माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७

वाढदिवस ०९ सप्टेंबर २०१७

                            नुकताच वाढदिवस येऊन गेला. दरवर्षी सारखा याही वेळी तो वेगळाच अनुभव देणारा होता. मुंबई पुणे मुंबई असा नियमित प्रवास करताना त्यादिवशी बसमध्ये होतो. बसमधे असणाऱ्या बाकी ऑफिसमधील मित्रांना दुसर्‍या दिवशी सकाळी इमेल आल्यावर वाढदिवस असल्याचे कळणार असल्याने त्यांनी सोबत असूनही शुभेच्छा दिल्या नाहीत. पण मागच्या वाढदिवसासारख्या याही वाढदिवसाला रात्री बाराच्या ठोक्याला मित्रांच्या शुभेच्छा आल्या. अगदी अनपेक्षित मित्रमैत्रीणींकडूनही. म्हणजे मागील पाच वर्षांत विसरले की काय अशी भिती ज्या मित्रमैत्रीणींबाबत वाटत होते त्यांनीही न चूकता फोन केल्याने वेगळाच आनंद झाला होता. मागील वर्षी सारखेच याही वर्षी वाढत्या वयानुसार कमी होण्याच्या शुभेच्छाही मिळाल्या. फक्त ह्या वेळी व्यक्ती वेगळी होती. पण एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टींपेक्षाही यंदाचा वाढदिवस मला वेगळ्याच कारणांमुळे लक्षात राहीला. 

                           रक्तदान केल्याची सुरवात तशी २००८ ची. पदविका अभ्यासक्रमादरम्यान पहिल्यांदा सुरू केलेला तो संकल्प दर तीन चार महिन्यांनी मी आजवर पाळत आलो. पण कधीही वाढदिवसाला रक्तदान करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे दरवर्षी वाढदिवस साजरा करताना बर्थडे डोनेरचा टॅग लावून कधीही सेलिब्रेशन झाले नाही. यंदा मात्र आजोबांना मंगेशकर हॉस्पिटल मधे डॉ. रमेश कुलकर्णी यांच्या ओपीडी करता रात्री रांगेत उभे रहायला जायचंय असल्याने ह्यावेळेस संधी मिळणार नक्की होते. दुपारी आजोबांचे एकूण तपासणीच्या सगळ्या गोष्टी पार पडल्या आणि मी औषधे घेण्याकरता आजोबांना थांबवून रक्तदान करण्याकरता गेलो. दीनानाथ मंगेशकर रक्तपेढीत पहिल्यांदाच रक्तदान करत असल्याने अर्ज आणि इतर बाबींची पूर्तता करून मी रक्त तपासणी करून घेतली. मी सांगतलेला रक्त गट आणि तपासणी मधील रक्त गट हे एकच असल्याची खात्री झाल्यावर मला समुपदेशन केंद्रात पाठवले. तिथे एक वयस्कर परिचारिका मला अर्जामधील गोष्टींची माहिती विचारून खात्री करून घेत होत्या. रक्तदान केल्यावर होणारे फायदे सांगितले. त्यानंतर एकूण उंची नुसार वजनावर घसरल्या आणि इतरांच्या सारखी वजनावरून होणारे आजार आणि इतर गोष्टीचं पारायण घातलं. शेवटी त्यांनी वय आणि जन्म तारीख ह्याची खात्री केली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आज माझा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाला मी रक्तदान करतोय. त्यानंतर माझी त्यामागची एकूण भूमिका समजावून घेतली. रक्तपेढीतर्फे माझा वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आणि मी वेगळ्याच आनंदाने मनातल्या मनात उड्या मारून घेतल्या. रक्तदान वगैरे झाल्यावर अपेक्षित एक छोटा केक कापून वाढदिवस साजरा झाला. अशा प्रकारे वाढदिवस साजरा करण्याची ही पहिलीच वेळ. 

                           एकूण आठ नऊ वर्षात तीसच्या आसपास वेळा रक्तदान करता आले याचा आनंद वेगळाच होता. समाजाचा एक भाग म्हणून आपल्याला जे शक्य असेल ते देण्याचा हा प्रयत्न होता. ह्यातून कोणाचा जीव वाचेल इतकीच अपेक्षा होती. रक्ताची नाती नसली म्हणून काय झालं ती अशाही पद्धतीने जोडता येतात. माणूस म्हणून जगताना एवढा छोटा विचार करून आपल्या अनाहूतपणे कोणाचा जीव वाचत असेल तर हे केव्हाही चांगलेच आहे. आजवर अनेकदा ऐकलं रक्तदान हेच सर्वश्रेष्ट दान. ते सर्वश्रेष्ट आहे की नाही माहित नाही. पण दान नक्की आहे. रक्तदान करताना लिहिलेल्या अर्जातील शेवटच्या काही ओळी हेच सांगत होत्या. कोणत्याही प्रकारचा मोबदला घेऊन, आमिषाला बळी पडून होणारे रक्तदानाचे प्रकार हा केवळ स्वतःच स्वतःची केलेली फसवणूक असते. ते दान कधीच ठरत नाही. त्यामुळेच नेतेमंडळींच्या किंवा इतर कुणी जाहीर रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित केले तर मी कधीही जात नाही. अशा कार्यक्रमातून असे प्रकार सर्रास घडतात. मध्यंतरी माझ्या वाढदिवसासारख्या दिवशी एका नेत्याच्या वाढदिवसानिमित्त असाच रक्तदान शिबिराच् कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आणि जाहिरातबाजी करतानाच हा किळसवाणा प्रकार घडणार आहे हे दिसून आले. जाहिरातीतच एक बाटली रक्तदान करा आणि एक पेनड्राईव्ह भेटवस्तू घेऊन जा. हे सरळसोट महाविद्यालयीन तरूणांना आमिष दाखवले होते. मलाही ह्याचे निमंत्रण मिळाले. पण आयोजकांनी ही भूमिका समजून पण उमजली नाही. त्यांना आमिष दाखवून गेल्या वर्षीचा रक्तदानाचा विक्रम मोडीत काढण्याकरता रक्तदान शिबिराचा खटाटोप केला. त्यामुळेच मला रक्तपेढीत जाऊन रक्तदान केल्याने वेगळा आनंद झाला होता. 

                           आता पुढच्या वर्षी वाढदिवसाला काहीतरी वेगळं असं सादरीकरण असेल हे नक्की. रक्तदानापासून सुरू झालेला हा संकल्प पुढच्या वाढदिवसाला मरणोत्तर अवयवदान आणि देहदान करण्याचा आहे. तूर्तास इतकेच.
नवीन वर्षाचा नव्या संकल्पपूर्ती करता आपल्या माणसांचं पाठबळ मिळावं.



गणेशदादा शितोळे
(१६ सप्टेंबर २०१७)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा