आपण अजूनही मित्र आहोत...
आज दुपारी ऑफिस मध्ये कामाच्या गडबडीत नेहमी सारखाच गुंतलो होतो. इतक्यात फोन वाजला. खरंतर उचलायची मुळातच इच्छा नव्हती. आणि त्यात कामावर असताना अनोळखी क्रमांकावरून आलेला फोन घेणे मी टाळत होतो. पहिल्यांदा रिंग वाजून वाजून फोन कट झाला. पण मी उचलला नाही काही वेळानंतर पुन्हा फोन आला. पुन्हा तेच. शेवटची रिंग वाजेपर्यंत उचललाच नाही. तिसऱ्यांदा पुन्हा फोन आला आणि मी मग शेवटी एकदाचा उचलून कानाला लावला. जमेल तितक्या चिडक्या आवाजात हॅलो म्हणालो. खरंतर ऑफिसमधे असल्याने मी फोनवर हळू आवाजात बोलतो. पण कामाचा सगळा ताण त्या फोनवर निघला आणि मी ओरडतच बोललो. क्षणभर खूर्चीवरून उठून आजूबाजूला कोणी ऐकलं का ते पाहिलं.
माझ्या ओरडल्यानंतर पलीकडून कोणी बोललंच नाही. समोरून आवाज येत नसल्याचं पाहून माझी चीड चीड जास्तच वाढली. असं वाटलं की चार चांगल्या शब्दात समजून सांगवं. कामाच्या वेळी असा वेळकाढूपणा नको. दोन चार सेकंद झाले पण समोरून काहीही प्रतिसाद नव्हता. आजूबाजूला पाहून मी सावरून पुन्हा बोलू लागलो. पलीकडची शांतता खूपच गंभीर वाटत होती. पहिलं वाक्य कानावर पडलं.
"मी तुला फोन का केलाय तुला कळणार नाही."
त्या वाक्यासोबत मला चटकन लक्षात आलं. आठवड्यापूर्वी आपण सुरू केलेल्या सोशल नेटवर्कींग साईट्सवरील तुला कळणार नाही चा हा पहिला प्रतिसाद होता. ते वाक्या मला ह्या तुला कळणार नाहीच्या ट्रेण्डचीच आठवण करून देत होते. त्या वाक्यावरोबर जाणवलं की कोणीतरी जवळी व्यकती आहे. जवळची व्यक्ती असल्याने जाणीव वाढत चालली होती. मनातल्या मनात कोण असेल कोण असेल हा प्रश्न एकसारखा विचारून मनाला भांडावून सोडत होतो. पण मनाकडून कोणताही प्रतिसाद मिळतच नव्हता. क्षणभर ह्याच विचारात हरवलो. पण लगेच सावरलो. कामाचा ताण असल्याने नंतर बोलू म्हणून फोन ठेवणार इतक्यात पुढचं वाक्य कानावर पडलं.
" का रे, कसा आहेस आता.? मधे आजारी होता ना ? माहिती होतं मला !"
ह्या फक्त दोनतीन वाक्यातील संवादातून सगळच सांगून गेले. त्याचा आवाज ऐकून मन कधीच जुन्या आठवणींच्या मागे धावत सुटले होते. थेट पदविका अभ्यासक्रमाच्या वेळीच्या दिवसांत जाऊन थांबले होते. दीड वर्षाचा सोबतचा प्रवास. मैत्रीचा हमरस्त्यावरची साथ. अन आठवणींच्या जगात घेऊन जाणारी पायवाट. पदविका अभ्यासक्रमादरम्यान जुळलेल्या मैत्रीतील एक रेशीमगाठ होती ती. खरंतर ही रेशीमगाठ बांधून ठेवणारा ज्या दिवशी निघून गेला तेव्हाच मैत्रीची ही रेशीमगाठ पडद्याआड गेली. ज्या दिवशी अहमदनगर सोडलं त्यादिवशी जणू मी श्रीला सोडलं. मला रेल्वेस्टेशनर सोडल्यानंतर मी निघताना साठलेलं त्याच्या डोळ्यातलं पाणी त्याच्या आठवणींसारखंच तराळून आलं. अन आज ओसांडून डोळ्यातून वाहत होतं. ऑफीस मधल्यांची नजर चुकवून पटकन डोळे पुसले अन फोन घेऊन बाजूला निघून गेलो.
श्रीकांत आणि मला बांधून ठेवणारी ती फोनवर बोलत होती. सुरवातीला काही पुढे बोलणं दोघांनाही जमत न्हवतं. कारण इतक्या वर्षांनी मनात खोलवर आत काहीतरी दुखत होतं. आमची मैत्री श्रीच्या अनुपस्थितीत कधीच पूर्ण होणारी नव्हती. दोन मिनिटांनी तिने पुन्हा तो प्रसंग सांगितला. मैत्रीची काळरात्र ठरणारा. माणसाच्या आयुष्यात अपघाताने माणसं येतात.तशीच अपघात माणसाच्या आयुष्यातून माणसंही घेऊन जातो. तो अपघातही असंच काहीसं करून गेला होता. श्रीकांतच्या साथीच्या आठवणी जागवून आमचं चालू होत फक्त श्वासांच संभाषण. मनातल्या मनात हुंदका देत. मन गहीवरून गेलं होतं.
ऑफिसमधे असल्याने कामाची आठवण होती. फोन तसाच अर्धावर ठेवून मी वॉशरूमला गेलो. पापण्यांमधील पाणी गालांवर ओघळण्याआधी मी तोंडावर पाणी मारून चेहरा धुवून घेतला. कदाचित वाटत होतं दोन्ही पाणी एकमेकांत विरघळून जातील. जुनी प्रत्येक आठवण जागी झाली होती अन हजारो प्रश्नांना ओठांवर घेऊन येत होती. मैत्रीच्या कितीतरी क्षणांची गोळा बेरीज करायची राहिली होती.
हजार प्रश्नांना बाजूला सारून पुन्हा फोन केला. अगदी काहीच वाटलं नसल्यासारखं बोललो. तिच्या प्रश्नावरचं फक्त "बरा आहे म्हणत उत्तर दिलं. फोन ठेवण्याअगोदर एक महत्वाचं वाक्य ती बोलली. "आपण अजूनही मित्र आहोत." त्यानंतर फोन ठेवला गेला. अनंत आठवणींना वळसा घालून पुन्हा कधी न भेटण्याकरताच. पुन्हा कधी भेट होईल की नाही याची खात्री नव्हतीच. सोशल नेटवर्किंग साईटसचा उपयोग काय असतो याची जाणीव तेव्हा झाली.
आजवरच्या प्रवासात अनेक माणसं जोडली गेली. पण कोणत्याही व्यक्तीला श्रीकांतची जागा घेता आली नाही आणि ती येणारीही नाही. ती तशीच त्याच्यासारखीच स्पेशल आरक्षित आहे. सर्वात जवळची व्यक्ती कोण असा प्रश्न पडला की कोणत्या एका मित्राचे नाव येत नाही. त्याचं कारण आणि उत्तर माझं मलाच मिळालं होतं. तुला कळणार नाहीच्या माध्यामातून मनातलं हे कोडं सुटलं याचा आनंद आहे. बाकी अजून बरीच नाती रिफ्रेश करायचीत. तूर्तास इतकंच.
गणेशदादा शितोळे
(८ सप्टेंबर २०१७)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा