सोशल नेटवर्किंग साईट्समधे हरवलेला संवाद...!!!
घरच्या समारंभातून मोकळा वेळ मिळाल्याने जरा आपल्या लेखक कवी मित्रमैत्रीणींच्या ब्लॉग ला चाळत बसलो होतो. अशातच एका मैत्रिणीचा ब्लॉग वाचनात आला. तशी ती नियमित लेखन करायची. पण मला ब्लॉग वाचताना नवीन असं काही दिसलं नाही म्हणून मी आपला व्हाटस अप वरून मेसज केला. लेखनाशी आणि इतर बाबतीत बरेचसे लिहिले होते त्यात. एवढं सगळं वाचून झाल्यावर तिनं एकही रिप्लाय दिला नाही. सहसा असं होत नसल्याने मी चकीत होऊन परत मेसेज टाकला. तेव्हा तिने दिलेला एक रिप्लाय मला माझी चूक दाखवून देत होता.
बरेच दिवस झाले होते आमचा संपर्क नव्हता. एकमेकांचे लिखाण वाचून त्यावर प्रतिसाद द्यायचो. पण संपर्क असा नाहीच. एकमेकांविषयीच्या बर्याच गोष्टी आम्हाला सोशल नेटवर्किंग साईट वरूनच समजत असायच्या. मी मेसेज मधे लिहिले ती सध्या काय करते याविषयी फेसबुकवरच्या माहिती वरून बरेचसे लिहिले होते. तेव्हा तिचा एक साधासा रिप्लाय होता की, मी कशी आहे, काय करते, काय लिहीत आहे, वाचत आहे याची माहिती घेण्यासाठी फेसबुकवर सहा महिने जून्या पोस्ट वाचल्या. ब्लॉग वाचून काढले. मात्र साधासा एक फोन करावासा वाटला नाही का..? दोन मिनिटात सगळं समजलं असतंच ना...!
तिचं हे बोलणं मला इतकं टोचलं की कालची रात्र झोप उडवली. तिचं काहीही चुकलं नव्हतं. सोशल नेटवर्किंग साईट ने इतकं अभासी केलं आहे की नात्यातील संवाद संपला आहे. असे अनेक मित्र आहेत की फेसबुक आणि व्हाटस अप आल्यानंतर त्यांना फोन केल्याचंही आठवत नाही. एक काळ होता की त्यांना फोन केल्याशिवाय दिवस जात नव्हता. सोशल नेटवर्किंग साईट वर बोलून मोकळे होता येतं पण प्रत्यक्षात त्या व्यक्तीशी बोलणं अवघड जातं. अनेकदा हेच जाणवलंय की तासनतास बोलणार्या मित्रांशी आता भेटल्यावर हाय बाय च्या पलीकडे जाऊन फार तर फार दोन मिनिटे बोलता येतं. सोशल नेटवर्किंग साईट ने नात्यातील अंतर कमी केलं असं वरवर दिसतं खरं पण वास्तवात संवादाचं अंतर वाढत चाललं आहे हेही खरंच.
पुण्यात येऊन तसं आता वर्ष उलटलं. पुण्याच्या प्रत्येक कानाकोपर्यात मित्र परिवार आहे. पण वर्षभरात ठरवून कोणाशी भेट झाली असेल. कामाचं बिझी शेड्युल हे फक्त सांगायला कारण असेल पण खरं बोलायचं तर प्रत्यक्ष भेटून बोलण्याची हिंमत होत नाही. कारण भेटल्यावर काय बोलायचं इथूनच सुरवात असल्याने कित्येक भेटी टाळल्या आहेत. एक फोन करायला कितीसा वेळ लागतो पण तो करायलाही हिंमत होत नाही. कारण हेच आहे की सोशल नेटवर्किंग साईट वर चॅटिंग सहजतेने करता येईल पण प्रत्यक्ष बोलायचं म्हटलं की अवघड होतं. इतरांचं माहिती नाही. पण माझं तरी निदान असंच होतं. अनेक मित्रांशी खरंतर बोलायचं खूप असतं. कडाडून भेटायचंही असतं. पण डायल केलेला फोन कट करण्याच्या पलिकडे जाऊन प्रत्यक्षात दोन शब्द बोलण्याची हिंमत यायला अजून अवकाश आहे.
सोशल नेटवर्किंग साईटने सोशल संवाद वाढवला. पण मनामधला संवादाचा दूवा तोडण्याचं काम केलं याची खंत कायम वाटत रहाते. याच तुटलेल्या तारा जोडण्याचा प्रयत्न करण्याकरताच महाविद्यालयीन जीवनावर आधारित पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानिमित्ताने का होईना पण त्या मित्र परिवाराशी पुन्हा एकदा तेच जुनं संवादाचं नातं जोडलं जाईल. तोपर्यंत हिंमत एकत्र करण्याचा प्रयत्न चालूच आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा