माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

सोमवार, १२ नोव्हेंबर, २०१८

आता काय राहीलंय आयुष्यात...?




काही महिन्यांपूर्वीच  मी माझा २७ वा वाढदिवस साजरा केला. आयुष्याच्या ह्या वळणावर खरंतर मी खुश असायला हवे. आर्थिक, सामाजिक, इत्यादी इत्यादी सगळं स्वातंत्र्य कमावलं आहे. आयुष्याच्या जहाजाचं सुकाणू आपल्या हातात आहे. त्याला आपण जिथे पाहिजे तिथे घुमवू शकतो.
पण कधी कधी वाटत रहातं, ‘आलिया भोगासी असावे सादर’. आता काय राहिलंय आयुष्यात.?
तीस वर्ष जगायचं धेय्य आहे अन आपण तीशी जवळ आलोय, असाचा निराशावादी विचार मनात येतो तेव्हा मला माझंच आश्चर्यचकित व्हायला होतं. माझ्यापुरतं म्हणाल तर मी थोडंफार कमावलंय, थोडं फार शिकलोय आणि अजून खूप काही मिळवायचंय असाच विचार येतो.
स्वतःला पट्टीचा वाचक समजतो मी पण विशिष्ट लेखक/लेखिका सोडले तर काय वाचलंय मी ? मराठीत अजूनही नामदेव ढसाळ, दया पवार, लक्ष्मण माने इत्यादींचं साहित्य वाचायचंय मला. कुसुमाग्रज, अरूणा ढेरे, ग दि माडगुळकर, ना. सि. फडके, गो.नी दांडेकरांच्या एकाही पुस्तकाला अजून हात लावलेला नाही. बऱ्याच आधी वपू अन सुहास शिरवळकरांची पुस्तकं वाचायचा, समजून घ्यायचा आटोकाट प्रयत्न केला होता. रहस्यकथा वाचल्या. पण नेमाडे, जी. ए वाचूनही तेव्हा काही केल्या ती झेपली नव्हती. काय हरकत आहे आता पुन्हा वाचून बघायला ?
कदाचित गेल्या काही वर्षांत माझ्या जाणिवा समृद्ध झाल्या असतील आणि ती पुस्तकं आता कदाचित नव्याने उमगतीलही. मराठी कविता / गझलांमध्ये तर आता कुठे मंगेश मुळे माहीती झाल्यात. म्हणजे गझल काय असते यासा मागमूसही नव्हता. सुरेश भट, संदीप खरे, वैभव जोशी यांच्या वरवर तरी थोड्या प्रमाणात कविता माहीत आहेत. पण केशवसुत, बा.सी. मर्ढेकर, दा.सु. वैद्य, बा.भ. बोरकर, विं.दा., इंदिरा संत, बहिणाबाई, वसंत बापट, इंद्रजीत भालेराव नावाला सोडले तर साहित्य नाहीच वाचलं अजून. अजूनही बरेचसे कवी/कवयित्री आणि त्यांच्या कविता मला अनभिज्ञ आहेत.
नाटकांचं म्हणाल तर शांतेचं कार्ट, सखाराम बाईंडर, मोरूची मावशी अशी लोकप्रिय अन जादू तेरी नजर, एका लग्नाची गोष्ट सारखी विनोदी नाटकं तीही प्रशांत दामलेची सोडली तर अजूनही मी चंद्रकांत कुलकर्णी, केदार शिंदे, सतीश आळेकर, तेंडुलकर, एलकुंचवार यांच्या महासागरात प्रवेश झालेलाच नाही.
चित्रपटांचं म्हणाल तर मराठी, हिंदी आणि निवडक लोकप्रिय इंग्लिश चित्रपट वगळता अजून बरंच काही बघायचं बाकी आहे. जगभरातल्या उत्कृष्ट अशा डॉक्यूमेंट्रीज, शॉर्ट फिल्म्स अजून बघायच्या बाकी आहेत.
भारतात दक्षिण भारत, गोवा वगळता इतर अनेक प्रदेश पादाक्रांत करायचे बाकी आहेत. भारतंच इतका सुंदर आहे की जगप्रवास तर पुढची पायरी आहे.
स्वयंपाक हा काही फक्त बायकांसाठी राखून ठेवलेला प्रांत नाही.  मटन आणि बिर्याणी शिवाय दुसरं काय बनवायला शिकायचंय अजून.।
हेमलकसा, आनंदवनाच्या सानिध्यात प्रकाशवाटा शोधायच्यात.
मला भेटलाले आनंदयात्री संपादीत करायचंय.
आजवरच्या शाळा अन महाविद्यालयाचा प्रवास शब्दबद्ध करायचाय.
कित्येक सुरवात केलेल्या अपूर्ण पुस्तकांना पूर्णत्वःला न्यायचंय.
ही यादी न संपणारी आहे.
इथून पुढच्या आयुष्यात खूप काही करण्याची यादी फार मोठी आहे. यातल्या कितपत गोष्टी साध्य होतील हा भाग अलहीदा पण प्रयत्न करायला काय हरकत आहे ?
आता काय राहीलंय आयुष्यात या निराशावादी प्रश्नाला इतकं लांबलचक उत्तर आहे याची जाणीव आहेच.
म्हणूनच गालीब साहब शुक्रिया.
हजारो ख्वाहिशे ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले

गणेश सुवर्णा तुकाराम
१२ नोव्हेंबर २०१८




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा