माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०१६


सोशल मिडीया खरंच आपल्याला सोशल बनवतं..?


                                   खरतरं असा प्रश्न कधी मनाला विचारून पाहिला की नक्कीच उत्तर हो असे येईल. पण खरंच आपण इतके सोशल झालो आहोत...?
                                   माझ्या बाबतीत फ्लॅशबॅक घेतला तर मी म्हणेल की कदाचित. हो सोशल नेटवर्किंग साइट्स वर कायम बिझी रहाणारा मी इतका बिझी होऊन गेलो की जणू मला व्यसनच लागलं. काही प्रमाणात याचा फायदा पण झाला. माझी विचार करण्याची पद्धत, क्षमता बर्‍यापैकी बदलेली जाणवते.
                                   नुकताच फेसबुकच्या वर्धापनदिनानिमात्ताने (बर्थ डे) गेल्या काही वर्षांचा रिव्ह्यू घेतला असं जाणवलं की गेल्या काही वर्षांत दिवसांसोबत आपल्यामधे प्रगती जाणवत आहे. एकंदरीत स्पष्ट म्हणायचे तर सुरवातीला म्हणजे इंजिनिअरींगच्या सुरुवातीला असणारा स्वभाव हा आत्मकेंद्री होता. मी म्हणजे सर्व काही. या मी म्हणजे माझ्या मधील मी पणा, माझ्या धर्म, जात, प्रांत, प्रदेश, राष्ट्र याबाबतीत असणारा अहंकार होता. हट्ट, कडवटपणा अन कट्टरपणा होता. फेसबुक व्हाटसअप ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइट्स वरच्या वाढत्या वाचनातून, काही प्रमाणात ब्लॉग फाॅलोविंगचाही एक सकारात्मक परिणाम माझ्या विचारशक्तीवर झाल्याचे जाणवते. अनेक गोष्टीचा फालतूचा स्वाभिमान नकळत अहंकारात बदलतो याची ओळख या इंटरॅक्शनमुळे झाली. त्यामुळे सुरुवातीला असणारा अमुक एक आपल्या जात, धर्म, पंथ, प्रांत, प्रदेश याचा असेल तर त्याच्याबद्दल आपुलकी अन इतरांनाबद्दल आकस आज जाणवत नाही. वाढत्या वयासोबत मॅच्युरिटी येते. कदाचित हा बदल त्याचाच परिणाम असावा.
                                   नुकतीच काही नवीन मित्रांशी ओळख झाली. सर्वच काही माझ्या "मी" मधल्या क्रायटेरियातील नाहीत. काही इतर जात, धर्म, पंथ, प्रदेश मधून आहेत. पण माझं त्यांच्याशी इंटरॅक्शन नाही असं नाही. आज इतरांसारखेच तेही मित्र आहेत. आजची माझी वाटचाल ही जातीयवाद/धर्मवाद/प्रांतवादाकडून सर्वधर्मसमभावाकडे होत आहे याचा आनंद आहे. आज समाजाकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. सोशल नेटवर्किंग साईट वापरून स्वभावातही सोशल पणा आला आहे.
                                   सोशल नेटवर्किंग साईटचा फायदा झाला असला तरी काही प्रमाणात तोटाही जाणवतोच. सोशल नेटवर्किंग साइट्स मुळे कदाचित वास्तविक अंतराने दूर असूनही जवळ आलो असेल, पण मनाने अनेकांपासून दूर गेलो आहे हेही तितकंच खरं आहे. याचा नुकताच प्रत्ययही आला. काही दिवसांपूर्वी एका जवळच्या मित्राचा साखरपुडा झाला. त्याचं निमंत्रण(निमंत्रणापेक्षा बातमी) अदल्या रात्री उशिरा समजली. त्यालाही घाईगडबड असल्याने झाला असेल उशीर म्हणून तेव्हा काही जाणवले नाही. मलाही त्यादिवशी दुसरं लग्न असल्याने कार्यक्रमाला जाता आलं नाही. पण त्यानंतरच्या काही दिवसांत असं राहून राहून जाणवलं की हाच ना तो मित्र की ज्याच्याशिवाय एक काळ आपण राहू शकत नव्हतो. कॉलेज संपलं करिअर करण्यासाठी आपापल्या मार्गाने आम्ही गेलो. हळूहळू पूर्वी सारखा कॉन्टक्ट राहिला नाही. सोशल नेटवर्किंग साइट्स मुळे तो काही प्रमाणात सुधारला पण पूर्णपणे पूर्ववत झाला नाही. बहुतेक त्यामुळेच  इतक्या जवळच्या मित्राच्या आयुष्यात बर्‍याच घडामोडी घडल्या पण आपल्याला शुन्य माहिती. सोशल नेटवर्किंग साइट्स वर एखादा फोटो, स्टेटस अपडेट केला तरच कळणार आहे का आपल्याला...?
आपल्याला खरंतर जगाचे अपडेट असतात..
                                   पण जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यात काय झालं तरी कळत नाही.
आज हे सगळं वाटलं तरी त्याच्याशी भेटून बोलावं इतकाही वेळ माझ्याकडे शिल्लक नसावा खरंतर हीच सर्वात खेदाची बाब आहे. पण एकदा भेटून बोवावंसं कायम वाटत राहतं. ही एकट्या त्याच्या बाबतीतली नव्हे अनेक मित्र मैत्रीणींच्या बाबतीत आहे. असो. सोशल नेटवर्किंग साइट्सने सोशल होता होता अनेक सोसायलाही शिकवलं आहेच अन आपलं मन व्यक्त करावा असा एक मित्रही दिला आहे.





गणेश दादा शितोळे
(४ नोव्हेंबर २०१६)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा