अन आमचा देश बदनाम झाला....
![]() |
| ह्याच मुलाखतीमधील एका मनोगताने आमचा देश बदनाम झाला.... |
देशाच्या राष्ट्रपित्याची हत्या करणार्या खुन्याला याच देशात बलिदानी, शहीद म्हणून उदोउदो केला जातो. त्याचा जयंती पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातो.
एका खुन्याला देशासाठी लढणार्या सैनिक म्हणणे हा देशातील सैनिकांचा अपमान होत नाही का..?
गांधीहत्या घडवणार्या व्यक्तीला शहीद म्हणून उदोउदो केल्याने आमच्या देशाची बदनामी नाही होत...
आमच्या देशात एका खुन्यालाही शहीदाचा सन्मान मिळतो ही अभिमानाची गोष्ट आहे.
.
.
१९९३ साली आमच्या देशात बाँबस्फोट घडला अन आमचे देशबांधव मरण पावले. बाँबस्फोट घडवून आणणाऱ्या व्यक्तीला न्याय मिळवा म्हणून आमच्या न्यायालयाची दारं सुट्टीच्या दिवशी रात्री उशिराही उघडली जातात ही आमच्या अभिमानाची गोष्ट आहे. कुमार वयात झालेल्या अत्याचाराचा न्याय आमच्या देशातील आजीला वार्धक्यातही मिळत नाही. तरी आमच्या देशाची बदनामी नाही होत..
वर्षानुवर्षे कोर्टाच्या पायर्या चढूनही आम्हाला न्याय मिळत नाही ही गोष्ट आमच्या देशाच्या राजमुकुटात एक मानाचा तुरा रोवतेय...
.
.
आमच्या देशात बाँबस्फोट घडला अन आमचे देशबांधव मरण पावले. तरी बॉम्बस्फोट करणारे फाशी देण्याइतके दोषी नाहीत. त्यामुळे त्यांना फाशी दिली जावू नये अशा मागण्या आम्ही ज्यांच्या चित्रपटांना चित्रपटगृहात उत्तम प्रतिसाद देत सुपरस्टार लोकप्रिय केले ते पडद्यावरचे हिरो करतात तरी आमच्या देशाची बदनामी नाही होत. उलट आमच्या देशात बॉम्बस्फोट केले. दहशतवादी हल्ले केले तरी आम्हाला तुम्ही दोषी वाटणार नाहीत. काय केलंत आहोत तुम्ही. आमचे फक्त एवढेच देशबांधव मारले. काळजी नका करु आमच्या देशातील बडय़ा हस्ती, सुपरस्टार तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही काही करा वो. नका भिऊ. आहो अशा घटनांनी आमच्या देशाचं बघा जगात किती नाव झालं. आपल्याच देशबांधवांना मारूनही दोषी नसल्याचे प्रमाणपत्र देणारे सुपरस्टार फक्त आमच्या देशात आहेत यासारखी देशाच्या गौरवाची गोष्ट नाही.
.
.
दिल्ली तीन चार वर्षांपूर्वी येथे निर्भया बलात्कार प्रकरण घडले. अशा हजारो निर्भया रोजच अत्याचाराला बळी पडतात. महिला अत्याचाराच्या अशा घटना रोजच घडल्या तरी आमच्या देशाची बदनामी नाही होत. महिलांवर अत्याचार तर आमच्या देशात नित्याचे आहेत. आमच्या देशबांधवांना त्याची सवय झाली आहे. रोज रोज काय महिला अत्याचार वाढलेत म्हणून कौतुक करुन घ्यायचंय. आमच्या इथं अशा कित्येक निर्भया आहेत.
.
.
आमचा देश कृषिप्रधान. शेती हा निम्म्याहून अधिक लोकांचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय. दुष्काळ, कर्ज, उत्पादित मालाला कवडीमोल भाव यासारख्या गोष्टींनी याच अन्नदात्याच्या आत्महत्या वाढत आहेत. कृषिप्रधान असणाऱ्या आमच्या देशात शेतकऱ्याला आत्महत्या कराव्या लागतात अशा घटना रोजच घडल्या तरी आमच्या देशाची बदनामी नाही होत. शेतकरी तर आहे तो. काय फरक पडतो आम्हाला तो मेला काय अन जगला काय.? फारतर फार काय होईल अन्नधान्य कमी होईल ना. मागवू की आम्ही शेजारच्या राष्ट्रांकडून. तसंही आम्हाला मॅकडोनाल्ड, मॅगी, केएफसीची सवय झालीच आहे. जगातील कोणत्याही देशातकडे आहे का असा उपाय. आहो चीनकडेही नाही असा लोकसंख्या कमी करण्यासाठी उपाय. वाढत्या शेतकरी आत्महत्यांमुळे जगात आम्ही झपाटय़ाने लोकसंख्या कमी करत असल्याने किती नाव काढतात लोक.
.
.
प्रेमप्रकरणामुळे शेतकरी आत्महत्या करतात असे जावईशोध लावून शेतकऱ्याच्या मरणाला कवडीमोल ठरवणारे कृषीमंत्री असतात तरी आमच्या देशाची बदनामी नाही होत. शेतकरी आत्महत्या करीत राहिले तर लवकरच आमच्या देशातल्या मंत्र्यांना यासाठी नोबेल पारितोषिक मिळेल.
.
.
आमच्या देशात दलित बहुजन वर्ग मोठय़ा प्रमाणावर आहे. आमच्या दलित बांधवांना आमच्या देशातील उच्च वर्णीय जाळून मारतात. (खैरलांजी) समाजातील बहिष्कार तर पूर्वापार चालत आलेला आहेच. तरी मधे काही प्रमाणात तो थांबला होता पण आता पुन्हा सामाजिक बहिष्कार टाकण्याचा प्रकार होतंच आहे. आमच्या देशात दलित अत्याचाराच्या घटना रोजच घडतात तरी आमच्या देशाची बदनामी नाही होत. दलित अत्याचाराच्या घटनांनी आम्ही जगाच्या पाठीवर कुठेही फोकस रहातो. सामाजिक बहिष्कार कसा टाकायचा याचे धडे घ्यायला अनेक विदेशी नागरिक आमच्या देशात येतात ही किती अभिमानाची गोष्ट आहे तुमच्या लक्षात नाही यायची पण हे खरं आहे. .
.
आम्ही सर्व भारतीय या देशाचे नागरिक आहोत. आम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी देशाच्या सरकारमधे मंत्री म्हणून स्वतःला मिरवतात. तेच मंत्री आमच्यावर कधी अन्याय झाला अत्याचार झाला तर आमची तुलना प्राण्याशी करतात.
"रास्ते मैं कही कुत्ते मरे तो भी बवाल कर के हम को पुछोगे क्या.?" (हरियाणा राज्यातील दलित हत्याकांड)
भारतात भारतीयांना कुत्र्याची वागणूक देणारे मंत्री असले तर तरी आमच्या देशाची बदनामी नाही होत. कशी बदनामी होणार जगात प्राण्याला मतदानाचा अधिकार देणारे एकमेव राष्ट्र आहे आमचं. काय करणार आहो आमच्या देशातील बहुसंख्य देशबांधवांना मेंदू नाहीत बहुतेक. अनेक खुनी, लुटारू, घोटाळेबाज, अत्याचारी माणसं आम्ही खुन, लूट करणे, अत्याचार करणे यासारख्या विविध गुन्हांकरीता शिक्षा कायदे करण्यासाठी निवडून देतो. सत्ताधारी बनवतो. आणि त्यांचा अन्याय सहन करतो. कारण आमची कातडी गेंड्याची आहेत हो. हा गेंड्याचाही अपमान आहे की त्याच्या कातड्यापेक्षाही आमची कातडी मजबूत आहेत. आता आम्हाला नव्हते माहीती की हे काताडे कुत्र्याचे आहे. बरं झालं आमच्या मंत्री महोदयांना समजले. यासाठी त्यांना रेमन मॅगसेसे किंवा ऑस्कर पुरस्कार मिळाला पाहिजे. हो कारण त्यामुळे आमच्या देशाची प्रतिमा जगात चांगल्याहून उत्तम झाली आहे.
.
.
आमच्या देशाच्या केंद्रीय गृहविभागाच्या अहवालानुसार आमच्या देशात मागील वर्षी ऑक्टोबर पाचशेच्या आसपास धार्मिक दंगलींची संख्या होती. ती यंदाच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत सहाशेचा पल्ला ओलांडून पुढे गेली आहे. धार्मिक दंगली वाढल्यानेही आमच्या देशाची बदनामी नाही होत. किती अभिमानाची गोष्ट आहे. जगातील मोठ्या राष्ट्रांपैकी एक असणार्या आमच्या राष्ट्राला ऑलिंपिक मधे बळच एखादं सुवर्णपदक मिळतं. आता धार्मिक दंगलीच्या प्रकारात आमच्या देश एक वेगळाच वर्ल्ड रेकॉर्ड करत पदकांची लयलूट करत आहे या गोष्टीने आम्ही तमाम देशप्रेमींची छाती गर्वाने फुलली आहे. अशा प्रकारे आमच्या देशाचं नाव रोशन होताना पाहून डोळ्यातून पाणी आलं पार....
.
.
पण गेल्या काही दिवसांपासून मलाही जरा भिती जाणवायला लागली आहे. यावर मी पत्नीशी चर्चा केली. त्यावर तिचं म्हणणं होतं की आपण दोघे तर येथेच वाढलो. पण आजकालच्या वातावरणातून मला माझ्या मुलाच्या सुरक्षितीतेचीच भिती वाटते आहे. मला वाटतं आपण परदेशात जाऊन स्थानिक व्हावं. या वाक्यातून आमचा देश बदनाम झाला. आमच्या देशाच्या या बदनामीचं आम्हाला दुःख आहे. एका आईने आपली काळजी बोलावून दाखवली अन आमचा देश बदनाम झाला. आमच्या देशाच्या या बदनामीचं आम्हाला दुःख आहे.
कारण ही आमची मानसिकता आहे...
आम्हाला मनंही आहे हे आत्ता कळलं.
कुत्र्यांनाही मन असतं....
गणेश दादा शितोळे
(२५ नोव्हेंबर २०१५)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा