संपत चाललाय माझाच माझ्याशी होणारा संवाद अन
अंधारात हरवत चाललेलं अस्तित्व शोधण्यात....
बुंध्याजवळ एकवटणाऱ्या गडद सावलीसारखी
पाऊलवाटेवर आठवणींची दाटी झालीय म्हणून...
अशातही काही प्रश्न पडलेच,
मी खरंच खूप दूर गेलोय का माझ्यापासून
माझीच तत्वे सांभाळत अन
मीच आखलेल्या मर्यादा सांभाळत....
कोंडमारा होतोय का माझाच....
श्वास अडकतोय का माझाच....
रोजच्या जगण्याची काळजी का भीती
मस्तकात शिरताये का प्रश्न घेऊन...?
कारण साधा पडदा हलला ना तरी
अंगावर आता काटा उभा राहतो...
पुन्हा तशाच प्रश्नांनी अनुत्तरीत होऊन
विचारांच्या गहन समुद्रात हरवल्यासारखा
स्तब्धच...?
पश्चात्तापाची खूप मोठी लाट येणार आहे
असं जाणवूनही मी अबोलच...?
आयुष्याच्या कपाटात सापडलेली काही जूनी पानं
वाचायची नव्हती तर फक्त सांभाळूनच ठेवयाची
का....?
पुढे कधी काहीतरी शोधतांना
ती पानं चाळता चाळता संपूर्ण वाचली तर
आपलं आपल्यालाच अंतर्बाह्य हलवलं जातं.
आयुष्य अगदी अर्धमेल्या सारखंच होतं.
आयुष्यासंबंधीच्या सगळ्या कल्पना ठिसूळ ठरतात.
सगळीच स्वप्न प्रवाहात गटांगळ्या खात वाहून जाऊ
लागतात...
अन आपणही त्या स्वप्नांसारखं
वादळात सापडलेल्या निर्मनुष्य जहाजासारखे
सर्वस्व हरवूनही उरतो.
म्हणून आता थांबवलीय फरफट
आयुष्याच्या अशा अनुत्तरीत प्रश्नांमागे
धावण्याची..
काही सांगायचंय म्हणून नाही तर काही ऐकायचंय
म्हणून,
काही समजून घ्याचंय म्हणून...
गणेश सुवर्णा तुकाराम
१८ नोव्हेंबर २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा