माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०१७

तुला कळणार नाही


                              गेली अनेक दिवस झाले माझ्या टाईमलाईवर तुला कळणार नाही हा ट्रेंड सुरू होता. माझं नेमकं काय चाललंय हे अनेकांना काही कळत नव्हतं. मुळात ते तसंच होतं. त्यांना कळण्यासाठी नव्हतंच. या दिवसांत मला विचारणार्‍या प्रत्येक करता ते तुला कळणार नाही होतं. हा मराठी सिनेमाच्या पब्लिसिटीचा प्रकार आहे का असंही विचारलं गेलं. अनेकांनी तुला मधे आमची ती शोधण्याचा प्रयत्न केला तोही वाखाणण्याजोगाच आहे. एकूण हा सगळा खटाटोप बुचकळ्यात टाकणाराच होता.  
                           खरंतर हा होता एका आव्हानाचा अन आवाहनाचा प्रतिसाद. ज्या दिवशी तुला कळणार नाही चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला त्यानंतरच्या सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रतिक्रियेमधून चित्रपटामागची एकूण कल्पना लक्षात आली. आणि मग सर्व मराठी चित्रपट प्रेमी असणार्‍या मित्र मैत्रीणींच्या ग्रुपच्या चर्चेत एक भन्नाट कल्पना सुचली. आपापल्या टाईमलाईच्या माध्यमातून ही एक ओळ वापरून जे काही लिहिले जाईल ते पोस्ट करायचे. अन हा तुला कळणार नाही चा खेळ सुरू झाला. 
                              वास्तविक हा खेळ वेगळ्याच कारणाकरता होता. तुला कळणार नाही हा चित्रपटच मुळात म्हणजे आपल्या आयुष्यातील थांबलेल्या नात्यांना रिफ्रेश करून पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात करायची. आजपर्यंतच्या आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक वळणावर कुणी ना कुणी भेटत राहिले. मित्र मैत्रिणींचा परिवार जोडला गेला अन आपल्यातील प्रत्येक जण परिपूर्ण होत गेला. पण ह्याच प्रवासादरम्यान अनेक नात्यांच्या फक्त आठवणी साठत राहिल्या. मोबाईलच्या काॅन्टक्ट लिस्टमधे क्रमांक जोडत राहिले. पण नात्यांमधला संवाद थांबला तो थांबलाच. अशी थांबलेली नाती प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. 
                          माझंही आजवरच शिक्षण फिरस्ती असल्यासारखं विविध ठिकाणी झाले अन त्यामुळेच असंख्य मित्रपरिवार जोडला गेला. पण प्रत्येक वेळी जूनी शाळा किंवा काॅलेज बदलले तशी जवळच्या मित्रांची जागा बदलत राहीली. मैत्रीच्या कक्षेतील हे फेरबदलच नात्यांना रिझ्युम करू लागले. म्हणूनच अशा थांबलेल्या नात्यांना सुरवात करण्यासाठी तुला कळणार नाही च्या माध्यमातून एक प्रयत्न आहे. जेव्हा हा खेळ सुरू झाला तेव्हा अट होती की यामागचं रहस्य आठ सप्टेंबर पर्यंत तसंच ठेवायचं. आज ही पोस्ट लिहीतानाच हे रहस्य उघडकीस येणारंच आहे. पण हाही खेळाचाच भाग होता. ह्या पोस्टच्या नंतर थांबलेल्या नात्यांच्या प्रवासाच्या साचलेल्या आठवणी अन काॅन्टक्ट नंबर आठवून प्रतिसाद म्हणून आठवण करून देत थांबलेली नाती रिफ्रेश करून रिस्टार्ट करावीत. हा प्रतिसाद फोन करून असेल, प्रत्यक्ष भेट घेऊन असेल. अथवा या पोस्टला प्रतिसाद म्हणून प्रतिक्रिया भागात असेल.


गणेशदादा शितोळे
(८ सप्टेंबर २०१७)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा