माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

रविवार, २३ एप्रिल, २०१७

 

संस्कृती...!!!


                       नुकतेच कामानिमित्ताने मुंबईला जाण्याचा योग आला. मुंबई म्हटलं की गर्दी आणि ट्रॅफिक जाम यापलिकडेही काही आहे याचा अनुभव मुंबईत गेल्या वर येतोच. सर्वात महत्वाचे म्हणजे पुणेकरांना शिकण्याची गरज असणारी वहातूक शिस्त. एकंदरीत मुंबईत वास्तव्यास असताना प्रत्येक वेळी मुंबई आणि पुणे यांची तुलना व्हायचीच. मुंबई आणि पुणे यामधे ठळकपणे जाणवणारा फरक म्हणजे समुद्रकिनारा. 

                      माझं काम करण्याचं ठिकाण नरिमन पॉइंट ला असल्याने रोजच टॅक्सीने जाताना मरीन ड्राईव्ह चौपाटीवरून जाण्याचा योग यायचा. टॅक्सीमधून मरीन ड्राईव्ह चौपाटीवर नजर टाकली की एक हमखास दिसणारं दृष्य म्हणजे सकाळच्या चटकणार्‍या उन्हात समुद्रकिनारी यथेच्छ रममाण होऊन गेलेली जोडपी. अशी जोडपी बसली की चर्चा आल्याच. त्यामुळे ह्यावर रोजच टॅक्सी प्रवासात चर्चा व्हायची. अनेकदा ही संस्कृती आपली नव्हे असाच सुर असायचा. पण मनातून आपलं हे करायचं राहून गेल्याचंच खटकत असल्याचं जाणवलं. या निमित्ताने परदेशी संस्कृती, कल्चर यावर खडे फेकणंही आलंच. काय तर म्हणे मरीन ड्राईव्ह वर दिसणारं आपलं कल्चर नव्हे. खळखळार्‍या लाटांनी बेबंद वहाणारा समुद्र, मंद वहाणारी मुक्त हवा आणि समुद्रकिनारा यासोबत कोणी अखंड प्रेमात बुडलेलं असेल तर काय गुन्हा झाला...? 
प्रेम करणे हा कोणता गुन्हा...? 
आणि कोणत्या संस्कृतीच्या गप्पा...? 
गोव्यातील समुद्रकिनार्‍यासारखी विशिप्त संस्कृती तर दिसत नाही ना..? 
मग ह्या संस्कृती रक्षकांना एवढी चिंता कशाची..?
                      देशभरातील समुद्रकिनार्‍यांवरची परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्र आणि मुंबईने आपलं वेगळेपण जपले आहे. संस्कृती आणि वैविध्यानेही. आणि संस्कृती संस्कृती काय गप्पा मारतो... समुद्राकिनारी प्रेम करायला यायचं नाही मग काय कचरा आणि घाण टाकून प्रदूषित केलेला समुद्र किनारा पहायचा..? परदेशी संस्कृतीचा एवढा तिटकारा वाटतो तर पहिल्यांदा परदेशी लोकांकडून स्वच्छतेचे गुण शिकले पाहिजेत. हुंडाबळी, घटस्फोट, पत्रिका पुराणाच्या नावाखाली चालणाऱ्या देशी संस्कृतीने रोज काढलेले वाभाडे कोणत्या शहाणपणाने ही संस्कृती रक्षक मंडळी खपवून घेते..? 
                      आपली संस्कृती संस्कृती च्या टिमक्या मारण्याअगोदर आपल्या संस्कृती प्रथा आणि परंपरामधील घाण अगोदर काढून टाकली पाहिजे. मग दुसर्‍याला दोष दिले पाहिजेत.



गणेश दादा शितोळे
(२३ एप्रिल २०१७)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा