माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

बुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१८


पुतळ्यांचे स्तोम कशासाठी...?


प्रस्तावित बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारकं

प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज स्मारक

सरदार पटेलांचा पुतळा

राज ठाकरेंचे शालजोडे...

कालच गुजरात मध्ये स्व. श्री वल्लभभाई पटेल याच्या स्मारकाचं जगातील सर्वात मोठ्या पुतळ्याचं अनावरण झालं. लवकरंच महाराष्ट्रात छत्रपती श्री शिवाजी महाराज, स्व. श्री बाळासाहेब ठाकरे ,स्व. श्री बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे स्मारके अन पुतळे बांधण्यासाठी आंदोलन, भूमिपुजनं अन आश्वासनंही झाली.
मध्यांतरी मुख्यमंत्री म्हणाले, प्रसंगी राज्य गहाण टाकू, अजून कोणी म्हणाले राज्याची तिजोरी मोकळी करू. हे नेमकं काय चालूयं. अशा या स्माराकांद्वारे काय साध्य होते ? हा सरकारी अन पर्यायाने पण जनतेच्या पैशांनी स्मारक बांधणे या महापुरुषांना तरी आवडेल का ? जनतेच्या काडीलाही हात लावण्याचा अधिकार नाही असा आदर्श घालून देणाऱ्या शिवछत्रपंतीच्या स्मारकाकरता  जनतेच्या तिजोरीला मोकळं करण्यात नक्की कुठलं शहाणपण. शेतकरी आत्महत्या करतो. त्याला जगण्याकरता पुरेशी मदत करायला तिजोरीत पैसा नसताना हा असला अपव्यय कशाकरता.?
यात निव्वळ राजकारण आहे.  हल्ली सरळसोट धार्मिक अन जातीयवादी भाषणे करून दंगे भडकावता येत नाहीत ना म्हणून मतांसाठी अशा पद्धतीने याचा पुतळा बांधा, त्याचा पुतळा काढा, याच्यासाठी निधी उभारा, त्याच्या करता आंदोलन कर असे राजकारण चालू आहे. मधल्या मधे होतो तो जनतेच्या पैशाचा अपव्ययंच.
 नव्या पिढीला पुतळ्यातून, स्मारकांमधून इतिहासाची, महापुरूषांच्या विचारांची, त्यांच्या आदर्श कार्याची प्रेरणा मिळावी, या हेतूनेच हे पुतळे उभारले जावेत हे एक वेळ मान्य करू. पण मग अमुकच उंची हवी हा अट्टहास कशाकरता. पटेलांचा पुतळा १०० फुट बांधला असता तरीही तोच विचार मिळाला असता ना. १८२ फुट पुतळा बांधून आपण उगाच का पुतळ्यांमधे उंचीची स्पर्धा तयार करतोय. उलट यामुळे आपण महापुरूषांची उंची खालीवतोय. 
बरं ते महापुरूषांची लांब राहीलं, आजकाल राजकारण्यांचेही पुतळे उभारले जाऊ लागलेत. काय योगदान दिलं आहे पुढाऱ्यांनी...? राजकारण करून जनतेच्या भावनांशी खेळण्यापलिकडे काय केलंय.? लोकनेता म्हणजे नेमकं काय..? जनतेच्याच पैशातून पुतळे किंवा  धार्मिक स्थळे उभारण्याने नेमके काय साध्य होते? पुढाऱ्याचे असे उदात्तीकरण करण्यापेक्षा, स्मारक उभारण्यापेक्षा हाच पैसा गरीबांच्या कल्याणासाठी का वापरला जात नाही? पुतळ्यांची भाऊ गर्दी कशासाठी?
मध्यांतरी त्रिपुरामधल्या विजयानंतरचा उन्माद तिथला लेनिननचा पुतळा पाडून व्यक्त झाला. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून कोलकात्यात जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याची विटंबना केली गेली. यापूर्वी तामिळनाडूत पेरियार यांचाही पुतळा पाडण्याचा दुर्दैवी प्रकार घडला. काय साधलं आपण पुतळे बांधून...?
पुतळे, स्मारके बांधण्यामागचा उद्देशच आपण कधी नीट समजून घेतला नाही. केवळ भावनिक राजकारणाकरता पुतळे किंवा स्मारके उभारले जात नसतात. कुठल्या विशिष्ट समाजाचा किंवा विचारांचा आदर करण्यासाठी हे पुतळे अन स्मारके बांधायची नसतात. ज्या व्यक्तींनी अलौकिक काम केलेले आहे. ज्यांचे कर्तृत्व सर्वप्रकारच्या समाजाला आणि विचारांनाही पुरून उरणार आहे, किंबहुना सर्व समाजाला एकत्रित करणारे आहे, अशांचाच सन्मान करण्यासाठी पुतळे उभारले जात असतात. त्या पुतळ्यांच्या निमित्ताने समाजाला किंवा येणार्‍या पिढीला प्रेरणा मिळावी, सर्वसमावेशकता किंवा सामाजिक सौजन्याचा वसा जपला जावा हा हेतू त्यामागे असतो.  आपल्या इथे कुठलाही राजकीय नेत्याचं निधन झालं की उभारा पुतळा. रस्त्याला, चौकाला द्या नावं. भले मग तो सार्वजनिक सभातून शिवराळ भाषेत बोंबलाना का..? त्याने लोकांच्या झोळ्या मोकळ्या करून भीकेला लावले असेल तरीही त्याचे अनुयायी बोंबलत रहाणार. आंदोलन करणार. सर्व कशाकरता..?
पुतळे, स्मारंकाचा वापर 'प्रेरणा' कमी अन 'द्वेष' पसरवून माणुसकीच्याच छाताडांचं रक्त पिण्यासाठी होतोय. किती पुतळ्यांचं संवर्धन खरंच होतं. पक्षांनी केलेली विष्ठाही आपण जयंती पुण्यतिथीशिवाय साफ करत नाही अन कसल्या गप्पा हाणतोय आपण स्मारकांच्या. कोणाचा किती उंच पुतळा उभा केला गेला यावर त्यावर आता महापुरूषांची महती मोजली जाणार का....?
म्हणूनंच पुतळे स्मारके आयुष्यात कधीच मला अभिमानस्पद वाटणार नाहीत. पुतळे स्मारके आयुष्यात कधीच मला स्फुर्ती, प्रेरणा देणार नाहीत. कारण शेवटी ती निर्जीवंच. त्यातून विचारांची प्रेरणा जन्मला येईलंच याची खात्री नाही...
काल उदघाटन झालेल्या एकतेच्या पुतळ्याच्या ओझ्याखाली देश तीन हजार कोटी रुपयांनी दबला. हजारो आदिवासी कुटुंब उद्ध्वस्त करून आदिवासींना देशापासून वेगळं करणारा एकतेचा पुतळा किती दिवस पुरणार अन उरणार ? उद्या परवा लवकरंच शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांचेही पुतळे असेच उभा रहातील. अनेकांची आयुष्याची पुंजी खर्ची घालून शेवटी अमितेची ढोंगी भूक शमवण्याकरताचा निरर्थक खर्च म्हणजे पुतळे, स्मारके...
शेवटी हेही तितकंच खरंय की महापुरूषांचे विचार त्यांना मोठे करून गेले. फुटातली दगडं त्यांच्या पायाच्या धूळीची देखील ऊंची गाठू शकत नाहीत...

गणेश सुवर्णा तुकाराम
३१ ऑक्टोबर २०१८




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा