माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

बुधवार, ३१ डिसेंबर, २०१४

या वर्षामधील शेवटची कविता....

Dedicate to all Friends who make me good friend than person.....
Thanks for including me in your life


!! आयुष्याचं पान !!

आयुष्याचं अजून एक पान पलटलं....
काळाच्या पडद्याआड जाऊन पडलं...
जणू आयुष्य आठवणीत कोंदलं गेलं...
क्षणभरासाठी डोळ्यात टिपे देऊन गेलं...


होतं दुःखानं थोडं चुरगाळून गेलेलं....
पण तरी नव्हतं किंचित ही फाटलेलं...
आनंदाचं अक्षर कुठेमुठे होतं लपलेलं
जणू सुखाच्या रेषेचं अस्तिवच होतं त्यानं जपलेलं...


होतं कोणी त्यावर थोडं अधिक लिहलेलं....
पण कोणीच नव्हतं ते वाचलेलं...
जणू कोणाला वाचताच नव्हतं आलेलं...
कारण आयुष्यात अजून कोणी डोकावून नव्हतं पाहिलं....


होतं मैत्रीचं नातं एका कोपर्‍यात लिहिलेलं...
प्रत्येक सुख दुःखात साथ दिलेलं..
आठवत होतं कधी पाठीवर आधाराचा हात दिलेलं..
विसरत नव्हतं एकत्र खळखळून हसलेलं....


होतं एका कोपर्‍यात कवितेवरं प्रेम लिहिलेलं...
छंद आहे की आवड कधीही नाही उमजलेलं...
असावं बहुतेक जुन्या आठवणींचं मनोगत...
शब्दाशब्दातून कागदावर उतरलेलं....


होतं एका कोपर्‍यात कुटुंबाचं प्रेम लपलेलं...
कधी व्यक्त केलं नाही तरी
कायम सोबत असलेलं...
आयुष्याला प्रेरणा देत असलेलं...


होतं एका कोपर्‍यात प्रेमाचं फुलपाखरू...
अजूनही फुलाचा शोध घेत असलेलं....
अजूनही वेड्यासारखं फिरत असलेलं...
भेटीच्या ओढीनं वाट बघत हिंडत असलेलं....


होतं एका कोपर्‍यात खेळावरचंप्रेम लपून राहिलेलं....
क्रिकेट कबड्डी फुटबॉल की कुस्ती....
सगळ्याच खेळत मन होतं अडकलेलं...
धोनीच्या निवृत्तीइतकंच दुःख
मुंबई केरलाच्या हरण्याचंही झालेलं....


होतं एका कोपर्‍यात
दुःख राजकारणातलं....
जितकं होतं मुंडेच्या अपघाती मृत्यमधलं...
तितकच होत दादांच्या पराभवातलं...

आपल्याच लोकांनी पाठीत खंजीर खुपसलेलं....

होतं एका कोपर्‍यात प्रेम गाण्यात उतरलेलं...
मैं तेनु समझावा म्हटलं तरी कधीच न समजलेलं...
प्रत्येक क्षणी नवा आनंद देत असलेलं....


होतं एका कोपर्‍यात प्रेम त्या मित्रांमधलं....
कॉलेजमधील प्रत्येक क्षणाला जाणीव करून देत असलेलं....
कधी पुन्हा भेटून गप्पा मारू म्हणत असलेलं...
उचकीनंतरही पाणी पिऊन देत नसलेलं...


होतं एका कोपर्‍यात प्रेम
कोणाच्या तरी आठवणी मधलं....
ह्रदयावर खोल जख्मा करून गेलेलं...
आठवणी विसरण्याची वाट पहात असलेलं...

एक एक कोपरा वाचून काढत....
पान होत संपत आलेलं...

मनातल्या ओलेपणाला
त्यानेही अलगद डोळ्यातून टिपलेलं.....

आयुष्याचं नवीन पान उलटताना
पु लं चं एक वाक्य आठवलं...

आयुष्यात मला भेटलेल्या तुमच्या सारख्या व्यक्तींचं
व्यक्तीपेक्षा वल्लीपणच मला फार आवडलं...
म्हणूनच तुमच्या आभाराचे शाब्दिक प्रेम
लेखनीतून काव्यातून उतरलं....


वर्ष येतात आणि जातातही,
वर्षाचा शेवटचा दिवस आला कि, "गेलेलं संपूर्ण वर्ष कसं गेलं...?" याचा हिशोब लावायला सुरुवात होते. गेलेल्या वर्षात खूप काही झालं, खूप काही मिळालं, खूप काही गमावलं...
आता जे कमवलं किंवा जे गमावलं, त्याला "खूप" कसे म्हणता येईल हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे...
नवीन माणसं भेटली "जीव" बनली, काही "जीव" लावलेली माणसं दुरावली..
काही श्वास भास ठरले आणि काही भास श्वास ठरले....
जे चांगलं होतं, मनापासून हवं होतं आणि ते आयुष्याने आपल्याला मिळवून दिलंय त्याची किंमत ठेवायची, मिळालंय ते जपून ठेवायचं...

"सगळेच नशीबवान नसतात, आपण नशीबवान निघालो" असे म्हणून आयुष्याचे आभार मानून मिळालेलं टिकवून ठेवायचं...
कारणआयुष्य आपल्याला "मिळवून द्यायचं" काम करतं.
ते जपणं आपल्या हातात असतं..
आपण चालायचे थांबतो पण आपण थांबलो म्हणून घड्याळाचे काटे थांबतात का...?
नाही, त्यांची टिकटिक चालूच राहते
"वेळ थांबत नसतो"...

"दु:ख मनाच्या कुपीत बंद करायचं आणि सुखाच्या स्वागतासाठी सज्ज रहायचं"

आज वर्षाचे शेवटचे दोन दिवस राहिलेत.....
खूप काही गमावल पण त्यापेक्षा अजून कमावल, अगदी ह्रदयाजवळची माणसे दूर झाली, पण तितकीची जवळ आली, खूप काही सोसलं, खूप
काही अनुभवलं, केलेल्या संघर्षातून जीवन कस जगायच हे शिकलं......

धन्यवाद मित्रांनो देत
असलेल्या साथीबद्दल......
असाच सहवास तुमचा आयुष्यभर लाभो.......
चुकून जर मन दुखवल असेल तर मोठ्या मनाने माफ करा......



गणेश दादा शितोळे
(३१ डिसेंबर २०१४)



सोमवार, २९ डिसेंबर, २०१४


कालच्या दिवसाकरता सुचलेली कविता.....

एका लग्नात....



होते एक लग्न जेव्हा....
आम्ही मित्र एकत्र भेटलो होतो....
विसरून कामाचे टेन्शन सारे....
बिझी शेड्युलचा वेळ काढून आलो होतो...

सातासमुद्रपारचे मित्र भेटले....
जणू असाच कल्लोळ झाला होता....
असे गप्पांच्या ओघात रिंगण झाले होते....
जणू पुन्हा एकदा कट्ट्यावरच बसलो होतो....

आले सगळेच एकमेकांना भेटायशी....
जणू हसून भेटली विखूरलेली मने....
येताच सुर्य नभशीरावरी....
हळूच गेले सावलीमधे....

अचानक नाद असा तो घुमू लागला...
क्षणात पायंचा ठेका थिरकू लागला...
मित्र आमुचा ऐसा नाचला...
जणू प्रभूदेवाही त्याच्याकडूनही शिकला असता...

बेबंध तालांनी नाद तो गुणगुणला...
मित्रांचा मेळा येथेच्छ डुंबून गेला...
नृत्याचा आविष्कार ऐसा होता...
पहाणारा नकळत खळखळून हसून गेला...

वेळ झाली तिथी समीप आली...
नवजोडप्या अगोदर भटजींनाच घाई झाली....
पावालांची वाट मंडपापर्यंत पोहचली....
आक्षताही हातोहाती विसावली...

पहिली सावधान घटका झाली...
अक्षताच्या पावसाचा सडा तोंडावर सडकून पडला...
जणू अक्षता युद्धाचा खेळ सुरू झाला....

तोंडाच्या झडपा झाकल्या परी..
डोक्यावरचा सडा नाही थांबला....
दाराखिडकीत चोरून बसला...
तरी मागूनही अक्षतांचा मारा न चुकला...

लग्न लागले बाहेर पडले....
तरी सगळ्यांनी मनी ठरवले...
अक्षतांचा खेळ ही शेवटी...
मित्राच्या तोंडावर मारूनच संपला...

जेवणाच्या पंगतीतही उठल्या...
खिशातल्या नोटा आहेराच्या पाकीटात विसावल्या....
नाव टाकण्याच्या बहाण्यात...
गर्लफ्रेंडच्या आठवणी जाग्या केल्या....

एकाकी फिरणारा मित्र आमुचा...
वहिनींसोबत दिसू लागला...
घुमघुमत्या आवाजाने
प्रत्येक हाका देऊ लागला...

जोडीनेच मग ओळखीचा कार्यक्रमही उरकला....
एका फोटोसाठी भटजी मधेच थांबवला....
मित्रांचा मेळा त्याला तारखेचे विचारू लागला...
जणू पुन्हा भेटण्याचा प्लान रेडीच केला....

निरोपाच्या गाड्या प्रत्येकाने बाहेर काढल्या...
तरी कोणाला जावेसे मात्र आठवेना...
मग नकळत उद्या डोळ्यासमोरी झाला. ..
शेवटच्या निरोपाला प्रत्येक जण घाई करू लागला....

भेटून झाले...
हसून झाले...
शेवटच्या क्लिक ला पुन्हा सगळे एकत्र आले...
पुन्हा भेटण्याच्या साक्षीने सगळे निघायला झाले....

सुर्य ही किरणात विखरून गेला...
प्रत्येक जण किरणाच्या प्रकाशात निघून गेला. ..
सुर्याला पुन्हा नव्याने भेटण्याच्या साक्षीने,
रस्ता ही स्वतःच्या प्रवासात मार्गस्थ झाला...

गप्पांच्या ओघात सारा...
तो दिवसच कसा निघून गेला...
मनी मनी हे कळले नाही...
पुन्हा एकदा भेटणार कधी......




गणेश दादा शितोळे
(२९ डिसेंबर २०१४)



महेशच्या भावाचं लग्न

              खुप दिवसांनी मित्राच्या भावाच्या लग्नानिमित्ताने आज जुने मित्र भेटलो. जवळपास वर्षभरानंतरच. प्रत्येकाचा चेहरा पुन्हा एकदा नव्याने पाहिला आणि क्षणात त्यांच्या सोबतचे दिवस डोळ्यासमोर दरवळून गेले.

                       काही क्षण बरं वाटलं पण नंतर एकंदरीत काहीतरी बिनसल्याची जाणीव झाली. मैत्रीची नाती कधी बदलत नाहीत असं मी कायम मानायचो आणि आजही मानतोच. परंत त्या दुसर्‍या क्षणाला जाणवलं की ही मैत्री सुरवातीला जशी मोकळीढाकळी होती तशी ती जाणवली नाही. आज त्या मैत्रीत शिष्टाचाराची बंधनंच जास्त दिसून आली. करीअरसोबत कामानिमित्ताने शिष्टाचार इतके अंगवळणी पडलेले पहिल्यांदाच जाणवलं. बहुतेक मी या क्षेत्रात उशिरा पदार्पण केल्याने मला ते अजूनही जाणवले नाही.

                           आजची भेट योगायोगाने नव्हे तर ठरवून घडलेली होती. त्यामुळे भेटीनंतरची उत्कठता होती. परंत आजच्या भेटीत संवाद हरवलेला दिसला. विभागलेला दिसला. प्रत्येक जण हातचं राखून बोलत असल्याचे स्पष्ट जाणवले. अगदी मलाही काही झाले होते माहित नाही. कारण खुप दिवसांनंतर भेटलेल्या मित्रांसोबत खुप काही बोलायचं होतं. पण ते काहीच बाहेर पडलं नाही. बहुतेक शिष्टाचाराची लागण झाल्याची जाणीव उशीरा झाली.

                             काही वर्षांपूर्वी अनेक धागे एकत्र येऊन संवादाने गुंफत मैत्री नावाचा सुंदर दोर तयार झाला होता. परंत आज जाणवले या दोरातील काही धागे मधेच कुठेतरी अडून बसलेले होते. काही धागे कक्षेबाहेर जाऊन वेगळा दोर गुंफला होता. मन धागा धागा जोडतो आहे असं म्हटलं तरी ते वरवरचं भासत होतं. काही काळ हे क्लेशदायक वाटलं तरी धक्का बसण्याइतपत काही नव्हते. कारण आजही तो मैत्रीचा दोर तसाच आहे. धागे विखुरलेले आहेत, अंतर वाढले आहे तरी त्यातील जागा दुसर्‍या कोणी तरी घेतली याचा आनंद आहे. नवीन धागे जुळताना जुन्या धागे कुजकट झालेलेच असतात. पण म्हणून कुणी ते हाताने तोडत नाही. नवीन धागे गुंफत जुन्या नव्याची सांगड होते. फरक इतकाच की अंतराच्या कक्षा विभिन्न असतात. आपापले धागे गुंफत नवे दोर विनायला कधीचे निघून गेली. मी मात्र एकटाच चाललो होतो. असो. लिहायला बरंच काही आहे परंतु वहायचं नाही हे ठरवलंय. शेवटी एकच प्रश्न मनाला पडला आहे...

का दुर मी एकटाच आहे...

बघू याचंही उत्तर मिळेल. तेव्हा पूर्ण लिहिले जाईल. परंतु 

"अशी अचानक कुठे अलगद,

आपल्याच कुणाशी भेट व्हावी. 
अन आनंदाच्या भरातही मग,
सांजवेळ अलगद निघून जावी."

गणेशदादा शितोळे
(२९ डिसेंबर २०१४)



सोमवार, १ डिसेंबर, २०१४

तू एकदा तरी पुन्हा पहिल्या सारखे बोलावं...


मैत्रीमधे एकाचवेळी सायलेंट व्हायचं नसतं.....
एकानं बोलायचं तर दुसर्‍याने ऐकायचं असतं.....
मैत्रीमधे संवादाचं काम कायम ठेवायचं असतं....
नात्यातला संवाद संपला की नातं संपत जात असतं.....

मैत्रीमधे फक्त समजून घ्यायचं असतं.....
नातं फिल करण्यात आनंद आणि दुःख असतं.....
मैत्रीमधे एकमेकांना फिल करायचं असतं....
म्हणूनच मैत्रीचं नातं आयुष्यभर टिकत असतं.....

मैत्री मधे सॉरी आणि थँक्यू असं काहीच नसतं.....
पण त्याशिवाय कोणतंच नातं टिकत नसतं.....
मित्र चुकला तर त्याला ‘गलत का सही’ करायचं असतं......

अबोला असताना मनवण्याइतकं
अवघड काहीच नसतं.....
तू कायम माझ्याशी बोलावं असं नेहमी वाटतं.....
मी चूकतो तरी तू सावरते माझ्या लक्षात आलं होतं....
मै जिंदगी का साथ निभाता रहूंगा म्हणत जगायचं होत....

आयुष्यात प्रत्येकाकडूनच
काहीना काहीतरी चुकत असतं......
आपल्या माणसाच्या चुकांना
आपणच माफ करायचं असतं.....

रूठलेल्या मनाला मनवायचं असतं....
प्रेम वाढतं म्हणून फक्त भांडायचं असतं.....
 खोटं भांडता भांडतानाही
एकमेकांच्या मनाला जपायचं असतं.....

गणेश दादा शितोळे
(०१ डिसेंबर २०१४)


शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०१४

छत्रपती संभाजी महाराज नेमके कोण..? ब्राम्हणांचा कर्दनकाळ की धर्मवीर ...?







                         आजवर संभाजी महाराजांचा इतिहास अनेकांच्या कलाकृतीतून समजला. विश्वास पाटील यांची संभाजी असेल किंवा शिवाजी सावंत यांच्या छावा मधून संभाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहोचले. अनेक बखरी, संदर्भ ग्रंथ यामधूनही संभाजी महाराजांचा इतिहास मांडण्यात आला. परंतु या बखरीतील काही बखरीतून केवळ संभाजी महाराजांच्या द्वेषापोटी वेगळा इतिहास रेखाटण्याचा प्रयत्न केला गेला. अनेक संघटना ही याच आपल्या सोयीनुसार वाचणात आलेल्या बखरी, संदर्भ ग्रंथानुसार समाजापुढे संभाजी महाराजांचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. व्याख्यातेही गर्दी जमवण्याचा प्रयत्न करत संभाजी महाराजांचा इतिहास सांगतात. यातूनच संभाजी महाराजां संदर्भात विविध इतिहास समोर आणण्यासाठी प्रयत्न झाला. 
                           कुणी संभाजी महाराजांना ब्राम्हणांचा_कर्दनकाळ ठरवलं तर कुणी हिंदू धर्म वाचवण्याकरता महाराज लढले म्हणून धर्मवीर केले. तर काहींनी संभाजी महाराजांची व्यक्तीरेखाच बदलून ठेवत संभाजी महाराज म्हणजे स्वराज्यद्रोही म्हणून उभे करत आपण नेमकं कोणाबद्दल बोलतोय हे विसरल्याचाच प्रत्यय करून दिला. परंतु या तिन्ही चारही विचारधारांमधला संभाजी महाराजांचा इतिहास नेमका खरा कोणता असा प्रश्न बहुतेक लोकांना पडतो. आणि मग जो तो आपापल्या पटेल तो विचार घेऊन संभाजी महाराजांना त्या चौकटीत बसवून आपल्या मनात उभा करतो आहे.
                          असा प्रश्न खरंतर मलाही पडला होता आणि मीही यातीलच एका विचाराने प्रेरित होऊन माझ्या नजरेतील संभाजी महाराजांचा इतिहास चौकटीत बसवला होता. परंतु त्याबाबत अनेक शंका,  कुतूहल होते. नेमके खरं काय या विचाराने अनेकदा इतिहास चाळून बघण्याचा प्रयत्न सुद्धा केला. या तिनही विचारधारांच्या संबंधीत या निमित्ताने लोकांची पुस्तकं वाचली. परंतु प्रत्येक पुस्तकात आपल्याला परीने इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला गेल्याचेच दिसले. तरीही या एकंदरीत वाचनातून आणि सखोल विचारमंथनातून या सर्व विचारधारांहून वेगळ्या अशा संभाजी महाराजांची ओळख झाली. 
संभाजी महाराज नेमके कोण..? 
                   छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र, राजमाता जिजाऊंनी घडवलेले युवराज आणि कायम अजेय असे स्वराज्याचे दुसरे छत्रपती ही संभाजी महाराजांची एका व्याख्येतील ओळख झाली. परंतु माझ्या मनात याबद्दल प्रश्न नाहीच. प्रश्न आहे तो याबद्दल की संभाजी महाराज नेमके आण्णा दत्तो आणि संबंधित काही ब्राह्मण मंडळी संभाजी महाराजांचा द्वेष करत कट करस्थान करत म्हणून त्यांना देहदंड दिला म्हणून ब्राम्हणांचा_कर्दनकाळ की हिंदू धर्म वाचवण्याकरता महाराज लढले म्हणून धर्मवीर..?

                       खरतरं या दोन्ही लेबलाखालील व्याख्येत संभाजी महाराज बसत नाहीत. यातील पहिल्या व्याख्येचा फोलपणा बघू.
                            काही संघटनांच्या मते संभाजी महाराजांनी आण्णा दत्तो, मोरोपंत पिंगळे आणि संबंधित काही ब्राह्मण यांना संभाजी महाराजांनी देहदंड दिला. कारण ही मंडळी सुरवातीपासून संभाजी महाराजांना आपला शत्रू समजून कट कारस्थानं करत होती. अनेकदा संभाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न सुद्धा केला. शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर छत्रपती राजाराम यांना गादीवर बसवण्याकरता स्वराज्याचे सरसेनापती आणि राजारामांचे मामा हंबीररावांना संभाजी महाराजांना कैद करण्याच्या कटात सहभागी करून घेण्याचाही प्रयत्न केला. तरीही संभाजी महाराजांनी या मंडळींना सुधारण्याची संधी देत माफ केले. अपयश आले म्हणून मग या मंडळींनी चक्क औरंगाजेबाचा मुलगा अकबर याच्याशी संधान बांधून स्वराज्याचा व्यवहार करण्याचाही प्रयत्न केला. याची माहिती स्वतः अकबराने संभाजी महाराजांना दिल्याने संभाजी महाराजांनी स्वराज्याचा व्यवहार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या मंडळींना देहदंड दिला. ही गोष्ट जोपर्यंत संभाजी महाराजांपर्यंत मर्यादित होती तोपर्यंत महाराजांनी प्रत्येक वेळी सुधारण्याची संधी दिली. परंतु जेव्हा स्वराज्याशी द्रोह करण्याचा कट आखला तेव्हा माफी नव्हती. हा इथपर्यंत सगळा इतिहास खरा मांडण्यात आला. 
                          पण यामुळे संभाजी महाराज नेमके ब्राम्हण विरोधी आणि ब्राम्हणांचा कर्दनकाळ कसे ठरतात हेच कळत नाही. संभाजी महाराजांनी या मंडळींना ब्राम्हण म्हणून देहदंड दिला नव्हता तर स्वराज्यद्रोह केला म्हणून दिला होता आणि सगळेच ब्राम्हण संभाजी महाराजांना शत्रू मानत नव्हते. मग संभाजी महाराज ब्राम्हणांचे कर्दनकाळ कसे ठरतात. बरं कर्दनकाळ ठरायला संभाजी महाराजांनी नंतरच्या काळात स्वराज्यातील ब्राम्हणहत्या केल्या का तर तसेही नाही. मग कर्दनकाळ कसे..? म्हणजे एकतर कर्दनकाळ कोणाला म्हणतात हेच या विचारसरणीच्या लोकांना समजले नसावे किंवा त्यांनी इतिहासाचा सुंकुचित अभ्यास केला असावा. संभाजी महाराज ब्राम्हणांचे कर्दनकाळ असते तर कवी कलश कधीच इतका काळ संभाजी महाराजांसोबत राहिले नसते किंवा त्यांचीही हत्या करण्यात आली असती. आण्णा दत्तो आणि मंडळी सोबत संभाजी महाराजांचे पटले नाही ते संभाजी महाराजांनी या मंडळींच्या लाचखोरपणाला आळा घालण्याचा प्रयत्न केला म्हणून ही मंडळी संभाजी महाराजांना शत्रू समजायची. 
                                 संभाजी महाराज ब्राह्मणांचे कर्दनकाळ असते तर या मंडळींच्या जागी पुन्हा ब्राह्मण अष्टप्रधान मंडळी का नेमली असती ..? असे बरेच प्रश्न या निमित्ताने उभे रहातात. संभाजी महाराजांचा संघर्ष कधीही एका विशिष्ट जातीविरोधी नव्हता. त्यामुळे संभाजी महाराजांना ब्राम्हणांचा कर्दनकाळ ठरवून जातीयवादी करणार्‍या लोकांनी आपल्या विचारसरणीवर सखोल विचार करून पूर्वग्रह ठेवून चौकटीत बंदिस्त संभाजी महाराजांची प्रतिमा व्यापक करायला हवी.

                             आता या विषयातील दुसर्‍या बाजूचा फोलपणा पाहू. संभाजी महाराजांचा धर्मवीर म्हणून अनेक संघटना, विचारधारा गौरव करतात. परंतु त्यांची यामागची भूमिका लक्षात घेतली तर धक्का बसतो. या विचारसरणीच्या लोकांमते संभाजी महाराजांना कैदेत असताना औरंगाजेबाने धर्मांतर करून मुसलमान करण्याचा आग्रह धरला होता. परिणामी कैदेतून सुटका केली जाईल असा एकंदरीत दावा केला जातो. औरंगाजेबाच्या या प्रस्तावाला संभाजी महाराजांनी म्हणे नकार दिला आणि संभाजी महाराजांनी हिंदू धर्माचे रक्षण केले म्हणून संभाजी महाराज धर्मवीर...
                         खरंतर असा दावा करून संभाजी महाराजांनि हिंदूत्ववादी करण्याचा आणि धर्मवादी करण्याचा प्रयत्न का केले जातो हे न उमजणारे आहे. औरंगजेब उतारवयात मौलावींच्या सहवासाने धर्मांध झाला असला तरी तो वास्तवाचे भान ठेवून वागत असल्याचे दिसून येते. त्यामुळे आयुष्यभर ज्या सह्याद्रीच्या छाव्याशी जंग जंग लढून त्याला कैद करण्यात यश आले त्याला हिंदू धर्मातून मुसलमान करून सोडून देण्याइतका नक्की महामुर्ख नव्हता. आणि खरंच असा प्रस्ताव असता तर स्वराज्य वाचवण्याकरता संभाजी महाराजांनी आपली पर्वा न करता हे सहजपणे केले असते. बालवयात स्वराज्य वाचवण्यारता त्याच मुघलांचा सरदार मिर्झा जयसिंग यांच्या कैदेत रहाणारा शिवपुत्र हा निर्णय घेताना कधीही कचारला नसता. कारण संभाजी महाराजच नव्हे तर स्वराज्यातील प्रत्येक मावळ्यांच्या डोळ्यासमोर स्वराज्य हाच एकमेव धर्म होता आणि ते स्वराज्य वाढवण्याकरता आणि संरक्षणाकरता प्रसंगी जीवाची बाजी लावण्याचाच आदर्श होता. त्यामुळे संभाजी महाराजांनी स्वराज्य वाचवण्याकरता हसत हसत हे धर्मांतर केले असते. परंतु वास्तवात औरंगाजेबाने असा काही प्रस्तावच ठेवला नव्हता. 
                          औरंगजेब धर्मांध होती तरी वास्तवाची जाणीव ठेवून निर्णय घेत होता. मुघलशाही मधे अनेक मराठाच नव्हे तर हिंदू सरदार होते. पण आपले नातेवाईक मिर्झाराजेंनाही त्याने कधी मुसलमान करण्याचा प्रयत्न केला नाही तर बाकी सर्व लांबच. कैदेत असताना औरंगाजेबाने संभाजी महाराजांना सोडण्याची कधीही भाषा केली नव्हती.  आणि केवळ दोनच प्रश्न विचारले होते. एक तर स्वराज्याचा खजिना कुठे आहे आणि मुघलशाहीतील कोण कोण फितूर सामिल आहे. दुसरं एक असे की संभाजी महाराजांसमोर शिवाजी महाराजांचा आदर्श होता. खरंच संभाजी महाराज हिंदूत्ववादी किंवा धर्मवादी असे समजले तरी एकंदरीत संभाजी महाराजांच्या काळात महाराजांनी कोणाचे धर्मांतर केल्याचे दिसून येत नाही. याउलट सर्वच जातीधर्माचे लोक स्वराज्यात आनंदात नांदत होते. यापलीकडेही संभाजी महाराजांना धर्मवीर संबोधले जात असेलच तर ते केवळ या करता की स्वराज्य हाच शिवधर्म आणि हेच स्वराज्य वाचवण्याकरता निधड्या छातीने मरणाला समोरे जाणारे संभाजी महाराज धर्मवीर वाटतात.


गणेशदादा शितोळे
(७ नोव्हेंबर २०१४)


बुधवार, १३ ऑगस्ट, २०१४

मी....!!!



मी म्हणजे कोण
मी म्हणजे पाऊस
कधी ढगांच्या गर्दीतून रिमझिम बरसणारा...
तर कधी विजेच्या कडकडाटाने कोसळणारा...

मी म्हणजे कोण
मी म्हणजे प्राजक्त
सांजवेळी फुलून झाडाखाली सडा पडणारा...
अन सभोवताली यथेच्छ सुगंधाची उधळण करणारा...

मी म्हणजे कोण
मी म्हणजे शब्द
कधी आधार देत पाठीशी उभा रहाणारा...
तर कधी बोचत मनाला टोचणारा...

मी म्हणजे कोण
मी म्हणजे कवी
कधी भावनांना वाट करून देणारा...
तर कधी भावनांमधेच गुंग होणारा...

मी म्हणजे कोण
मी म्हणजे विश्वास
कधी आपलेपणाची खात्री देणारा...
तर कधी नात्यातील गैरसमजांना लाथाळणारा...

मी म्हणजे कोण
मी म्हणजे आनंद
कधी हास्याचे तुषार उडवणारा..
तर कधी मनाला नकळत स्फुरणारा....

मी म्हणजे कोण
मी म्हणजे माणूस
कधी संकटासमोर उभा ठाकणारा...
तर कधी आयुष्याची लढाई जिंकणारा...

मी म्हणजे कोण
मी म्हणजे केवळ मी स्वतः,
एकच असूनही विभिन्न आयुष्य जगणारा...
अन आसवे आणि पाण्याइतका एक होऊन जाणारा...
मी म्हणजे केवळ मी स्वतः,
पडद्याआडूनच सावली बनून असणारा....

गणेशदादा शितोळे
(१३ ऑगस्ट २०१४)


शुक्रवार, १३ जून, २०१४

तू एकदा तरी पुन्हा पहिल्या सारखे बोलावं.......


मैत्रीमधे एकाचवेळी सायलेंट व्हायचं नसतं.....
एकानं बोलायचं तर दुसर्‍याने ऐकायचं असतं.....
मैत्रीमधे संवादाचं काम कायम ठेवायचं असतं....
नात्यातला संवाद संपला की नातं संपत जात असतं.....

मैत्रीमधे फक्त समजून घ्यायचं असतं.....
नातं फिल करण्यात आनंद आणि दुःख असतं.....
मैत्रीमधे एकमेकांना फिल करायचं असतं....
म्हणूनच मैत्रीचं नातं आयुष्यभर टिकत असतं.....

मैत्री मधे सॉरी आणि थँक्यू असं काहीच नसतं.....
पण त्याशिवाय कोणतंच नातं टिकत नसतं.....
मित्र चुकला तर त्याला ‘गलत का सही’ करायचं असतं......

अबोला असताना मनवण्याइतकं
अवघड काहीच नसतं.....
तू कायम माझ्याशी बोलावं असं नेहमी वाटतं.....
मी चूकतो तरी तू सावरते माझ्या लक्षात आलं होतं....
मै जिंदगी का साथ निभाता रहूंगा म्हणत जगायचं होत....

आयुष्यात प्रत्येकाकडूनच
काहीना काहीतरी चुकत असतं......
आपल्या माणसाच्या चुकांना
आपणच माफ करायचं असतं.....

रूठलेल्या मनाला मनवायचं असतं....
प्रेम वाढतं म्हणून फक्त भांडायचं असतं.....
 खोटं भांडता भांडतानाही
एकमेकांच्या मनाला जपायचं असतं.....

गणेश दादा शितोळे
(१३ जून २०१४)


शनिवार, ३ मे, २०१४

तिच्या आठवणीत.....



डोळ्यांना सांगितलंय मी आज ओंगळवाणं पाहू नको...
आज तिला आठवणीत पहायचं आहे....
पापण्यांना सांगितलंय मी आज मिटू नको
आज तिच्या आठवणीत जागायचं आहे....

गालाला सांगितलंय मी आज खळी पडून देऊ नको...
आज तिच्या गालावरच्या खळीला बघायचं आहे...
ओठांना सांगितलंय मी आज ठम्म बसून रूसू नको...
आज तिच्या ओठांवरच्या हास्याला बघायचं आहे...

मनाला सांगितलंय मी आज कोणाला अलिंगन देऊ नको...
आज तिला मिठीत घ्यायचं आहे..
ह्रदयाला सांगितलंय मी आज जास्त धडधडू नको...
तिच्या आठवणीत तुला खूप धडधडायचं आहे....

शब्दांना सांगितलंय मी आज फार काही सुचवू नको...
तिच्या आठवणीत बरचं काही सुचणार आहे...
कवितेला सांगितलंय मी आज शब्दांतून काही बोलू नको...
आज आठवणीत का होईना  तिच्याशी बोलायचं आहे...

भावनांनाही सांगितलंय आज मनाच्या कोपर्‍यात दडून राहू नको..
आज तिच्याबद्दलच्या सर्व भावनांना वाट करून द्यायचं आहे...
आसवांना सांगितलंय मी आज नुसतेच गालावरून ओघळू नको..
आज तिच्या विरहाच्या आठवणीत मनसोक्त रडायचं आहे....


गणेश दादा शितोळे
(३ मे २०१४)



सोमवार, १४ एप्रिल, २०१४

आठवणीत तुझ्या या मन बावरले का असे..सांगणार का कधी तू या मना...


आठवणीत तुझ्या या मन बावरले का असे..
सांगणार का कधी तू या मना...
हसरे भास तुझे दिसती मना कसे
सांगणार का कधी तू या मना...
गुंतले मन हे तुझ्या आठवणीत गाठ ही मी सोडवू कशी...
सांगणार का कधी तू या मना...
आठवणीत तुझ्या या मन बावरले का असे..
सांगणार का कधी तू या मना...

चालता चालता आयुष्य हरवले  आठवणीत तुझ्या...
पावले थबकली रमण्यात आठवणीत तुझ्या...
चालता चालता आयुष्य हरवले  आठवणीत तुझ्या...
पावले थबकली रमण्यात आठवणीत तुझ्या...
साद घालती तरी का आठवणी तुझ्या..
सांगणार का कधी तू या मना...
आठवणीत तुझ्या या मन बावरले का असे..
सांगणार का कधी तू या मना...

आठवणी तुझ्या खेळती खेळ ते जूनी..
थांबवले मी तरी नयनी येते पाणी...
आठवणी तुझ्या खेळती खेळ ते जूनी..
थांबवले मी तरी नयनी येते पाणी...
सावरू किती या मना मी क्षणोक्षणी...
सांगणार का कधी तू या मना...
आठवणीत तुझ्या या मन बावरले का असे..
सांगणार का कधी तू या मना...


गणेश दादा शितोळे
(१४ मार्च २०१४)


शुक्रवार, ४ एप्रिल, २०१४

माझ्या कवितेची आणि तिची,जरा वेगळीच मैत्री होती...!!!!!


माझी कविता आणि तिची,
जरा वेगळीच मैत्री होती..
जुन्या त्या आयष्याच्या कप्यात रमताना,
आठवणीतली ती प्रिय सखी होती...!!!

शब्दांच्या गुंफनातल्या कवितेशी तिची,
खरं तर ओळख फार जुनी होती...
शब्द तिच्या काळजाला भिडन्यात पण,
बहुदा कवितेचीच काहीतरी खेळी होती...!!!

भेट ती शब्दांची माझ्या कवितेतून,
तिला जन्मभर पुरणारी होती...
कारण वाचून कविता माझी धडधड
तिच्या ह्रदयातली वाढली होती...!!!

मी भेट म्हणून लिहलेली कविता,
तिला रे अगदीच प्रिय वाटत होती...
मी नसतांनाही कविताच तिचा,
प्रिय बनून मिरवत होती...!!!

त्याच कवितेमुळे तिची,
अवखळ नजर भिडली होती...
माझी कविता मनापासून वाचताना,
तिच्या मनात हुरहुर वाढली होती...!!!

एकटं मन रमवणार्‍या तिला,
आयुष्यभराची सोबत मिळणार होती...
शब्दांनीच नकळतपणे,
ही जोड़ी जमवून आणली होती...!!!

कारण माझ्या कवितेची आणि तिची,
जरा वेगळीच मैत्री होती..........!!!!!





गणेश दादा शितोळे 
(०४ एप्रिल २०१४)


शुक्रवार, १४ मार्च, २०१४


आयुष्य.....!!!



माणसाच जीवन किती इंटरेस्टींग असतं
आयुष्य क्षणाक्षणात विखुरलेलं असतं
क्षणात काही घडत बिघडत असतं
आयुष्यही बदललं जात असतं

एका क्षणात कोणाचं मन तुटत असतं
मनाला जोडणारं दोरंखंड सुटत असतं
विश्वासाचं नातं संपत असतं
क्षणात होत्याचं नव्हतं होत असतं

एका क्षणात कोणी भेटत असतं
पुढच्या क्षणात नात जुळत असतं
नात जोडता जोडता मन गुंतत असतं
क्षणात माणसाच्या जीवनात कोणी येत असतं

आयुष्यात प्रत्येकावर काहीतरी ऋण असतं
ऋणांखाली प्रत्येकाचं आयुष्य दबलेलं असतं
म्हणून प्रत्येकावर काहीतरी बंधन असतं
त्या बंधनांतच आपल्याला जगायचं असतं...



गणेश दादा शितोळे
(१४ मार्च २०१४)




सोमवार, १० मार्च, २०१४


आयुष्य....!!!





आयुष्य कोणत्या वाटेने जाईल कोणालाच कळत नसतं
आपण कितीही ठरवलं तरी आयुष्य त्याच वाटेनं जात असतं
वेड्या वाटा कोठून कशा वळतील सांगता येत नसतं
सरळ असू की वाकडी आयुष्य त्याच वाटेनं जागवं लागतं

कधी एकाकी आयुष्य हाती ठेवुन
वाटांनी पळणं सुरू केलेलं असतं
तर कधी आठवांना हाती सोडून
आयुष्य आपल्या वाटेनं पळत असतं

आयुष्याच्या सुंदर वाटेचं स्वप्न मीही पाहिलं होतं
कोणी सोबत असताना आयुष्य सुंदर वाटत होतं
आयुष्य कधी वळण घेईल माहित नव्हतं
स्वप्नपूर्ती करणाऱ्‍या वाटेला आयुष्यानं मधेच वळण घेत बदललं होतं

त्या वळणावर आसवांना रडायला आलं होतं
दुःखाच्या काळोखात स्वप्न गळून पडलं होतं
दुनिया तर गोल आहे प्रत्येकालाच वाटत होतं
पण कितीही गोल फिरलं वाटेवर परत जाता येत नव्हतं

याच वळणावर कोणी मला सोडून जायचं ठरवलं होतं
त्यांच्या वाचून आयुष्य माझं मलाच छळत होतं
त्याच वाटेवर मैत्रीच्या प्रवासाला सुरू केलं होतं
त्याच वाटेवरच्या वळणावर मैत्रप्रेम संपलं होतं...




गणेश दादा शितोळे
(१० मार्च २०१४)




रविवार, ९ मार्च, २०१४




रिझल्ट...!!!






आजचा दिवसच खूप वाईट ठरला
गारांच्या पावसाने हाहाकार माजवला
आयुष्यात पहिल्यांदा पाऊस नको म्हणेपर्यंत बरसला
निसर्गही आमच्या नशीबावर कोपला

संध्याकाळी कोण्या मित्राचा फोन आला
संध्याकाळच्या वेळी अजून एक धक्का बसला
रिझल्ट लागल्याचे सांगून त्यानेही फोन ठेवला
वेटींगवरचा रिझल्ट येऊन काळजावर धडकला

रिझल्ट पहाण्याआधीच सिट नंबर विसरला
स्वतःचा सीट नंबर शोधायला बाकी मित्रांना फोन केला
अचानक कोणीतरी खोटा नंबर सांगितला
पेपर सुटल्याचा आनंद खाऊन पिऊन सेलिब्रेट केला

थोड्याच वेळात खरा नंबरही कळाला
फेल केटी पाहून क्षणीक आनंद विरून गेला
मॅथ पुन्हा एकदा फेल एटीकेटी मधे अडकला
पार्टी देण्याआधीच आनंद हिरमुसला
नशिबाने पुन्हा एकदा माझा घात केला

कधी नव्हे तो एवढा मॅथचा अभ्यास केला
प्रॉब्लेम सोडवता येत नाही म्हणून पाठच केला
रात्रीच्या पहिल्या प्रहारापासून शेवटच्या प्रहारापर्यंत अभ्यास केला
व्हेक्टरचा प्रत्येक प्रूव्ह डोक्यात फिट्ट केला

एवढा अभ्यास करून पहिल्यांदाच कोणाता पेपर दिला
अभ्यास केलेला क्वेशन परफेक्ट सोडवला
रट्टा मारलेला प्रुव्ह सिद्ध केला
प्रोबॅबलीटीचा थोडा घोळा झाला
पण स्टॅटीक्सने बरोबर ऑप्शन दिला

पेपर तर बरोबर लिहला
ग्रेस न घेता सहज सुटनारा वाटला
शंभर टक्के सुटेन म्हणून गावभर बोभाटा केला
रिझल्टला पार्टी देणार म्हणून प्रत्येकाला अॅडव्हान्समधे मेसेज दिला

पेपर चेकरला असा का पेपर वाटला
पुन्हा एकदा त्याने केटीतच अडकवला
आता पेपर देऊन देऊन मेंदू थकत आला
एखाद्या पिएचडीपेक्षा जास्त मॅथचा अभ्यास झाला

रिझल्ट लागला आणि ह्रदयाला धक्का बसला
क्षणभर मनाला दुःख देणारा अनुभव देऊन गेला
पुढच्या क्षणी हाही अनुभव मागे सोडला
जे होते ते चांगल्यासाठीच फक्त एवढाच विचार केला

केटीचा अनुभव होता
यीअरडाऊनचाही अनुभव आला होता
दोन्ही वेळी दोष माझाच होता
ही सेम जाऊदे नेक्स्ट सेमला सिरीअसली अभ्यास करू म्हणत
प्रत्येकवेळी अभ्यासच केला नव्हता

पण यावेळी पहिल्यांदा एवढा अभ्यास केला
तरी पुन्हा एकदा फेल केटीचाच रिझल्ट आला
क्षणभर वाईट अनुभवाचा प्रत्यय आला

अपयश आलं नाही तो माणूस
आयुष्यात कधीच यशस्वी नाही झाला
अपयशाचा सिलसिला आतापर्यंत आयुष्यात येऊन गेला
म्हणूच आता मात्र पेपर सोडवण्यात
यशस्वी होण्याचा मीही निश्चयच केला






गणेश दादा शितोळे
(०९ मार्च २०१४)




शनिवार, ८ मार्च, २०१४


फेसबुक....!!!




प्रत्येकालाच रोजच फेसबुकला लॉगिन करावंस वाटत असतं
आपलंही काहीतरी स्टेटस टाकावसं वाटत असतं
किती कमेंट्स लाईक्स मिळतात यापेक्षा काही सांगावं वाटत असतं
समोरच्याला फालतू वाटलं तरी काही शेअर करावं वाटत असतं

प्रत्येकालाच रोजच फेसबुकला लॉगिन करावंस वाटत असतं
रोज न चुकता कायम ऑनलाईन राहावं वाटत असतं
सतत कोणाबरोबर चॅटींगला बसावं वाटत असतं
समक्ष भेटून न बोलणाऱ्‍यालाही इथं मात्र
ऑनलाईन हाऊ आर यु विचारावं वाटत असतं
समोरच्याच्या जीवनात काय चाललंय जाणून घ्यायचं असतं

प्रत्येकालाच रोजच फेसबुकला लॉगिन करावंस वाटत असतं
आपलंही रिलेशन स्टेटस सिंगलपासून कमिटेडमधे बदलावं वाटत असतं
त्यासाठीच एखाद्या ग्रुपला जॉईन करावं वाटत असतं
समोरच्याने इंचभर जागा दिली की तशी कोसभर वाढवावी वाटत असतं
फेसबुकचाही वापर कोणी मॅट्रीमोनी साईटसारखा करत असतं

प्रत्येकालाच रोजच फेसबुकला लॉगिन करावंस वाटत असतं
समोरच्याला चांगलं वाटणारं प्रोफाईल भरलं जात असतं
त्यातलं खरं किती खोटं किती प्रत्येकालाच माहित असतं
प्रत्येकजण उगाच स्वतःला अतिसभ्य दाखवायचा प्रयत्न करत असतं

प्रत्येकालाच रोजच फेसबुकला लॉगिन करावंस वाटत असतं
आपलंही काही सिक्रेट उघडकीस केलं जात असतं
बोभाटा झाला की प्रायव्हसी जपत नसल्याचा दोष फेसबुकलाच देत असतं
आपण काय अपलोड करावं कळून येत नसतं
मात्र आपल्या चूकीचं खापर फेसबुकवरच फोडलं जात असतं

प्रत्येकालाच रोजच फेसबुकला लॉगिन करावंस वाटत असतं
आपण कुठे फिरलो हिंडलो सगळ्यांना सांगायचं असतं
प्रत्येक ठिकाणचे स्वतःचे फोटो शेअर करायचं असतं
जणू स्वतः त्याठिकाणी गेले होते हेच प्रुव करायचं असतं
स्वतःच्या फोटोपेक्षा तिथलं सौंदर्य अधिक सुंदर असल्याचंच विसरायला होतं
फोटोंशिवायही फिरणं असतं हेच त्यांना माहित नसतं

प्रत्येकालाच रोजच फेसबुकला लॉगिन करावंस वाटत असतं
इथं वास्तवात जगण्यापेक्षा ऑनलाईन जगण्यालाच महत्व असतं
भेटून बोलून नाती जपण्यापेक्षा ऑनलाईन नाती टिकवण्यालाच महत्व वाटत असतं
फेसबुक किप इन टच ठेवत नात्यातला ओलावा कमी करत असतं

प्रत्येकालाच रोजच फेसबुकला लॉगिन करावंस वाटत असतं
प्रोफाईल फोटोच्या नावाखाली वास्तवातल्या चेहऱ्‍याला लपवलं जात असतं
फेसबुक नावाप्रमाणेच फेस बघूनच नाती जपायला शिकवत असतं
कितीही लिहलं कितीही वाटत असलं तरी
फेसबुकच महत्व प्रत्येकाला जाणवत असतं

प्रत्येकालाच रोजच फेसबुकला लॉगिन करावंस वाटत असतं
फेसबुक चांगलं किती वाईट किती काहीच कळत नसतं
कोण म्हणतं फेसबुक प्रत्येकाला किप इन टच ठेवत असतं
पण नात्यातला खरा ओलावा कमी करत असतं
कोणी काही म्हटलं तरी हे खरंच असतं
वास्तवातल्या नात्यापेक्षा ऑनलाईनच नातं घट्ट बनत असतं




गणेश दादा शितोळे
(०८ मार्च २०१४)




मंगळवार, ४ मार्च, २०१४


ओळखीचं माणूसही परकं




इतक्या दिवस मन ज्या गोष्टीची वाट बघत होतं
आता त्या गोष्टीचा विट आल्यासारखं वाटत असतं
ज्याच्याकडून काही अपेक्षीत नसतं
त्याच्याकडूनच अनपेक्षित उत्तर येतं असतं

आज ओळखीचं माणूसही परकं भासत होतं
जणू कधी आपलं असल्याच जाणवून परकं वाटलं होतं
तर कधी अनोळखी माणूसही आपलसं झालं होतं
जणू कोणी परकं असूनही आपलं वाटलं होतं

ज्याच्यासाठी आपली टिपे गळतात
त्याला त्याची महत्व नसतं
अन ज्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं
आपलं हास्य किंमती वाटतं असतं

कधी जन्मभर आपली साथ देऊनही
आपल्याला माणसला समजून घेता येता नसतं
तर कधी एका क्षणातच अनोळखी माणूसही
आपल्याला ओळख दाखवत असतं...



गणेश दादा शितोळे
(०४ मार्च २०१४)




सोमवार, ३ मार्च, २०१४

कालच लोकसभा निवडणकीच्या तारखा घोषीत झाल्या. चालू स्थितीचं आणि मतदारांनी मतदानादिवशीची सुट्टी ऐन्जॉय न करता मतदान करावे म्हणून आवाहन करणारी कविता......



सत्ते फक्त तुझ्याच साठी...










काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप
मनसेच्या जोडीला आता आली आहे आप
सगळ्यांची लढाई सुरू आहे सत्ते तुझ्याच साठी

इटलीच्या बाईंवाचून झाली काँग्रेसमधे बिघाडी
पवारांनी काढली राष्ट्रवादीची हो गाडी
स्वबळावर चढाईची होती यांना सत्तेची शिडी
नव्यानवची निवडणूक लढली स्वबळावर सत्ते तुझ्याच साठी

हाती आली पराभवाची गोडी
म्हणून केली परत काँग्रेसबरोबरच आघाडी
म्हणे खाऊ सत्ता जोडीनं आपण थोडी थोडी
निवडणूक जिंकत राहिले दोघं जोडीनं सत्ते तुझ्याच साठी

शिवसेनेनं घेतलं भाजपला सोबती
आघाडीसमोर उभी राहिली युती
तरी नाही संपली पराभावाची साडेसाती
त्यांचा हिंदूत्ववाद सत्ते तुझ्याच साठी

बाळासाहेबांनी सुत्र सोपवलं उद्धवाच्या हाती
रागावून गेले काही शिवसेनिक आणि सोबती
प्रत्येकानं फोडलं खापर विठ्ठलाच्या बडव्याच्या माथी
पक्ष सोडताना केली त्यांनी हो वादावादी
सगळं काही सुरू आहे सत्ते तुझ्याच साठी

बीडचे मुंडे नागपुरवासी गडकरी
एकाच म्यानातल्या दोन तलवारी
राज्यातील भांडण गेलं पार दिल्ली दरबारी
राजनाथ बोली दाखवा जरा समजदारी
सगळं समजावणं फक्त सत्ते तुझ्याच साठी

नितीनरावांला अध्यक्ष दिल्ली करी
लोकसभेचं उपनेतेपद पडलं गोपीनाथरावांच्या पदरी
दोघंचही भलं झालं दिल्ली दरबारी
दोघांचंही लढणं सुरू आहे सत्ते तुझ्याच साठी

राष्ट्रवादी करतो आश्वासनांचा गाजावाजा
पवार म्हणतात आहे मी जाणता राजा
आबा दादांना मंत्रीपदातच येई मजा
विसरत चाललेत मतदारच आहे खरा राजा
काकापुतण्यांची तयारी असते फक्त सत्ते तुझ्याच साठी

सांगलीचे पाटील म्हणतात मी आहे जयंतराव
जाणत्या राजाचा पेशवा बाजीराव
अर्थखात्याचं बजेट फक्त कळतं ना राव
तरी का ग्रामविकास खातं पदरी नाही ठावं
पाटलांचं रडगाणं फक्त सत्ते तुझ्याच साठी

म्हणे मी गृहमंत्री आर. आर. पाटील उर्फ आबा
आहे पोलिसांवर माझाच फक्त ताबा
वाजवतात फक्त आश्वासनांचा तोंडी डबा
पोलिसांच्याच जीवावर करतात महाराष्ट्रात हवा
आबांचही चालंलंय फक्त सत्ते तुझ्याच साठी

पाचपुते झाले आहेत वारकरी
मागणं मागता पंढरीच्या दारी
सहाव्यांदा घेतली तुम्ही आमदारकीची भरारी
तुमचं नशीब आहे लय भारी
मंत्रीपदाची माळ कायम पदरी
बबनरावांची केली होती लोकसभेची तयारी फक्त सत्ते तुझ्याच साठी

दादा तुम्हीच आमचं कल्याणकरी
तुम्ही करता जनतेची कामं भराभरी
म्हणून जनता तुमचा उद्धार करी
खरंच तुम्ही आहेत लय भारी
अजितदादांचं हे वागणं फक्त सत्ते तुझ्याच साठी

फडणवीस म्हणतात तटकरेंनी केला जमीनीचा घोटाळा
किरीट सोमय्यांनी आरोप करत वाजवला खुळखुळा
सुनिलराव म्हणतात मी आहे निर्दोष आणि भोळा
जनतेला समजून घ्यायचंय लुटलाय का तुम्ही खरंच हो मळा
सुनिलरावांची ही शाळा फक्त सत्ते तुझ्याच साठी

अकोलेचा आहेत हे मधूकर पिचड
ठरतात नेहमीच हो हे वरचड
यांना पराभूत करणं आहे अवघड
अजून तरी सत्तेत नाही यांची पडझड
मधुकर पिचडांचं विकासकाम सत्ते फक्त तुझ्याच साठी

जेव्हा सेनेत होते राणेंचे नारायण
उडवीत होता कोकणात दाणादाण
मिळवून दिला शिवसेनेला कोकण
म्हणूनच बाळासाहेबांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा मान
राणेंचं हो राजकारण सत्ते फक्त तुझ्याच साठी

बाळासाहेब म्हणाले मीच केला नारोबांचं नारायण
तरी का सोडला राणेंनी धनुष्यबाण
हाताला साथं देऊन दिला काँग्रेसला कोकण
लोक म्हणतात फक्त मुख्यमंत्रीपदवरच होतं यांचं ध्यानं
राणेंचं काँग्रेसमधे येणं सत्ते फक्त तुझ्याच साठी

मुख्यमंत्रीपदासाठी उपसलं बंडाचं हत्यार
उद्योगमंत्री होताच झाले बंड थंडगार
स्वत: होते आधीच आमदार पोर केले खासदार
निलेश नितेशला केलं त्यांनी जाहिर वारसदार
राजकारणात उतरलं यांच घरदार सत्ते फक्त तुझ्याच साठी

शिवसेनेत तयार झाला जोशींचे मनोहर
कधी काळी होते कोहिनूर मधे सर
साहेबांनी बसवलं त्यांना मुख्यमंत्रीपदावर
वय झालं तरी अजूनही त्यांना हवं होते राज्यसभेचं गाजर
जोशी सरांचं भविष्य अधांतरीच सत्ते फक्त तुझ्याच साठी

शिवसेनेला बाळासाहेबांनी उभारलं
दोन्ही हातांनी उद्धवसाहेब आणि राजसाहेबांना घडवलं
भावबंदकीत म्हणे कोण्या बडव्यानं तेल ओतलं
एका हातानं दुसऱ्‍या हाताला कि वं सोडलं
ठाकरेबंधूचं राजकारण सत्ते फक्त तुझ्याच साठी

उद्धवसाहेबांनी धनुष्यबाण हाती घेतलं
राजसाहेबांचं इंजिन शिळ ठोकून विरोधात उभं राहिलं
जणू दोघांनीही मराठी माणूस असल्याचं सिद्ध केलं
मराठी माणसानं परस्परांच्या पायाला ओढलं
सेना मनसेचं राजकारण सत्ते फक्त तुझ्याच साठी

अजून एका काकांना वाटलं पुतण्याने केला घातं
धनंजयानं सोडली की गोपीनाथरावांची साथ
घड्याळानं केली की कमळावर मात
नेहमीच जिंकता येत नाही करुन भावनिक बात
मुंडेंचं भावनिक होणं सत्ते फक्त तुझ्याच साठी

अजितदादांनी मुंडेंना सुनावलं
लोकांच्या घराला तुम्ही फोडलं
मोहिते पाटलांनाही त्यातून नाही सोडलं
म्हणूनच तुम्हाला वाटतं तुमचं घर कोणी फोडलं
विचार करा आता पंकाजालाच फक्त मोठं केलं
म्हणूनच नाहीना धनंजयानं तुम्हाला सोडलं
गोपीनाथांनी जे केलं तेच फेडलं सत्ते फक्त तुझ्याच साठी

पराभवाची संपत नव्हती साडेसाती
म्हणून युतीने केली महायुती
रिंपाईच्या आठवलेंना केलं नवं सोबती
राज्यसभेच्या तिकट आलं
आता तरी रामदासांच्या हाती
तीन तिघाडा केला होता फक्त सत्ते तुझ्याच साठी

राजू शेट्टींच्या येण्यानं बळकट झाली महायुती
स्वाभिमानानं महायुती झाली होती चौहाती
जाणकरांनी केली वाढवून पंचहाती
आता तरी चारणार का आघाडीला माती
का सुरूच राहाणार पराभवाची साडेसाती
विशाल केली ही महायुती
फक्त सत्ते तुझ्याच साठी

पवारांना हरवण्याची मोहिम मुंडेनी घेतली हाती
हिसकावून घेणार पवारांची माढा अन बारामती
सांगत असतात जनतेला
पवारांची होणार आहे आता अती तिथं माती
मुंडेंच स्वप्न खरं होईल आणि मिळेल का सत्ता हाती
मुंडेचं हे स्वप्न फक्त सत्ते तुझ्याच साठी

मुंडेच्या मोहीमेची
पवारांना नाही वाटत भिती
मुंडेवरच उलटवायची त्यांची भानामती
राखणार यंदाही माढा आणि बारामती
मुंडेंच्याच गडात चारणार आहेत त्यांनाच धुळ आणि माती
पवारांनी केली तयारी फक्त सत्ते तुझ्याच साठी

लोकसभेच्या तारखा घोषीत झाल्या
युत्या झाल्या आघाड्याही करून झाल्या
जागांच्या भांडणात उमेदवारांच्या घोषणा झाल्या
काहींनी बंडखोरीच्या तलवारी उपासल्या सत्ते तुझ्याच साठी

प्रचाराचा नारळ सभातून फुटला
नमो आणि रागातच प्रचार रंगला
प्रत्येकजणच सांगतोय आपल्याच पक्ष कसा चागंला
पाच वर्षांनीच उमेदवाराला मतदार आठवला
जाता जाता मतदान करा सांगायला नाही विसरला
प्रत्येकाला जायचंय लोकसभेला सत्ते तुझ्याच साठी

म्हणून करतो मी प्रत्येक मतदाराला आव्हान
न चुकता करा प्रत्येकाने मतदान
बळी पडू नका जरी कोणी दिले प्रलोभन
गुंतून पडू नका कोणी दिले जरी आश्वासन
फक्त विकासकाम करणाऱ्‍यालाच द्या प्राधान्य
कोणाला निवडून द्यायचेय याची प्रत्येकाला आहे जाणं
स्वतःबरोबर इतरांनाही उत्साहीत करा करायला मतदान
आपल्या अमुल्य मताना निवडा आपला खासदार आणि पंतप्रधान
मतदारांनी मतदान करावं सत्ते तुझ्याच साठी
 




(कोणाच्या भावना दुखावल्यास क्षमस्व:)





गणेश दादा शितोळे
(०३ मार्च २०१४)




रविवार, २३ फेब्रुवारी, २०१४

महाराष्ट्र राज्य युवक कवी संमेलन, अहमदनगर.
स्थळ :- सहकार सभागृह.
दि. २२ फेब्रुवारी २०१४.
मी सादर केलेली पहिली कविता.............


असं कोणीच उरलं नव्हतं............


आज अचानक असं काही घडलं होतं
कधी असं घडणार वाटलंच नव्हतं
प्रत्येक क्षणाला तुझी आठवण येणं सुरू होतं
पण उचकी लागायचंच बंद झालं होतं....

इनबॉक्सकडं पहात आजही मोबाईल वापरणं तसंच सुरू होतं
प्रत्येक मेसेजला तितक्याच उत्सूकतेनं पाहिलं जात होतं
फॉरवर्ड मेसेलाही आता मनापासून वाचावं लागत होतं
मनापासून मेसेज करणारं आता कोणीचं राहिलं नव्हतं....

प्रत्येक मिसकॉललाही अटेंड करायला आजही आवडत होतं
पण मिसकॉल देणारंच आता कोणी राहिलं नव्हतं
कामापुरता मला फोन करायला प्रत्येकालाच आवडत होतं
कामाव्यतिरक्त बोलणारं आता कोणीच उरलं नव्हतं....

आजही प्रत्येकाला मलाच फोन करावा लागत होतं
नेहमी मलाच हाऊ आर यु विचारावं लागत होतं
प्रत्येकवेळी मी कसा आहे मलाच सांगावं लागत होतं
मी कसा आहे विचारणारं आता कोणीच उरलं नव्हतं....



गणेश दादा शितोळे
(२३ फेब्रुवारी २०१४)



शनिवार, १८ जानेवारी, २०१४

आज पहाटे लिहिलेली कविता.(व्हिच आय मोस्ट लाईक.)





सक्सेस म्हणजे तरी नक्की काय असतं...




सक्सेस म्हणजे तरी नक्की काय असतं
अपेक्षित गोष्ट वेळेत पूर्ण होणे म्हणजेच यश असतं
म्हणून कोणाचं यश अपयश आपण ठरवायचं नसतं
आयुष्यात कायम अपयशच मिळवायचं असतं

अपयशच कायम यशाकडे जायची फर्स्ट स्टेप असतं
थोड्याशा यशानं हुरळून जायचं नसतं
अपयश आलं कधी तरी खचायचं नसतं
आपण फक्त प्रयत्न करत रहायचं असतं
कधी ना कधी यश मिळणार हे ठरलेलंच असतं


गणेश दादा शितोळे
(१८ जानेवारी २०१४)






आयुष्यात करिअर मागे धावणाऱ्या मित्रमैत्रीणीकरता खास.......

 करिअर....



आयुष्यात प्रत्येकालाच करिअर करायचं असतं
उराशी बाळगलेलं प्रत्येक स्वप्न साकार करायचं असतं
कधी एकाच्या जवळ तर दुसऱ्‍यापासून दूर जायचं असतं
करिअर करत स्वप्न गाठायचं असतं

करिअर करत प्रत्येक नात्याला सांभाळायचं असतं
माझं आयुष्य करिअर एक करिअर कधीच नव्हतं
आयुष्यात फक्त पैशालाच कमावायचं नव्हतं
आयुष्य पैशानं नाहीतर माणसाने अमुल्य होत असतं

कारण नात्यातलं प्रेम पैशानं
विकत घेण्याएवढं स्वस्त नसतं
आयुष्यात पैसापाणी प्रत्येकालाच जरुरीच असतं
पैसा म्हणजेच सर्वस्व नसतं

पैशाच्या मागे धावताना नाते तुटत जात असतं
आयुष्यात करिअर पैसा कायमच मिळत असतं
पण तुटलंलं नातं कधीच जुळत नसतं
शेवटी नशीब नफा तोटाच देत असतं



गणेश दादा शितोळे
(१८ जानेवारी २०१४)



गुरुवार, २ जानेवारी, २०१४

From New Year I Started My New book of poetry म्हणून मला आयुष्यामधून कोणी गेलं म्हणून आयुष्य थांबवून ठेवायचं नव्हतं...................

कवितेचं पहिलं पान...................




म्हणून मला आयुष्यामधून कोणी गेलं म्हणून

आयुष्य थांबवून ठेवायचं नव्हतं...................





जगायचा होता प्रत्येक क्षण
उगाच श्वासांना लांबवून ठेवायचं नव्हतं
आठवणीच्या वाटावरून स्वप्नांपर्यंत पोहचायचं होतं
आभाळापर्यंत कोणालाच पोहचायता येत नसलं तरी
आभाळालाच खाली खेचायचं होतं
म्हणून मला आयुष्यामधून कोणी गेलं म्हणून
आयुष्य थांबवून ठेवायचं नव्हतं...................

मैत्रीच्या व्याख्या आज बदलेल्या असतील म्हणू
मित्रांना बदलायचं नव्हतं
आज असेल कदाचित मी एकटा पण
एकटेपणाशीच मैत्री निभावत जगायचं होतं
ते विसरत चालले म्हणून आपण त्यांना विसरायचं नव्हतं
त्यांना गरज होती कधी काळी म्हणून
मैत्री होते असं मैत्रीचं नातं नसतं
म्हणून मला आयुष्यामधून कोणी गेलं म्हणून
आयुष्य थांबवून ठेवायचं नव्हतं...................

मैत्रीचं नातं गरजांवर नाही तर विश्वासावर टिकतं
त्यांना आपल्यावर विश्वास नसेल म्हणून
मला तसं अविश्वासूपण दाखवायचा नव्हतं
आज दूर चालत गेले असले तरी
कधी सोबत होते म्हणत जगायचं होतं
हे गेले म्हणजे नशीब याहून चांगले मित्र देत असतं
म्हणून मला आयुष्यामधून कोणी गेलं म्हणून
आयुष्य थांबवून ठेवायचं नव्हतं...................

कदाचित नशीबात हेच परत मिळावेत असं नेहमीच नसतं
हेच मित्र कायम सोबत असावेत असं
प्रत्येकासारखंचं माझंही म्हणणं होतं
काहींचं स्वप्न सत्यात उतरतं तर काहींचं स्वप्नचं ठरतं
भेटतील आयुष्याच्या प्रवासात कधी म्हणत
त्यांना आठवणीत ठेवायचं होतं
म्हणून मला आयुष्यामधून कोणी गेलं म्हणून
आयुष्य थांबवून ठेवायचं नव्हतं...................
म्हणून मला आयुष्यामधून कोणी गेलं म्हणून
आयुष्य थांबवून ठेवायचं नव्हतं...................






गणेश दादा शितोळे
(०२ जानेवारी २०१४)