माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शनिवार, २६ डिसेंबर, २०१५


आयुष्य असंच जगत गेलो...



लहान होतो तेव्हा प्रत्येकवेळी,
पायवर उभा रहाण्यासाठी झगडलो...
वय वाठत गेलं तसं,
वयासोबत पाय घट्ट रोवत गेलो...

आयुष्याकडं पहाता पहाता,
मी आयुष्य जगत गेलो,
संकटं आली अनेक तरी,
 प्रत्येक गणितं सोडवायला गेलो...

अनेकदा पडलो, जखमी झालो,
पण पुन्हा उभा रहात लढत राहिलो,
अविश्वास गैरसमजाच्या गर्तेतही,
पोहत पोहत विश्वासाच्या किनाऱ्यावर पोहचलो...

काळासोबत चालता चालता,
छोट्या छोट्या आनंदात सहभागी होत गेलो...
आकडेमोड करत आनंद दु:खीची,
प्रत्येकवेळी आनंदाची बाकी आणत गेलो...


गणेशदादा शितोळे
२६ डिसेंबर २०१५




गुरुवार, २४ डिसेंबर, २०१५


निर्भया बलात्कार खटला आणि आपण







(कृपया कोणी अमक्या एकाची बाजू घेतली असा गैरसमज करून घेऊ नका. ही सध्याची सत्य परिस्थिती आहे.  याउपरही कोणाला ही भूमिका तशी वाटत असली तर ते मोकळे आहेत.)
नुकताच निर्भया बलात्कार खटल्यातील बाल गुन्हेगार मोकळा सुटला. खरंतर ही भारतीय न्याय व्यवस्थेबाबत खंत व्यक्त करणारी गोष्ट आहे अन शरमेची गोष्ट आहे. पण त्यावरूनही शरमेची ही बाब आहे की सध्या आमीर खानची पत्नी किरण राव वर पोस्ट फाॅरवर्ड करण्यात येत आहेत.  
" डियर अमीर खान जी !!
निर्भया के क्रूर हत्यारे बलात्कारी मोहम्मद अफरोज रिहा हो गया है..अपनी बेगम ''किरण'' से पूछिये डर तो नहीं लग रहा है..?" 
मुळात आपल्याला कोणत्याही गोष्टीला सिरियसली घेण्याची सवय नाही. पण जो प्रश्न किरण राव ला विचारणार आहोत तोच कोण्या आपल्या माता भगिनीला विचारला तर येणारं उत्तर एकदा तपासून बघा. आपल्या माणसावर अन्याय करणारी व्यक्ती पुन्हा मोकट सुटल्यावर येणारी चिड अनुभवून बघा. 
खरंच आज महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात महिला सुरक्षित आहेत..?आपलं जर उत्तर हो असेल तर मग रोज पाऊस पडवा तसा महिला अत्याचारांचा सडा का पडत आहे..?रोजच बलात्कार, विनयभंग,  छेडछाड असे प्रकार का घडत आहेत..?दिल्लीतल्या निर्भयासारख्या कित्येक निर्भया रोजच बळी पडतात याचं नक्की गांभीर्य आहे का..? 
जर रोजच्या वाढत्या महिला अत्याचारांच्या घटना वाढत असतील तर भारतात महिला सुरक्षित आहेत या म्हणण्यालाच धक्का पोहोचतो. पण आपल्याला त्याचं गांभीर्य नाही. निर्भयाच्या जागेवर आपलं कुणी असतं तर आपल्याला याची जाणीव झाली असती हेच तथ्य आहे. 
मग या अशा असुरक्षितेतच्या वातावरणाबाबत एक अभिनेत्री प्रश्न उभा करते तेव्हा आम्हाला देशद्रोह का वाटावा..?किरण राव ऐवजी आपली कोणी व्यक्ती आपल्याला असं म्हटली असती तर आपल्याला देशद्रोह वाटला असता का..?विचार करा एकदा. 
महिला अत्याचारात भारत जगातील एक प्रमुख देश ठरावा यामागचं गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे... 
दुसरी गोष्ट ही की आपली न्याय व्यवस्था किती कमकुवत आहे याची नुकतीच ओळख झाली असेलच..चार जणांना चिरडणारा सलमान खान निर्दोष ठरतो अन रविंद्र पाटील सारखा पोलिस निष्कारण मृत्यू पावतो...दिल्लीतल्या निर्भया बलात्कार प्रकरणातील बाल गुन्हेगार मोकळा सुटतो. 
या अशा घटनांनी न्याय व्यवस्थेवरचा विश्वास कमी होत आहे.अशा घटनांनी न्यायालयापेक्षाही आपली मानसिकता बिघडत चालल्याचंच लक्षात येतं....एखाद्या गोष्टीचा विनोद करण्याअगोदर त्याचं गांभीर्यही लक्षात आलं पाहिजे.  
प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट आपल्या बाबतीत घडल्यावरच आपण जागे होणार का..?आपल्या कोणा व्यक्तीवर किंवा आपल्यावर परिस्थिती ओढावल्याशिवाय आपल्याला गांभीर्य येणार नाही का..?
विचार करा...


 गणेशदादा शितोळे
(२४ डिसेंबर २०१५)


रविवार, २० डिसेंबर, २०१५

अशी जहाली शब्दांची मोरपिसे...


अशी जहाली शब्दांची मोरपिसे...


आज माझ्या शब्दांच्या मोरपिसांचा सातवा वाढदिवस.
“शब्दा, वाढदिवसातच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा.”  
                    आज शब्दांच्या मोरपिसांवर काय लिहावे समजेना. कारण आजवर या शब्दांच्या मोरपिसानेच भरपूर लिहिले आहे. नुकतेच मित्राचे लग्न झाले.  त्यावेळी या शब्दांची मोरपिसं नावावर बरीच चर्चा रंगली. अनेकांनी एकच प्रश्न विचारला.“तू नक्की हे शब्दांची मोरपिसं नाव का दिलं..?”                तेव्हा या प्रश्नावर उत्तर देता आलं नाही. पण आज शब्दांच्या मोरपिसांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते राहिलेलं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.

अशी जहाली शब्दांची मोरपिसे...

ही कथा आहे माझीमाझ्या शब्दांचीया शब्दांच्या मोरपीसाचीमी लिहिले त्या प्रत्येक लिखाणामागं असणार्‍या प्रेरणेची.
दि२० डिसेंबर २००७. वेळ सायंकाळीची होतीमी डिप्लोमाच्या पहिल्या वर्षाला असताना ची गोष्टत्या दिवशी दीड एक महिन्यानंतर घरी चाललो होतोसाधारतः दुपारच्या तीन वाजता रेल्वे स्थानकावर पोहोचलो असेलगाडीला यायला अवकाश होतात्यामुळे ट्रेन मध्ये तीन चार तासांच्य् प्रवासात काहीतरी वाचायला घ्यावं म्हणून नजीकच्या बुकस्टॉलवरून एक पुस्तक विकत घेतले होते.
छोटंच होतंदोनशेच्या आसपास पानं असतीलनाव होतं"तो अन ती". एका कॉलेजवयीन लेखकानं लिहिलेली एक कॉलेजवयीन कथानावावरून जशी ती प्रेमकथा होती तशीच ती पुस्तकातूनही साकारली होती.
साडेतीन च्या आसपास ट्रेन आलीफारशी गर्दी नव्हतीत्यामुळे आरामात जागा मिळालीएक विंडो सीट पाहून मीही एका डब्यात बसलोनेहमीच्या शैलीत मोबाईलवर मराठी गाणी लावून हेडफोन्स कानात सरकवले अन पुस्तकात मुंडकं घालून पहिलं पान उलटलंपुस्तक वाचताना लोक प्रस्तावनालेखकाचं मनोगत फारसं वाचत नाहीतपण मी अगदी पहिल्या पानावर असणार्‍या पब्लिकेशन पासून वाचायला सुरवात केली होती. एकूणच लेखकाच्या मनोगतावरून वाटलं की ही तो अन ती ची गोष्ट लेखकाच्या आयुष्यात घडलेली सत्य घटना असावीप्रस्तावना मनोगत वाचून एकदाचं प्रेमकथेचं पहिलं पान उलटलं.
गाडीने अहमदनगर पार केलेलं होतंया प्रवासातच नगरमधूनच एक फॅमिली माझ्या सोबत डब्यात बसलेली होतीएक चष्मा लावून बसलेले गृहस्थ अगदी समोरच्या बाकड्यावर बसलेले होतेशेजारी एक मध्यमवयीन महिला होतीबहुतेक पत्नीच होतीदोन विन्डो सिट्सवर मुलगा मुलगी बसलेली होतीसमोरच्या व्यक्तीलाही बहुतेक माझ्या सारखंच वाचनाची आवड असावीमला आवड म्हणण्यापेक्षा वाचन म्हणजे सवड तेव्हा आवड असा प्रकार होताती व्यक्तीही चष्मा लावून पुस्तक वाचत होतीकर्मयोगीनीगाडी मंद आचेवर एखादा पदार्थ तळल्यासारखी सावकाश सुरू होतीनेहमीच्या प्रवासाने या गोष्टीची सवयच झाली होती.
प्रेमकथेच्या सुरवातीला पात्रांची ओळख करून दिली होतीकॉलेजला कसे आलेभेटलेमैत्री कशी झाली वगैरे वगैरेअर्धा तास झाला असेल की ट्रेन सारोळ्यात क्रॉसिंगला थांबली अन मी पुस्तकात गुरफटलेलं डोकं वर काढलंहेडफोन्स काढले अन आपसूकच माझ्या तोंडातून एक वाक्य बाहेर पडलं,
“शीटहे ट्रेनचं नेहमीचंच झालंयसारख्या क्रॉसिंग.
तसं तर मी स्वतःशीच फस्ट्रेशनी बोललो होतोपण तितक्यात समोरच्या व्यक्तीनंही माझ्या हा मधे हा मिसळत उत्तर दिलं.
“होनायतर कायगेली अनेक वर्षे मी प्रवास करतोय पण दरवेळी पहिले पाढे पंचावन्नच...!
एकंदरीत अशा पद्धतीने आमच्यातील संभाषणाला सुरवात झालीकाही वेळातच ट्रेन सुरू झाली अन आमच्या गप्पाहीओळख झालीकोण काय करतंयट्रेनच्या प्रवासातल्या आठवणी असं थातूरमातूर बरंच बोलणं झालं.
नाव होतंश्रीअशोक बाळासाहेब पाटीलमराठी विषयाचे शिक्षक होतेरयत शिक्षण संस्थेच्या शाळेतपत्नीही शिक्षकाच होत्याचारपाच वर्षांपूर्वी बदली झाली अन नगरला स्थायिक झालेलेशेजारच्या खिडकीत बसलेली दोन मुलंश्रीकांत अन प्रियासमवयस्कच होते मलाश्रीकांत गेल्या वर्षी दहावी पास झाला होताअन प्रिया दहावीला होती.
ओळख परेड झाल्यावर आमचा विषय आला पुस्तकावरसर अहिल्याबाई होळकरांचं कर्मयोगीनी पुस्तक वाचत होतेसरांनी मला माझं मराठी भाषा अन मराठी पुस्तकावरचं मत विचारालंम्हणजे मला नेमकं काय वाटतं.? नेमकी कोणती पुस्तकं वाचलीत...? असंमीही नुकताच दहावी पास होऊन आलेलो असल्याने मी काय मत देणार..? अन वाचनचं तर सवड तर आवड असंच असल्याने मी जरा गोंधळलोचशाळेत असताना ग्रंथालयातून घेऊन काही पुस्तकं वाचली होतीत्यातली फारशी नावंही आठवत नाहीतपण ती प्रामुख्याने गोष्टींचीअल्लाउद्दीनचा जादूचा दिवाटारझनवगैरे काही.
सरांनाही बहुतेक माझ्याकडून हेच उत्तर अपेक्षित होतंत्यामुळे माझ्या या बोलण्यावर त्यांनी फारशी प्रतिक्रिया दिली नाहीनंतर त्यांनी तो अन ती पुस्तकाबाबत विचारलंपढ मीच आत्ताच वाचायला घेतलं असल्यानं त्याबाबतंही फारसं माहिती नव्हतंलेखकानं मनोगतात सांगितलेलंच मीही सांगितलं.
काही वेळ अशी चर्चा सुरू राहिली अन मग सरांनी विषयाला हात घातला.
 माझ्याकडून मराठी साहित्यमराठी भाषासाहित्य,  कवी लेखक यांची जमेल इतकी माहिती काढून घेतलीमग सरांनी कथा कादंबर्‍यांविषयी सांगितलेकर्मयोगीनी चा जीवनपट मांडलाकोणत्या लेखकांची कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत असं बरंचसं मार्गदर्शन केलं.
आमच्या या गप्पात गाडी पुन्हा क्रॉसिंगला बेलवंडी स्टेशनला थांबली होतीसरही काही वेळानं पुस्तक वाचण्यात रमून गेलेमीही पुन्हा तो अन ती मधे डोकं खुपसलंनिम्मं पुस्तक संपलं होतंपण माझं पुस्तकात लक्ष लागत नव्हतंसरांच्या बोलण्यावर मनात विचारचक्र चालू होतंलेखक पुस्तक अन कथा कादंबर्‍यांभोवतीच बर्‍याच वेळ डोकं अन मेंदू भिरभिरत होता.
ट्रेन सुरू झाली अन पुन्हा मी पुस्तकात डोकं घातलंपुस्तकात हॉस्टेल लाईफवर गॅदरींग मधे सादर करण्यात आलेले एक गीत होते.
‘मना सज्जना तू हॉस्टेल वरतीच रहावे..
पुर्ण गीत तर नव्हतंपण हे गीत वाचताना डोक्यात विचार चालू होता की हे गीत नक्की पुढे कसं असेलएकंदरीत हॉस्टेलवरच्या सात आठ महिन्यांत आलेल्या अनुभवावर अन ऐकलेल्या माहितीवर मी मोबाईलच्या ड्राफ्ट मधे लिहीण्याचा प्रयत्न करत होतातोडकं मोडकं लिहिण्याचा प्रयत्न करत होतोमाझं पुस्तकातलं डोकं मोबाईलमधे गेल्याचं पाहून सरांनी कटाक्ष टाकून मला सहज काय करतो विचारलंमी पुस्तकातलं नाव अन मोबाईल सरांकडं सोपावलात्यातली एकेक ओळ ऐकून सर हसत होतेसरांच्या हसण्यासरशी मला हूरूप येत होताच्यायला आपण चांगलं लिहिलंय कीड्राफ्ट वाचून झाल्यावर सरांनी माझ्या कडं बघून विचारलं,
“कधी पासून लिहीतोस रे...? ”
मी उत्तर दिले“पहिलाच प्रयत्न. ”
“चांगलं लिहितोय.
बहुतेक मला खुश करण्यासाठी सर असं बोलले असावेत असं समजून मी गप्प बसलोसर बोलत होते.
“चांगला प्रयत्न आहे तुझाहळूहळू लिहियला शिकशीलवाचन वाढवलिखाण आपोआप वाढतंचित्रपट बघत असशीलच नामीही बघायचो अन बघतोतहीपण प्रत्येक चित्रपटाबाबत काय वाटतं हे लिहिण्याची सवय लावून घेतली आहेपरिणामी माझा प्रत्येक चित्रपटाकडं बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहेविविध अॅन्गलने विचार करायला लागलोकाळासोबत मराठीचा प्राध्यापक असल्याने वाचन वाढलं अन सोबत लिखाणाचीही सवय वाढलीतूही असंच काहीसं करंनक्की यशस्वी होशीलइथून मागं नसतील पुस्तकं वाचलीपण आता वाचया पुस्तकापासून टिपणं लिहिण्याचा सराव ठेवंनक्की चांगलं लिहिशीलव्याख्याने ऐकण्याची सवय असेल तर अधिक चांगलं आहे.
आपल्या नगरच्या सहकार सभागृहात आयोजित होतात सारख्या व्याख्यान मालातू आता शिकतोयअभ्यास असेलहीपण यातूनही जेवढा वेळ मिळेल तेवढा सत्कारणी लावमी श्रीकांतलाही हेच सांगतोवाढत्या वयानुसार तुम्ही याकडं दूर्लक्ष करता पण स्वतःला ओळखाप्रत्येकात एक लेखक वाचक असतोतो शोधता आलं पाहिजेमराठी सारखी समृद्ध भाषा नाहीबरीच पुस्तकंग्रंथसंपदा उपलब्ध आहेगावी कदाचित पुस्तकं मिळत नसतीलपण इथं नगरमधे अनेक वाचनालयं/ग्रंथालयं आहेतएखादं जॉईन करंनाहीतर महिन्यातून एकदा घरी जात असशीलच नाप्रत्येक वेळी नवीन पुस्तक विकत घेऊन वाचण्याला काय हरकत आहेसोबत हा बोअरींग प्रवास आहेच की निमित्त.
माझ्या घरीही अनेक पुस्तकं आहेतअधून मधून वाचतो मीप्रवासात एकवेळ जेवणाचा डब्बा नसेल पण पुस्तकं नक्की असतंबघ तू परत येशील नगरला तेव्हा बघं ये एखाद्या दिवशी घरी आला तरबोलू या विषयावरपुस्तकातले विचार म्हणजे ना मोरपीस आहेजून्या वहीत जपून ठेवतो ना तसंहे विचार आपण मनात जपून ठेवतो अन ठेवायला पाहिजेतबघं तुला काय जमंतयबराच वेळ घेतलाकाय करणार मराठीचा शिक्षक आहे अन मुलांना रोजच समजून सांगायला लागतंआज सुट्टी च्या दिवशी तुला समजून सांगितलेबघ विचार कर या शब्दांच्या मोरपिसांवरपण मला वाटतं तू लिहावंमाझ्या शुभेच्छाबराच वेळ झालावाचूया पुस्तक.  नायतर तू म्हणायचा काय माणूस आहेस्वतःही पुस्तक वाचेना अन मलाही वाचून देईना...!!!
सरांनी असं मिश्कीलपणे हसून विषयाचा समारोप करत पुस्तकात ठेवण्यासाठी एक मोरपिस सोपावलाट्रेनही भीमा नदीचा पुल ओलांडून दौण्ड स्टेशनच्या जवळ आली होतीमला दौण्डलाच उतरायचं होतंसर पुढे पुण्याला जाणार होतेमी दुमडलेल्या पानात तो मोरपिस घालून पुस्तक सॅक मधे टाकलंसरांचा फोन नंबर घेऊन निरोप घेत मी स्टेशनवर उतरलो अन घरचा रस्ता धरला.
सरांनी दिलेली नगर दौण्ड प्रवासात दिलेली शब्दांची मोरपिसं मनावर खोलवर गेलीनंतरच्या काळात यावर बराच विचार झाला अन शेवटी माझ्या शब्दातील या मोरपीसांना रेखाटन्याचा नवा प्रयत्न सुरू झाला आहेतो वाचकांना कसा वाटतो याची प्रतीक्षा आहेअसो.
गणेश दादा शितोळे
(२० डिसेंबर २०१५)



शनिवार, १९ डिसेंबर, २०१५

मनाचीच सेन्सॉरबाजी


                   प्रचंड विरोधानंतरही नुकताच बाजीराव मस्तानी प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनीही दणदणीत प्रतिसाद देत प्रत्येक शो हाऊस करत विरोध करणारांना सणसणीत चपराक दिली आहे. पुण्यात काल भाजपच्या काही चमच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटाचे शो बंद पाडण्यासाठी निदर्शने केली. वास्तविक यांची निदर्शने म्हणजे केवळ नौटंकी होती.
यातील काही महाभागांना पत्रकारांनी प्रश्न विचारले, 
"पहिले बाजीराव कोण होते.?"
उत्तर:-ते एक मोठे लढवय्ये होते...

"पेशवाईची स्थापना कोणी केली...?"
उत्तर :- एवढं जूनं आठवतं का.?

"सदाशिव भाऊ कोण होते..?"
उत्तर :- सदाशिवराव पेशव्यांच्या घरातले असतील कुणीतरी...!

"पानिपतची लढाई कधी झाली..?"
उत्तर:-1680...


(पानीपत कुठंय हेतरी माहित आहे का हाच प्रश्न आहे...
नशीब पुढचा प्रश्न विचारला नाही, पानिपतची लढाई कोणात झाली होती...?
महाभागांनी उत्तर दिले असते. छत्रपती बाजीराव पेशवे अन औरंगजेब...)

एकाने तर प्रश्न विचारण्या अगोदरच सांगितले...

"काय साहेब, एवढा इतिहास माहित असता तर इथं असतो का.?"

असं म्हणून हे कार्यकर्ते पुन्हा निदर्शने करायला लागली.

"छत्रपती बाजीराव पेशवे यांचा विजय असो. "

यावरून मुख्य म्हणजे हा प्रश्न उभा राहतो की
"बाजीराव पेशवे छत्रपती कधी झाले..?"
बाजीराव पेशवे छत्रपतींच्या स्वराज्यातील चाकर पेशवा म्हणून कार्यरत होते. 

बाजीराव मस्तानी चित्रपटात देखील हाच डायलॉग आहे.

"मैं छत्रपती शाहू का नौकर हूँ..."


दुसरं असं या कार्यकर्त्यांनी  आंदोलने निदर्शने केली पण मुळात यांना इतिहास माहित नाही तर हे कशाच्या आधारावर निदर्शने करतात..?

मुळात पेशवे कधीच स्वतःला छत्रपती म्हणवून घेत नव्हते. 
तर ते छत्रपती या तख्थाचे नोकर समजत होते.
असे असताना बाजीराव पेशवे यांना छत्रपती म्हणून संबोधून एक प्रकारे पुन्हा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. 

पेशव्यांना छत्रपती करून एक प्रकारे चूकीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करतोय हेही समजून घ्या....

यांना बाजीराव पेशवे कोण होते माहिती नाही अन हे बाजीराव मस्तानी चित्रपटाविरोधात बोंबलत आंदोलने करत आहेत हाच विनोद आहे.

प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद देऊन या अशांच्या मुसकाडात मारली आहे...

एकदा बाजीराव मस्तानी चित्रपट बघा..
मग मत बनवा...
इतिहास समजून घ्या. 

उगाच उंटावरून शेळ्या राखण्याचा प्रयत्न करू नका.

गणेश दादा शितोळे
(१९ डिसेंबर २०१५)



शुक्रवार, १८ डिसेंबर, २०१५



वाटतं कधीतरी...!


 वाटतं कधीतरी घेऊन या मनाला,
आयुष्यात एकदा तरी असं व्हावं...
आपलंच आयुष्य आपल्याला,
आपल्या मनासारखं जगता यावं...

वाटतं कधीतरी घेऊन या मनाला,
आठवणींच्या झुल्यावर झुलावं...
जात उंच उंच  हा झोका,
जुन्या आठवणींनी नव्यानं मनात यावं...

वाटतं कधीतरी घेऊन या मनाला,
वार्याच्या झुळकेसोबत मंद वहावं...
जणू पक्षासारखं होऊन,
उंच भरारी घेत स्वच्छंदी उडावं...

वाटतं कधीतरी घेऊन या मनाला,
स्वप्नांच्या दुनियेत मनसोक्त हिंडावं...
स्वप्नांच्या या प्रवासातच,
मी तिला आपलंस करून घ्यावं...

वाटतं कधीतरी घेऊन या मनाला,
असंच रोजच्या साखरझोपेत झोपावं...
स्वप्नांच्या या चंदेरी दुनियेत,
आयुष्य मनासारखं जगता यावं...





गणेश दादा शितोळे
(१८ डिसेंबर २०१५)



मंगळवार, १५ डिसेंबर, २०१५



अशी माणसं भेटती पुन्हा...!


 अशी माणसं भेटती पुन्हा,
घेऊनी गुज आठवणीचे...
सुखावून जाती मनाला,
देऊनी क्षण आनंदाचे...


ओढ ती की उत्सुकता वेडी,
खेचून आणती बंध नात्याचे...
गुंफले होते बंधच जणू असे,
जुळले होते सुर मनाचे...

पाहूनी मग अर्ध्या तपानंतर,
फुलले चेहरे  स्मितहास्याचे...
भारावले डोळे घेऊन कवेत,
हर्षाने बदलले रंगही आसवांचे...

बोलावे की ऐकावे तेच जुने,
दिवस मंतरलेल्या आठवणींचे...
घेती निरोप उद्याच्या स्वप्नांनी,
आभार आहेत शब्द उधारीच्या भेटीचे...






गणेश दादा शितोळे
(१५ डिसेंबर २०१५)





"अशी माणसं येती पुन्हा,
भेटाया घेऊनी गुज आठवणीचे..."




                           कालचा दिवस म्हणजे एक संस्मरणीय अनुभवाची साठवणच होती. जवळपास पाच सहा वर्षांनी झालेली मित्र मैत्रिणींची भेट मनाला आनंद देणारी होती. काॅलेज संपल्यावर आपापल्याला करिअर मधे गुंतून गेलेला प्रत्येक जण काल भेटला. त्या भेटीत एकमेकांत झालेला बदल पाहून बाहेर पडणारी उत्सुकता पहाण्याजोगी होती.
                           सकाळच्या बाईकवर फिरून आलेला कंटाळा शिवप्रसादला भेटला अन एका क्षणात नाहीसा झाला. त्याच्या एकमेकांची खेचत केलेला प्रत्येक विनोद खळखळून हसू देत होता. संध्याकाळच्या त्याच्या भेटण्यापासून लग्न सोहळ्यानंतर जाईपर्यंत इतके हसलो की त्या हसण्याने पोट भरेल की काय कित्येकदा वाटलं. मनोज होलमचा पोवाडा ऐकण्याचा आनंदही तेवढाच संस्मरणीय होता. लग्नाला तो नसूनही शिव ने त्याची कसर भरून काढली होती.
                           संध्याकाळच्या मिरवणुकीत एकेका मित्राला भेटताना त्यांच्यासोबतच्या काॅलेजमधल्या आठवणीच डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. प्रत्येकाची भेट ही एक विलक्षण अनुभव देणारी होती. या सगळ्यात जास्त भारवलेली भेट होती. संत्याचा संतोषराव झालेल्या जीवलग मित्राची. इंजिनियरींगच्या अॅडमिशननंतर झालेली पहिली भेट. त्याचं लग्न कधी झालं माहिती नव्हतं त्यामुळे त्याच लग्न मिस झालंच. त्याला भेटून पुन्हा एकदा काॅलेजचा तोच मित्र भेटल्याचं जाणवलं. अगदी तसाच. मितवा सारखा. मित्र,  तत्वज्ञ अन वाटाड्या.  वयासोबत नवीन नात्यासोबत थोडीफार मॅच्युरिटी आली होती बस्स.
                           सोबत महेश उर्फ पप्पू अन स्वप्निल यांचाही भेट झाली. स्वप्निल अगदी काॅलेजमधल्या स्वाप्याची तीच काॅपी होती. तरी या मिरवणुकीत अजून दोन व्यक्ती मिसींग भासत होत्या. जसं ऐकायला कान हवा होता तसाच जवळचा मित्र. आजही कधी कानाजवळ हात गेला की डोळ्यासमोर उभा रहाणारा. राहुल. गर्दीत शोधूनही सापडत नव्हता. दुसरा म्हणजे माझ्या नावसरशी आठवणारा नंदू. मला कुणी आवाज दिला तरी त्याचीच आठवण येणारा. गॅदरींग मधे गणनायकाय गणदेवताय गाणं गायलेला गायकमित्र नंदकिशोर मोरे. मित्रांच्या गर्दीतही ही दोन माणसं दिसत नसल्याने कित्येकांना विचारलंही.
                           मित्रांच्या भेट घेऊन कसतंरी वाट काढत एकदाचं नवरदेवाला भेटलो. शुभेच्छा दिल्या. भेटीगाठी पार पडल्या अन परण्यातला डान्स सुरू झाला. एकमेकांना आत ओढून नाचण्याच्या खेळात मलाही जाऊन यावंच लागलं. मित्रांचा डान्स पाहून एक क्षण वाटलंही प्रभूदेवाही यांच्याकडून शिकला असावा. परण्याची मिरवणूक पुढं पुढं चालली होती.अन एका क्षणी मिसींग माणसं दिसली. दोघांनाही मारलेली मिठी सर्व जूनं आठवण करून देत होती.
                           लग्नाची तिथी समीप आली. नवरानवरी मंडपाच्या दाराशी येऊन थांबले होते. एवढ्या गर्दीतही नवरदेवासोबत प्रचेता भेटली. पण तेव्हा बोलायला फारसा वेळ नव्हता. गर्दीसोबत आत शिरलो. तुतारीसह वरवधू स्टेजवर पोहचले अन अक्षता डोक्यावर पडल्या. सर्व मित्र परिवार स्टेजवर जाऊन फोटो सेशनला थांबला होता.सर्व मित्र परिवार स्टेजवर जाऊन फोटो सेशनला थांबला होता. तिथेच अबोलीचीही भेट झाली.
                           उशीर झाल्याने मित्र जेवणाकरता ताटकळलेले होते. त्यामुळे लवकर जेवण करून आलेल्या मित्रांना निरोप द्यायला निघालो असतानाच नाशिक पॅटर्न भेटला. शब्दांची मोरपिसे,  कवी लेखक यावरून चेष्टा मस्करीही झाली. काहींनी कौतुकही केलं. अमरने गर्लफ्रेंडसाठी कविता लिहिच्यातही सांगितलं. अमर, सुहास, सुरज, सागर एकेकाशी बोलताना उशीर झाला. बाहेर मित्र वाट पहात होते. बाहेर गप्पा मारत एकमेकांची उडवत मित्रांना निरोप दिला जात होता. मधेच माझ्या कवितांकडेही गाडी घसरत होती.
                            कित्येकांनी तर लग्नादिवशी च्या घटनांवर कविता लिहिण्याचा सल्ला ही दिला. आधीच मला उल्हास त्यातच मित्र म्हणतात म्हटल्यावर लिहिणार हे नक्कीच. गप्पा मारत मारत कविता लिहिलीही अन फेसबुक वर पोस्टही केली. या गप्पा निरोपाच्या कार्यक्रमात कधी साडेदहा अकरा वाजून गेले.  नाशिककर बाहेर जेवायला निघून गेले होते. त्यामुळे त्यांच्याशी बोलायचं राहिलं ते राहिलंच. अमरला पुस्तकं द्यायचंही राहिलंच.
आता पुन्हा भेट कधी होईल माहीत नाही.
                            बाहेरच्या गप्पा संपत नाही तोपर्यंत साडे अकरा वाजून गेले होते. पाठीमागेच आरती, अबोली, प्रचेता घरी निघाल्या होत्या. गाड्यांभोवती निरोपीची चर्चा सुरू होती अन मी पोहचलो. मला पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच सेम प्रश्नचिन्ह.
"तू असा कसा झाला...?"
पण त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर हसून उत्तर दिले.
                            आता वाटतंय या दिवसाची आठवण, या हॅकर व्हायरसची आठवण म्हणून या प्रश्नाचा विचार सुरू केला आहे. पुन्हा हा प्रश्न पडणार नाही याकरता आता मनावर घेतले आहे. पाहू हा निश्चय किती दिवस पाळला जातोय. राहुलच्या रिलेशन स्टेटसवर काही कमेंट्स होतं तिघींनीही निरोप घेतला. त्यानंतर काही वेळाने जेवण करून आम्हीही स्वप्निलच्या घराकडे निघालो.
                            रात्रीचे दोन वाजले तरी स्वप्निलच्या घरीही मस्ती चालूच होती. संतोषचा जुना अंदाज पुन्हा एकदा पहायला मिळाला. गप्पांच्या ओघात माझी कविताही लिहून झाली होती. राहुलने पहिल्यांदा वाचली अन नंतर संतोषचा विषय बाळूवरून कवितेवर आला. मोबाईलवर काही कविता, पुस्तकाची सुरवात वाचली. काही त्याला आवडल्या. गप्पा मारत कधी झोपेलो कळलं नाही.

आता पुन्हा भेट कधी होईल माहीत नाही.
बहुतेक अजून कोणाच्या तरी लग्नाची प्रतिक्षाच....
काहींचे सुर जुळलेत. काहींचे जुळत आहेत.
बघू आता कोणाचा नंबर...
अमर की सागर...
बहुतेक पुढच्या लग्नाला नाशिकला जावं लागतंय बहुतेक.
भग्याच्या लग्नापेक्षा लक्षात राहील ती ती संध्याकाळ...


किशोर कुमार यांनी प्रेयसीसाठी म्हटलं होतं..


"वो शाम कुछ अजीब थी,
ये शाम भी अजीब है...
वो कल भी पास पास थी,
वो आज भी पास है..."


मला या मित्रांसाठी डेडीकेट करायला आवडलं असतं,
"वो शाम कुछ अजीब थी,
ये शाम भी अजीब है...
वो दोस्त कल पास पास थे,
आज उनकी यादे पास है..."



(विवाहसोहळ्यापूर्वी मंडपात नवरदेवासह सनी कानडे यांनी घेतलेली सेल्फी. डावीकडून विवेक नांगरे, प्रमोद लहाकर, रविंद्र दरावडे, नवरदेव सागर भगत, ऋषिकेश बांडे, हेमंत घोडे, विशाल वागस्कर आणि सनी कानडे)
(विवाहसोहळ्यानंतर शासकीय तंत्रनिकेतन मित्रपरिवार. डावीकडून उद्योजक लिंबाशेठ नागरगोजे यांचे खंदे समर्थक प्रमोद लहाकर उर्फ नाग्या, पूर्वाश्रमीचे अनिल भैय्या राठोड यांचे कट्टर समर्थक विवेक नांगरे, देवळालीचे नेते समर्थ कडू पाटील,  विनोदवीर मोहन भुजबळ, संग्राम भैय्या जगताप यांचे सहकारी सचिन कराळे पाटील, रविंद्र गायकवाड, विद्युतप्रेमी प्रतिक सोनावणे उर्फ करंट, कट्टर शिवसैनिक व सतत मोबाईलमधे व्यस्त असणारे गिरीश लंगोटे उर्फ लाल्या, भिंगारचे बुबालु च्युविंगमचे व्यापारी विशाल वागस्कर, केडगावचे तत्वज्ञ ऋषिकेश बांडे, अहमदनगरचे ह्रतिक रोशन मोहनिश मांढरे, मुर्ती लहान पण किर्ती महान असे सामाजिक कार्यकर्ते रविंद्र दरावडे, अष्टपैलु खेळाडू निखील जाधव उर्फ दगड्या, अमोल भालसिंग, अक्षय पाचार्णे आणि माचो पैलवान सनी कानडे)

(जीवलग सहकारी डावीकडून राहुल गिऱ्हे, गणेश शितोळे, नंदकिशोर मोरे, स्वप्निल कोकाटे, सागर भगत, संतोष गाढवे, बाळासाहेब खाडे आणि महेश आडेप)


(राहुल गिऱ्हे यांनी काढलेली सेल्फी. डावीकडून आरती दळवी, अबोली पाटील, संतोष गाढवे, स्वप्निल कोकाटे, प्रचेता गवारे, महेश आडेप, बाळासाहेब खाडे, गौरी गाढवे, सागर व वहीनी, नंदकिशोर मोरे आणि राहुल गिऱ्हे)


(राहुल गिऱ्हे यांनी काढलेली सेल्फी. डावीकडून  संतोष गाढवे, स्वप्निल कोकाटे, प्रचेता गवारे, अबोली पाटील, गौरी गाढवे, सागर व वहीनी, , बाळासाहेब खाडे, नंदकिशोर मोरे महेश आडेप आणि राहुल गिऱ्हे)


( "जब मिल बैठेंगे तीन यार". डावीकडून स्वप्निल कोकाटे, गणेश शितोळे आणि संतोष गाढवे. )



गणेश दादा शितोळे
(१४ डिसेंबर २०१५)


बुधवार, ९ डिसेंबर, २०१५

काल रात्रीच्या पावसात भिजता भिजता बाईक चालवताना सुचलेली एक कविता...


हिशोब आयुष्याचा....






बसलो होतो एकदा आयुष्याचा हिशोब करायला
सुखदुःखाचा ताळमेळ लागतोय का बघायला...
सुरवात केली मी आयष्याचं पान पलटायला...
आयुष्यातल्या वळणावर बाकी काय राहिलं बघायला....

करत होतो फक्त सुखाची बेरीज
अन दुखःची वजाबाकी...
सुंदर क्षणांचा करून करून गुणाकार भागाकार
वाटत होतं आयुष्यात येईल शुन्य बाकी...

आठवले काही मग मित्र अन
जोपसलेले त्यांच्यासोबतचे छंद...
आठवून जूनं सगळं नव्यानं
मिळाला फक्त निखळ आनंद...
जून्या आठवणीत रमत हिशोब झाला मंद...

हिशोब करता करता वाटलं
आयुष्याच्या पहिल्या वळणावर केलं सर्व काही...
क्षणांची आकडेमोड करता करता लक्षात आलं...
आपण थोडसं जगलो राहून गेलं बरंच काही...



गणेश दादा शितोळे
(९ डिसेंबर २०१५)


मंगळवार, ८ डिसेंबर, २०१५



नात्यांच्या गाठी...!


 जन्माजन्मांतरीच्या गाठी जुळल्या आपल्या,
आज कुठे सैल भासू लागल्या...
विश्वासाच्या कोमल धाग्याने गुंफलेल्या,
आज उलगडून सुटू लागल्या...

दिवस सरले काळचे घड्याळ पळाले,
रोजच्या भेटीही आता विरळ झाल्या...
करिअरने गुरफटून गेलो इतके,
हक्काच्या वेळाही आज निघून  गेल्या...

स्वभावाचे रंगही बदलून जणू,
जुन्या रंगाच्या छटाच नाहीशा झाल्या..
भासे आज आयुष्याचे चित्रच वेगळे,
जणू चित्रातल्या आपल्या जागाही भरून गेल्या...

दोष तो भला कुणाचा,
नात्यांच्याच गाठी आसूड होत्या बांधल्या...
विरहाच्या एका हिसक्यातच,
जन्मोजन्मीच्या गाठी क्षणात सुटून गेल्या...




गणेश दादा शितोळे
(८ डिसेंबर २०१५)



रविवार, ६ डिसेंबर, २०१५

एक होती अशीही मैत्रीण....


एक होती अशीही मैत्रीण
बरीचशी हट्टी अन किंचतशी लहरी...
बोलताना वाटायची फटकळ अन नव्हती लाजरी...

दिली तिने एकदा माझ्या कवितेला कमेंट...
ओळखलं होतं तिने कविता कोणासाठी परफेक्ट...

मित्र म्हणाला होईल सगळा भांडाफोड गप कर तिला...
दे अशी कमेंट की बोलताच येणार नाही काही तिला...

मित्राच्या आग्रहावरून दिला तिला कडक रिप्लाय..
वाचून तिने डायरेक्ट केलं बरं म्हणून बाय...

माझ्या कमेंट्स वाचून बिचारीच्या दुखावल्या भावना...
होता तो फक्त टाईमपास तिला काही कळेना...

टाईम पास टाईमपास मधे झाली ती नाराज
अन अचानक थांबला तिचा कमेंट्समधला आवाज

कमेंट्स द्यायला लावणारा मित्र झाला नामा निराळा..
मला म्हणाला तूच समजंव हिला बाळा...

आता कसं सांगणार तिला मला असं काहीच बोलायचं नव्हतं...
आता कसं कळणार तिला मित्रांची यारी निभावताना करावं लागतं..

समजवायला बोलता येत नव्हतं शब्दात...
पण वस्तूस्थितील वास्तव उतरत होतं सगळं काव्यात....


गणेश दादा शितोळे 
( ०६ डिसेंबर २०१५ )


शनिवार, ५ डिसेंबर, २०१५

मंगेश भाऊंना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...
आई जिजाऊ अन शिवछत्रपतींचे आशिर्वाद सदैव पाठीशी राहोत अन उत्तरोत्तर प्रगती करत रहावे हीच सदिच्छा...

खास आमच्या या जीवाभावाच्या मित्रासारख्या भावाला एक शुभेच्छा देणारी कविता...

अजून किती दिवस असं बिनलग्नाचं रहाणार...!


झाली इंजिनिअरींग संपलं काॅलेज आता,
अजून किती दिवस काॅलेजची कारणं देणार...
आता तरी सुरवात करा निमंत्रणाची कारणं द्यायला....
अजून किती दिवस असं बिनलग्नाचं रहाणार...

वय झालं आता उरकून टाकावं हे कर्तव्य,
आई दादांना सारखं राहून राहून वाटतंय...
इच्छेखातर तरी तुम्ही घ्या आता मनावर,
अजून किती दिवस असं बिनलग्नाचं रहाणार...

जाॅबसोडून तुम्हाला शेतीच आवडली,
पाणी आहे भरपूर म्हणून तुम्ही विहीर बांधून घेतली...
म्हणून काय आता विहीरीशीच लग्न करणार....

अजून किती दिवस असं बिनलग्नाचं रहाणार...

काॅलेजमधेही नव्हतं तुमचं लक्ष मुलींवर,
तुमच्या लाईन फक्त मॅडमवर...
उरकली आता त्यांचीही शुभमंगलं...
अजून किती दिवस असं बिनलग्नाचं रहाणार...

अकारशेवरून तुम्ही ग्रॅण्ड वापरायला सुरुवात केली...
पण तुम्ही लाडकी स्प्लेंडर नाही बदलणार...
मोबाईल सारखी आयुष्यातही प्रगती करा,
अजून किती दिवस असं बिनलग्नाचं रहाणार...

आम्हा मित्रांनाही वाटतं सारखंच,
मंगेश भाऊंच्या लग्नात यंदातरी नाचणार...
आहो कधी आम्हाला "शादी के लड्डू" खायला घालणार...
अजून किती दिवस असं बिनलग्नाचं रहाणार...

साजरे केले आपण कित्येक वाढदिवस एकट्याचे...
आता जोडीने वाढदिवस साजरा करण्याची संधी कधी देणार...
दोनाचे चार हात करा लवकर,
अजून किती दिवस असं बिनलग्नाचं रहाणार...



(मंगेश भाऊंसह एक दुर्मिळ छायाचित्र....)

आपल्या सगळ्यांचे लाडके मित्रासारखे भाऊ,
परिक्रमा काॅलेजला लाभलेले अंतरंगचे जिएस ,
काॅलेज कारकीर्द "पोलार्ड" सारखी गाजवणारे आधारस्तंभ,
भांडणं असू की तंटा जिथं मॅटर तिथं भाऊ हजर कायम मित्रांच्या पाठीशी रहाणारे,
काॅलेजमधील मुलं अभ्यासातल्या एम थ्री चा इतका धसका घेत नव्हते इतका या एम थ्रीचा धसका घ्यायचे असे,
आपल्या  स्प्लेंडर, नोकीया अकराशे अन विहीर यावर जीवापाड प्रेम करणारे,
बारामती तालुक्याचे युवा नेतृत्व..
चि. मंगेश भाऊ मारुतीराव मोरे  उर्फ  एम थ्री  म्हणजेच तुमचा आमचा मंग्या

आज आयुष्याचं एक पान पलटून सत्तावीसाव्या वर्षांत पदार्पण करीत आहे.

मंगेश भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

मंगल पावलांनी जीवनात प्रवेश करून मनात आनंदाच्या असंख्य मधुलहरी निर्माण करणारा हा वाढदिवस जीवनात जेवढा हवाहवासा वाटतो तेवढा कोणताही दिवस वाटत नाही अशा या मनपसंद दिवशी सुखांची स्वप्ने सफल होवून अंतरंग आनंदाने भरून जावे...!

शुभेच्छुक : गणेश दादा शितोळे (देशमुख) आणि तमाम जिएस ग्रुप..


गणेश दादा शितोळे
(०५ डिसेंबर २०१५)





बुधवार, २ डिसेंबर, २०१५


एवढंच सांगणं आहे फडणवीस सरकारला...



बास झाले आता लोकांचे हारे तुरे घ्यायचं...
बास करा आता लोकांच्या लग्न उद्घाटनाला जायचं...
बस करा मागच्या सरकारनं काय केलं सांगायचं...
अन बस करा तुमचं नवरा बायकोसारखं भांडायचं...


कधी सुरू होणार तुमच्या मोदी सरकारचे अच्छे दिन...
भारत सोडून जग हिंडण्यातच रमतंय त्यांच मन...
मागच्या सरकारने पंधरा वर्षे लुटलं म्हणता ना...
मग शंभर दिवस उलटले हार तुरे घेण्यात. ..
आता सुरू करा काम लावून तन मन धन....


कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोड़ी थोड़ी प्रगति करा.
खुप संकटे येतील आडवी.
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.


जर तुम्हाला तुमची प्रगती मोजायची असेल तर
शंभर दिवस वर्ष असे मोजू नका !
शेतकरी वर्गाच्या डोळयांत आलेले
दोन अश्रू  पुसायला किती दिवस लागणार ते मोजा.!!!


गणेश दादा शितोळे 
(०२ डिसेंबर २०१५)


शनिवार, २८ नोव्हेंबर, २०१५

काॅलेज संपून वर्ष उलटत आलं...
पहिल्यांदा मित्र सोडून नवीन वर्षांचं सेलिब्रेशन करणार आहे.
दिवाळीही विना पुस्तक परीक्षा शिवाय साजरी केली. पण दरवेळेस सोबत असणारे मित्र नसल्याचं दुःखही त्या आनंदात होते. तसंच काहीसं या वर्षाचा निरोप घेतना झालं आहे. मनातल्या त्या जून्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. त्यांनाच वाट करून देण्याचा हा एक प्रयत्न....

                         हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...


आठवतोय तो कॉलेजचा पहिला दिवस,
चिखलातून वाट काढत केलेला तो प्रवास...
पहिल्या लेक्चर नंतचा तो मोकळा श्वास,
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतेय ती सबमिशनच्यावेळी झालेली ओळख,
अन काही दिवसात जुळलेली घट्ट मैत्री...
आणि तो तयार झालेला जीवलग मित्रांचा ग्रुप,
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतोय आपला कॅन्टीनशेजारचा तो हक्काचा कट्टा,
लेक्चर बुडवून त्यावर बसून मारलेल्या गप्पा...
अन मस्तीत केलेली एकमेकांची खेचाखेची,
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतंय कोण जायचं फार्मसीच्या मुलींना पहायला,
तर कोणाची लाईन मॅडमवरच होती...
अन कोणी मुलींना फलटणचा टॉन्ट मारायचं
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतंय सुट्टीच्या दिवशी फिरायला जाणं,
कधी सिद्धटेक तर कधी शिर्डी,
कधी मोरगाव तर कधी भुलेश्वरला जाणं...
आठवतात पळवलेल्या गाड्या अन उडवलेली धूळ,
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतंय कधी तोंडावर केक फेकून मारणं,
तर कधी केक लावता लावता पाण्यात पडणं...
विडंबनाचं गीत म्हणत वाढदिवस साजरे करणं,
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतंय मैदानावरचे क्रिकेट, कबड्डी, हॉलीबॉलचे खेळ,
मधेच घातलेले वाद अन केलेला तो राडा...
आठवतात ती भांडणं अन कॅन्टीनवर खालेल्ला वडा,
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतोय तो न चूकवलेला,
दरवर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा...
गडकोटांचा दऱ्याखोऱ्यातला प्रवास,
अन दीव दमणच्या ट्रीपची धमाल....
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतंय गोपाळवाडीची भेळ अन रुचिराचा चहा,
कधी योगराजचा नाश्ता तर कधी कावेरीला पार्टी...
कारण असो वा नसो चहा, नाश्ता, पार्टी मात्र होणारच,
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतंय मित्राची गर्लफ्रेण्ड होण्याआधी ग्रुपच्या वहीनी,
कुणी पांढऱ्या बुटावरून लक्षात ठेवलेली...
कुणी होती नुसती नजरेत साठवलेली,
तर कुणी डिप्लोमालाच पटवलेली...
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय

आठवतंय कॅम्पला केलेली धमाल मस्ती,
गॅदरींगच्या मैदानात जिंकलेली कुस्ती...
जिएस वरून झालेलं वेगळंच राजकारण,
अन मिळवलेलं हक्काचं सेक्रेटरी पद....
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतोय तो अंतरंगमधला बे जुबान परफॉर्मन्स,
खुद को तेरे चं ड्युएट अन फॅशन शोचा दरारा...
बक्षीसांचा पाऊस अन जमलेला एकत्र ग्रुप,
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतेय गोव्याची अविस्मरणीय ट्रिप,
कोलंगुटला घेतलेला समुद्रकिनाऱ्याचा आनंद...
चर्च, किल्ला, क्रुज अन पाहिलेला मावळतीचा सूर्य,
अन आयुष्यात जगलेलो काही भन्नाट दिवस...
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतोय इपिटॉमचा पहिला वहिला इव्हेन्ट,
रोबोकॉनचा ट्रॅकवर रंगलेला खेळ...
झालेली तारांबळ अन प्रयत्नांचा फसलेला मेळ,
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय...

आठवतोय तो सेण्डॉफचा मंतरलेला दिवस,
भेट देण्यात आलेली आगळीवेगळी गिफ्ट...
सांगितलेले अनुभव अन कॉलेजचा घेतलेला निरोप,
हो आज ते सगळंच मिसिंग वाटतंय... 

गणेशदादा शितोळे
(२८ डिसेंबर २०१५)


गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०१५

एक आठवण २६/११/२००८ ची...


आजही तो दिवस तसाच आठवतो. जणू कालपरवाच घडून गेलेला.

मी डिप्लोमा काॅलेजच्या दुसर्‍या वर्षाला होतो. पेपरचाच काळ होता. बहुतेक पहिलाच पेपर असावा त्यादिवशी. इंजिनियरींग मॅथेमॅटीक्स (एम थ्री)चा. गारठून टाकणार्‍या थंडीत पेपर असल्याने पहाटेच उठलेलो होतो. त्यामुळे साडेनऊच्या पेपरच्या वेळेपर्यंत बर्‍यापैकी अभ्यास झालेला होता. पहिला पेपर असल्याने जरासं टेन्शन होतंच. पण रिव्हिजन झाल्याने त्यादिवशी हाॅस्टेलवरून लवकरच काॅलेजला आलो होतो. काॅलेजमधल्या नेहमीच्या कट्ट्यावर फाॅर्मुलाची रिव्हिजन सुरू होती. हाॅस्टेलवरचे काही मित्रही होते. काहीवेळ गेला असाच गेला.
साडे आठ नऊ वाजण्याच्या सुमारास काॅलेजमधे हळूहळू मुलं यायला सुरवात झाली होती. काही कट्ट्यावर येऊन अभ्यासाच विचारत होती. तितक्यात कोठून तरी ऐक बातमी येऊन धडकली. कोणीतरी आम्हाला कट्ट्यावर बसलेल्यांना आवाज दिला.
"अरे अभ्यास काय करता..? पेपर कॅन्सल झालाय.."
या आवाजासरशी आम्ही त्या मुलाकडे माना वळवल्या. गाडीवर होता बहुतेक. त्यामुळे तो बोलला अन निघून गेला. आम्हाला पाठमोराच दिसला.
पेपर कॅन्सल झाल्याच्या बातमीने एक आनंदाचा धक्का दिला. ही बातमी काॅलेज परिसरात झपाटय़ाने पसरली. जो तो एकमेकांना पेपर खरंच का कॅन्सल झालाय का याची खात्री करत होता. काॅलेज समोरच्या आवारातल्या गर्दीत एवढा एकच विषय सुरू होता. तितक्यात गेटमधून सरांची एक गाडी आली. काॅलेजमधील दोन मित्रांची जोडी होती. एका सरांकडे पिशवी होती. त्यात काही स्वीट आणलं होतं. बहुतेक वाटायचं असावं काॅलेजमधे. ते दोघेही आम्हाला शिकवायला होते. त्यामुळे गर्दीचा रोख सरांच्या दिशेने गेला. सरांनी एवढी गर्दी पाहून पार्किंग कडे जाणारी गाडी मधेच थांबवून मुलांना गर्दीविषयी विचारणा केली. मुलांकडून पेपर कॅन्सल झालाय, पोस्टपोन झाल्याच्या बातम्या पोहचल्या. मुलांनी खात्री करण्यासाठी सरांना विचारलं पण त्यांनाच माहिती नव्हती. लगबगीने ते काॅलेजमधे गेले.
काही वेळातच एकेक शिक्षक काॅलेजमधे आले. सव्वा नऊ वाजले तरी एन्ट्री बेल झाली नव्हती. प्रिन्सिपल केबिनमध्ये मिटींग सुरू होती. थोड्या वेळाने मिटींग संपली अन पेपर कॅन्सल झाल्याची नोटीस नोटीसबोर्डवर लावण्यात आली. पेपर कॅन्सल झाल्याची पुष्टी झाल्यावर आम्ही मुलं आनंदात काॅलेजबाहेर गप्पा मारत निघालो. जो तो पेपर कॅन्सल झाल्याने आनंदी होता. काही वेळातच त्याचं कारणही कळाल.

"मुंबई मधल्या ताज हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. "

ऐकल्यानंतर तंस आमच्या कोणाच्याही मनात दुःख भिती काही जाणवलं नाही. उलट पेपर पोस्ट्पोन झाले याचा खुपच आनंद झाला होता. कारण अशा घटना नेहमीच घडत असल्यासारखं आम्हाला गांभीर्य नव्हते.
दुपारी मेसला जेवायला गेल्यावर टिव्हीवर जेव्हा ही बातमी बघितली. दहशतवादी रेल्वे स्टेशनवर बेछूट गोळीबार करत होते. लहान मुलांचाही विचार करत नव्हते. त्याचवेळी ताज हॉटेलमध्ये एनडीएची फोर्स चाॅपरमधून उतरत होते. अन दहशतवाद्यांशी दोन हात करत होते. काही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. दहशतवाद्यांशी लढताना हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर शहीद झाले होते. सर्वत्र मृतदेहांचा खच पडला होता.

"मुंबई पोलिसांनी नाकाबंदी केली होती. दोन दहशतवादी गाडीतून अंधाधुंद गोळीबार करत होते. नाकाबंदीत गाडीचे टायर फोडल्याने गाडी थांबली होती. पोलीसांनी शरण येण्याची वॉर्निंग दिली तरी गाडीतून उतरून कोणीच खाली येत नव्हते. पोलीसांनी त्या गाडीवर फायरिंग केली. त्यात दहशतवादी ठार झाले समजून पोलीसांनी गाडी घेरली. दहशतवादी मेले समजून दार उघडण्यासाठी तुकाराम ओंबळे पुढे सरसावले. एक दहशतवादी जिवंत होता. एके 47 घेऊन ट्रिगर दाबत अंधाधुंद गोळीबार करण्यासाठी त्याने बंदूक उचलली. ते पाहून त्या दहशतवाद्याशी दोन हात करण्यासाठी सह्याद्रीचा वाघ छाती ठोकून ऊभा ठाकला. ट्रिगर दाबली गेली अन गोळ्या संपेपर्यंत तुकाराम ओंबळे यांच्या छातीवर मोकळी झाली. सह्याद्रीचा वाघ मराठी मातीचा लेख छातीठोकपणे मरणाला सामोरा गेला अन पोलिसांचे प्राण वाचवले. गोळ्या संपल्या अन अलगद तो दहशतवादी पोलिसांच्या हाती जिवंत सापडला. नाव होतं अजमल कसाब. "

टिव्हीवर हा ह्रदयद्रावक व्हिडिओ पाहताना गांभीर्य नसणार्‍या शरीरावरही काटा उभा राहिला. आपसूकच शहीद वीरांना मानवंदना देण्यासाठी हात डोक्यावर गेला. डोळ्यात पाणी ओघाळू लागले.

आजही तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला की कसाबच्या गोळ्या झेलणार्‍या तुकाराम ओंबळेंना सॅल्युट करायला हात उभा रहातो.
कामटे करकरे साळसकर सरांच्या बलिदानाचा अभिमान वाटतो.

आज त्या मुंबईवरच्या भ्याड हल्ल्याला सात वर्षे पूर्ण होत आहेत.
या हल्ल्यात शहीद झालेल्या माझ्या सर्व देशबांधव पोलीसांमित्रांना श्रद्धांजली.
शहीदांच्या बलिदानासोबत आम्हाला आमचीच चिड येते की हा भ्याड हल्ला होऊन सात वर्षे झाली तरी हल्ला करणारे सूत्रधार हाफिज सईद पाकिस्तान मधे मोकळा हिंडतोय. अमेरिकेने ९/११ च्या वर्ल्ड ट्रेड सेंटर वरील हल्लेखोर अन मास्टर माईंड ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानात घुसून मारले. अन नंतर त्यावर चित्रपट तयार करण्यात आला.
मुंबईवरच्या भ्याड हल्ल्याला सात वर्षे झाली तरी मास्टर माईंड हाफिज सईद जिवंत आनंदाने हिंडत आहे अन पुन्हा दहशतवादी हल्ला करण्याची तयारी करतोय. आमच्या देशातील सरकारने अमेरिकेसारखी धडक कारवाई करत पाकिस्तानमधे घुसन हाफिज सईदला कंठस्नान घालावे किंवा आमच्या देशातील कोणी फॅन्टमने जाऊन सईदला कंठस्नान घालावे हीच इच्छा प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. तेव्हाच आमच्या देशातील शहिदांना खरी आदरांजली ठरेल.

.
 गणेशदादा शितोळे
(२६ नोव्हेंबर २०१५)



एक सलाम पोलीसांना...




 
काल सकाळीचीच काष्टी मधली अपघाताची घटना.
वाघजाई भरधाव निघालेली गाडी शिवनेरी हाॅटेलसमोर दोघांना धडक देऊन निघून गेली होती. दुचाकीवरचे ते दोघंही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. बघ्याची गर्दी वाढत होती. पण त्या दोन व्यक्तींना उचलून हॉस्पिटलमधे घेऊन जाण्याची हिम्मत होत नव्हती. नुसती एकमेकांना विचारत चर्चा झाडल्या जात होत्या.
त्याचवेळेस रस्त्यावरून एक पोलीस अधिकारी पुण्यात आपली नाईट ड्युटी संपवून आपल्या स्विफ्ट गाडीतून घरी गावाकडे निघालेला होता. हाॅटेलसमोरच्या गर्दीने वाहनांची गती मंदावली होती. गाडीतल्या त्या पोलीस अधिकार्‍याला गर्दी पाहून शंका आलीच. त्या अधिकार्‍याने गर्दीतून वाट काढत आपली गाडी त्या अपघात झाला त्या ठिकाणी घेतली. सुरवातीला गाडी बघून लोक ओरडायला लागले. पण त्यात खाकी वर्दीतला माणूस पाहून गर्दीत शांतता पसरली.
त्या पोलीस अधिकार्‍याने क्षणाचाही विलंब न करता त्या जखमी व्यक्तींना आपल्या गाडीच्या शिटावर बसवले. पण त्या ढीगभर बघ्यांच्या गर्दीतला एकही माणूस मदतीसाठी पुढं आला नाही. जखमींना घेऊन उपचारासाठी गाडी जवळच्याच हॉस्पिटलमधे निघून गेली. बघ्यांची गर्दीही पांगली. जणू काही झालं नव्हतेच.
गाडी हॉस्पिटलच्या दाराशी आली. पोलिस अधिकार्‍याने इमर्जन्सी म्हणताच वाॅर्डबाॅय नर्स पटापट बाहेर धावले. त्या जखमींना अॅडमिट करून घेतले. खुद्द पोलीसच सोबत असल्याने डॉक्टरांनीही आढेवेढे न घेता जखमींना दाखल करून घेतले. जखमी अवस्थेत असलेल्या त्या दोन व्यक्तींना उपचार मिळालेले पाहून पोलीस अधिकार्‍याने गाडी हॉस्पिटलमधून फिरवली. जवळच्या पोलीस ठाण्यात अपघाताची खबर देऊन तो अधिकारी आपल्या गावाच्या दिशेने निघून गेला.

सलाम त्या पोलीस अधिकार्‍याला.

ही घटनेवरून आपल्या समाजातून माणूसकी हरवली आहे का असंच वाटतं. अपघात झाला की बघ्यांची गर्दी होती. पण त्या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची कोणाचिही इच्छा होत नाही. कारण काय तर ही आपली जबाबदारी नाही. हे आपलं काम नाही. ही आपली ड्युटी नाही. अनेकांना वाटतं की आपढ अपघातात जखमी व्यक्तीला मदत केली तर पोलीस आपल्यालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करतील. पण कोणालाही वाटत नाही की जखमी व्यक्तीच्या ठिकाणी कोणी आपली व्यक्ती असती तर आपण मदत केली असतीच ना. त्यावेळी अशीच भूमिका बघ्यांनी घेतली अन आपल्या व्यक्तीचा उपचाराअभावी मृत्यू झाला तर किती राग आला असता. दुःख वाटलं असतं. मग जखमी असणारी व्यक्ती आपलीच आहे समजून उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्याची भावना बघ्यांच्या मनात का येत नाही हीच एक शोकांतिका आहे.
त्याचवेळी पोलीस अधिकार्‍याच्या या कृतीतून आपढ काही बोध घेणार आहोत का.?
आपल्याला समजणार्‍या ड्युटी ड्युटीच्याच भाषेत समजा त्या पोलीस अधिकार्‍याला वाटलं असतं, मी आत्ताच माझी नाईट ड्युटी संपवून घरी चाललोय. दरम्यान रस्त्यावर कुठे अपघात घडला तर मी का पुढे जावं. आता माझ्या ड्युटीचा टाईम नाही म्हणून तो अधिकारी बघ्यांच्या गर्दीतून निघून गेला असता तरी ना बघ्यांना काही फरक पडला असता ना पोलीस अधिकार्‍याला. पण त्या पोलीस अधिकार्‍यात समाजभावना माणूसकी होती. तो पोलीस नंतर अगोदर एक माणूस आहे. भले त्या अंगावरच्या खाकी वर्दीने ती भावना जागी केली. पण त्याने आपल्या कामाची ड्युटी संपवून समाजाचीही ड्युटी व्यवस्थित पार पडली.
त्याचवेळी आपण हे विसरतो की आपणही समाजाचा भाग आहोत अन कधी आपणही साजाप्रती आपली माणूसकीची, बंधूभावाची ड्युटी पार पाडली पाहिजे.
आजच्या 26/11 निमित्ताने पुन्हा एकदा पोलिसांमधे आजही तोच तुकाराम ओंबळे जिवंत आहे याचीच जाणीव होते. साळसकर, कामटे, करकरे ओंबळे उन्नीकृष्णन शहीद झाले. पण महाराष्ट्रातल्या कोपर्‍याकोपर्‍यात ते जिवंत आहेत.

26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या माझ्या देशबांधवांना भावपूर्ण आदरांजली.

आज त्या मुंबईवरच्या भ्याड हल्ल्याला सात वर्षे पूर्ण होत आहेत.
या हल्ल्यात शहीद झालेल्या माझ्या सर्व देशबांधव पोलीसांमित्रांना श्रद्धांजली.
शहीदांच्या बलिदानासोबत आम्हाला आमचीच चिड येते की हा भ्याड हल्ला होऊन सात वर्षे झाली तरी हल्ला करणारे सूत्रधार हाफिज सईद पाकिस्तान मधे मोकळा हिंडतोय. अमेरिकेने 9/11 च्या वर्ल्ड ट्रेड सेंटर वरील हल्लेखोर अन मास्टर माईंड ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानात घुसून मारले. अन नंतर त्यावर चित्रपट तयार करण्यात आला.
मुंबईवरच्या भ्याड हल्ल्याला सात वर्षे झाली तरी मास्टर माईंड हाफिज सईद जिवंत आनंदाने हिंडत आहे अन पुन्हा दहशतवादी हल्ला करण्याची तयारी करतोय. आमच्या देशातील सरकारने अमेरिकेसारखी धडक कारवाई करत पाकिस्तानमधे घुसन हाफिज सईदला कंठस्नान घालावे किंवा आमच्या देशातील कोणी फॅन्टमने जाऊन सईदला कंठस्नान घालावे हीच इच्छा प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. तेव्हाच आमच्या देशातील शहिदांना खरी आदरांजली ठरेल.

.
.
गणेशदादा शितोळे
(२६ नोव्हेंबर २०१५)