माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१८

आठवणीतली गाणी




प्रत्येकाचा मनात एखाद्या गाण्याचे विशेष स्थान असते. गाणे कोणतेही असो ते विशिष्ट गाणे ऐकले की मन प्रसन्न होते, गहिवरते, आठवणींचा जगात नेते असे एक तरी गाणे प्रत्येकाचा आयुष्यात असतेच. ते आपल्याला वेगळ्याच जगात घेऊन जाते. त्याचे आपल्याशी जोडलेले नाते कधीच तुटत नाही. असं आठवणीतले गाणे माझे गाणेअसे आपल्याला वाटते. आपण ते कधी कोणासमोर व्यक्त केलेले असते कधी नसते. पण ते गाणे एकदम कुठे ऐकले की आपण स्तब्ध होतो काही क्षणापुरते का होईना भावनीक होतो. काल रात्री अशीच काही गाणी ऐकली अन मन स्तब्ध झालं. त्या गाण्याने मला महाविद्यालयातील प्रसंगाची आठवण करून दिली.

तुझे मेरी कसम,
तब्बल आठ वर्षांनी पुन्हा ऐकलं राहुल.

जरा सी सावली है वो. खुदाया खैर
सागर काल रात्री पुन्हा क्लासच्या वातावरणात नेऊन सोडलंस.

कजरा मोहब्बतवाला
आरती, शासकीय तंत्रनिकेतनचं संपुर्ण स्नेहसंमेलनं आणि त्याचीआठवणी ताज्या झाल्या.

गणदैवताय
नंदू, भाऊ देवावर आजिबात विश्वास नाही पण हे तुझं गाणं म्हणजे आमच्याकरता शंकर महादेवनंच.

हा चंद्र तुझ्यासाठी, वो पहली बार.
संतोष, शेवटच्या सेमिस्टरला आपला अभ्यास या गाण्यांचाही झाला होता.

इस्टओर वेस्ट इंडीया इज बेस्ट.
प्रतिक, काय या गाण्याचं नशीब, आम्ही डान्सर प्रतिक पहायचा राहून गेलो.

रंग दे बसंती.
सुहास, तुझी तर चिक्कार गाणी ऐकायची राहीली लेका शेजारी असूनही.

गालावर खळी,
नाना, आपलं पहिलं सेमिस्टर यातंच गेलं ना रं.

बे जुबाँ.
अंतरंग याही कारणाने लक्षात राहीलंच.

खुद को तेरे,
अंतरंग च्यावेळी पहील्यांदा ऐकलं अन पुढचे काही महीने प्लेलिस्ट बदललीच गेली नाही.

जो जिता वही सिंकदर,
माझ्या दोन्ही महाविद्यालयातील एकमेव गाणं जे कायम ग्रुपचं टायटल साँग राहीलं.

या व्यतिरिक्तही केरळच्या कंटाळवाण्या प्रवासाला हलकं करायला कारणीभूत ठरल्याच गाण्यांच्या भेंड्या. काही चित्रपट जसे लहानपणी घालविलेल्या निवांत दिवसांची आठवण करून देतात तशी काही गाणी खूप खास अशा ठेवणीतल्या आठवणी जागवतात. ती गाणी आपण आपल्या मनाच्या एका सुगंधी कोपर्‍यात नीट घडी घालून ठेवतो.
भरजरी वस्त्रे जशी जुन्या काळी नीट घडी करून जुन्या लोखंडी पेटीच्या तळाशी ठेवली जात असत त्याप्रमाणे ही भरजरी गाणी आपण जपून ठेवतो. कधीतरीच बाहेर काढण्यासाठी आणि आठवणींची येथेच्छ आतषबाजी अनुभवून झाली की पुन्हा त्या सुगंधी कोपर्‍यात रचून ठेवण्यासाठी. सुंदर गाणं असच अवचित कुठूनतरी ऐकू यावं आणि चिंब करून जावं. त्याची खुमारी काही औरंच.

गणेश सुवर्णा तुकाराम
१६ नोव्हेंबर २०१८



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा