माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१८

भाषीक बेगडीपणा




२७ फेब्रुवारी ला मराठी भाषा दिवस साजरा होतो. खरंतर त्या दिवशीच मराठी भाषेवर लेख लिहीण्याची इच्छा होती, परंतु हे इतरांसारखेच झाले ना एक दिवस आला म्हणून उमाळे काढायचे म्हणून लिहीला नाही. तरीसुद्धा या विषयावर लिखाण करण्याची इच्छा काही स्वस्थ बसू देत नव्हतीच. काल जेव्हा निलेशचं स्टेटस वाचलं तेव्हा म्हटलं आता हे करावाच लागणार, नाहीतर रात्रीची झोप आणि दिवसाची भूक कुठे आणि कशी हरवून बसील, ते मलाही कळणार नाही. त्यामुळेच आज हा लेख लिहत आहे.
भाषा हे प्रथमतः संवादाचे माध्यम आहे. मराठी भाषा हा मराठी माणसाचा मानबिंदू तर आहेच पण मराठी भाषेच्‍या विकासातच आपल्या प्रत्येकाचा विकास होऊ शकतो. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे. आजपर्यंत मराठी भाषेला लेखकांची, कवींची उणीव कधीच भासली नाही.  गद्य, पद्य, नाटक अशा तिनही क्षेत्रात मराठी भाषेतील साहित्य रचना उत्कृष्ट दर्जाची आहे. मराठी चित्रपटांनी सुद्धा यात भरच घातली आहे. अनेक उत्कृष्ट दर्जाचे चित्रपट मराठी भाषेत प्रदर्शित झालेले आहेत, होतातही आहेत. या चित्रपटांमुळेच आज मराठी भाषेचा झेंडा सातासमुद्रापार जाउन तिचे महत्त्व दशपटीने वाढलेले आहे.
मराठी भाषा दर पंचवीस किलोमीटरवर वेगळी भासते. अगदी नदीसारखी. नदी वहाताना जशी वेगवेगळी वळणे घेते, तशी मराठी भाषा वेगवेगळ्या भागात नवी लय धारण करते. पण मूळचा गाभा मात्र तोच. संत ज्ञानेश्वरांनी छातीठोकपणे सांगितल्याप्रमाणे, `अमृताशी पैजा जिंकणारी' गोड पवित्र आणि रसरशीत ! अशी `मायबोली मराठी आहे.
मराठीभाषकांच्या स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन आज अर्धशतक उलटून गेले आहे. परंतू मराठी माणसाच्या मानसिकतेनेच येणाऱ्या काळात मराठी भाषेचे अस्तित्व टिकून राहील का हा प्रश्न उभा रहातो. महाराष्ट्रात राहून आपण मराठी भाषेला तितकं महत्त्व देतही नाही अन तसे ते जाणवत नाही. आई समोर असताना आईचे महत्त्व जाणवते का ? आपण जेव्हा घरापासून दूर जातो तेव्हा मात्र आईची नक्की आठवण येतेच ना. तसेच परप्रांतात काही काळासाठी जातो व सतत जेव्हा ती परप्रांतीय अनोळखी भाषा कानावर पडू लागते. तेव्हा आपण आपली मातृभाषा ऐकण्यासाठी कासावीस होतो. चुकून आपली भाषा बोलणारी , अनोळखी मंडळी दिसली तर ती माणसे अनोळखी असूनही खूप आपली वाटतात! हे भाषेचे अदृश्य धागे !
परंतू त्याच वेळी आजही संत ज्ञानेश्वरांची रचना मराठीची बोलू कौतूके आवश्यक पडतेच आहे. कारण आजची परिस्थिती वेगळी आहे,   मराठी माणसाला मराठीचा अभिमान कमी अन लाज जास्त वाटते. मातृभाषेचे महत्व वाटत नाहीच अन त्यावर हद्द की आता घराघरातली मराठीची जागा वाघिणीचं दूध म्हणत इंग्रजीनं घेतलीय. आम्ही मराठी भाषिक आहोत असे अभिमानाने सांगणारे आज संख्येने मात्र फार मोजके आहेत. मराठी भाषेला जो मुलायम साज संत ज्ञानेश्वरांनी दिला, त्याच मराठी भाषेला स्वत:च्याच मातीत उपेक्षिताचे जिणे जगावे लागते आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आज अनेक मराठी घरांतून मराठी अभावानेच बोललं जातं. याचं एक कारण असं असावं की आपण मराठी बोललो तर चारचौघांत आपल्याला कमी लेखतील अशी भीती युवा पिढीला असावी. मराठीऐवजी इंग्रजी बोलल्यास 'इम्प्रेशन' पडतं हा ही एक  फोफावलेला गैरसमज आहे. आपल्या आईवर प्रेम करायला कुणी शिकवायला लागत नाही आणि आईवरील प्रेम हे कमीपणाचे लक्षणही मानले जात नाही मग मातृभाषेवर प्रेम करणे हा काय जागतिक गुन्हा समजला जातो का ? एकूण काय आपल्या भावना आपल्या मातृभाषेतून व्यक्त करण्यातील महत्व अनेकांना अजूनही समजलेलंच नाही.
मराठी आणि माझा महाराष्ट्र मराठ्यांचा छे इतके मराठी संदर्भात गंभीरतेने घेतले असते तर मात्र आपण मराठी भाषेच्या  प्रगतीत मागासलेले नसतो.
आज भारताच्या शेजारी चीनमध्ये इंग्रजीचे महत्त्व नगण्य आहे. तरीसुद्धा चीन सर्वच क्षेत्रांमध्ये जगामध्ये आघाडीवर आहे. इंग्रजीशिवाय त्यांचे कुठे अडत नाही. एवढेच नाही तर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर नेहमी चिनी भाषेतूनच माहिती छापलेली असते. जपान, चीन ला हे  जाणलं, म्हणून त्यांची भाषा आज टिकून आहे. भारत मुळातंच विविध भाषांनी मिळून झाल्याने कोणतिही एक भाषा नाहीच.
जपाननं इग्रंजी माध्यम कटाक्षानं दूर ठेवलं. लिपी कमालीची क्लिष्ट आणि जपानीत वैज्ञानिक शब्दांची पराकोटीची वाण, पण न थकता त्यांनी शब्द घडवले. विज्ञान अन इतिहास मातृभाषेत असल्याचा जपानच्या समाजाला केवढा लाभ झाला ते लक्षात घेतलं तर हा भेद प्रकर्षांनं जाणवतो. आपल्या समाजात वैज्ञानिक दृष्टी नाही, असा आपण केवळ बोंब करीत असतो, पण तशी दृष्टी येण्यासाठी आपलं ज्ञानांच माध्यम हे समाजाच्या भाषेत उपलब्ध हवं. तसं झाल्याशिवाय सामान्यजनांपर्यंत विज्ञान पोहोचेल कसं? आणि विज्ञान समजलंच नाही, तर वैज्ञानिक दृष्टी समाजात मूळ धरील कशी? मग बोंब मारत बसायचं श्रद्धेच्या नावानं.
आम्ही मराठी माणसे इंग्रजीच्या इतके आहारी गेलेलो आहोत की, मराठी भाषा लिहिणे ,वाचणे, बोलणे वा तिच्या अभ्यासासाठी आणि जीवन व्यवहारासाठी माध्यम म्हणून उपयोग करणे यात आपल्याला अभिमान किंवा गौरवास्पद वाटण्यापेक्षा कमीपणा वाटत आहे. कुटुंबातील आईची जागा हि आईचीच आणि मावशीचीच जागा मावशीला हे अलिखित सूत्र आहे त्या प्रमाणे भाषेबाबतही असले पाहिजे. इंग्रजी ज्ञानभाषा आहे.हे आपण बहुतेक जन सांगताना आढळतात, इतर सर्व भाषा अज्ञानभाषा आहेत का….?   पण अवास्तव महत्व देण्याचे कारण काय….?
जगात यशस्वी व्हायचे असेल तर उत्तम इंग्रजी बोलता आले पाहिजे. ही जाणीव प्रत्येक मराठी घरात रुजली आहे. त्यामुळे पालक वाट्टेल तेवढी फी भरून आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालतात. मराठी बरोबर इंग्रजीचा उत्तम अभ्यास आजच्या तरुण पिढीने करावा. पण इंग्रजी माध्यमात मराठीला दुजाभाव देऊन नाही.  सध्या जन्मलेल्या मुलांना आई ऐवजी मम्मीचे ढोस पाजणारे संस्कृतीदर्शन मराठी भाषा संवर्धनासाठी उपयुक्त नाही. आपल्या मुलांवर आपल्या भाषेचे संस्कार जितके अधिक विकसित करू तितक्या सहजतेने मुले ज्ञान ग्रहण करतात जेव्हा मातृभाषेवर प्रभुत्व असेल तेव्हाच परकीय भाषेवर प्रभुत्व मिळविता येते. मातृभाषा, राजभाषा हेच खरे राष्ट्राचे मानदंड . लोकभाषा लोकशाहीचा कणा.
अस्सलिखित इंग्रजी बोलणारे गांधीजी म्हणतात 'परकीय माध्यमातील शिक्षणामुळं बालकांचा मेंदू थकतो आणि बुद्धीला मांद्य येते. त्यामुळं ती केवळ घोकंपट्टी आणि पोपटपंची करतात. आजही घरोघरी हीच परीस्थिती आहे. आपण माणूस कमी अन पुस्तकी किडे जास्त तयार करतोय. गुणवत्ता म्हणजे इंग्रजी हा मोठा गैरसमज झालाय. परिणामी मूलभूत विचार व संशोधन याकरिता ती पीढीच अपात्र बनते. आपल्या ज्ञानाचा लाभ ती कुटुंबाला किंवा समाजाला दे‌ऊ शकत नाहीत. देशाकरता, समाजाकरता त्यांचा काहीच उपयोग होत नाही. परकीय माध्यमातून झालेले हे यांत्रिक पोपट मग नोकरी पण तशीच शोधणार अन आपसूकंच परकीय नोकरीकडे धावणार.
परकीय चलनातील गुलामी वाढली देशाची ओढ संपते. ब्रिटीशांनी सर्वात मोठी ही गुलामगिरी तशीच कायम ठेवलीय. उच्च शिक्षणात प्रादेशिक भाषा माध्यम म्हणून उपयोगात आणायचं राहिलं बाजूलाच. उलट प्राथमिक आणि बालवाडय़ांतूनही आपण इंग्रजी माध्यमाचाच हिरिरीनं पुरस्कार करीत आहोत. दैनंदिन व्यवहारात सर्व प्राथमिक शिक्षण भारतीय भाषांतूनच दिले पाहिजे. पण स्थिती अशी आहे की काठावर पास होण्याच्या मानसिकतेपलिकडे हे सरकत नाही. इंग्रजी शिक्षण इंग्रज गेले तरी कायम राहिले. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्तता झाली तरी गुलामगिरीची मानसिकता मात्र तशीच राहिली. त्यामुळेच इंग्रजीतून शिक्षण झाले नाही तर पुढे जीवनात काही होणार नाही असा समज झाला आहे.
इंग्रजी येणारी माणसंच पुढे येतात, असं नाही. मराठीची गळचेपी होण्याचा आवेग सुसाट असल्याने ही त्सुनामीभविष्यात कोणकोणती संकटे घेऊन येणार आहे याची कल्पना मराठी माणसाला असूनही तो त्याकडे कानाडोळा करत इतर भाषांकडे मृगजळाच्या मागे पिसाटल्याप्रमाणे धावत आहे.
मराठी बोलणे म्हणजे अल्प प्रतिष्ठेचेअसा समज आतापासूनच रूढ होत आहे. त्यामुळे मानमर्यादेस तिलांजली वाहिलेली इंग्रजी भाषा बोलणे उच्च प्रतिष्ठेचेमानले जात आहे. मराठी माणसालाच मराठीची लाज वाटू लागल्याने त्याच्याकडूनच मोकाटपणे मराठीची गळचेपी होत आहे. मराठीतील अग्रगण्य लेखक कै. जी.ए. कुलकणीही इंग्रजीचेच प्राध्यापक होते.  पण त्यांचं साहित्य मराठीत होतं हे आपण कधी लक्षात घेणार.?
मातृभाषेतून शिक्षण घेऊन यशस्वी झालेल्यांची कितीतरी उदाहरणे समाजापुढे असली तरी इंग्रजी शिक्षणाचा पगडा असलेल्या मानसिकतेमुळे इंग्रजी शाळांत पाल्यांना धाडण्यात येते. यामुळे होते काय, धड इंग्रजी पक्के होत नाही आणि मराठीच्या नावाने बोंब. इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद केल्या पाहिजेत. कारण त्यामुळे मराठी संस्कृती नष्ट होत आहे, असे ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडेंच्या विधानात काहीतरी तथ्य  नक्कीच आहे. मराठी माध्यमांतील शिक्षणाला आपलीच मराठी माणसं नाकं का मुरडताना दिसतात. हा न्यूनगंड कशासाठी?
फडफड इंग्रजी बोलणारा माणूस तेवढा हुशार हा ग्रह आपणंच करून घेतलाय. अरे पण मग अस्खलित मराठी बोलणारा माणूस काय मद्दड, मुर्ख असतो का.?  भाषा कुठलीही असो, ती उत्तम बोलता यायला हवी, प्रत्येक भाषेची इज्जत करायला हवी याबद्दल दुमत नाही.  पण आपल्या आईला बाजूला सारून दूरच्या आत्याला, मावशीला तिच्या जागी बसवण्याचा अट्टाहास का ?  जिथे आवश्यक आहे तिथे ती भाषा जरूर बोलली गेली पाहिजे. पण म्हणून लगेच घरी ताटावर बसल्यावर 'भात' वाढ म्हणायच्या ऐवजी की 'राईसच'  म्हणायचं का? हे आपणं ठरवलं पाहीजे नां.
 पु ल देशपांडे किती मराठी माणसांना माहीती आहेत हा ही प्रश्नच आहे. माझ्या आईच्या हातच्या थालीपीठाची सर कश्या कश्यालाही  नाही' या वाक्याचा जसाच्या तसा इंग्रजी अनुवाद करून दाखवावा असे आव्हान पुलंनी त्यांच्या पुस्तकातून दिले होते. आजवर एकाही वाघीणीच्या दूधावरच्या बछड्याला ते जमलं नाही. तात्पर्य काय तर प्रत्येक भाषेची गोडी ही वेगळीच असते. भाषांतरीत करून तयार झालेलं वाक्य भलतंच काही सांगून जाईल. त्यात ती मजा असूत शकत नाही.  प्रत्येक भाषेची नजाकत, नखरा, ऐट ही वेगळीच असते.
यू नो, माय सन स्पीक्स ओन्ली इंग्लिश' असं सांगणारे पालक लहान मुलांची पाहूण्यांसमोर सर्कसच करतात. वन टू म्हण, ही पोयम म्हण अरे काय हे.? त्या पोराला अजून आईला 'आई' म्हणता येत नाही याची लाज कशी वाटत नाही.? हळूहळू घरातलं हे अ-मराठी भाषांचं कल्चर मुलांच्या चांगलंच अंगवळणी पडतं आणि मग मराठी एक अभ्यासक्रमातील १००-२०० पानाचा विषय वगळता मराठीशी मुलांची कायमची ताटातूट होते.  हे फक्त शहरात आहे असा भाग नाही, ग्रामीण भागातही याचं पेव जास्त आहेच. इंग्रजी माध्यम म्हणजेच चांगली शाळा हा अजून एक गैरसमज तिथे रूजलाय.  आ आ ई शिकण्याच्या वयात मुलाला पोयम शिकाव्यात असा अट्टहास धरत लाखोंची फी भरून इंग्रजी माध्यमाच्याच शाळेत प्रवेश घेणारी मंडळी सगळीकडेच आहे. आजकालचे पालक अशा शाळांकरता प्रसंगी स्वतः मुलाखती देतात प्रवेशाकरता.!  मुर्खपणाच कळस असतो तो हाच.
आपण मुलं शिकवत नसतो तर रोबोट तयार करत असतो.  ज्या त्या वयात तितकाच ताण मेंदूवर टाकला जावा याची तरतूद म्हणजे मातृभाषा.  व्हॉट इज श्रावण? असे विचारणारी अभियांत्रिकीला गेलेली मराठी मुले भेटतात तेव्हा डोक्यावर हात मारायची वेळ येते. मध्यांतरी मित्रांना आमरस खायला बोलवलं होतं, एक मित्र आंब्याच्या रसात चपातीचे तुकडे टाकून काटे चमच्याने खात होता, याला नेमकं काय म्हणायचं.? कारण सोपं होतं त्याच्या ममा ने Use Spoon while taking meal एवढंच सांगितलं होतं. चार वर्ष हा अमेरिकेला काय गेला अन विसरलाच की.
इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून मराठी हा विषय सक्तीचा असल्याने मराठी भाषिक असलेली आणि नसलेली मुले मराठी भाषेचे लचके तोडताना दिसतात.  र्हस्व, दीर्घ, आकार,उकार,काना,मात्रा,वेलांट्या या भाषांतर्गत व्याकरणाच्या भानगडी इंग्रजी भाषेत नसल्याने मायमराठीपेक्षा मुलांना इंग्रजी जवळची वाटू लागलीय. अन आम्हालाही मराठी भाषेविषयी फारशी आस्था आढळून येत नाही. मी मराठी लिहीतोय याला बरीच वर्षे झाली, पण आजही अशी अनेक माणसं आहेत की जी माझ्या चूका सांगतात.  पण माझ्या चूका ह्या अज्ञानाने नव्हे तर अनावधनाच्याच होत्या. की जसे सखाराम बाईंडर हे गंभीर बिषय मांडणारं नाटक आहे पण माझ्या वाक्यरचनेत ते विनोदी नाटकांच्या यादीत आलं म्हणून ते चुकलं. अन हे चुक आहे हे त्यांनाच कळलं ज्याला ही भाषा कळली, त्यातलं साहित्य, कला क्षेत्र कळलं..

उच्चभ्रू जीवनशैलीसाठी इंग्रजीशिवाय पर्यायच नाही. भाषा म्हणून इंग्रजी शिकायला विरोध नाही. पण आपली मानसिकता अशी झाली आहे की, पाश्चात्यांचे अनुकरण करताना मराठीचा गळा घोटतोय. जागतिक पातळीवर वावरताना इंग्रजी भाषा यायला हवी याबाबतीत दूमत नाही. पण म्हणून आपण आपल्या मातृभाषेचे महत्व काढुन टाकत मातृभाषाच काढून टाकावी हे नक्कीच आश्चर्यकारक आहे. आजकालच्या बदलत्या वातावरणात इंग्रजीचं अवडंबर माजलं तर प्रादेशिक मातृभाषा नाहीशा होऊन आपण पुन्हा इंग्रजी गुलामीचे पाईक होऊ. जागतिक पातळीवर वावरताना इंग्रजी भाषा यायला हवी याबाबतीत दूमत नाही. पण म्हणून आपण आपल्या मातृभाषेचे महत्व काढुन टाकत मातृभाषाच काढून टाकावी हे नक्कीच आश्चर्यकारक आहे. कुठलीही भाषा आवडणे, न आवडणे ही वैयक्तिक बाब जरी असली तरी मराठी मातीत जन्माला येऊन मराठी भाषेचे बोट सोडून देणे हे करंटेपणाचेच लक्षण आहे.  आपल्या देशातील खेडय़ापाडय़ांत बुद्धीची वानवा आहे काय ? मुळीच नाही. तुटवडा कशाचा असेल तर मातृभाषेचा. माहिती परभाषेतून मिळवता ये‌ईल, पण ज्ञानात भर घालण्यासाठी आपापली मातृभाषाच अधिक उपयुक्त आहे. आम्हा मराठी जनांना आमच्या भाषेची अस्मिताच कळली नाही. इंग्रजी शिकायला कोणी नाही म्हणत नाही; पण माझ्या मातृभाषेचा अवमान अपमान करण्याचा अधिकार कोणी दिला.
मातीचीच भाषा मातीचीच भूमी,
तिचे स्थान इंग्रजीपेक्षा का कमी.
आन मराठी, मान मराठी,
सकल जणांची शान मराठी

हे फक्त इंग्रजीच्या बाबतीत आहे असं नाहीच मुळी. हिंदीचंही अवडंबर बऱ्याच प्रमाणात माजलेलंच आहे. हिंदी काय तर म्हणे हिंदूची भाषा, हिंदूस्थानची भाषा. राष्ट्रभाषा. पण आपण कधी ध्यानात घेणार आहोत हा भारत आहे. विविधतेने नटलेला. उत्तरेकडील काही राज्यात हिंदी बोलली जाते म्हणून ती लगेच राष्ट्रीय भाषा होत नाही. याला कारणीभूत आपणंच आहोत. म्हणूनंच सुबोध जे बोलला ते खरंच आहे. आपण, आपले राजकारणी, आपला समाज आपणंच आपल्या मातृभाषेच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरत आहोत. अमुक हिंदी अभिनेता, नेता किंवा अन्य कुणी मराठीत बोलला की आमची छाती दोन इंच जास्तंच फुगते.  पण त्याचवेळी घरात मातृभाषेऐवजी अन्य भाषेचे सोहळे साजरे करतो.
मुंबई स्वप्नांची नगरी. महाराष्ट्रात आहे. परंतू कुणीही अनोळखी जरी भेटलं तरी हिंदीत बोलणार. का.? समोरच्याला मराठी कळणार नाही म्हणून.? कुणी सांगितलं कळत नाही.? बरं नाही कळत मग.? कारण काय असेल तर तो इतर प्रांताहून आला असेल मग.? आपण काय करतो दुसऱ्या देशात गेल्यावर.? आपलं चलन बदलून त्या देशाच्या चलनात करुन वापरतो. मग त्यांनी इथे येऊन मराठी शिकावी तर हरकत काय.? असं तर होत नाही ना की तुम्ही अमेरीकेत जाणारंय मग अमेरिकेनं डॉलर बदलून रूपया चलना करावं.?
आवश्यकता कुणालाय.?
गरज कुणालाय.?
बदल कुणी केला पाहीजे.?

कारण एकंच आम्हाला आमच्या भाषेचं महत्व वाटत नाही. याबाबतीत दक्षिणेची राज्ये अन तथल्यख माणसांचं खरंच कौतूक करावसं वाटतं. त्यांच्या इतका भाषीक स्वाभिमान क्वचितंच इतर राज्यात आढळतो. केरळला गेलं तर मल्याळम किंवा तेलगूच ऐकायला मिळेल. ती माणसं आपण गेलोय म्हणून मराठीत पण बोलणार नाहीत अन हिंदीत नाहीच नाही.

महाराष्ट्रात मराठीसाठी छाती बडवून घ्यावी लागते. आपलेच संवेदनशून्य होत जाणारे मन सध्या विसरत चालले आहे की, आपली भाषा, आपली मातृभाषा ही सुद्धा जागतिक भाषेच्या प्रसारमाध्यमांच्या प्रभावाद्वारे तिच्या हक्कांपासून वंचित होते आहे. आपल्याच मातृभाषेपासून आपण दुरावत आहोत. भाषेच्या शुद्धतेला आपण पारखे होत आहोत. केवळ मराठीचा अभिमान नको कृती करून दाखवण्याची वेळ आली आहे. मराठी भाषा खरोखरच समर्थ व्हायची असेल तर तिच्याविषयीचा मराठीभाषक समाजाचा दृष्टिकोन मुळातून बदलायला हवा मराठी भाषेवरचे आपले प्रेम प्रतिक्रियात्मक, सापेक्ष आणि नकारात्मक असता कामा नये.
नुसतंच २७ फेब्रुवारी आला की नुसतंच २७ फेब्रुवारी आला की माय मराठी बोंबलायचं अन इतर दिवशी मराठी कर तू काशी अशानं आपणंच आपल्या भाषेवर पाय देतोय. मराठी भाषा दिन म्हणून एखादा दिवस साजरा करणे खूप सोपं होत चालंय. पण आपण खरोखर आपली मातृभाषा टिकावी म्हणून काही प्रयत्न केले पाहीजेत. मराठी भाषेची प्रत्येकाने जोपासना केली पाहिजे. आपली भाषा आपणंच हिरीरीने बोलायची. जास्तीत जास्त  लोकांनी जास्तीत जास्त ठिकाणी ती भाषा बोलणे हा कुठल्याही भाषेच्या संवर्धनाचा पहिला टप्पा आहे. आपण हिरीरीने मराठी बोलले पाहिजे. ती बोलायला लाजायचे कारण नाही. आपण आपल्या भूमीत भक्कम उभे आहोत, आपली भाषा ही जगातल्या प्रमुख भाषांपकी एक आहे. आपण मराठी भाषेत सर्व व्यवहार करू शकतो, या आत्मविश्वासाने ती बोलण्याची आवश्यकता आहे. इंग्रजी किंवा इतर माध्यमातून शिकलेले लोक मराठी बुडवतील, असेही समजण्याचे कारण नाही. आज खरी गरज आहे ती प्रत्येक मराठी कुटुंबाने आपल्या मुलांना मराठी शिकवण्याची!
मी लहानपणापासून तसा लिहीत आहेच. पण अभ्यासाव्यतिरिक्त मराठी लिहायला सुरुवात करून मला दहा वर्षे झाली होत आली. तेव्हापासूनच मराठी विषयी एक विशेष आवड निर्माण झाली. का हे माहीत नाही पण शेवटी माय ती मायंच. आई विषयी आपसूकच प्रेम निर्माण होतं. जसा मोबाईल माझ्या आयुष्यात आला आहे तेव्हा पासून हे प्रेम जरा जास्तच वाढलं. मोबाइल मराठी भाषेत वापरणं म्हणजे अनेकांना जिकिरीचं काम वाटतं. पण मला त्याशिवाय जमत नाही. मध्यंतरीच्या काळात केवळ या एका कारणाने मी नवीन मोबाईल घेणे टाळत होतो. कारण इतकेच की त्यात सहजपणे वापरायला यावी अशी मराठी भाषा नाही. हळूहळू सवय होईल म्हणून मित्रांनी आग्रह केला म्हणून मोबाईल घेतला. पण त्यातही भाषा मराठीच. सवय होईपर्यंत अडचण होतेय. पण जुना मोबाईल फोन सोबत आहेच. सांगायचे तात्पुर्य इतकंच की मराठी शिवाय माझं दिवसात एक पान हलत नाही.
लॅपटॉप वर सुद्धा इंग्रजी कीबोर्डवर मराठीची अक्षरे सहजपणे उमटतात. शक्य तिथे प्रत्येक वेळी मराठी कायमंच माझा प्राधान्य क्रम राहीलाय. सोशल नेटवर्किंग साईट मराठीत, ब्लॉग मराठीत, मित्रमंडळींना शुभेच्छा मराठीत. वर्षाकाठी शंभर सव्वाशे चित्रपट पहात असेल. परंतु बहुतांश मराठीच. कसाही असला तरी तो माझा चित्रपट असतो.
माझ्या माणसांकरता असतो. मराठी नाटकं बघणं सुद्धा नीत्याचंच. डोन्ट वरी बी हॅपी दहादा बघितलं असेल. वाचताना बहुतेक पुस्तकं मराठीतंच. आजवर जी निवडक पुस्तकं वाचली ती मराठीच. क्वचित एखादं मराठी सोडून असेल. मराठी भाषा, कला, साहित्य, संगीत, कविता प्रत्येक क्षेत्र मला कायम आपलं वाटतं. .प्लेलिस्टचा भाग कायमंच मराठी गाण्यांच्या मैफिलीकरताच राखीव असतो. एकंदरीत जिथं मराठी तिथं मी असं समीकरण बनवलं होतं.
आजचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे युग मानले जाते. संपर्क-क्रांतीचे युग मानले जाते. अशा वेळी आपण आपल्या दैनंदिन जीवनात अशाच छोटय़ा छोटय़ा कृतींनी नक्कीच काहीतरी करू शकतो.मी गेली दहा वर्षे हेच करत आलोय.
भाषेच्या जाज्वल्य नाही तरी किमान मनस्वी अभिमानातून आपण किमान एखादी तरी कृती करू शकतो एवढ्या एकाच धैय्यला समोर ठेवून. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हटल्यावर समोरची व्यक्तीही त्या मराठीतंच स्विकार करत आभारी आहे, धन्यवाद काहीतरी मराठी बोलेल म्हणून का असेना मी शुभेच्छा मराठीत देतो. रोजच्या लिखाणात मराठीचाच सर्रास वापर करण्यामागचं कारणंही तेच. भेटवस्तू म्हणून मराठी पुस्तके/ काव्यसंग्रह देताना वाचक म्हणून आपले भाषेसाठी योगदान देताना मला कसलीच लाज वाटत नाही.
माझ्या मराठी प्रेमाचं अनेकांना कौतुक आहे. पण मला ते माय मराठी ला सापत्न वागणूक देतात हे खटकत रहातं. अनेक जण मराठी भाषा वापरतो म्हणून दुरावलेत देखील. माणसं सुटू शकतात मराठी नाही. मागे गोव्याला फिरायला गेलो असताना फक्त फलटण, सांगली च्या भाषेच्या लकीबीने 'काय लका' एका शब्दावरून मराठी माणसांची भेट झाली तेव्हाचा आनंद वेगळाच होता.
परकीय भाषा शिकू नये, परकीय भाषा जरुर शिकाव्यात, या भाषांचा आदर करावा, अन्य भाषांचा जराही द्वेष मनात नसावाच. परंतू स्वत:ची मूळ भाषा टिकवून, मग वेळप्रसंगी परभाषेचा स्वीकार करावा. आपल्याला आपल्या भाषेचा स्वाभिमानही हवा अन अभिमानंही.
मला माहीतीय, मी काय असं मरभरून लिहीणार, वाचणारेच वाचणार अन घेणारेच मनावर घेणार.अनेकांना प्रदीर्घ पण सडेतोड लिहीलेलं खटकेलंही, आवडणार नाही, राग येईल. हरकत नाही. पण मराठी असल्याची लाज वाटू देऊ नका. मराठी भाषेसाठी असणारा आदर, प्रेम तसेच तिची समृद्धी वाढविण्याची प्रामाणिक इच्छा आहे बस्स इतकंच. यातून लगेच मनात ज्ञानेश्वर पुन्हा एकदा जन्माला यावेत अन मराठीचे कौतूक सोहळे होतील असं वाटत नाही पण बदल घडेल असे मला मनोमन वाटते


लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्या एक तो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

गणेश सुवर्णा तुकाराम
१६ नोव्हेंबर २०१८



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा