माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

बुधवार, २ नोव्हेंबर, २०१६

विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर

                                     सध्या विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांची तुलना करून विराट कोहली कसा सचिन तेंडुलकर पेक्षा सरस आहे हे दाखवण्याचा दुधखुळा प्रयत्न केला जात आहे. नुकतेच भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यानेही विराट कोहली सचिन तेंडुलकर पेक्षा सर्वोत्तम खेळाडू आहे असे ट्विट केले होते.
पण विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्यातल्या तुलनेवर एक माझं मत...
                                     बापाची आणि मुलाची कधीच तुलना होऊ शकत नाही. बाप हा बापच असतो. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली हे दोन वेगवेगळ्या परिस्थितीत खेळणारे खेळाडू आहेत. सचिन तेंडुलकर ने फेस जुन्या नियमांसह मॅग्रा, वसीम अक्रम, वकार युनिस, पोलाॅक, ब्रेट ली, वाॅर्न, मुरलीधरण, वास, जाईल्स अशा तगड्या गोलंदाजांच्या अप्रतिम गोलंदाजीचा सामना करत क्रिकेट विश्वात आपला ठसा निर्माण केला आहे. या उलट त्या तगड्या गोलंदाजांच्या तुलनेतला एकही गोलंदाज आज पहायला मिळत नाही. अँडरसन, स्टेन सारखे निवडक गोलंदाज वगळता अन्य गोलंदाज पूर्वी च्या गोलंदाजांच्या तुलनेत खूपच कमी आहेत. वकार आणि वसिम सारखे रिव्हर्स स्विंग याॅर्कर आज अपवादानेही पहायला मिळत नाही. त्यात नवीन नियमांनी फलंदाजी करणे अजूनच सोयीचे झाले आहे. पावरप्ले, ट्वेन्टी ट्वेन्टी सारख्या नव्या फाॅरमॅटने पूर्वी अपवादाने रचली जाणारी तीनशे धावांची मजल आज सर्रास मारली जाते. आणि त्या तीनशे धावाही विजय मिळवून देतीलच याचीही खात्री नाही. पुर्वी सपाट आणि वजनदार बॅट असल्याने फलंदाजी तितकी सोपी नव्हती. आजच्या कमी वजनाच्या बॅट, मुंगुस नावाचा नवीन प्रकार फलंदाजी सुकर करतो. परिणामी पूर्वी एखादा षटकार जाणारा चेंडू आज सामना संपेपर्यंत कितीदा बाहेर जातो याची मोजदाद केली की विक्रम होतो. पूर्वीची मैदान ओबडधोबड आणि मोठी होती. नव्वद यार्डच्या पुढेही मैदाने होती. आताच्या काळात चौकार षटकारांच्या बरसातीकरता मैदाने साठ सत्तर यार्डच्या आतच असतात. या विविध बाबींवर सखोल अभ्यास केला तर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांची तुलना होऊच शकत नाही.



गणेश दादा शितोळे
(२ नोव्हेंबर २०१६)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा