माझी मलाच पत्र लिहीताना...!!!
आजकाल वातावरणातल्या बदलासारखं आयुष्यातही काहीतरी बदलतंय.
प्रत्येकवेळी जूनं आठवून पहिल्यासारखं कधीच अन काहीच होत नसतं हे जाणवतंय. झोपेची
वेळ बदलली अन लिहीण्याची इच्छा उर्मी कमी झाली की काय कळत नाही. रोज रात्री
गाडीवरून प्रवास करताना असंख्य विचार लिहून उतरावेत असं होतं. अन शेवटी पोहचलो
म्हणत सगळं विसरून मलाच गाडीवरुन खाली उतरावं लागतं.
त्याने दिलेली ती डायरीही आता तशीच निपचित पडलीए. अजून
पुरेशी धूळ साचलीच नाही म्हणून दूरूनही आकर्षित करतेच. नवी होती तेव्हा चौकार
षटकारांच्या सुरवातीऐवजी कसोटी सामना सुरू केला. सुरवातीच्या काही पानांच्यानंतरच
डाव घोषीत करायला लागला. तिथं बादही कुणीच झालं नाही अन धावही कुणालाच काढता आली
नाही. कारण तिथं पंचही मीच होतो, खेळाडूही मीच
होतो. अन प्रेक्षकही मीच होतो
आजही असाच घडीघडीचा डाव सुरू आहे कोणत्याही निर्णयाविनाच.
कधी आठवणींचा पाऊस आलाच तर उलट सामना सुरू होतो. अन लख्ख प्रकाशाला पाहून डायरी
बंद करून ठेवतो. पुन्हा एकदा तशीच धूळ साठण्याकरता.
मीच मला माझीच पत्र लिहीताना खूप काही बदललंय जाणवतंय. पण
त्या प्रत्येक वेळी मी चुकीचाच होतो हेही माहीतीए
कारण तू प्रत्येक वेळी बरोबर करत होतास. र्हस्व दीर्घ आकार
अन उकार देत, तू आयुष्याचं व्याकरण बरोबर करत
होतास.
शब्दांची मोरपीसं
नाबाद ११ वर्ष
अलगद मिटलेल्या पानातून बाहेर पडत.
हळूवार मनाला स्पर्श करत….
गणेश सुवर्णा तुकाराम
३ नोव्हेंबर २०१८

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा