एक आठवण २६/११/२००८ ची...
आजही तो दिवस तसाच आठवतो. जणू कालपरवाच घडून गेलेला.
मी डिप्लोमा काॅलेजच्या दुसर्या वर्षाला होतो. पेपरचाच काळ होता. बहुतेक पहिलाच पेपर असावा त्यादिवशी. इंजिनियरींग मॅथेमॅटीक्स (एम थ्री)चा. गारठून टाकणार्या थंडीत पेपर असल्याने पहाटेच उठलेलो होतो. त्यामुळे साडेनऊच्या पेपरच्या वेळेपर्यंत बर्यापैकी अभ्यास झालेला होता. पहिला पेपर असल्याने जरासं टेन्शन होतंच. पण रिव्हिजन झाल्याने त्यादिवशी हाॅस्टेलवरून लवकरच काॅलेजला आलो होतो. काॅलेजमधल्या नेहमीच्या कट्ट्यावर फाॅर्मुलाची रिव्हिजन सुरू होती. हाॅस्टेलवरचे काही मित्रही होते. काहीवेळ गेला असाच गेला.
साडे आठ नऊ वाजण्याच्या सुमारास काॅलेजमधे हळूहळू मुलं यायला सुरवात झाली होती. काही कट्ट्यावर येऊन अभ्यासाच विचारत होती. तितक्यात कोठून तरी ऐक बातमी येऊन धडकली. कोणीतरी आम्हाला कट्ट्यावर बसलेल्यांना आवाज दिला.
"अरे अभ्यास काय करता..? पेपर कॅन्सल झालाय.."
या आवाजासरशी आम्ही त्या मुलाकडे माना वळवल्या. गाडीवर होता बहुतेक. त्यामुळे तो बोलला अन निघून गेला. आम्हाला पाठमोराच दिसला.
पेपर कॅन्सल झाल्याच्या बातमीने एक आनंदाचा धक्का दिला. ही बातमी काॅलेज परिसरात झपाटय़ाने पसरली. जो तो एकमेकांना पेपर खरंच का कॅन्सल झालाय का याची खात्री करत होता. काॅलेज समोरच्या आवारातल्या गर्दीत एवढा एकच विषय सुरू होता. तितक्यात गेटमधून सरांची एक गाडी आली. काॅलेजमधील दोन मित्रांची जोडी होती. एका सरांकडे पिशवी होती. त्यात काही स्वीट आणलं होतं. बहुतेक वाटायचं असावं काॅलेजमधे. ते दोघेही आम्हाला शिकवायला होते. त्यामुळे गर्दीचा रोख सरांच्या दिशेने गेला. सरांनी एवढी गर्दी पाहून पार्किंग कडे जाणारी गाडी मधेच थांबवून मुलांना गर्दीविषयी विचारणा केली. मुलांकडून पेपर कॅन्सल झालाय, पोस्टपोन झाल्याच्या बातम्या पोहचल्या. मुलांनी खात्री करण्यासाठी सरांना विचारलं पण त्यांनाच माहिती नव्हती. लगबगीने ते काॅलेजमधे गेले.
काही वेळातच एकेक शिक्षक काॅलेजमधे आले. सव्वा नऊ वाजले तरी एन्ट्री बेल झाली नव्हती. प्रिन्सिपल केबिनमध्ये मिटींग सुरू होती. थोड्या वेळाने मिटींग संपली अन पेपर कॅन्सल झाल्याची नोटीस नोटीसबोर्डवर लावण्यात आली. पेपर कॅन्सल झाल्याची पुष्टी झाल्यावर आम्ही मुलं आनंदात काॅलेजबाहेर गप्पा मारत निघालो. जो तो पेपर कॅन्सल झाल्याने आनंदी होता. काही वेळातच त्याचं कारणही कळाल.
"मुंबई मधल्या ताज हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. "
ऐकल्यानंतर तंस आमच्या कोणाच्याही मनात दुःख भिती काही जाणवलं नाही. उलट पेपर पोस्ट्पोन झाले याचा खुपच आनंद झाला होता. कारण अशा घटना नेहमीच घडत असल्यासारखं आम्हाला गांभीर्य नव्हते.
दुपारी मेसला जेवायला गेल्यावर टिव्हीवर जेव्हा ही बातमी बघितली. दहशतवादी रेल्वे स्टेशनवर बेछूट गोळीबार करत होते. लहान मुलांचाही विचार करत नव्हते. त्याचवेळी ताज हॉटेलमध्ये एनडीएची फोर्स चाॅपरमधून उतरत होते. अन दहशतवाद्यांशी दोन हात करत होते. काही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. दहशतवाद्यांशी लढताना हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर शहीद झाले होते. सर्वत्र मृतदेहांचा खच पडला होता.
"मुंबई पोलिसांनी नाकाबंदी केली होती. दोन दहशतवादी गाडीतून अंधाधुंद गोळीबार करत होते. नाकाबंदीत गाडीचे टायर फोडल्याने गाडी थांबली होती. पोलीसांनी शरण येण्याची वॉर्निंग दिली तरी गाडीतून उतरून कोणीच खाली येत नव्हते. पोलीसांनी त्या गाडीवर फायरिंग केली. त्यात दहशतवादी ठार झाले समजून पोलीसांनी गाडी घेरली. दहशतवादी मेले समजून दार उघडण्यासाठी तुकाराम ओंबळे पुढे सरसावले. एक दहशतवादी जिवंत होता. एके 47 घेऊन ट्रिगर दाबत अंधाधुंद गोळीबार करण्यासाठी त्याने बंदूक उचलली. ते पाहून त्या दहशतवाद्याशी दोन हात करण्यासाठी सह्याद्रीचा वाघ छाती ठोकून ऊभा ठाकला. ट्रिगर दाबली गेली अन गोळ्या संपेपर्यंत तुकाराम ओंबळे यांच्या छातीवर मोकळी झाली. सह्याद्रीचा वाघ मराठी मातीचा लेख छातीठोकपणे मरणाला सामोरा गेला अन पोलिसांचे प्राण वाचवले. गोळ्या संपल्या अन अलगद तो दहशतवादी पोलिसांच्या हाती जिवंत सापडला. नाव होतं अजमल कसाब. "
टिव्हीवर हा ह्रदयद्रावक व्हिडिओ पाहताना गांभीर्य नसणार्या शरीरावरही काटा उभा राहिला. आपसूकच शहीद वीरांना मानवंदना देण्यासाठी हात डोक्यावर गेला. डोळ्यात पाणी ओघाळू लागले.
आजही तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला की कसाबच्या गोळ्या झेलणार्या तुकाराम ओंबळेंना सॅल्युट करायला हात उभा रहातो.
कामटे करकरे साळसकर सरांच्या बलिदानाचा अभिमान वाटतो.
आज त्या मुंबईवरच्या भ्याड हल्ल्याला सात वर्षे पूर्ण होत आहेत.
या हल्ल्यात शहीद झालेल्या माझ्या सर्व देशबांधव पोलीसांमित्रांना श्रद्धांजली.
शहीदांच्या बलिदानासोबत आम्हाला आमचीच चिड येते की हा भ्याड हल्ला होऊन सात वर्षे झाली तरी हल्ला करणारे सूत्रधार हाफिज सईद पाकिस्तान मधे मोकळा हिंडतोय. अमेरिकेने ९/११ च्या वर्ल्ड ट्रेड सेंटर वरील हल्लेखोर अन मास्टर माईंड ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानात घुसून मारले. अन नंतर त्यावर चित्रपट तयार करण्यात आला.
मुंबईवरच्या भ्याड हल्ल्याला सात वर्षे झाली तरी मास्टर माईंड हाफिज सईद जिवंत आनंदाने हिंडत आहे अन पुन्हा दहशतवादी हल्ला करण्याची तयारी करतोय. आमच्या देशातील सरकारने अमेरिकेसारखी धडक कारवाई करत पाकिस्तानमधे घुसन हाफिज सईदला कंठस्नान घालावे किंवा आमच्या देशातील कोणी फॅन्टमने जाऊन सईदला कंठस्नान घालावे हीच इच्छा प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. तेव्हाच आमच्या देशातील शहिदांना खरी आदरांजली ठरेल.
.
गणेशदादा शितोळे
(२६ नोव्हेंबर २०१५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा