माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

रविवार, १८ नोव्हेंबर, २०१८

हरवलेला रस्ता...




आजकाल हरवलेला असतो मी असाच कुठे...
स्वत:च स्वत:च्या विचारात....
घुटमळ रहातो कितीतरी वेळ एकाच वर्तुळात
तोच विचार, त्याच भावना अन तोच माझ्यात....

तशीच असते गाडीच्या रेसवर दाबलेली मुठ
रस्त्यावरच्या खड्यांचा अन भोवतालच्या माणसांचा अंदाज घेत....
कधी कमी होते, कधी अचानक वेगही घेते,
पण सगळं कसं एकदम नियंत्रणात असतं माझ्याच...

वाटतो रस्ता मला घेऊन पळतोयच की काय
तो तिथेच असला तरी स्तब्ध एकाजागी...
मीच पळत असतो गाडीवरूनही अन मनातल्या विचारातही
रस्ते बदलत अन पडत जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधत...

कधी अचानक मन तरंगत होतं उल्हासाच्या आसमंतात
अवचित काहीतरी गवसल्याचा भास होत....
कापसाहूनही हलकं हलकं होऊन जातं पार
प्रश्नांचा सोयीचा अर्थ लावून उत्तर मिळालं की...

अलगद मोरपिस फिरावावं अंगावरून
बोचरा गारवा शहारा आणतो कात टाकत
किंचितसं स्मित नकळत येतं
मनातल्या मनात आठवणींच्या गुदगुल्यांनी हसत...

सिग्नल लागतो रस्त्यावरचा अन आयुष्याच्याही
नकळत गाडी थांबली जाते क्षणातंच....
सिग्नल संपून प्रवास पुन्हा सुरू होतो,
नव्या विचार जन्माला घालत...

पुन्हा रस्ता पळतो तसा जीव कासावीस होतो
अन मी वेड्यासारखा राहतो नुसता फिरत...
शोधत राहतो पाऊलवाटांवरच्या ओळखीच्या जून्या खुणा
हळूवार पावलांवरची धूळ झटकत....



गणेश सुवर्णा तुकाराम
१८ नोव्हेंबर २०१८




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा