नाती...
नाती म्हणायला गेलं तर दोन अक्षरं अन म्हणायला गेलं तर आयुष्यातलं सर्वस्व. आयुष्याची व्याख्या नात्यांच्याशिवाय होऊच शकत नाही. कोणी कितीही म्हटलं की माझ्या आयुष्यात नात्यांना फारशी किंमत नाही तरी नात्यांहून अमुल्य गोष्ट आयुष्यात नसतेच. मग ती नाती भले स्वतःशीच असो की दुसर्याशी.
आयुष्यात माझं सर्वात जवळचं नातं शब्दांशी आहे. भावनांशी आहे. आठवणींशी आहे. मनाशी आहे. स्वतःशीच आहे. स्वतःच्या अनुभवाशी आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात भावना, मन, आठवणी अन अनुभव या गोष्टी सर्वात जास्त जवळचे वाटतात आणि असतातही. परिस्थिती कोणताही असो या गोष्टी कायम आपल्या सोबत असतात. त्यांच्याहून खरा मित्र आपला दुसरा कोणीही असू शकत नाही.
ही झाली नात्याची एक बाजू स्वतःशी असणाऱ्या.
काही नाती असतात दुसर्याशी. काही रक्ताने बांधलेली तर काही विश्वासाने जोडलेली. भावनांच्या बंधात अडकलेली. ही नाती आपणास हवीहवीशी वाटतात. जशी मन, आठवणी, भावना, अनुभव ही नाती "बाय डिफॉल्ट" आयुष्यात असतातच, तशी विश्वासाने बांधलेली नाती हवीशी वाटतात. गरजेची वाटतात. रक्ताच्या असो की मग विश्वासाने बांधलेल्या आपल्या नात्यांचा सर्वात मोठा पाया हाच असतो की की आपलं मुळात आपल्याशी , स्वतःशी म्हणजे मन, आठवणी, भावना, अनुभव यांच्याशी नातं कसं आहे. ते नातं घट्ट असेल तर ही नाती टिकतात.
मन, आठवणी, भावना, अनुभव या स्वतःशी असणाऱ्या नात्यांमधेही विश्वास हवाच. कारण
नाती कोणतीही असो विश्वास हा असावाच लागतो, विश्वास या एकमेव गोष्टीवर नात्याची सुरवात अन शेवट होत असतो. कधी काय होतं, आपल्याला एखाद्या विषयी काहीतरी वाटतं. म्हणजे समोरच्या व्यक्तीशी आपलं नेमकं नातं कोणतं आहे. अशावेळी आपल्या मनाला निर्णय घ्यायचा असतो. आपला आपल्या भावनांवर आपल्या मनावर विश्वास असेल तर आपल्याला समजतं की आपल्याला समोरच्या व्यक्तीशी हे नातं आहे. आपल्या मनात त्याविषयी ही भावना आहे. त्यावरून ठरतं की आपण त्या व्यक्तीशी कोणत्या भावनेने जोडले जात आहोत. त्यावरून नाय्याचे नाव ठरते. हे दोन्ही बाजूंनी वेगळेही असू शकते. म्हणजे एकतर्फी प्रेम नावाचा प्रकार हा यातूनच घडतो.
नात्यात विश्वास हवा पण गृहीत धरणे नसावे. अनेकदा असं होतं की समोरची व्यक्ती आपल्याला एक मित्र म्हणून "ट्रीट" करत असते. पण आपल्याला ती प्रेम आहे वाटतं. म्हणजे आपण तसा गृह करून घेतो. कदाचित हे आपल्याला समजतही नाही. कारण प्रेम आणि मैत्री या गोष्टी विश्वास अन भावनांच्या किंचितशा भिंतींनी वेगळ्या आहेत. त्यामुळे मैत्रीची गाडी कधी प्रेमाच्या मार्गाने धावेल सांगता येत नाही. या सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत असते ते एखाद्याला गृहीत धरणे. माझा विश्वास आहे की त्याला किंवा तिलाही मला वाटतं असंच वाटत आहे हा विश्वासापेक्षा गृहीतपणा अधिक झाला. कदाचित ते एखाद्या वेळी खरं असू शकतं. पण प्रत्येक वेळी खरंच असेल याची खात्री दोघंही देऊ शकत नाही.
काही वेळा असं होतं, त्याला/तिला माझ्या बद्दल असं वाटतंय ना मग ते खरं असेल. यात विश्वासही झाला अन गृहीतही धरले गेले. पण हे कधी घडतं जेव्हा आपला आपल्या मनावर म्हणजे स्वतःवर विश्वास नसतो. तेव्हा वाटतं समोरच्याला माझ्या बद्दल काय वाटतं हे बरोबर आहे. आपण आपल्याला काय वाटतंय याचा विचार जरा उशीरा करतो. या अशा विचारातून हेच घडतं की आपण प्रत्येक वेळी समोरच्या व्यक्तीला जसं वाटेल तसं वागू लागतो.
गृहीत धरून चालणे ही भावना जितका कमी वेळ नातं तयार करायला घेते त्याहूनही कमी वेळ त्याचा शेवट करायला घेते. सुरुवातीला आपण गृहीत धरतो की समोरच्या व्यक्तीला माझ्या विषयी जास्त माहिती आहे अन ते माझ्या मनापेक्षा बरोबर आहे तेव्हा ते बरं चांगलं वाटतं. पण काही काळाने समोरच्या व्यक्तीलाही जाणवतं की ही व्यक्ती आपण सांगू तशीच वागते. म्म्हणजे जवळपास आपण समोरच्या व्यक्तीचे गुलाम झालो आहोत. हे गृहीत धरून चालणे पुढे नात्यासोबत वाढत जातं अन अशी एकवेळ येते की आपल्याला समोरचा सांगतोय ते पटत नाही. सुरवातीला असं वाटलं तरी आपण नात्यातल्या विश्वासामुळे टाळत आलो तरी शेवटी गृहीत धरण्याचा फुगा फुटतो. अन नात्याचा शेवटही होऊन जातो. नात्यामधे कधीही कोणीही एकमेकांचे गुलाम नसते. जशी प्रत्येकाला मतं असतात तसंच त्याचा सन्मान ठेवण्याची भावना असावी.
आपणात समोरच्या व्यक्तीला गृहीत धरण्याची भावना जेवढ्या लवकर येऊ शकते तितकेच लवकर नाते संपण्याचा धोका जवळपास येतो. मुळात गृहीत धरण्यापेक्षा नातं निर्माण व्हायला सहवास वाढत रहावा. त्यात प्रेम फुलण्यासाठी जरा वेळ द्यायला हवा. उगाच उतावीळ होऊन गुडघ्याला बाशिंग बांधलं तर ना नातं तयार होतं ना नात्यातलं प्रेम मिळतं.
नाती कोणतीही असू त्यात विश्वास हवा. जितका विश्वास आपण समोरच्या व्यक्तीवर दाखवतो तितकाच विश्वास आपण आपल्या मन, भावना, आठवणी, अनुभव यावरही दाखवला पाहिजे. नात्यामधे एकमेकांवर विश्वास असण्याइतकाच "स्पेस" देण्याची भावना असावी. नाती निर्माण होताना ती फुलण्यासाठी वेळ देता आला पाहिजे. पुर्ण वाढ झालेलीच नाती टिकतात. नात्यांच्या पोषण काळासाठी लागणारा अधिकचा वेळ दीर्घकाळ आनंद देणारा ठरतो. ही नाती आपण विश्वासाने जपली वाढवली अन जोपासली की त्या नात्यांच्या प्रेमाची गोड फळं चाखून नक्की तृप्त होता येते....
गणेशदादा शितोळे
(१५ नोव्हेंबर २०१५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा