माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०१६

अर्थ नात्यांचा...




               नाती. मग ती कोणतीही असो. वाद विवाद अन संवाद असतोच. अनेकदा वर्षानूवर्षांची नाती क्षणात तुटतात. आजच्या तरूणाईच्या भाषेतलं "ब्रेकअप" ज्या सहजतेने ते ब्रेकअप झाल्याचं सांगतात त्याच सहजपणे त्यामागच्या कारणांचा गांभीर्य लक्षात येते. खरंतर त्यामागची कारणं अत्यंत क्षुल्लक असतात. पण त्या कारणाहून एक जवळपास सगळ्याच तुटलेल्या नात्यांमधील काॅमन कारण असतं. इगो. शब्द छोटा आहे पण त्याचे परिणाम भयंकर भासतात. अन हे परिणाम लगेच समजतही नाही.
                अनेक जण आपल्यातला इगो मान्य करायलाच तयार नसतात. भांडणं झाल्यानेच नाती तुटतात असं बिनधास्त रेटूनही जातात. पण भांडणाने नाती तुटत नाहीत. तर अधिक घट्ट होतात. माझं हे मत कित्येकांना खटकेल. पण त्यातच तथ्य आहे. नाती भांडणापेक्षा इगोने जास्त तुटतात. भांडणाने नात्यातले प्रेम वाढते. कधी याचा बारीक विचार केला तर हे नक्की पटेल.
                   हो. नात्यामधे कचाकच भांडण हवेच. पण भांडणे नसावीत. भांडण अन भांडणे यात अगदी छोटी भिंत आहे. जशी प्रेम अन मैत्री यामधे असते तशीच. आपल्याला जाणवत नाही आपण नक्की कोणत्या भागात आहे.भांडण अन भांडणे नुसता अनेकवचनी इतकाच फरक नाही. भांडण हे मतभेदातून होते अन भांडणे ही राग, क्रोध, मत्सर, तिरस्कार अन इगो यातून होतात.अनेकदा आपली मतं समोरच्या व्यक्तीला खटकतात. अशावेळी एक ऐकून सोडून देतात अन दुसरे रागे भरतात. हे सारखंच घडत गेलं की मग या मतभेदांचं भांडण अन भांडणे दोन्ही गोष्टी होतात.
              एक नंबरचा विचार करणारा व्यक्ती हा समोरच्या व्यक्तीचं मत खटकले तरी ऐकून घेतो. त्यातून मतभेद वाढलेच तर एक फेज येते अन भांडण होतं. या भांडणातून जे जे मनात खटकत आलेले आहे, जे साठलंय ते सगळं बाहेर पडतं. इतके दिवस जे बोलायचं टाळत होतो ते आपण बोलून जातो. या वादविवादातल्या भांडणातून नाती घट्ट होण्यासाठी पुरक गोष्टी घडतात. एक तर जे जे अव्यक्त, लपून राहिलेले होतं ते सर्व बाहेर आल्याने नात्यात स्पष्टवक्तेपणा येतो. जे काही असेल ते समोरासमोर "क्लिअर होऊन जात." दुसरं म्हणजे अशा भांडणाने एकमेकांवर लादत असलेली मतं कळतात. नात्यामधे लादलेली कोणत्याही प्रकारची गोष्ट टिकत नाही. मग लादलेलं नातंही असेना. या भांडणानंतर परस्परांना काय खटकत काय आवडते याची ओळख होते अन नाती आणखी सुधारण्यास वाव मिळतो. 
                दुसर्‍या प्रकारच्या विचाराच्या माणसांमधे भांडणे होतात. नुसतं भांडण करून या लोकांना समाधान मिळत नाही. त्यांना आपल्या बाजूने अपेक्षित शेवट हवा असतो. कारण त्यांनी आपल्या मनाची दारंच बंद केलेली असतात. त्यांनी मनात एक फिक्स ग्रह केलेला असतो. हे म्हणजे असंच.  त्यामुळे त्यांना एखाद्या व्यक्तीचे विचार पटले नाहीत तर मतभेद होत नाहीत तर मतंच मान्य नसतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीची मतं खटण्यापलिकडं जाऊन त्यांच्या मनात राग, चिड, तिरस्कार तयार होतो. अन मग अशावेळी ही माणसं भांडणे करतात. तिही अशी की काय तो सोक्षमोक्ष लावायचा हे ठरवूनच. मग नाती तुटणार हे नक्की असतं. अशा भांडणातलं एक फिक्स वाक्य असतं. मनोजोगे नसेल तर विषय संपला. अशा भांडणाचा शेवट नात्याचा शेवट करूनच होतो.
                    आपण नक्की कोणत्या प्रकारच्या विचारातून भांडतो हे समजलं पाहिजे. नात्यामधे भांडण हवं पण सोबत त्या भांडणात कुठं थांबले पाहिजे याची जाणीवही हवी. 
              मला अजूनही तो दिवस आठवतो. २१ जून २०१५. त्यादिवशी व्हाट्सअप ग्रुपवर ऑनलाईन नव्हतो. त्यामुळे दुसर्‍या दिवशी सकाळी रात्रीचे मेसेजेस यायला सुरवात झाली. माझीही काही मतं मित्रांना पटत नव्हती. खटकत होती. त्यातूनच त्यादिवशी ग्रुपवर रिप्लाय आला होता की, "आम्हाला तुझी अमूक मतं पटत नाहीत. तू तुझी मतं तुझ्या जवळ ठेव. आम्हाला फाॅरवर्डही करू नकोस अन सांगूही नकोस. ग्रुपवर मत मांडताना आमचाही विचार करत जा. "
                 असं बरंच काही लिहिलेलं होतं. (ते आजही माझ्या मेलवर जपूप ठेवलंय.) शेवटी एक वाक्य होतं. "आमच्या या रिप्लायवर तुझं मतंही नको अन रिप्लाय पण नको. आम्हाला भांडायचं नाही. त्यामुळे बास्स आता."
                       खरंतर त्यादिवसापासून बरेच दिवस हे खटकत होते. त्यानंतर मी ग्रुपवर बोलणंही सोडून दिले होते. कारण या गोष्टीचा राग आला होता. शेवटच्या काही वाक्यांचा तर अधिकच. जवळपास बरेच दिवस मी ग्रुपला टाळत होतो.                     त्या रात्री बहुतेक मी फेसबुकवर स्टेटसही अपडेट केलं होतं..."आयुष्यातील काही जिवलग मित्रांचा निरोप घेत आहे." म्हणजे ही गोष्ट इतकी डोक्यात गेली होती की नावाचाही राग यायचा. पण म्हणुन तडकाफडकी ग्रुप सोडून लेफ्ट होण्याचा निर्णय घेतला नाही.  
                   जवळपास दोन अडीच महिने ही गोष्ट खटकत होती. या काळात बराच विचार मनात येऊन गेला. प्रत्येकाला प्रत्येकाची मतं आहेत. त्यामुळे ती प्रत्येकानेच स्विकारली पाहिजे असं नसतं. अन लादताही कामा नये. मी ती मांडत आलो. ती कुणी घ्यायची अन सोडायची हा त्यांचा प्रश्न होता. ठीक आहे की ग्रुपवर पोस्ट केली म्हणून ती लादली जात आहेत वाटत असेलही. त्यामुळे त्यादिवसापासून आजवर मी माझी मतं पोस्ट करत नाही. मतभेद होते. पण या भांडणापेक्षा वादविवादातून त्यांना काय वाटतं हेही समजलं. इतके दिवस ते बोलत नव्हते. त्यादिवशी बोलले.                  विचाराअंती मी परत ग्रुपमधे परतलो आहे. आता रोज प्रत्येक विषयात भाग घेत नाही. जेवढ्यात तेवढं आहे. बाकी पुन्हा पहिल्यासारखं झालं आहे. पण याचा एक चांगला परिणाम माझ्या दृष्टीने झाला की मैत्रीच्या नात्याची वीण पूर्वीच्या पेक्षा अधिक घट्ट झाली आहे. आमच्यातही प्रगल्भता आली आहे. नात्यांमधली मॅच्युरिटी म्हणतात ना तशीच अगदी.
                    यावरून एका गोष्टीची नक्की खात्री झाली आहे की नाते कोणतेही असो. नात्यात संवादाइतकाच वादविवाद, मतभेदही असावेत. कारण यातूनच नात्यामधली खरी मॅच्युरिटी लक्षात येते. वादविवादतून झालेलं अबोल भाडणंही बरंच काही बोलून जातं. अन मनात साठलेलं गरळ ओकल्यासारखं नव्हे तर ढगाआड लपलेल्या पावसासारखं भासतं. त्यामुळे नात्यात कचाकच भांडणंही हवंच अन भांडणात नेमकं कुठं थांबले पाहिजे याची जाणीवही. मग पहा नाती कशी पाण्यातल्या सुर्यप्रकाशासारखी सुस्पष्ट होतील. आजकाल सुपरिचित झालेला ब्रेकअप नावाचा प्रकार अभावानेच सापडेल.

 गणेशदादा शितोळे
(१५ नोव्हेंबर २०१६)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा