माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शुक्रवार, १८ डिसेंबर, २०१५



वाटतं कधीतरी...!


 वाटतं कधीतरी घेऊन या मनाला,
आयुष्यात एकदा तरी असं व्हावं...
आपलंच आयुष्य आपल्याला,
आपल्या मनासारखं जगता यावं...

वाटतं कधीतरी घेऊन या मनाला,
आठवणींच्या झुल्यावर झुलावं...
जात उंच उंच  हा झोका,
जुन्या आठवणींनी नव्यानं मनात यावं...

वाटतं कधीतरी घेऊन या मनाला,
वार्याच्या झुळकेसोबत मंद वहावं...
जणू पक्षासारखं होऊन,
उंच भरारी घेत स्वच्छंदी उडावं...

वाटतं कधीतरी घेऊन या मनाला,
स्वप्नांच्या दुनियेत मनसोक्त हिंडावं...
स्वप्नांच्या या प्रवासातच,
मी तिला आपलंस करून घ्यावं...

वाटतं कधीतरी घेऊन या मनाला,
असंच रोजच्या साखरझोपेत झोपावं...
स्वप्नांच्या या चंदेरी दुनियेत,
आयुष्य मनासारखं जगता यावं...





गणेश दादा शितोळे
(१८ डिसेंबर २०१५)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा