महेशच्या भावाचं लग्न
खुप दिवसांनी मित्राच्या भावाच्या लग्नानिमित्ताने आज जुने मित्र भेटलो. जवळपास वर्षभरानंतरच. प्रत्येकाचा चेहरा पुन्हा एकदा नव्याने पाहिला आणि क्षणात त्यांच्या सोबतचे दिवस डोळ्यासमोर दरवळून गेले.
काही क्षण बरं वाटलं पण नंतर एकंदरीत काहीतरी बिनसल्याची जाणीव झाली. मैत्रीची नाती कधी बदलत नाहीत असं मी कायम मानायचो आणि आजही मानतोच. परंत त्या दुसर्या क्षणाला जाणवलं की ही मैत्री सुरवातीला जशी मोकळीढाकळी होती तशी ती जाणवली नाही. आज त्या मैत्रीत शिष्टाचाराची बंधनंच जास्त दिसून आली. करीअरसोबत कामानिमित्ताने शिष्टाचार इतके अंगवळणी पडलेले पहिल्यांदाच जाणवलं. बहुतेक मी या क्षेत्रात उशिरा पदार्पण केल्याने मला ते अजूनही जाणवले नाही.
आजची भेट योगायोगाने नव्हे तर ठरवून घडलेली होती. त्यामुळे भेटीनंतरची उत्कठता होती. परंत आजच्या भेटीत संवाद हरवलेला दिसला. विभागलेला दिसला. प्रत्येक जण हातचं राखून बोलत असल्याचे स्पष्ट जाणवले. अगदी मलाही काही झाले होते माहित नाही. कारण खुप दिवसांनंतर भेटलेल्या मित्रांसोबत खुप काही बोलायचं होतं. पण ते काहीच बाहेर पडलं नाही. बहुतेक शिष्टाचाराची लागण झाल्याची जाणीव उशीरा झाली.
काही वर्षांपूर्वी अनेक धागे एकत्र येऊन संवादाने गुंफत मैत्री नावाचा सुंदर दोर तयार झाला होता. परंत आज जाणवले या दोरातील काही धागे मधेच कुठेतरी अडून बसलेले होते. काही धागे कक्षेबाहेर जाऊन वेगळा दोर गुंफला होता. मन धागा धागा जोडतो आहे असं म्हटलं तरी ते वरवरचं भासत होतं. काही काळ हे क्लेशदायक वाटलं तरी धक्का बसण्याइतपत काही नव्हते. कारण आजही तो मैत्रीचा दोर तसाच आहे. धागे विखुरलेले आहेत, अंतर वाढले आहे तरी त्यातील जागा दुसर्या कोणी तरी घेतली याचा आनंद आहे. नवीन धागे जुळताना जुन्या धागे कुजकट झालेलेच असतात. पण म्हणून कुणी ते हाताने तोडत नाही. नवीन धागे गुंफत जुन्या नव्याची सांगड होते. फरक इतकाच की अंतराच्या कक्षा विभिन्न असतात. आपापले धागे गुंफत नवे दोर विनायला कधीचे निघून गेली. मी मात्र एकटाच चाललो होतो. असो. लिहायला बरंच काही आहे परंतु वहायचं नाही हे ठरवलंय. शेवटी एकच प्रश्न मनाला पडला आहे...
का दुर मी एकटाच आहे...
बघू याचंही उत्तर मिळेल. तेव्हा पूर्ण लिहिले जाईल. परंतु
"अशी अचानक कुठे अलगद,
आपल्याच कुणाशी भेट व्हावी.अन आनंदाच्या भरातही मग,सांजवेळ अलगद निघून जावी."
गणेशदादा शितोळे
(२९ डिसेंबर २०१४)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा