आयुष्यातला कसोटीचा प्रसंग...!!!
आयुष्यात कधी ना कधी अशी वेळ येते की जिथे आपल्या कसोटीचा प्रसंग असतो. आयुष्यही आपण अशा प्रसंगातून नेमका कसा मार्ग काढत आहोत याचीच वाट पहात असते. अपेक्षा, जबाबदारी अन कर्तव्य यांची सांगड घालताना आपल्याला असे निर्णय घ्यायला लागतात की ज्यातून इतरांच्या अपेक्षा अन जबाबदार्या पूर्ण करताना एकतर आपल्या अपेक्षा अन मतांना मुरड घालावी लागते. यात अनेकदा आपल्याच माणसांकडून भावनिक आवाहन करण्यात आले की आपल्यात एक हतबलता येते आणि मग आपल्याला प्राधान्य द्यावे लागते. त्यांचे अनुभव असतात अन आपली मतं असतात.
विरोधी मतं असली की मग हेच अजून कसोटी पहाणारं ठरतं. आणि मग असं अवघड जागेचं दुखणं बनतं की ते बोलता येत नाही कारण आपलीच माणसं दुखावण्याची शक्यता असते. अन सहनही करता येत नाही कारण आपल्या मतांविरोधी वागणं सहजपणे जमत नाही. अशा परिस्थितीत आपली असणारीच आपल्या विरोधात असल्याने आपण एकाकी पडल्याचंच होतं. आपल्याला काय वाटते आहे ते ऐकून घ्यायलाच कुणी तयार नसल्याने मग चिडचिड होते. आणि भावनेच्या भरात आपण निर्णय घेतो. कधी आपल्याच लोकांची भावनिक आवाहनाची चाल यशस्वी होते तर कधी आपली माणसं सरळ सरळ संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर टाकून मोकळे होतात आणि निर्णय घेण्याचं स्वातंत्र दिल्याची भूमिका घेतात. त्यांची ही बाजूही भावनिक आवाहनच असते. त्यामुळे अशा द्विधा मनस्थितीत खरतर आपल्याला समजून घेणारा अन समजावून सांगणार्या व्यक्तीची जास्त गरज भासते.
सध्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीत मनाची अशीच गोंधळलेली परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि एकाकी पडल्याचं जाणवतं.
गणेश दादा शितोळे
(२३ मे २०१७)
(२३ मे २०१७)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा