नव्हता. कशातरी करून नोट्स मिळवल्या पण काही गचामही कळत नव्हता. इंटिग्रेशन, लिमिट सगळं अवघड वाटत असलं तरी स्टॅटॅस्टीक्सचे दहा मार्क मिळण्याची खात्री होती.
एम थ्री च्या पेपरचा दिवस उजाडला. मेकॅनिकलचे नंबर सिव्हिलच्या वर्गात आले होते. एक मॅडम पेपर घेऊन आल्या. मॅडम म्हणजे आता इकड तिकडं बघण्याचा प्रश्नच नव्हता. आणि त्यातही शेजारचं कोणीच ओळखीचं नाही. मॅडम असूनही संजू आणि निलेश दोघांच एकमेकांना विचारून लिहीणे चालूच होतं. आणि त्यात माझ्या आडून संजू बोलल्याचंही दिसत नव्हतं. पेपर पाहून आमच्या डोक्यावर आठ्याच होत्या. पहिले तीन प्रश्न तर उलाटले पण नाहीत. स्टॅटॅस्टीक्स चा प्रश्न फक्त व्यवस्थित सोडवला. १२ मार्क्स पडणार हे गृहीत धरलं होतं. अजून १६ मार्क करता काहीतरी इकडून तिकडून लिहीण्याचा प्रयत्न चालू होता. शेजारच्यांशी अजून फारशी ओळख झाली नसल्याने मोठा प्रश्न होताच. निलेशचा एक प्रश्न पाहून लिहीला पण पुढे बाकी काहीच नाही. मग शेवटचा तास फक्त ज्या किंमती काढता येतील ते करावं म्हणत प्रत्येक प्रश्नातलं जेवढं येईल तेवढं लिहिण्यात गुंतून गेलो. पडतील तेवढे पडतील मार्क्स. मला तर फक्त १६ मार्क्सचीच खात्री असल्याने पहिल्याच चेंडूत त्रिफाळाबाद होण्याची शक्यता खरी ठरल्याची लक्षात घेऊन पुढच्या पेपरचा अभ्यास करण्याकरता निघून गेलो.
पुढचा पेपर अॅप्लाईड थर्मोडायनामिक्सचा होता. तोडकरी सरांचे बरचसे लेक्चर्स केलेले असल्याने तसा बरा पेपर गेला. काही अपवाद वगळता प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला होता. काहीही झाले तरी एटीडीत पास होणारच अशी खात्री वाटत होती. नंतरचे पेपर सोपे होते. एम पी चं बरंचस डिप्लोमाला झालेलं असल्याने एकदम सोपा पेपर गेला. थिअरी लिहायचा मला अजिबात कंटाळा नव्हता. त्यामुळे एम पी ची पण पासींगची चिंता नव्हती. मेटलर्जीही डिप्लोमाच्या एमईएम सारखंच असल्यानं त्याचाही पेपर फारसा अवघड गेला नाही. निलेशला प्रॉब्लेमॅटीक विषयात काहीच अडचण येत नव्हती. पण थिअरी पेपर मधे सुरवात आठवत नसल्याने एम पी आणि मेटलर्जीच्या पेपरला निलेश, मी आणि संजू यांच्याशी बराचसा ताळमेळ बसला आणि आम्ही तिघांनी एकमेकांच्या मदतीने पेपर लिहीला. त्यातल्या त्यात अशक्यप्राय वाटणारी आयर्न कार्बाईडची आकृती मी बरोबर काढली होती. पण दोघांना ती छापताना मात्र जाम त्रास झाला असावा. एफ एमचंही पाय थेरम आणि बर्नॉलिज थेरम समजल्यामुळे तसा बराच पेपर गेला. अभ्सासकर्म निम्मापण शिकवून न झाल्याने जे झालं होतं त्यातंच कसेतरी २८ मार्क्स पाडायचे होते. एकंदरीत एम थ्रीच्या त्रिफाळबाद वगळता इंजिनिअरींगची पहिली ओव्हर मी चांगली खेळून काढली होती.
सागर आणि पंकज या हुशार मंडळींना सोडून मी दौंडकर मडंळीचाच भाग झालो होतो. गेल्या आठवड्यापासून सगळं एकदम पालटलं होतं. सागर, पंकज, वैभव, रोहीत या हुशार मंडळीला सोडून मी दौंडकर मंडळींसोबत राहू लागलो होतो. हळूहळू आता बाकी मुलांशीही ओळख होऊ लागली होती. आमचा चांगला ग्रुप जमू लागला होता. दौंडकर मंडळींसोबत काष्टीमधलाही एक ग्रुप आमच्यात सामाविष्ट झाला होता. मंगेश मोरे शी फोनवरून झालेली ओळख आम्हाला एकत्र आणण्यास पुरेशी ठरली. त्याच्याशी ओळख झाल्यावर दुसऱ्या सेमिस्टरच्या सुरवातीलाच श्रीकांत नागवडेशीही ओळख झाली. तब्बेतवाली सगळी माणसं आता मित्र झाली होती.  मंगेशची रूमही माझ्या जायच्या रस्त्यात असल्याने जाणंयेणंही वाढलं. त्याच्या रूमवरचा मित्रपरिवारही मला जोडला गेला. महेश बांडे, जयदीप नलावडे, निलेश कोलते, प्रणीत समगीर, शेखर मोरे, रणजीत ननावरे, रोहीत बनसोडे, मिलींद पोळ, दिलीप, पिस्तुल्या अशी बरीच मंडळी ओळखीची झाली. त्यापैकी महेश बांडे, जयदीप नलावडे, निलेश कोलते हे वर्गात असल्याने अधिक जवळचे झाले. तर मंग्याचे मित्र असणारे शेखर मोरे, रंजीत ननावरे, रोहीत बनसोडे ही बैठकीतले झाले. श्रीकांतच्या रूमवरील पवन काळे आणि निलेश कापरेही मित्रपरिवारात जमा झाले होते. एकंदरीत कट्ट्यावर मैफिल जमायला आता पुष्कळशी मंडळी जमली होती.





गणेश दादा शितोळे
(१२ मे २०१७)






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा