माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०१४

छत्रपती संभाजी महाराज नेमके कोण..? ब्राम्हणांचा कर्दनकाळ की धर्मवीर ...?







                         आजवर संभाजी महाराजांचा इतिहास अनेकांच्या कलाकृतीतून समजला. विश्वास पाटील यांची संभाजी असेल किंवा शिवाजी सावंत यांच्या छावा मधून संभाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहोचले. अनेक बखरी, संदर्भ ग्रंथ यामधूनही संभाजी महाराजांचा इतिहास मांडण्यात आला. परंतु या बखरीतील काही बखरीतून केवळ संभाजी महाराजांच्या द्वेषापोटी वेगळा इतिहास रेखाटण्याचा प्रयत्न केला गेला. अनेक संघटना ही याच आपल्या सोयीनुसार वाचणात आलेल्या बखरी, संदर्भ ग्रंथानुसार समाजापुढे संभाजी महाराजांचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. व्याख्यातेही गर्दी जमवण्याचा प्रयत्न करत संभाजी महाराजांचा इतिहास सांगतात. यातूनच संभाजी महाराजां संदर्भात विविध इतिहास समोर आणण्यासाठी प्रयत्न झाला. 
                           कुणी संभाजी महाराजांना ब्राम्हणांचा_कर्दनकाळ ठरवलं तर कुणी हिंदू धर्म वाचवण्याकरता महाराज लढले म्हणून धर्मवीर केले. तर काहींनी संभाजी महाराजांची व्यक्तीरेखाच बदलून ठेवत संभाजी महाराज म्हणजे स्वराज्यद्रोही म्हणून उभे करत आपण नेमकं कोणाबद्दल बोलतोय हे विसरल्याचाच प्रत्यय करून दिला. परंतु या तिन्ही चारही विचारधारांमधला संभाजी महाराजांचा इतिहास नेमका खरा कोणता असा प्रश्न बहुतेक लोकांना पडतो. आणि मग जो तो आपापल्या पटेल तो विचार घेऊन संभाजी महाराजांना त्या चौकटीत बसवून आपल्या मनात उभा करतो आहे.
                          असा प्रश्न खरंतर मलाही पडला होता आणि मीही यातीलच एका विचाराने प्रेरित होऊन माझ्या नजरेतील संभाजी महाराजांचा इतिहास चौकटीत बसवला होता. परंतु त्याबाबत अनेक शंका,  कुतूहल होते. नेमके खरं काय या विचाराने अनेकदा इतिहास चाळून बघण्याचा प्रयत्न सुद्धा केला. या तिनही विचारधारांच्या संबंधीत या निमित्ताने लोकांची पुस्तकं वाचली. परंतु प्रत्येक पुस्तकात आपल्याला परीने इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला गेल्याचेच दिसले. तरीही या एकंदरीत वाचनातून आणि सखोल विचारमंथनातून या सर्व विचारधारांहून वेगळ्या अशा संभाजी महाराजांची ओळख झाली. 
संभाजी महाराज नेमके कोण..? 
                   छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र, राजमाता जिजाऊंनी घडवलेले युवराज आणि कायम अजेय असे स्वराज्याचे दुसरे छत्रपती ही संभाजी महाराजांची एका व्याख्येतील ओळख झाली. परंतु माझ्या मनात याबद्दल प्रश्न नाहीच. प्रश्न आहे तो याबद्दल की संभाजी महाराज नेमके आण्णा दत्तो आणि संबंधित काही ब्राह्मण मंडळी संभाजी महाराजांचा द्वेष करत कट करस्थान करत म्हणून त्यांना देहदंड दिला म्हणून ब्राम्हणांचा_कर्दनकाळ की हिंदू धर्म वाचवण्याकरता महाराज लढले म्हणून धर्मवीर..?

                       खरतरं या दोन्ही लेबलाखालील व्याख्येत संभाजी महाराज बसत नाहीत. यातील पहिल्या व्याख्येचा फोलपणा बघू.
                            काही संघटनांच्या मते संभाजी महाराजांनी आण्णा दत्तो, मोरोपंत पिंगळे आणि संबंधित काही ब्राह्मण यांना संभाजी महाराजांनी देहदंड दिला. कारण ही मंडळी सुरवातीपासून संभाजी महाराजांना आपला शत्रू समजून कट कारस्थानं करत होती. अनेकदा संभाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न सुद्धा केला. शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर छत्रपती राजाराम यांना गादीवर बसवण्याकरता स्वराज्याचे सरसेनापती आणि राजारामांचे मामा हंबीररावांना संभाजी महाराजांना कैद करण्याच्या कटात सहभागी करून घेण्याचाही प्रयत्न केला. तरीही संभाजी महाराजांनी या मंडळींना सुधारण्याची संधी देत माफ केले. अपयश आले म्हणून मग या मंडळींनी चक्क औरंगाजेबाचा मुलगा अकबर याच्याशी संधान बांधून स्वराज्याचा व्यवहार करण्याचाही प्रयत्न केला. याची माहिती स्वतः अकबराने संभाजी महाराजांना दिल्याने संभाजी महाराजांनी स्वराज्याचा व्यवहार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या मंडळींना देहदंड दिला. ही गोष्ट जोपर्यंत संभाजी महाराजांपर्यंत मर्यादित होती तोपर्यंत महाराजांनी प्रत्येक वेळी सुधारण्याची संधी दिली. परंतु जेव्हा स्वराज्याशी द्रोह करण्याचा कट आखला तेव्हा माफी नव्हती. हा इथपर्यंत सगळा इतिहास खरा मांडण्यात आला. 
                          पण यामुळे संभाजी महाराज नेमके ब्राम्हण विरोधी आणि ब्राम्हणांचा कर्दनकाळ कसे ठरतात हेच कळत नाही. संभाजी महाराजांनी या मंडळींना ब्राम्हण म्हणून देहदंड दिला नव्हता तर स्वराज्यद्रोह केला म्हणून दिला होता आणि सगळेच ब्राम्हण संभाजी महाराजांना शत्रू मानत नव्हते. मग संभाजी महाराज ब्राम्हणांचे कर्दनकाळ कसे ठरतात. बरं कर्दनकाळ ठरायला संभाजी महाराजांनी नंतरच्या काळात स्वराज्यातील ब्राम्हणहत्या केल्या का तर तसेही नाही. मग कर्दनकाळ कसे..? म्हणजे एकतर कर्दनकाळ कोणाला म्हणतात हेच या विचारसरणीच्या लोकांना समजले नसावे किंवा त्यांनी इतिहासाचा सुंकुचित अभ्यास केला असावा. संभाजी महाराज ब्राम्हणांचे कर्दनकाळ असते तर कवी कलश कधीच इतका काळ संभाजी महाराजांसोबत राहिले नसते किंवा त्यांचीही हत्या करण्यात आली असती. आण्णा दत्तो आणि मंडळी सोबत संभाजी महाराजांचे पटले नाही ते संभाजी महाराजांनी या मंडळींच्या लाचखोरपणाला आळा घालण्याचा प्रयत्न केला म्हणून ही मंडळी संभाजी महाराजांना शत्रू समजायची. 
                                 संभाजी महाराज ब्राह्मणांचे कर्दनकाळ असते तर या मंडळींच्या जागी पुन्हा ब्राह्मण अष्टप्रधान मंडळी का नेमली असती ..? असे बरेच प्रश्न या निमित्ताने उभे रहातात. संभाजी महाराजांचा संघर्ष कधीही एका विशिष्ट जातीविरोधी नव्हता. त्यामुळे संभाजी महाराजांना ब्राम्हणांचा कर्दनकाळ ठरवून जातीयवादी करणार्‍या लोकांनी आपल्या विचारसरणीवर सखोल विचार करून पूर्वग्रह ठेवून चौकटीत बंदिस्त संभाजी महाराजांची प्रतिमा व्यापक करायला हवी.

                             आता या विषयातील दुसर्‍या बाजूचा फोलपणा पाहू. संभाजी महाराजांचा धर्मवीर म्हणून अनेक संघटना, विचारधारा गौरव करतात. परंतु त्यांची यामागची भूमिका लक्षात घेतली तर धक्का बसतो. या विचारसरणीच्या लोकांमते संभाजी महाराजांना कैदेत असताना औरंगाजेबाने धर्मांतर करून मुसलमान करण्याचा आग्रह धरला होता. परिणामी कैदेतून सुटका केली जाईल असा एकंदरीत दावा केला जातो. औरंगाजेबाच्या या प्रस्तावाला संभाजी महाराजांनी म्हणे नकार दिला आणि संभाजी महाराजांनी हिंदू धर्माचे रक्षण केले म्हणून संभाजी महाराज धर्मवीर...
                         खरंतर असा दावा करून संभाजी महाराजांनि हिंदूत्ववादी करण्याचा आणि धर्मवादी करण्याचा प्रयत्न का केले जातो हे न उमजणारे आहे. औरंगजेब उतारवयात मौलावींच्या सहवासाने धर्मांध झाला असला तरी तो वास्तवाचे भान ठेवून वागत असल्याचे दिसून येते. त्यामुळे आयुष्यभर ज्या सह्याद्रीच्या छाव्याशी जंग जंग लढून त्याला कैद करण्यात यश आले त्याला हिंदू धर्मातून मुसलमान करून सोडून देण्याइतका नक्की महामुर्ख नव्हता. आणि खरंच असा प्रस्ताव असता तर स्वराज्य वाचवण्याकरता संभाजी महाराजांनी आपली पर्वा न करता हे सहजपणे केले असते. बालवयात स्वराज्य वाचवण्यारता त्याच मुघलांचा सरदार मिर्झा जयसिंग यांच्या कैदेत रहाणारा शिवपुत्र हा निर्णय घेताना कधीही कचारला नसता. कारण संभाजी महाराजच नव्हे तर स्वराज्यातील प्रत्येक मावळ्यांच्या डोळ्यासमोर स्वराज्य हाच एकमेव धर्म होता आणि ते स्वराज्य वाढवण्याकरता आणि संरक्षणाकरता प्रसंगी जीवाची बाजी लावण्याचाच आदर्श होता. त्यामुळे संभाजी महाराजांनी स्वराज्य वाचवण्याकरता हसत हसत हे धर्मांतर केले असते. परंतु वास्तवात औरंगाजेबाने असा काही प्रस्तावच ठेवला नव्हता. 
                          औरंगजेब धर्मांध होती तरी वास्तवाची जाणीव ठेवून निर्णय घेत होता. मुघलशाही मधे अनेक मराठाच नव्हे तर हिंदू सरदार होते. पण आपले नातेवाईक मिर्झाराजेंनाही त्याने कधी मुसलमान करण्याचा प्रयत्न केला नाही तर बाकी सर्व लांबच. कैदेत असताना औरंगाजेबाने संभाजी महाराजांना सोडण्याची कधीही भाषा केली नव्हती.  आणि केवळ दोनच प्रश्न विचारले होते. एक तर स्वराज्याचा खजिना कुठे आहे आणि मुघलशाहीतील कोण कोण फितूर सामिल आहे. दुसरं एक असे की संभाजी महाराजांसमोर शिवाजी महाराजांचा आदर्श होता. खरंच संभाजी महाराज हिंदूत्ववादी किंवा धर्मवादी असे समजले तरी एकंदरीत संभाजी महाराजांच्या काळात महाराजांनी कोणाचे धर्मांतर केल्याचे दिसून येत नाही. याउलट सर्वच जातीधर्माचे लोक स्वराज्यात आनंदात नांदत होते. यापलीकडेही संभाजी महाराजांना धर्मवीर संबोधले जात असेलच तर ते केवळ या करता की स्वराज्य हाच शिवधर्म आणि हेच स्वराज्य वाचवण्याकरता निधड्या छातीने मरणाला समोरे जाणारे संभाजी महाराज धर्मवीर वाटतात.


गणेशदादा शितोळे
(७ नोव्हेंबर २०१४)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा