माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

सोमवार, २३ नोव्हेंबर, २०१५








अर्थ नात्यांचा....




नाती. नाती नेहमीसारखाच एक शब्द. पण त्यात जगातला प्रत्येक माणूस सामवला जातो. रक्ताने बांधला जाणारा कदाचित एखादाच असतो पण मैत्री आणि प्रेम या दोन धाग्याने गुंफला जाणारा वर्ग मात्र मोठा असतो.

कोणत्याही नात्याच्या गाठी ह्या आधीपासूनच बांधलेल्या असतात. प्रत्यक्षात भेट नंतर झाली तरी हा दैवी योगायोग आहे अजूनही मानला जातो. आपल्या भेटी झाल्या, सहवास वाढला की त्या त्यावेळी येणार्‍या प्रत्येक अनुभवावरून एकमेकांच्या स्वभावाचे न उलगडलेले अनेक कांगोरे समजतात. अन हे सर्व लक्षात आलं की नात्यातलं "पुढचंपाऊल" टाकलं जातं. दोन चार भेटी अन ओळख संपून नात्यातला "मैत्री" नावाचा एक नवीन पल्ला गाठला जातो.

हळूहळू हे नवलाईचे हवहवेसे मैत्रीतले दिवस अगदी आनंदात जातात. एकमेकांच्या आवडीनिवडी जपल्या जातात. स्वभावातला सालसपणा, अबोलपणा, समजावून घेत मैत्रीच्या स्टेशनवर गाडी रेंगाळत राहते. नात्यातले समज गैरसमज जाणवायला लागतात. आपण कसे एकमेकांसाठी "मेडफॉरइचऑदर" आहोत ही भावना प्रबळ होऊ लागते. एकमेकांना समजून घ्यायला जो वेळ लागतो तो या मैत्रीच्या टप्प्यात पुर्ण मिळाला की प्रत्येक बाबतीत अनुरूपता येते अन नात्याचा एक नवीन पदर वाट बघत असतो. "प्रेम". बरेच दिवस मैत्रीच्या स्टेशनावर रेंगाळलेली गाडी मग प्रेमाच्या मार्गावर धावू लागते.

मैत्रीची गाडी प्रेमाच्या मार्गाने धावते तोपर्यंत सगळं मनासारखं आनंदी आनंद वाटतं. पण काही काळाने जेव्हा ही गाडी थांबते तेव्हा जणू आयुष्यच थांबल्याचाही भास होतो. पण हे असं का होतं. ?
कारण खुप साधं सोपं आहे. गाडी धावायला तिची दोन्ही चाकं पळायला हवी असतात. पण कधी कधी एक चाक मैत्री च्या स्टेशनवर अडकून पडलेले असते अन दुसर्‍याला तर पुढे जायची घाई असते. अन मग ही प्रेमाची गाडी मधेच थांबते. अशा अवेळी थांबलेल्या गाडीचा अपघात होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे नात्यात प्रत्येक वेळी नव्याने पदर उलगडताना काळजी घेतली पाहिजे. आपल्या पेक्षा आपल्या सोबत असलेल्या व्यक्तीला आपल्या बरोबर घेतलं पाहिजे. म्हणजे ही गाडी सुसाट वेगाने धावलीच म्हणून समजा.

काहीवेळा असंही होतं की ही गाडी प्रेमाच्या मार्गावर चालली आहे अन ही गोष्ट दोघांना माहिती आहे तरी एखादा पार्टनर ते माहित नसल्याचा आव आणतो. खरंतर मनातून त्याचं समोरच्या व्यक्तीवर प्रेम असतं. पण प्रत्येक वेळी तो ते दाखवण्याचं टाळतो.
असंच काहीसं माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत झालं होतं. त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे हे दोघांनाही माहिती होतं. पण ती नेहमी त्याला ते प्रेम नसल्याचं दाखवायची. त्यानं त्याबतीत काही बोललं तरी तिच्या उलट्या बोंबाच. सगळा दोष त्या बिचार्‍याच्या माथी.

या अशा परिस्थितीने पुढे काय होणार आहे याचा त्या दोघांना कदाचित अंदाजही नसतो. प्रत्येक वेळी असंच घडत राहिले की नात्यात हळूहळू गैरसमज वाढायला सुरवात होते. नेहमीच्या संवादात आता वाद येऊ लागतात. वाद वाढले की भांडणं होतात अन पुढे इतके दिवस नात्यातले गुंफलेले विश्वासाचे रेशमी दोर सूटू लागतात. परिणाम शेवटी एकच. नात्याचा शेवट. हे म्हणजे कसं झालं की आपल्याच नात्याचा आपणच खुन करणे. आपल्या पायवर धोंडा मारून घेणे.

प्रत्येक वेळी आपण जे समजत असतो ना "मेड फॉर इच अदर", तसं प्रत्यक्षात कोणतेच कपल्स खर्‍या अर्थाने "मेड फॉर इच अदर" नसतंच. अनेकदा ती बोलकी असते तर तो अबोल. ती फटकळ तर तो समंजस. त्याला संगीताची आवड तर तीला एकही गाणं ऐकायला आवडत नाही. अशी कित्येक उदाहरणे देता येतील.

आपण एकत्र असलो, आपले नाते एका नव्या उंबरठ्यावर असलं तरी आपल्यात म्हणजे दोघांतही सगळ्याच गोष्टी एकच असतील असं काही नसतं. आणि ते असावंही. नाहीतर कधी असं होतं आपल्यात खूप साम्य होतं अन मग काहीदिवसांनी मित्र परिवार शेजारी यांच्या कडून ऐकायला मिळतं की "हाकायजोरूकागुलाम", "हा बघा सगळं तिचंच ऐकतो. " हो असं नक्की घडतं. तुम्हाला वाटत नसलं तरी. कारण आपलं आयुष्य वेगळं आहे. आपण एकमेकांच्या आयुष्यात सहभागी असलो तरी प्रत्येकाला स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगावं लागतंच. म्हणून आपल्या दोघांमध्ये भिन्नता असेल तर चांगलेच आहे. या भिन्न गुणधर्मांमुळे एकमेकांना समजून घेण्याची क्षमता, सहन करण्याची पात्रता येत जाते. कधीकधी समोरच्या व्यक्तीकरीता आपल्या अपेक्षांना मुरड घालता आली की याच भिन्न गुणधर्मांचा नात्याचा सुरेख धागा विनला जातो.

"GreatRelationships Are NeverBecome,
When PerfectPeople Are Come Together....
It is Become When Two ImperfectPeople Learn To Enjoy Each Other'sDifferences."

"नाती तेव्हा कधीच उत्तम बनत नाहीत जेव्हा योग्य माणसं एकत्र येतात.
नाती तेव्हाच उत्तम बनतात जेव्हा भिन्न माणसं एकमेकांच्या वेविध्याचा आनंद घ्यायला शिकतात."

नाती जपण्यासाठी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे संवाद. नात्यात संवाद असावा अन सोबत वादही. हो नात्यात वाद भांडणं ही हवीतच. तुम्हाला हा प्रश्न छळत असेल की हा असं काय बोलतोय. पण हो हे खरं आहे ही भांडणं हा वाद असावा, पण एका मर्यादेत. आपण हे गृहीत धरतो की मला असं वाटतंय ना मग त्याला पण असंच वाटलं पाहिजे. कारण नात्यातील दोन व्यक्तींची वेगळी मतं वेगळा दृष्टीकोन असला की वाद होणारच. भांडणंही होणारच. एखाद्या गोष्टीच्या अनेक बाजू असू शकतात. एखादी बाजू पटेल एखादी खटकेलही. प्रत्येक बाबतीत मत पटायलाच हवं असं नसतं. नायतर संपलंच की सगळं. नात्यात संवाद असला की याच प्रत्येक वादविवादातून, भांडणातून नातं अधिक खुलून जातं. एखाद्या चेहराखुललेल्यानिरागसमुली सारखं. या भांडणात आपण कितीही चिडलो रागवलो तरी ते आपल्या भल्यासाठी आहे याची जाणीव असते. त्यामुळे एकमेकांवर अविश्वासाचा संशयही मनात येत नाही..

तिचा मुड बरा नाही, तिला उदास वाटतंय. भांडा तिच्याशी कोणत्याही विषयावर. असंच। काही वेळानं तिलाही जाणवेल आपढ उगाच भांडतोय. त्यानंतर बघा सुंदर स्मितहास्य येईल. त्या हास्यासाठी तरी भांडत जा. पण तेही मर्यादेत.

नातं टिकवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे विश्वास. एकमेकांवरचा विश्वास. एकमेकांवर विश्वास आहे ना मग जगातली कोणतीही ताकद तुमच्या नात्याला तोडू शकत नाही. अगदी कितीही मोठा घाव घातला तरी. पण कधीतरी आपल्या कडून नकळतपणे आपल्या पार्टनरवर अविश्वासाची भावना व्यक्त होऊ लागते. म्हणजे कसं काहीवेळा आपलं इन्टेशन तसं म्हणायचं नसलं तरी त्याचा अर्थ तसा जावू शकतो.

त्याग- सॅक्रिफाईस. खरंतर हा शब्द खूप मोठा आहे. पण रिलेशनशीप मधे असणारी माणसं सारखा वापरत असतात. काही झालं की मी अमूक त्याग केला अमक्या साठी अमूक सॅक्रिफाईस केलं. वारंवार आपल्या पार्टनर वर अशा मोठ्या शब्दाचा भडिमार केला जातो. पण खरंतर यातून अविश्वासाची भावना व्यक्त केली जात आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आपल्या हातून सॅक्रिफाईस नावाच्या गाण्याने आपला जोडीदार दुखावला असेल तर ही सर्वात मोठी चूक आहे. सर्वात मोठी यासाठी की आपल्या हातून चूक झाली हे जाणवतंही नाही.

सॅक्रिफाईस च्या तुणतुणं म्हणजे अविश्वास हे म्हणजे कसं. ?
हे असं की आपण रिलेशनशीप मधे आहोत, अन आपण काही झालं की आपल्या पार्टनरला म्हणतो की मी आपल्या नात्यासाठी अमकं सॅक्रिफाईस केलं, तमकं सॅक्रिफाईस केलं, हा त्याग केला. तेव्हा खरंतर हे लक्षात घ्यायला हवं की आपल्या जोडीदाराला माहिती आहे की आपण आपल्या नात्याला जपण्यासाठी काय केलंय अन काय करतोय. प्रत्येक वेळी सॅक्रिफाईस म्हणून आपल्या जोडीदारावर हा अविश्वास दाखवला जातो की, "हे बघ, तूझं तर प्रत्येक वेळी असंच असतं. पण प्रत्येक वेळी आपलं नातं टिकवण्यासाठी मीच सॅक्रिफाईस करतेय, " करतेय यासाठी खास की ही गोष्ट मुलींच्या बाबतीत अधिक होते. म्हणजे बहुतेकदा मुलीच सॅक्रिफाईस नावचं गाणं म्हणतात. आपण लक्षात घेतले पाहिजे की टाळी एका हाताने वाजत नाही. तर दोन्ही हात वापरावे लागतात. तसंच नात्याचं आहे. नातं जपण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न झाला पाहिजे. नुसते सॅक्रिफाईस नावचं तुणतुणं वाजवून उपयोग नाही. आपल्या हातून नकळत ही चूक झाली आणि आपल्या जोडीदाराचे मन दुखावले असल्यास आपल्याला जाणवलं की ताबडतोब माफी मागितली पाहिजे आणि नात्यातला हा अविश्वासाचाढग दूर केला पाहिजे.

कधीकधी काय होतं आपण रिलेशनशीप मधे आहोत हे समजतं. नात्यातले नऊ दिवस संपले की एकमेकांचे स्वभाव समजतात. काही गोष्टी जशा आवडतात तशा काही बोचतातही. अगदी किरकोळ गोष्टी खटकतात. अन मग चिडचिड होते. आपण म्हणत जरी असलो की आता आम्ही एका जीवाचे झालो म्हणजे आपण एक होत नसतो. दोघांनाही वेगळेपण आहे. कदाचित दोघांची मनं एक झाली असतील. भावना जुळल्या असतील. पण म्हणून एकच आहोत म्हणणं चूक आहे. प्रत्येकाला आपापली मतं असतात. आपल्या आवडी निवडी सवयी असतात. त्याचा समोरच्या व्यक्तीने आदर ठेवला पाहिजे. उगाच हे आवडत नाही ते खटकले म्हणून प्रत्येक वेळी दुसर्‍याला दोष देणे चुकीचं आहे. मला हवं तसं समोरच्या व्यक्तीनं वागावं म्हणजेच प्रेम हा समज जरा डोक्यातून काढता आला पाहिजे.


नात्याचे विविध कंगोरे उलगडताना आपल्याला नाती मॅनेज करता आली पाहिजेत. जसं प्रत्येक गोष्ट सक्सेस होण्यासाठी कोणी मॅनेजर हवा असतो. तसाच आपली नाती चांगल्या पद्धतीने सांभाळण्यासाठी आपल्यात नात्याचं मॅनेजमेंट आणि मॅनिप्युलेशन करता आलं पाहिजे. कोणत्याही नात्यात मग ते कोणत्याही दोन व्यक्तींमधलं असो. दोघांनीही एकमेकांच्या स्वभावाचे पैलू समजून घेतले की नाती आपोआप सांभाळली जातात. एखाद्या गोष्टीकडे पहाण्याचा दोघांचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो हे मान्य करा.

प्रत्येक नाते एकमेकांमधे कितीही मिसळून गेले तरी ते एकमेकांपासून स्वतंत्र असतेच. हे मान्य करून आपण नात्यात पझेसिव्हपणा न ठेवता एकमेकांना हवी असणारी "स्पेस" दिली पाहिजे. नाती घट्ट करण्यासाठी हीही एक महत्त्वाची गोष्ट आहे. ही स्पेसही एका प्रमाणात देण्यात आली पाहिजे. म्हणजे आपढ रिलेशनशीप मधे आहोत पण एकमेकांच्या आयुष्यात काय घडतंय हे माहीत न करून घेणेही घातकच आहे. नाती टिकवण्यासाठी स्पेस हवी. पण तिचा अतिरेकही नको नाहीतर फुकटचा "का रे दुरवा येतो."

नात्यात समतोल साधणे महत्त्वाचे असते. एकमेकांच्या आयुष्यात नको इतकंही लक्ष घालणं चूक आहे. भविष्यात आपण एकत्र येणार आहोत म्हणून प्रत्येक खासगी गोष्ट माहितीच हवी हा आग्रहही चूकीचाच. एकमेकांमधे लक्ष घालणे अन एकमेकांना स्पेस देणे याचा समतोल साधला की नाती अधिक घट्ट होतात.

आजपर्यंतच्या आयुष्यात झाल्या असतील काही नकळत चूका तर एकदा त्या मनाचा मोठेपणा दाखवत मान्य करा.
आपल्या अविश्वासाच्या घावाने तूटले असेल नाते तर एक विश्वासाचीफुंकर घाला.
सॅक्रिफाईस, त्याग या गोष्टी मोठ्या आहेत. तिथपर्यंत पोहण्यासाठी अवकाश आहे. उगाच आपल्या जोडीदारावर अविश्वास दाखवू नका.
नात्तातला नाटकीपणा संपवून नात्यात वास्तविकतेत अन खरेपणानं जगा.
नात्यात परस्परांना स्पेस द्यायला शिकत विश्वास आपुलकी प्रेम अन व्यक्तीस्वातंत्र्य यांचा समतोल साधत नात्यांचा हा खरा अर्थ समजावून घेतला की बघा एका उत्तम नत्याची वीण कशी आपोआपच गुंफली जाते.
नाती टिकावणं अन निभावणं खरंतर हा खूप अवघड प्रश्न आहे. पण काही सोप्या गोष्टी असतात की ज्यांचा आपण नीट विचार केला की नात्याचे अंतरंग आणि त्या अंतरंगाल्या प्रत्येक रंगातली उर्जा कायम तशीच रहायला मदत होते. या नात्याच्या जुळून आलेल्या रेशमगाठी घट्ट झाल्या म्हणून समजाच....

धन्यवाद.




गणेश दादा शितोळे
(२३ नोव्हेंबर २०१५)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा