माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

रविवार, ४ नोव्हेंबर, २०१८


माझी मला पत्र लिहीताना...!!!

काळोख आणि शोकांतिकेच्या ओझ्याखाली पिचलेलं मोडकळीला आलेलं हे मन
आता अस्वस्थ करणाऱ्या आठवणीचं संग्रहालय बनलं आहे.
धूळ झटकल्याने त्या आठवणीही पुसून जातील
या भीतीमुळे मनाची खोली स्वच्छ करणंही सोडून दिलं आहे.

बाहेरच्या भिंतीवर असलेल्या एका पोटमाळ्याच्या जागेत
पुसटशा तपकिरी रंगाची धूळ साचलेली पानं अस्तावस्त पडलेली आहेत.

दाराबाहेर अर्धवट उघडा असणारा पेन
अजूनही तसाच पडलेला आहे.
जरा मळला, काळवंडला आहे.

पत्र लिहीण्यासाठी घेऊन ठेवलेली  कोरी पत्रं
कोपऱ्यात अजूनही उभी आडवी पडलेली आहेत.

काचेचं दार असलेल्या कपाटात
जुन्या कवितेत्या वह्याही तशाच आहेत.
त्यातली मोराची पिसं,
कुरमजायला ठेवलेली पिंपळाची पानं,
गुलाबाच्या पाकळ्या सगळं जिथच्या तिथंय.

टेबलावर बसून जी काही चित्र काढली.
ती चित्राची वही,
अन रंगात अर्धवट बुडलेला ब्रश देखील हलवलेला नाही.
अन सोबतच आहेत माझ्या जगण्याची असंख्य औषधं...


 गणेश सुवर्णा तुकाराम
०४ नोव्हेंबर २०१८



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा