माझ्या मनातलं...!!!
कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!
आठवणींचा कचरा...!!!
सकाळी सकाळी ऑफिसला जायची गडबड असताना अजित ची एक कविता वाचली आणि मग प्रतिसाद देत हे असं जे मनात आलं ते लिहिलं.
बरंच काही साचलेले असतं. पण आपणच लिहायचे टाळतो. ज्या त्या गोष्टीनं तेव्हाच व्यक्त झालं पाहिजे. नाहीतर मग मनात आठवणींचा कचरा होतो. माहिती असतं त्या आठवणींचं आपल्याच मनाच्या वाढीकरता उपयोगी पडणारं खत होणार आहे. पण काही आठवणी अशाही उरतात ज्या मुळे उगाचच आपल्याला त्यातून वेगळा गंध येतो.
कधी अविश्वासाचा...
कधी अहंकाराचा...
अन कधी इर्षेचा...
त्यामुळे योग्य वेळी योग्य ते असं कुठेतरी व्यक्त झालं की बरं वाटतं. मनाचा आठवणींचा कचरा डेपो होऊन द्यायचा नाही कधीच. मन कायम आठवणींच घर रहायला हवं. ज्या ठिकाणी सगळे काही सामावलंय. म्हणजे आपल्याला आपल्या घराविषयी जशी ओढ लागते तशीच ओढ या आठवणींच्या घराचीही लागते. इथेच भेटत रहात सगळे गेलेले क्षण. फक्त नाजूकसा एक उंबरठा ओलांडायचा असतो. बाकी स्वैर फिरायचं नुसतं.
गणेश दादा शितोळे
(८ मे २०१७)
Share
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा