माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०१५


एक सलाम पोलीसांना...




 
काल सकाळीचीच काष्टी मधली अपघाताची घटना.
वाघजाई भरधाव निघालेली गाडी शिवनेरी हाॅटेलसमोर दोघांना धडक देऊन निघून गेली होती. दुचाकीवरचे ते दोघंही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. बघ्याची गर्दी वाढत होती. पण त्या दोन व्यक्तींना उचलून हॉस्पिटलमधे घेऊन जाण्याची हिम्मत होत नव्हती. नुसती एकमेकांना विचारत चर्चा झाडल्या जात होत्या.
त्याचवेळेस रस्त्यावरून एक पोलीस अधिकारी पुण्यात आपली नाईट ड्युटी संपवून आपल्या स्विफ्ट गाडीतून घरी गावाकडे निघालेला होता. हाॅटेलसमोरच्या गर्दीने वाहनांची गती मंदावली होती. गाडीतल्या त्या पोलीस अधिकार्‍याला गर्दी पाहून शंका आलीच. त्या अधिकार्‍याने गर्दीतून वाट काढत आपली गाडी त्या अपघात झाला त्या ठिकाणी घेतली. सुरवातीला गाडी बघून लोक ओरडायला लागले. पण त्यात खाकी वर्दीतला माणूस पाहून गर्दीत शांतता पसरली.
त्या पोलीस अधिकार्‍याने क्षणाचाही विलंब न करता त्या जखमी व्यक्तींना आपल्या गाडीच्या शिटावर बसवले. पण त्या ढीगभर बघ्यांच्या गर्दीतला एकही माणूस मदतीसाठी पुढं आला नाही. जखमींना घेऊन उपचारासाठी गाडी जवळच्याच हॉस्पिटलमधे निघून गेली. बघ्यांची गर्दीही पांगली. जणू काही झालं नव्हतेच.
गाडी हॉस्पिटलच्या दाराशी आली. पोलिस अधिकार्‍याने इमर्जन्सी म्हणताच वाॅर्डबाॅय नर्स पटापट बाहेर धावले. त्या जखमींना अॅडमिट करून घेतले. खुद्द पोलीसच सोबत असल्याने डॉक्टरांनीही आढेवेढे न घेता जखमींना दाखल करून घेतले. जखमी अवस्थेत असलेल्या त्या दोन व्यक्तींना उपचार मिळालेले पाहून पोलीस अधिकार्‍याने गाडी हॉस्पिटलमधून फिरवली. जवळच्या पोलीस ठाण्यात अपघाताची खबर देऊन तो अधिकारी आपल्या गावाच्या दिशेने निघून गेला.

सलाम त्या पोलीस अधिकार्‍याला.

ही घटनेवरून आपल्या समाजातून माणूसकी हरवली आहे का असंच वाटतं. अपघात झाला की बघ्यांची गर्दी होती. पण त्या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची कोणाचिही इच्छा होत नाही. कारण काय तर ही आपली जबाबदारी नाही. हे आपलं काम नाही. ही आपली ड्युटी नाही. अनेकांना वाटतं की आपढ अपघातात जखमी व्यक्तीला मदत केली तर पोलीस आपल्यालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करतील. पण कोणालाही वाटत नाही की जखमी व्यक्तीच्या ठिकाणी कोणी आपली व्यक्ती असती तर आपण मदत केली असतीच ना. त्यावेळी अशीच भूमिका बघ्यांनी घेतली अन आपल्या व्यक्तीचा उपचाराअभावी मृत्यू झाला तर किती राग आला असता. दुःख वाटलं असतं. मग जखमी असणारी व्यक्ती आपलीच आहे समजून उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्याची भावना बघ्यांच्या मनात का येत नाही हीच एक शोकांतिका आहे.
त्याचवेळी पोलीस अधिकार्‍याच्या या कृतीतून आपढ काही बोध घेणार आहोत का.?
आपल्याला समजणार्‍या ड्युटी ड्युटीच्याच भाषेत समजा त्या पोलीस अधिकार्‍याला वाटलं असतं, मी आत्ताच माझी नाईट ड्युटी संपवून घरी चाललोय. दरम्यान रस्त्यावर कुठे अपघात घडला तर मी का पुढे जावं. आता माझ्या ड्युटीचा टाईम नाही म्हणून तो अधिकारी बघ्यांच्या गर्दीतून निघून गेला असता तरी ना बघ्यांना काही फरक पडला असता ना पोलीस अधिकार्‍याला. पण त्या पोलीस अधिकार्‍यात समाजभावना माणूसकी होती. तो पोलीस नंतर अगोदर एक माणूस आहे. भले त्या अंगावरच्या खाकी वर्दीने ती भावना जागी केली. पण त्याने आपल्या कामाची ड्युटी संपवून समाजाचीही ड्युटी व्यवस्थित पार पडली.
त्याचवेळी आपण हे विसरतो की आपणही समाजाचा भाग आहोत अन कधी आपणही साजाप्रती आपली माणूसकीची, बंधूभावाची ड्युटी पार पाडली पाहिजे.
आजच्या 26/11 निमित्ताने पुन्हा एकदा पोलिसांमधे आजही तोच तुकाराम ओंबळे जिवंत आहे याचीच जाणीव होते. साळसकर, कामटे, करकरे ओंबळे उन्नीकृष्णन शहीद झाले. पण महाराष्ट्रातल्या कोपर्‍याकोपर्‍यात ते जिवंत आहेत.

26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या माझ्या देशबांधवांना भावपूर्ण आदरांजली.

आज त्या मुंबईवरच्या भ्याड हल्ल्याला सात वर्षे पूर्ण होत आहेत.
या हल्ल्यात शहीद झालेल्या माझ्या सर्व देशबांधव पोलीसांमित्रांना श्रद्धांजली.
शहीदांच्या बलिदानासोबत आम्हाला आमचीच चिड येते की हा भ्याड हल्ला होऊन सात वर्षे झाली तरी हल्ला करणारे सूत्रधार हाफिज सईद पाकिस्तान मधे मोकळा हिंडतोय. अमेरिकेने 9/11 च्या वर्ल्ड ट्रेड सेंटर वरील हल्लेखोर अन मास्टर माईंड ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानात घुसून मारले. अन नंतर त्यावर चित्रपट तयार करण्यात आला.
मुंबईवरच्या भ्याड हल्ल्याला सात वर्षे झाली तरी मास्टर माईंड हाफिज सईद जिवंत आनंदाने हिंडत आहे अन पुन्हा दहशतवादी हल्ला करण्याची तयारी करतोय. आमच्या देशातील सरकारने अमेरिकेसारखी धडक कारवाई करत पाकिस्तानमधे घुसन हाफिज सईदला कंठस्नान घालावे किंवा आमच्या देशातील कोणी फॅन्टमने जाऊन सईदला कंठस्नान घालावे हीच इच्छा प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. तेव्हाच आमच्या देशातील शहिदांना खरी आदरांजली ठरेल.

.
.
गणेशदादा शितोळे
(२६ नोव्हेंबर २०१५)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा