माझंघर :- भोईटे रेसिडेन्सी
महाविद्यालयामध्ये गेलेला प्रत्येकजणच म्हणत असतो की, महाविद्यालयामधलं जीवन खूप सुंदर असतं. महाविद्यालयाचे ते दिवस, महाविद्यालयाच्या त्या आठवणी, सारं काही खूपच रम्य असते. महाविद्यालयामध्ये असणारे वातावरणच भन्नाट असते. तिथे मित्रांसोबत केलेला कल्ला असतो, सर्वांनी मिळून केलेला "बंक' असतो, मित्रांसाठी अन मित्रांच्या प्रेमप्रकरणाकरता केलेला नको तो उद्योग असतो. हे सारं काही कुठं तरी आपल्या मनाच्या कोपऱ्यात साठवलेलं असतं. पण महाविद्यालयामधील धमाल मस्तीचा एक अविभाज्य भाग असतो ते म्हणजे वसतिगृह. जो शाळा महाविद्यालयात गेला अन त्याच्या या जागेशी आठवणी नाहीत असं होणार नाही. आणि नसतील तर तो काय आयुष्य जगला यावरच प्रश्नचिन्ह आहे. ज्याने वसतिगृहातील वात्सव्य अन जीवन अनुभवलेलं नाही तो काय महाविद्यालयीन जीवन जगला मगं. थोडक्यात त्याशिवाय महाविद्यालयीन जीवनाला अर्थ नाही.
घर म्हणजे असतं आपलेपण,
घर म्हणजे असतं माया,
घर म्हणजे असतं जीवाला लावणारी ओढ
घर म्हणजे अशी जागा जिला नसते कशाचीच तोड.
असंच काहीसं अनेकांच घर म्हणजे वसतिगृह. माझ्या आजवरच्या महाविद्यालयीन शिक्षणात दोन्ही वेळेस वसतिगृहात रहाण्याचा योग आला. पदविका अभ्यासक्रमात घरापासून महाविद्यालय दूर होतं म्हणून तर पदवीला जवळ होतं म्हणूनही वसतिगृहात राहिलो. म्हणजे एकून काय तर महाविद्यालयाचं अंतर हे कारण ठरवण्यास अर्थ नाही. तर असंच माझ्या पदवीच्या शिक्षणादरम्यानच्या प्रवासातील अविभाज्य ठरणारं वसतिगृह होतं, भोईटे रेसिडेन्सी. मी त्याला वसतिगृह म्हणणार नाही तर ते माझं दुसरं घरंच होतं. माझंघर होतं ते आमच्या सगळ्यांकरताच. शिक्षणाकरता बाहेरगावाहून आलेल्या प्रत्येकाकरता ते घरासारखंच होतं. या घराने घरातली प्रेम देणारी माणसं दिली. असंख्य अशा आठवणींचा साठा दिला की ज्या ओंजळीत मावायच्या नाहीत. ह्याच माझघरांबद्दल आपुलकीचे दोन शब्द लिहावेत म्हणून खूप दिवसापासून मनात होतं. आज थोडा मोकळा वेळ आहे तर घेतले आठवणीतल्या शब्दांच्या मोरपिसांना शोधायला. जे सापडेल ते शब्दात उतरेल.
नुकतेच माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या माझघरांची बिकट अवस्था पाहिली अन कसंतरींच झालं. सगळीकडे कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं होतं. आमच्या मैदानाची दैना पाहून तर मन सुन्न झालं. छतावर पाणी साठून शेवाळ आलेले. कठड्यांना भेगा पडलेल्या. माझंघरांची अवस्था पाहून वाटत होतं की आम्ही निरोप घेतल्यापासून त्याच्यातला जीवच निघून गेला. आजही आठवतं पदवीच्या दुसऱ्या वर्षानंतर जेव्हा पहिल्यांदा भोईटे रेसिडेन्सीला आलो तेव्हा आपला लवाजमा घेऊन आलो होतो. शोकेसचं कपाट. गादी, खेळायला कॅरम, पत्ते अन गाणी ऐकायला एक ध्वनीषेपक. मधल्या खोलीत जागा नसल्याने मग शेजारच्या खोलीत सामान ठेवलं आणि ती जागा हक्काची होऊन गेली. रोहीत आहिरराव च्या सोबतीने प्रवास सुरू झाला होता. नंतर प्रताप गवळी अन अक्षय खैरे, अक्षय कदम असे एकेक मित्र भेटत गेले. जस जसा मी ह्या माझंघरात रमत गेलो तसतसा माझंघराचा परिवार वाढतंच गेला.
रोहीत आहिररावपासून झालेली ही सुरवात अक्षय खैरे, प्रताप गवळी, अक्षय कदम, प्रशांत चांदगुडे, विकास तावरे, दादासाहेब करपे, बाळासाहेब सुरसे, मनोहर रोहकले, अक्षय लगे, अमोल लगे, विकास सांगळे, लक्ष्मण सानप, प्रशांत खिलारी, विलास पुंड, अविनाश निंभोरे, अशोक चांडे, अविनाश कुसमुडे, महेश थोरात, सोमनाथ जाधव, प्रवीण कुसमुडे, प्रवीण जामदार, कैलास कोरडे, संदीप सोनटक्के, युवराज कुद्री, निलेश म्हात्रे, मयुर दळवी, संदीप धायगुडे, देवेश सरोज, अतुल लवटे, अजय पवळ, योगेश कारंडे अशा अनेक मित्रांपर्यंत सुरूच आहे. इथे भेटलेला प्रत्येकजण माझ्या वर्गातलाच होता असाही भाग नव्हता की खोलीमित्रही नव्हता. पण त्या प्रत्येकाशी माझं एक वेगळंच नातं होतं. इथल्या प्रत्येकाकरताच मी कोणीतरी होतो. सुरवातीला असणारा खोलीमालकांचा भाचा हे नातं जावून मैत्रीचं नातं चिकटलं तशी आमची ओळख सलगीत बदलली.
माझ्यातला दादा ते भाऊ हा प्रवास खऱ्या अर्थाने झाला तो याच मित्रांमुळे. महाविद्यालयाच्या दिवसांत प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना घडत असतात. खरा जडणघडणीचा काळ तो हाच. महाविद्यालयामधला. याच महाविद्यालयच्या कट्ट्यापासून, वसतिगृहापासून स्वत:ला स्वत:ची नवी ओळख होते. मलाही माझी एक वेगळी ओळख मिळाली ती इथेच. माझ्या नावामागे खरं तर दादा हे बिरूद, महाविद्यालयात ते जपलं गेलं. पण माझंघरात मला कायम मोठ्या भावाची वागणूक मिळाली. आणि महाविद्यालयात गणेशदादा अन भोईटे रेसिडेन्सीकरता मी गणूभाऊ झालो. त्यामुळे मला या महाविद्यालयीन काळात झालेले संस्कार म्हणा किंवा आठवणी म्हणा आयुष्यभराची शिदोरी देणाऱ्या वाटतात. असं म्हणतात माणूस चांगला किंवा वाईट होणं हे त्याच्या संगतीवर अवलंबून असतं. पण मला या माझघरात जी जी माणसं भेटली ती चांगलीच भेटली असं मी मानतो. कारण त्यांच्या वाईट असं नव्हतं हे मी म्हणणार नाही. पण मी त्यांच्यातील चांगलं घेऊ शकलो नाही हा माझा दोष असावा असे मी मानतो. या माझंघरात भेटलेले मित्रच माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरले. कारण आज मी जो आहे ते त्यांच्या बळावर.
आजही आठवतंय माझंघरासमोरच्या पटांगणात रोज आमचा क्रिकेटचा डाव रंगायचा. एकवेळ महाविद्यालयात एखादा तास बुडेल पण आमचं क्रिकेट खेळणं थांबेल असं कधीही झालं नाही. इतकं की परीक्षेच्या काळात सुद्धा एखादा तरी सामना खेळला तरच पास होऊ असं काही असल्यासारखं खेळण्याच वेड होतं. क्रिकेट खेळतानाचे माझंघराचे नियमही भलतेच होते. सुरवातीला कंपाउंडच्या पलिकडे उंचावरून मारलं की बाद असा नियम असल्याने षटकार नावाचा प्रकारच गायब होता. फक्त उजव्या बाजूला चेंडू गेला तरच धावा. नंतर रस्त्याच्या बाजूने धावपट्टी केली अन नियमही बदलले. नंतर समोरच्य़ा भिंतीला बाद ठेवण्यास सुरवात झाली तर उजव्या बाजूला चेंडू मारायच्या सवयीने शेजारच्या विहीरीने अनेक चेंडू गिळले. काही शेजाऱ्यांनीही चोरले तो भाग वेगळा. धावबादचा निर्णय म्हणजे माझं कौशल्य़ असल्यासारखं अंतिम निर्णय माझाच होता. कधी कधी दादा भाऊ असल्याचा फायदाही झाला तो असा.
अशोक भाऊ चांडे घडले ते याच मैदानात. निलेश साळुंखेसारखा फलंदाज कितीही चिडला तरी सांभाळून ठेवला तो याच मैदानाने. युवराज कुद्रीचं अष्टपैलुत्व निखारलं तेही याच मैदानात. मनोहर रोहकले आणि मी वेगाने फेकायलाही याच मैदानात शिकलो. अक्षय लगे भोईटेचा युवराज सिंग घडला तेही श्रेय याच मैदानाचे. आशुतोष लांडे यष्टीसमोर उभे राहून खेळायला याच मैदानामुळे शिकला. दादासाहेब करपे यांना पंचगिरी करत मार खावा लागला तोही याच मैदानात. विलास पुंड ह्यांनी छोटंसच कर्तुत्व गाजवलं तेही इथेच. अविनाश निंभोरे उर्फ गुल्लुदादा, अविनाश कुसमुडे उर्फ छोट्या, अक्षय खैरे, विकास सांगळे उर्फ काका, प्रशांत चांदगुडे उर्फ आण्णा हे घडले ते या मैदानातच. ह्या मैदानाचं वैशिष्टच असं होतं की मैदानावर ज्याने पाऊल ठेवलं त्याला त्याने खेळायला भाग पाडलं. अगदी अतुल लवटे उर्फ मास्तरांपासून ते संदीप धायगुडे उर्फ बारक्या पर्यंत सगळ्यांना. बाळासाहेब सुरसे यांना अध्यक्षपद संभाळताना त्रास झाला पण त्यामुळे ते राहून गेले नाहीत.
क्रिकेट खेळतानाच्या एकेक आठवणींकडं मागे वळून पाहिलं की सगळं काही तराळून येतं. निलेश साळुंखे आणि युवराज कुद्री यांची जुगलबंदी रोज अनुभवताना सगळ्यांना येणारी मजा अवर्णनणीय आहे. खुनशी खेळ करता करता ताबा सुटून झालेले अनेक पराभव पाहिले, अनुभवले. अशोक भाऊंची अन प्रवीण जामदार यांनी दोन्ही बाजू मध्यस्थींप्रमाणे सांभाळल्याने अनेक वादविवाद मिटले. सामानाधिकारी म्हणून आमची भूमिका कायम राहिल्यानेही त्याला हातभार लाभला.
क्रिकेट इतकाच माझंघरात दुसरा खेळ रंगला तो कॅरमचा. मी माझंघराच पाऊल टाकलं तेच कॅरम घेऊन. सुरवातीला मी, प्रताप गवळी, अन दोन्ही अक्षय असा डाव रंगायचा. नंतर रोहीत शिकल्यानंतर एक अक्षय कमी झाला अन त्याची जागा रोहीतने घेतली. कॅरम खरा रंगला तो प्रशांत चांदगुडे (आण्णा) माझंघरांचा भाग झाल्यापासूनच. प्रशांत, विकास, मी आणि रोहीत ही चौकडी आणि कॅरम. रात्री झोप येईपर्यंत डाव सुरू असायचा. नंतर विकास गेल्यानंतरही मी आणि प्रशांत दोघे रात्री दोन वाजेपर्यंत खेळायचो. नंतर संपूर्ण माझंघरंच कॅरमवर तुटून पडायचं. कॅरमच्या रेषांचे रंग निघून गेले पण खेळ सुरूच राहिला. कधीकधी तर गुप्तहेर खात्याला शोध घ्यायला लागायचा कॅरम कोणत्या खोलीत आहे. कॅरम ही माझघरांचाच एक भाग होऊन गेला होता.
दरम्यानच्या काळात सगळ्यांचाच अधिक गुण मिळवण्याकरता प्रयत्न सुरू झाले आणि कॅरमला रामराम ठोकला. दिवसा क्रिकेट आणि रात्री पत्ते हा अजून एक खेळ आमच्या दररोजच्या वेळापत्रकाचा भाग झाला होता. अभ्यासाकरता वाचनालयात जायला दूर पडायचं म्हणून अनेक मित्रांनी माझंघरही सोडलं होतं. पण नव्या ठिकाणी क्रिकेटची जागा पत्त्यांनी घेतली होती. सकाळी गणिताचा ज्यादा तास झाला की दिवसभर आम्ही मोकळे. नितीन जाधव, अक्षय खैरे, गणेश पाटील, दादासाहेब करपे, प्रशांत चांदगुडे असा चार पाच जणांचा समुह रोज दहा अकरा वाजले की खेळायला तयार. तिथे कोणाताही पैशाचा व्यवहार नव्हता. दिवसभराच्या खेळानंतर हरणाराने फक्त कपभर चहा प्यायला देणे एवढंच नाममात्र. नाहीतरी तेवढा नियमित खर्च होताच. रोजच्या खेळात हरल्यावर उद्यापासून सगळं बंद म्हणत नितीन पत्ते फाडून एका खोक्यात भरायचा. पण सकाळी पुन्हा नवीन डाव. असे पत्ते फाडत फाडत खोकं भरून गेलं पण डाव चालूच राहिला. अगदी गणित विषयात प्रविण्य मिळेपर्यंत पत्ते खेळण्यातही प्राविण्य मिळाले असंच झाले.
शेवटच्या वर्षी भोईटेपासून दूर गेलेली सगळी मंडळी जशी माझंघरात परतली तसा मीही आलो. महाविद्यालयीन काळाचा सर्वात आनंद देणारा कालवधी म्हणजे शेवटचं वर्ष होतं. महाविद्यालयातील अनेक गोष्टींची सुत्र माझंघरातून हलवली जात होती. भांडण तंट्यापासून ते मुली पटवण्यापर्यंत सगळी. विलास पुंड आणि अविनाश निभोरे ह्यांची प्रकरण मिटवताना गावतल्या अनेकांशी वाईट घेतलं. अगदी शालेय मित्र वैभव पाचपुते ते मावस भाऊ शशिकांत पाचपुते पर्यंत. नंतर प्रकरणाचा काहीच फायदा नसल्याने पश्चाताप झाला तो वेगळाच.
भोईटेवरून दौण्डच्या मित्रांना सतावल्याचाही किस्सा मोठा रंजक होता. अशाच एका संध्याकाळी महाविद्यालयातील जिएस ग्रुप दौण्डच्या फ्लॅटवर जमला होता. फक्त मीच त्यात नव्हतो. जरा खेचावी म्हणून आणि तसंही मोबाईलचा बॅलंस संपवायचाच होता म्हणून दादासाहेब कर्पेला श्रीकांत नागवडेला फोन करायला लावला. नंतर तासभर श्रीकांत, जयदीप, स्वप्निल, रोहीत, प्रवीण अशी एकेकाची दादासाहेब कर्पेने खेचली की आम्ही शेजारील मंडळी हसू हसू जाम झालो होतो. आज जर ती रेकॉर्डिंग ऐकली तरी पोट धरून हसू येतं. जयदीपची दाददाने सांगितलेली जागा मजेशीर होती. मेरगळवरची धर कोंबडी पिरगळ ही चारोळी पण बरीच साधली होती. प्रवीण गाडे आणि दादा ह्यांच्यातील पप्पा बोलतोय तो संवादही चांगलाच साधला होता.
माझघरांचा परीक्षेचा काळ काहीसा वेगळाच असायचा. उल्लेख करण्याजोगं बरंच काही आहे. तिसऱ्या वर्षाचा परीक्षेचा काळ होता. पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा संपल्याने गर्दी तशी तुरळकंच होती. अक्षय लगे आणि मनोहर दिवसरात्र अभ्यासिकेत असल्याने माझंघरात मी आणि दादासाहेब कर्पे एकटे असल्यासारखेच होतो. बाकी मंडळी एकीकडे आणि आम्ही दोघं एकीकडे. आम्ही दोघे मिळून माझंघरातच अभ्यास करायचो. त्यावेळी नुकताच जॉन अब्राहमचा शुटआऊट अॅट वडाळा आणि श्रद्धा कपूरचा आशिकी २ झळकला होता. आशिकीची गाणी एवढी सुपरहीट झाली होती की अभ्यासासोबत त्याचंही पारायण व्हायचं. माझंघरात त्या रात्री बाकी मंडळींनी शुटआऊट अॅट वडाळा आणि आशिकी २ पाहिल्याची कुणकुण आम्हाला कुठून तरी लागली होती. सकाळी मी पेनड्राईव्ह घेऊन दोन्ही चित्रपट प्रतिलीपीत करून घ्यायला गेलो. पण ज्याच्या लॅपटॉप मधे होते त्याने कृष्णा ने ते आम्हाला दिले नाहीत. त्यामुळे मी खूप संतापलो. मला नाही ऐकून घ्यायची सवयच नव्हती. संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. चिडून मी आणि दादा ने ऐन परीक्षेत त्या मंडळींना त्रास देण्याकरता वीज गायब केली. वीजेची एक जोडतार घेऊन आम्ही त्या रात्री राहुल मेरगळच्या घरी जत्रेचं जेवायला जायचं असल्याने निघून गेलो. त्यानंतर मामांना फोनाफोनी झाली. पण उपायच आम्हाला माहित असल्याने त्यांना न येण्याचा सल्ला दिला. आम्ही येईपर्यंत सगळी मंडळी अंधारात बसून होती.
राहुल मेरगळच्या घरी यथेच्छ जेवल्यानंतर एक स्प्राईट घेऊन येताना दौण्डमधील मित्रांकडून दोन्ही चित्रपट प्रतिलीपीत करून आणले. आम्ही माझंघरात परतताना आमच्या हातात स्प्राईटची बाटली पाहून अनेकांनी आज हे दारू पिऊन आलेत असा अंदाज बांधत आमच्यापासून दूर रहाण्याचा प्रयत्न केला. आल्यानंतर वीज सुरळीत करून बाहेरच्या मोकळ्या मैदानात गादी टाकून आमचं चित्रपटगृह सुरू झालं. एकदम दणदणाटात आम्ही चित्रपट पहात होता. काही वेळीने छतावर झोपलेल्यांनी काहीतरी फेकून मारल्याचे जाणवल्यावर मग यथेच्छ शिवीगाळ हासडूनही झाली. निखील नवले आणि त्याला साथ द्यायला प्रतिक रोहकले विरूद्ध मी आणि दादा. बराच वेळ ही लढाई चालू होती. मध्यरात्री पर्यंत दणदणाट सुरूच होता. आशिकी २ ची गाणी मनमुराद ऐकली जात होती. सोबत नवीन ग्रुपही तयार झाला होता. नाव होतं सी जी. त्याचा अर्थ जरा अश्लिल होता. पण तो समोरच्याने घेईल कसा बदलणारा होता.
एकंदरीत माझंघरात त्यानंतर महीनाभर जोपण अभ्यास झाला तो शुटआऊट अॅट वडाळा आणि आशिकी २ चित्रपटांच्या रोजच्या पारायणानेच. दिवसरात्र दोन चित्रपट लॅपटॉपवर झळकत असतं. अनेकांना त्याचा त्रास झाला. पण आम्ही त्याच्या साथीनेच अभ्यास केला. नंतर नंतर माझंघरावरील इतर मंडळींना अभ्यासिका हाच एकमेव पर्याय ठेवला होता. एका प्रकरणाचा राग दुसऱ्या ठीकाणी अन तेही महिनाभर तसाच धुमसत होता.
माझंघरात अभ्यास करताना असे वादाचे प्रसंग घडण्यासह आनंदाचे प्रसंगही घडले. तिसऱ्या वर्षात अनेकदा पेपर फुटीच्या अफवा पसरत होत्या रात्रीच माझंघरात अशी अफवा पसरायची आणि रात्रभर त्याच प्रश्नोत्तरांचा एकत्रित अभ्यास सुरू व्हायचा. माझंघराने अभ्यासातही अनेक आनंदाचे क्षण दिले. माझ्यामुळे माझंघरातील मित्रांना अगोदरच सबमिशन मिळायचं त्यामुळे आदल्या रात्री पूर्ण करा असा प्रकार कधी करायला लागला नाही. माझंघरात अनेकांना विविध विषयांकरता मार्गदर्शन केले. श्रीकांत इंगवले ने कटीया करता रात्री जागवल्या. ह्या सगळ्यापेक्षाही माझंघरात शेवटच्या वर्षीचं वातावरण काहीसं वेगळंच होतं. सगळे मिळून मिसळून अभ्यास करत होते. कधी अभ्यासिकाची जागाही माझंघराने घेतली.
भोईटे म्हणजे माझंघरावरून सगळ्यात महत्वाची म्हणजे अंतरंग ह्या स्नेहसंमेलानाची सगळी सुत्र हलली होती. गणेशखिंडचा एनएसएस कॅम्पपासून खरी तर ह्याला सुरवात झाली होती. मंगेश मोरेचा विद्यार्थी प्रतिनिधी करता फॉर्म भरायला जाताना गर्दीतली दर्दी माझंघरातील पण होती. नंतर विद्यार्थी प्रतिनिधी होईपर्यंत झालेल्या राजकारणात तितक्याच तोडीची सुत्र हलवली गेली तीही माझंघरातूनच. महाविद्यालयातील प्रशासनाला आव्हान उभं करण्यामागं माझंघर होतं हे लक्षात यायला अनेकांना वर्ष गेलं. स्नेहसंमेलनाचे पंधरा दिवस माझंघराने अनेकांना सामावून घेतलं. स्नेहसंमेलानाच्या सजावटीची अंतरंगची सुरवात जशी माझंघरातून झाली होती तसा शेवटीही तिथेच झाला.
माझंघर अनेक प्रेमप्रकरणांचं साक्षीदार आहे. कोणाचं एकतर्फी तर कोणाचं नुसतंच मनातलं आकर्षण. माझंघराने असे अनेक प्रेमवीर पाहिले. विलास पुंडची प्रकरण निस्तरताना अनेकांशी वाईटपणाही घ्यायला लागला. सर्वोतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केला. पण महाविद्यालयीन शिक्षण संपलं आणि त्या दोघांच्यातली ओढही अन प्रेमही. आता उगाच नसत्या उठाठेवी केल्याचा पस्तावा येतो. निलेश साळुंखे ह्यांच प्रेम फक्त वास घेण्यातच गेलं. त्यापेक्षाही उल्लेख करावा असे प्रेमवीर म्हणजे मनोहर रोहकले. त्याच्याल पुनवेचा चंद्र कायम मनातच उगवत राहिला. तावातावाने भांडणारा मनोहर एकतर्फी प्रेम करत करत झुलत राहिला. वर्षे गेली. शिक्षण संपले. पण एकदा तिला मनातल्या भावना बोलून दाखवता आल्या नाहीत. सोमनाथ जाधव ह्यांची प्रेमाची गोष्ट मनातच राहीली.
प्रवीण जामदार आणि दादा कर्पे ह्यांच महाविद्यालयीन आयुष्य न्याहाळन्यातच गेलं. दादासाहेबांच्या अभिलाषा पूर्ण झाल्या नाहीत अन आशाही. अविनाश निंबोरे ह्यांच्या प्रेमापेक्षा भलत्याच गप्पा व्हायच्या. अक्षय खैरेंनी जपून ठेवलेला प्रेमाची भेट असणारा रूमाल वहात्या पाण्यात सोडून गोष्टीचा शेवट केला. तुम भी तनहा थे हम भी तनही थे पलिकडे आमचं काही नव्हतंच पण अफवांचं पीक जोरात रंगलं माझघरात. बाळासाहेब सुरसे ह्यांची राणी अधूरी एक कहाणीच होऊन बसली. निलेश म्हात्रे ह्यांची प्रेमाची गोष्ट लग्नाची गोष्ट झाली. विकास सांगळे काका फक्त झुरत राहीला. पण प्रेमाचा बंगला बांधण्याची संधी नाहीच साधता आली. रोहीत आहिरराव ह्यांच प्रेमात शेजारधर्म आल्याने काहीच झालं नाही.
महाविद्यालयीन काळात एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावर तुम्ही हसू फुलवू शकलात तर तेच तुम्हाला येणाऱ्या काळात समाधान देणारं ठरेल. आयुष्यात आपण कितीही मोठे झालो. नाव कमावलं. पैसा कमावला. तरी देखील महाविद्यालय जीवनामधून मिळालेला आनंद, समाधान हा नेहमीच या सगळ्या गोष्टींपेक्षा मोठा असतो. हे सर्व जण खुल्या दिलानं मान्य करतील. माझ्या महाविद्यालयीन काळात मला आनंद, समाधान देणारं ठिकाण जसं महाविद्यालय होतं तसंच माझं हे माझंघरंही होतंच. आयुष्यातल्या सर्व बऱ्या अन वाईट गोष्टींचं साक्षीदार आहे माझंघर. इथेच मनमुराद क्रिकेट खेळलो. भांडणेही केली अन मिटवलीही. अनेकांशी वाद घातले आणि नवीन वाद निर्माण पण केले. भोईटे रेसिडेन्सी परिवारापासून सुरवातीला सी जी ग्रुप नंतर गणेशदादा शितोळे मित्रमंडळ हा प्रवास माझंघराच्या आठवणींप्रमाणेच बदलत राहिला.
माझंघरात हळू हळू दिवस जात गेले. अभियांत्रिकी झेपायला लागलं अन पास व्हायची कला आम्हाला अवगत झाली. हो हो नाही नाही म्हणता म्हणता आम्ही सगळे झालो. खूप यातना झाल्या. बाकी विद्यापीठा सारखं भरभरून गुणही आले. माझंघरातील या काही वर्षांनी खुप काही दिलं. सगळ्यात महत्वाच म्हणजे चांगले मित्र, आणि कुठल्याही परिस्थितीत लढायची ताकत दिली. कुठलीही गोष्ट आम्हाला आयती मिळाली नाही. इथे प्रत्येक गोष्ट आम्ही कमावलेली आहे आणि त्याचाच आम्हाला अभिमान आहे.
आज आयुष्याच्या एका वळणावरून माझंघराकडं डोकवून पाहिलं आणि हिशोब केली की माझंघरानं काय काय दिलं तर ओंजळीत मावणार नाही. माझंघराशी अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. त्यामुळेच वाढदिवसादिवशी माझंघराची अवस्था पाहून कसंनुसं झालं होतं. कदाचित आमच्या सारख्या वेदना त्यालाही होत असाव्यात. इथं राहिलेला प्रत्येकजण या माझघरांपासून काही ना काही घेऊनच गेला. रित्या हाताने कधी त्याने पाठवलंच नाही. आज हे लिहीतानाही माझंघराने गालावर ओघळणाऱ्या आसवांसह ओंजळीत मावणार नाहीत इतक्या आठवणी दिल्या. आयुष्याच्या प्रवासात आम्ही सगळे पुढे निघून गेलो आहोत पण माझंघर आजही तिथेच आहे. आमची वाट पहात गेट टु गेदर साठी सगळे पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या उत्साहात टुण्णकन उडी मारून तयार होत येऊ जीवन आणि मैत्री दोन्हीचा अनुभव घ्यायला...! माझंघराच्या आठवणी, गमती-जमती, भोईटे रेसिडेन्सीमध्ये केलेला वात्रटपणा, बावळटपणा आठवणीत साठवायला....!
 |
(भोईटे रेसिडेन्सिचा निरोप घेताना डावीकडून अशोक चांडे, मनोहर रोहकले, अमोल जाधव) |
 |
| (रॉयल वरून घेतलेला फोटो) |
 |
| (संयमी खेळाडू आशितोष लांडे) |
 |
| पदवीदान समारंभात युवराज कुद्री) |
 |
(पदवीदान समारंभात सोमनाथ जाधव)
|
 |
| (अभ्यासिकेत गाणी ऐकत अभ्यास करताना मी) |
 |
(परीक्षा संपल्यावरचा आनंद. डावीकडून युवराज कुद्री, सोमनाथ जाधव, गणेश शितोळे रोहीत आहिरराव) |
 |
(परीक्षा संपल्यावरचा आनंद. डावीकडून युवराज कुद्री, सोमनाथ जाधव, गणेश शितोळे रोहीत आहिरराव) |
 |
(परीक्षा संपल्यावरचा आनंद. डावीकडून युवराज कुद्री, सोमनाथ जाधव, गणेश शितोळे रोहीत आहिरराव) |
 |
(एन एफ एस खेळताना डावीकडून गणेश शितोळे,रोहीत आहिरराव) |
 |
(रात्री चहाचा आस्वाद घेताना डावीकडून रोहीत आहिरराव,
युवराज कुद्री, संदीप सोनटक्के, मयुर दळवी, दत्ता पावणे) |
 |
(हे भोईटे रेसिडेन्सीचे फकीरचंद फाके
उर्फ निलेश साळुंखे) |
 |
| (सूर्य मावळताना भोईटे रेसिडेन्सीवरून) |
 |
(भेळीवर ताव मारताना डावीकडून मनोहर रोहकले उर्फ लाळगे, फकीरचंद फाके उर्फ निलेश साळुंखे आणि इतर) |
 |
| (मयुर दळवीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना) |
 |
(युवराज कुद्री चा वाढदिवस डावीकडून गौरव गलांडे, रोहीत आहिरराव, दत्ता पावणे, युवराज कुद्री, अविनाश बिरारीस, मयुर दळवी, शुभम जाधव, आणि सोमनाथ जाधव) |
 |
(युवराज कुद्री चा वाढदिवस
मी आणि युवराज) |
 |
| (माझा आणि निलेशच्या वाढदिवसाचा केक) |
 |
| (वाढदिवसाचा केक कापताना मी आणि निलेश ) |
 |
| (वाढदिवसाचा केक भरवताना मी आणि निलेश ) |
 |
(माझा आणि निलेशचा वाढदिवस :- डावीकडून विलास पुंड निलेश साळुंखे, गणेश शितोळे, अशोक चांडे
आणि अशोक भाऊंचे मित्र ) |
 |
(मला आणि निलेश ला केक भरवताना संदीप धायगुडे उर्फ भोईटेवरील बारीकराव) |
 |
(मला आणि निलेश ला केक भरवताना विलास पुंड आणि अशोक चांडे) |
 |
| (अशोक भाऊंना केक भरवताना मी) |
 |
(रोहीतला केक भरवताना मी)
|
 |
(माझा आणि निलेशचा वाढदिवस साजरा करताना,
डावीकडून रोहीत आहिरराव, विलास पुंड, प्रवीण जामदार संदीप धायगुडे, निलेश साळुंखे, मी, अशोक चांडे आणि अशोक भाऊंचे मित्र) |
 |
(मला आणि निलेश ला केक भरवताना प्रवीण जामदार आणि दादासाहेब करपे) |
 |
| (प्रवीणला केक भरवताना मी) |
 |
| (मला केक भरवताना अशोक भाऊ) |
 |
| (मला केक भरवताना रोहीत) |
 |
(अशोक चव्हाण ह्यांच्या चहाच्या टपरीवर घेतलेला सेल्फी डावीकडून विलास पुंड, रोहीत आहिरराव, प्रवीण जामदार, निलेश साळुंखे, अशोक चांडे, अशोक भाऊंचे मित्र, गणेश शितोळे, संदीप धायगुडे आणि दादासाहेब कर्पे) |
 |
(अशोक चव्हाण ह्यांच्या चहाच्या टपरीवर घेतलेला सेल्फी डावीकडून विलास पुंड, रोहीत आहिरराव, प्रवीण जामदार, निलेश साळुंखे, अशोक चांडे, अशोक भाऊंचे मित्र, गणेश शितोळे, संदीप धायगुडे आणि दादासाहेब कर्पे) |
गणेशदादा शितोळे
(०९ सप्टेंबर २०१७)