मी रोज हळूहळू मरतोय...!!!
सुप्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेता कवी पाब्लो नेरुदा ची अनुवादित
"तुम्ही मरताय हळूहळू..." कविता वाचली आणि जाणवलं. हो, खरंच मी रोजच मरतोय हळूहळू.
मी आजवर खूप हिंडलो, फिरलो. डिप्लोमा आणि डिग्री फिरण्यातच गेली. कोझिकोडे पासून सुरू झालेला प्रवास गणपतीपुळेच्या समुद्रकिनारी धमाल मस्ती करण्यापर्यंत चालूच होता. अगदी इतका की गाडीचं मीटर आता बंद पडेल की काय म्हणून स्पीडोमीटर बंद करायची वेळ आली आहे. पण आता तसं होत नाही. आता वर्ष होऊन गेलं. करिअर या गोंडस नावाखाली अडकून पडलोय. एस ए पी नावाचा नवीन ज्ञानप्रवास सुरू झाला आणि प्रत्यक्षात धमाल, मस्ती करावासा वाटणारा प्रवास कायमचा थांबला आहे असंच वाटतं. आता कॉलेजमधे असतानाचा पंधरा दिवसांचा प्रवास आता नाही केला जात, भटकंती हा प्रकार तर थांबलाच आहे. हो म्हणून पाब्लो नेरुदा म्हणतोय तसं रोज हळूहळू मरतोय असंच वाटतंय...
"तुम्ही मरताय हळूहळू..." कविता वाचली आणि जाणवलं. हो, खरंच मी रोजच मरतोय हळूहळू.
मी आजवर खूप हिंडलो, फिरलो. डिप्लोमा आणि डिग्री फिरण्यातच गेली. कोझिकोडे पासून सुरू झालेला प्रवास गणपतीपुळेच्या समुद्रकिनारी धमाल मस्ती करण्यापर्यंत चालूच होता. अगदी इतका की गाडीचं मीटर आता बंद पडेल की काय म्हणून स्पीडोमीटर बंद करायची वेळ आली आहे. पण आता तसं होत नाही. आता वर्ष होऊन गेलं. करिअर या गोंडस नावाखाली अडकून पडलोय. एस ए पी नावाचा नवीन ज्ञानप्रवास सुरू झाला आणि प्रत्यक्षात धमाल, मस्ती करावासा वाटणारा प्रवास कायमचा थांबला आहे असंच वाटतं. आता कॉलेजमधे असतानाचा पंधरा दिवसांचा प्रवास आता नाही केला जात, भटकंती हा प्रकार तर थांबलाच आहे. हो म्हणून पाब्लो नेरुदा म्हणतोय तसं रोज हळूहळू मरतोय असंच वाटतंय...
मी वाचतच नाही काही असं होत नाही. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा काहीतरी वाचतच असतो. पण एस ए पी त प्रवेश घेतल्या पासून वाचनाच्या प्राथमिकतेतही फरक पडलाए. रिकामा वेळ मिळाला आणि एखादं आवडीचं पुस्तक घेऊन वाचायला सुरुवात केली तर मधेच एस ए पी ची आठवण होते आणि. मग एस ए पी हाना, जिएसटी संबंधित वाचन सुरू होते. त्यामुळेच की काय मौनातली भाषांतरे वाचूनही जगण्याच्या हाका कानावर पडल्याच नाहीत. आणि मग महिन्यात एक पुस्तक वाचण्याची सवयही खंडीत व्हायला लागली की मी स्वतःलाच कोसू लागतो. पाब्लो नेरुदा जे म्हणतो की
याचा अर्थ, तुम्ही मरताय हळूहळू" हे खरंच वाटतं. अगदी पूर्णसत्य..."चुकून कधी नाही देत, तुम्ही स्वत:च्याच पाठीवर शाबासकीची थाप.
एस ए पी मध्ये आल्यापासून कायम वाटतंय की मी स्वत:चं मन मारून, तडजोड करून जगतोय. कारण प्रकाशवाटेच्या शोधात प्रकाशवाटेलाच मिळण्याच्या दिशेने निघालेला मी कुठेतरी मधेच भरकटलोय. खरतंर जायचं होतं एकीकडे आणि चाललोय भलतीकडे. हेमलकसाची वाट विसरून हा मुंबई पुणे मुंबई प्रवास कसा सुरू झाला हे कळतंच नाही. अमक्या करता हे करायचं, तमक्या करता हे करायचं यापलिकडे जाऊन मी माझ्या स्वप्नांकरता काय करतो हा प्रश्न पडला की पाब्लो नेरुदा म्हणतो ते पटतं की मी रोज हळूहळू मरतोय...
अनेकदा असं होतं की आपलं कुणाशी मनातलं साचलेलं सगळं काही बोलायचं असतं. ती व्यक्ती जवळ नाही म्हणून फोनवर नंबरही शोधला जातो. फक्त डायल करण्याचा अवकाश असतो. पण थांबतो हात मधेच. नको बोलायला काही. असा अर्थ घेत घेत अनेक आपली माणसं दूरावली. मनात खरतंर खंत वाटते पण बोलण्याचं धाडस होत नाही. कारण आपणच वाट बदललीय. तेव्हा मात्र पाब्लो नेरुदा म्हणतो ते खरं वाटतं की हो खरंच रोज हळूहळू मरतोय.
एस ए पी मधे येऊन एवढा सवयींचा गुलाम झालो आहे की एस ए पी पलिकडे आपलं काही वैयक्तिक आयुष्य आहे हेच विसरलोय. अगदी सुट्टीला घरी आलोय आणि मित्रांशी बोलतोय तरी मनात दोन दिवसानंतर ऑफिसला गेल्यावर बाकी राहिलेल्या कामाची चिंता रहाते. मग वाटतंय की एस ए पी च्या विश्वात आपण बंदिस्त झालोय. त्याच्या पलिकडे जाऊन काही करण्याचा अधिकारच उरला नाही. मग पाब्लो नेरुदा म्हणतो ते पटतं. रोज त्याच त्या मळक्या वाटेवर चालताना मी हळूहळू मरतोय.
सगळं निरस वाटायला लागले आहे. एस ए पी सोडून जावं आपण पुन्हा प्रकाशवाटेच्या शोधात नव्याने. सापडेलच काही ना काही नविन. पण नवीन दिवस उगवला की चूकूनही कधी नव्या रस्त्यानं जाऊन पाहण्याचा विचार होत नाही अन आलाच तरी सवय झालेली पावले चूकून कधी वाट चूकत नाहीत. रोज तेच रूटीन आणि तीच सभोवतालची माणसं. परक्या अनोळखी माणसांना भेटण्याचा संबंधच येत नाही. आणि आलाच कधी कुठे तरी एस ए पी च्या पलिकडे त्यांच्याशी काही बोलत नाही. रोज तेच रोजचेच संवाद. चला चहा घ्यायला ते चला उद्या भेटू. रोजच्या आयुष्यात नाविन्य ते काय उरलंच नाही. आहे ते हेच की रोज मेंदूला अन मनाला वेगळ्या प्रकारे ताण देणे. मग पाब्लो नेरुदा म्हणतो ते पटतं की मी रोज हळूहळू मरतोय.
सभोवताची रंगीबेरंगी दुनिया पाहिली की वाटतं फेकून द्यावेत चौकटीत अडकलेले अंगारखे. चढवावा आपणही माणुसकीचा कुर्ता नवीन अन असावा आपलाही वेगळा बाज. पण त्यातही आवडनिवड आडवी आलीच. रंगाचीही झालीए वाटणी. नशीब अजून रक्ताने तरी एकच लाल रंग ठेवलाय. उद्या इंद्रधनुष्यावर हक्क सांगायला लागलं कोणी की मात्र अवघड व्हायचं. आणि म्हणून लोकांना काय वाटतंय च्या नादात अन राहून गेले अंगावर चढवायला नवेकोरे पूर्वी न वापरलेले रंग. आणि मग पाब्लो नेरुदा म्हणतो ते पटतं की आपण रोज हळूहळू मरतोय..
पाब्लो नेरुदा म्हणतो तसं छातीत धडधडतच नाही असं नाही काहीच. जगायचं पॅशन काय हेही विसरलो नाही. पण छातीची धडधड आणि जगण्याच्या ध्येयापलिकडे जाऊन कर्तव्यांचा अडसर दूर होत नाही. माझं जगण्याचं पॅशन आहे, छातीतली धडधड आहे म्हणून मी एस ए पी या नव्या विश्वात आलो असं काही नाही. कधीकधी इतरांच्या भावनांना जपण्यासाठी आपल्या भावनांना, ध्येयाला आडकाठी करावी लागते इतकच त्यामागचं कारण आहे. पाब्लो नेरुदा म्हणतो तसा भावनांचा अतिरेकी कल्लोळ आतल्या आत जाणवतो. आपली आपल्या ध्येयापासून नाळ तूटतेय हेही जाणवतं. अगदी इतका भावनांचा उहापोह होतो की एका क्षणी काहीही वाटत नाही. आसुसलेले गालही कोरडेच पडतात आणि मग पाब्लो नेरुदा म्हणतो ते पटतं की मी रोज हळूहळू मरतोय....
अनेकदा एस ए पी च्या कामात मन रमत नाही असं वाटतं. रोज तेच आयुष्य. अन कधी त्यावरून कुणी ओरडलं की इतका वीट येतो, की सोडून द्यावे सगळं आणि जाव आपण आपल्या प्रकाशवाटेच्या शोधात. कर्तव्यांची परतफेड होऊ शकत नसली तरी प्रयत्न म्हणून त्याच खूर्चीला चिकटूनच बसलोय. अनेक मित्रांशी नाही उरलं आता पूर्वीसारखं नातं. आमच्यातील मैत्री च्या गाठीचे दोर कधीचेच सुटून गेलेत. प्रेम आपली सगळं संपलंय तरी, ओळख उरलीए म्हणून धरून ठेवलंय तेच नातं. अजूनही वाटतं. आमची मैत्री पुन्हा पहिल्या सारखी होईल. माहिती आहे स्टिकर्स एकदा काढला की परत चिकटत नाही आणि मग पाब्लो नेरुदा म्हणतो ते पटतं की मी रोज हळूहळू मरतोय....
पाब्लो नेरुदा म्हणतो तसं मलाही वाटतंच की स्वत:च्या स्वप्नांसाठी स्वत:ला झोकून द्यावे. बदलावं चाकोरीबद्ध झालेलं आयुष्य आणि घ्यावी क्षितीजाच्या शोधात झेप. पण एकदा एस ए पी मुळे घेतलेला आयुष्य बदलण्याचा धोका कर्तव्यांची जाण ठेवत आता घेता येणं शक्य नाहीच.
कर्तव्यपूर्ती करताना तोलूनमापून सुरक्षित जगण्याचे सल्ले झुगारून देण्याची इच्छा असली तरी या गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त होता येत नाही. कारण स्वत:ला स्वत:साठी जगत आयुष्य बदलण्याची एक संधीही द्यायला कचरायला लागलो की मग पाब्लो नेरुदा म्हणतो ते पटतं की मी रोज हळूहळू मरतोय....
गणेश दादा शितोळे
(१३ मे २०१७)
(१३ मे २०१७)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा