आजकाल रोज असंच होतंय...!!!
रोज रात्री झोपताना मनात एक विचार कायम येतो...
"अरे आज काय तरी लिहायचं होतं."
मोबाइलचा ड्राफ्ट उघडला जातो. क्षणभर थांबून मनातलं शब्दांत उतरायला सुरूही होतं. पण अचानक काय होतं कळत नाही. मन एकदम स्तब्ध होतं. खरतंर समोर काहीही लक्ष देऊन पहाण्यासारखं नसतं. भिरभिरत्या पंख्याकडं पहात नजर एकटक होते आणि मी वेगळ्याच विश्वात प्रवेश करतो.
कुणी त्याला स्वप्नांची दुनिया म्हणतं. कुणी भास म्हणतं. पण मला ती माझी आठवणींची जागाच वाटते. हळूहळू एकेका आठवणींच्या गल्लीतून मन फिरू लागलं की मात्र सगळाच गोंधळ उडतो. काय चाललंय माझं मलाही कळत नाही. घडीत एकटाच हसतो आणि घडीत नकळत एखादा थेंब गालावरून ओघळतो. डोळे मिटेपर्यंत ही प्रवासाची गोष्ट सुरूच असते. जणू भिरभिरणार्या पंख्याच्या पात्यांसारखं मन भिरभिरत रहातं. पुन्हा नव्याने जाग येईपर्यंत.
तोपर्यंत मोबाईलचा ड्राफ्टही तसाच उघडा असतो. बोटंही लिहिण्याच्या प्रतिक्षेत थांबलेली असतात. आणि पुढच्या क्षणी कुठल्यातरी आवाजानं मन भानावर येतं. भिरभिरणार्या पंख्याच्या पात्याकडं पाहून विचार करू लागतं. आपण याच्याकडं का टक लावून बघत होतो. क्षणभर उत्तराची वाट बघते आणि पुन्हा एकदा डोळे मिटून घेते.
आजकाल रोज असंच होतंय.
गणेश दादा शितोळे
(१० मे २०१७)
(१० मे २०१७)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा