मैत्रीची अणूसंज्ञा....
FRIENDSHIP IS ANALOGUES WITH ATOM...
मैत्री फ्रेन्डशीप नुसतं नाव घेतलं तरी मनाला आधार देणारं कुणीतरी आहे असंच वाटतं. ही मैत्री ही फ्रेन्डशीप आयुष्यभर टिकून रहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. कारण हे असं नातं आहे की जे रक्ताच्या नात्याहून अधिक प्रिय असते. हवेहवेसे वाटणारे भासते.
खरंतर या नात्याला मैत्री म्हणतात याची ओळख होती ती आपल्या शाळेत. त्याअगोदरही आपले अनेक मित्र असतातच पण तरीही मित्र म्हणजे नेमकं काय..? मैत्री म्हणजे काय..? हे शाळेत गेल्यावरच कळतं. शाळेत गेल्यावर म्हणजे शाळेत शिकवतात असं नाही. पण शाळेत पहिल्यांदा आपली नवीन मित्रांशी भेट होती. काही दिवसांनी ओळख, मग काही दिवसांनी सहवास वाढला की त्या सहवासातून मैत्री या नव्या नात्याचा अनुभव येतो.
पुढे हळूहळू शाळेतून हायस्कूल, मग काॅलेज, मग पुढेचे शिक्षण घेत बदलत जाणारी काॅलेजस असा हळूहळू हा प्रवास वाढत जातो. या प्रवासासोबतच आपल्याला येणारा मैत्रीचा अनुभव वाढत जातो अन आयुष्यात मित्रमैत्रीणी असा एक वेगळा परिवारच जोडला जातो. शाळा ते काॅलेज ते पुढे आपलं करीअर करताना आयुष्यात अनेक माणसं भेटतात. त्यातलीच काहींशी आपली मैत्री होते. अन त्यातूनच ही हक्काची माणसं असणारा मित्र परिवार जमतो.
एकंदरीत या वरील लिखाणातून मैत्रीच्या नात्याबद्दल काय कळतं..?
आजच्या विज्ञानावादी युगात कधी विचार केला आहे का की आपली मैत्री अन विज्ञान याचा काही संबंध असेल का...?
नाही केला कधी विचार. कसला विचार करताय, तुमच्या डोक्यातही असं यायचं नाही. पण हे खरं आहे. मैत्रीचीही एक वेगळीच अणूसंज्ञा असते. तुम्ही म्हणाल काही सांगतो पण हो मैत्रीच्या नात्याची संरचना एका अणू सारखी असते. आपण स्वतः या नात्यातला न्यूट्रॉन असतो. आपले मित्रमैत्रीणींबाबतीत असणारे विचार म्हणजे प्रोटॉन असतात. मग इलेक्ट्रॉन कोण...?
तर आपल्या ह्या मित्रमैत्रीणी, हा परिवार म्हणजे इलेक्ट्रॉन. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या अणूला क्रियाशील करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारं वॅलेन्स इलेक्ट्रॉन असतं आपलं मन. कधी अन कुठेही धाव घेणारं. प्रत्येक वेळी आपल्याला पुर्णतः यावी म्हणून नवीन काही शोधणारं.
आपली लहानपण ते मोठेपणापर्यंत नवीन मित्र जोडण्याचे काही टप्पे आहेत. पहिला म्हणजे आपण उभा राहून खेळायला सुरुवात केली तेव्हा आपल्या सोबत खेळणारे आपले पहिले मित्र. आपल्या भाषेत लंगोटी यार. पुढे आपली शाळा, काॅलेज, क्लासेस, कंपनी अशा विविध ठिकाणी आपल्याला नवीन मित्र परिवार जोडला जातो. प्रत्येक वेळी आपण म्हणतो अमुक माझा मित्र तमुक माझा मित्र. असे करत करत ही यादी वाढत जाते. माझी आई कायम म्हणते काय लावलंय सारखं अमक्या मित्राकडं जायचंय, तमक्या मित्राला भेटायचंय...पायलीचे पन्नास मित्र आहेत तुला..
कोणी चार दो चांगले मित्र असावेत बाकी कशाला...?
आईच्या या म्हणण्याला एकदा मी विचार केला. तेव्हा लक्षात आलं आणि मी जे म्हणातोय ना तसं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आपलं हे मनं ते काम करायला सुरू झालं. प्रत्येक मित्राचा चेहरा डोळ्यासमोर उभा करायचा अन विचार सुरू. यात काय चांगले आहे..? याबरोबर आपलं जमतंय का..? कोण कसा वागतो बोलतो.? कोण कसा आहे..? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं मिळत गेली. अमुक चांगला आहे ना. मग हा पहिल्या यादीत. या बरोबर आपला फारसं संबंध आला नाही. पण आपलं जमू शकतं. मग हा नंतरच्या यादीत. असं करत करत शेवटी ही यादी वाढतंच गेली. हे शाळेतले चार पाच मित्र, हे काॅलेजमधले हे इथले अन हे तिथले आहेत असं होतं. यातून नेमकं काय होतं तर कोण आपल्या जवळचं आहे कोण दूरचं लक्षात येत.
आपल्या मनाचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन एकेक करत अमुक एक आपला मित्र झाला ना तर आपण परफेक्ट होऊ शकतो. त्याच्यातला अमुक गुण घेता येईल. मग आपण मित्र परिवाराचं आपल्या पॅरामिटरने कंपॅरिझन करतो अन ठरवतो. आमुक मला जवळचा मित्र आहे. तमुक माझा जरा लांबच रहणारा मित्र. हे असं जवळ लांब करत आपण मैत्री या काॅमन शब्दांखाली एकत्र जमवलेला परिवार विविध कक्षेत विभागाला जातो. अगदी अणूला जश्या कक्षा असतात तशाच. आपलं मन हे मग पहिल्या जवळच्या कक्षेशी संपर्क ठेवून रहातं. अन हळूहळू बाकी मित्र दूरवले जातात. दूरवले म्हणण्यापेक्षा ते दूरच्या कक्षेत फिरत असतात.
अणू आणि मैत्री यांच्या या कक्षांत मात्र बदल आहे. अणू सारखी मैत्रीच्या कक्षा स्थिर फिक्स नसतात. त्या इतक्या लवचिक असतात की या कक्षेतील इलेक्ट्रॉन म्हणजे मित्रांची संख्या कधीही कमीजास्त होत रहाते. कोण कधी कोणत्या जवळ लांबच्या कक्षेत येईल अन कोण दूर होईल सांगता येत नाही. तर ही आहे अशी मैत्रीची अणूसंज्ञा.
आपण कितीही ठरवलं की मैत्री मधे कोण जवळचा कोण लांबचा असा नसतो. कोण लहान कोण मोठा असा नसतो तरी मैत्रीच्या नात्यात ते तसं असतं. मीही ठरवलं होतं की मला सगळे सारखेच आहेत. पण हळूहळू मीही भरकटत गेलो. आणि त्यातूनच मग मित्रातही एक वेगळा ग्रुप असं होत गेलं.
डिप्लोमा काॅलेजमधे मी मेकॅनिकलचा असल्याने आमचा मेक मेक असा मित्रांचा ग्रुप होता. तेव्हा आम्ही सर्व जण मैत्रीच्या एकाच कक्षेत होतो. मग त्यातही आमचा हाॅस्टेलच्या मुलांचा वेगळा ग्रुप झाला. म्हणजे इतरांच्या तुलनेत हाॅस्टेलचे मित्र जवळचे झाले. पुढे हाॅस्टेलच्याही आमच्या मित्रालांमधे ग्रुप झाले. क्रिकेट खेळणारे अन न खेळणारे. खेळणारे माझे जास्त क्लोज फ्रेण्ड झाले.
एक दीड वर्ष हे असंच राहिलं. हळूहळू इतर ब्रॅण्चसोबत ओळख झाली. मैत्री झाली. मग हाॅस्टेलच्या मेकॅनिकलच्या ग्रुपसोबतच काँप्युटरच्याही ग्रुपमध्ये आऊट ऑफ ब्रॅन्च सदस्य झालो. त्यातही मग काही चार पाच मित्रांसोबत आमचा वेगळा ग्रुप झाला. म्हणजे मला इतर सर्व मित्रांपेक्षा जवळचे मित्र झाले. त्यांचाही काॅलेजमधे मुलामुलींचा एकत्र ग्रुप होता. त्या सर्वांसोबत मैत्री झाल्यावर ते सर्व एका नव्या कक्षेत माझे जवळचे मित्रमैत्रीण झाले. या प्रवासात डिप्लोमा काॅलेज संपले...
जसा प्रत्येक अणू वेगळा असतो तशीच प्रत्येकाची मैत्री वेगळी असते. मी ज्या मित्रमैत्रीणींना माझ्या जवळचे मानत होतो म्हणजे ते माझ्या पहिल्या कक्षेतील इलेक्ट्रॉन होते. पण त्यांची मैत्री तिची अणू संज्ञा वेगळी होती. त्यांच्या दृष्टीने मी त्यांच्या दूरवरच्या कक्षेत होतो. परिणामी आम्ही एकत्र होतो तरी मी कधीही त्यांच्या ग्रुपचा भाग होऊ शकलो नाही. पण ते सर्व जण माझ्या ग्रुपमध्ये होते.
काॅलेज संपलं. नवीन अॅडमिशन. इंजिनियरींगचं नवीन कॉलेज. नवीन काॅलेजसोबत नवीन मित्र भेटत गेले. जुन्या मित्रांची जागा नवीन मित्रांनी घेतली. मैत्रीच्या कक्षा बदलल्या. या पहिल्या कक्षेत डिप्लोमाच्या मित्रमैत्रीणींसोबत नवीन भर पडली. प्रत्येक सेमिस्टरमधे जसं नवनवीन शिकत गेलो तसे नवीन मित्र भेटत गेले. त्यांची पहिल्या कक्षेत ये जा सुरू राहिली. गॅदरींगच्या काळात याच पहिल्या कक्षेत इतकी गर्दी झाली की माझं मलाही कळले नाही.
काॅलेज संपले. सोबत ही गर्दीही कमी होत गेली. अनेकदा असं घडलं की खूप दिवसांनी एखाद्या मित्राचा फोन आला की ती पहिली कक्षा पुन्हा क्रियाशील होते. डिप्लोमा काॅलेजनंतर अनेक दिवसांनी अचानक एके दिवशी दोन मित्र भेटायला आले. खुप बरं वाटलं. त्यादिवसापासून त्यांचीही त्या जवळच्या कक्षेत भर पडली. नुकतेच एका मित्राने कविता लेख आवडतात हवेत म्हणून मेसेजेस केला. डिप्लोमा नंतर बर्याच दिवसांनी. आनंद झाला. तोही आता जवळचा वाटतो. असे अनेकदा घडले. ही अशी नव्याने भेटणारी जूनीच माणसं माझ्या जवळच्या कक्षेत येतात. ती हक्काची आहेत. पण मी कुठेय...? मी त्यांच्या एका कक्षेत हरवून गेलेला आहे बहुतेक. पण काही जे पाय रोऊन राहिले ते आजही माझ्या पहिल्या कक्षेत तसेच आहेत. हो पण मी त्यांच्या कोणत्या कक्षेत आहे माहीत नाही. अनेकदा मला म्हणतात की तू जवळ आहे. पण मला तसं कधी जाणवलं नाही. म्हणूनच की काय आजवर मला विश्वासाने कोणी सांगितले नाही की हा माझा बेस्ट फ्रेंड आहे. जवळचा मित्र आहे.
म्हणून हे मन हा व्हॅलंस इलेक्ट्रॉन अजूनही भिरभिरत आहे. शोधत आहे. तो पर्यंत ज्यांना मी आपलं मानलंय अशा मित्रांच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या आठवणींसह मी जगतोय....
एकटाच मी एकटाच आयुष्याची पाऊलवाट चालतो आहे....
गणेश दादा शितोळे
(२४ नोव्हेंबर २०१५)
(२४ नोव्हेंबर २०१५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा