माझी शाळा - साधना विद्यालय...!!!
आज खूप दिवसांनी म्हणजे जवळपास दहा बारा वर्षांनी साधना शाळेच्या त्या जुन्या रस्त्याने जाण्याचा योग आला. बराच काळ लोटल्याने शाळेच्या आसपास इमारतींची गर्दी वाढली होती. त्यामुळे सुरवातीला लवकर लक्षात आले नाही. परंतु शाळेला वळसा घालून जाताना ते जुने गेट पाहिले आणि शाळेच्या आठवणींचा गाव क्षणार्धात डोळ्यासमोर येऊन गेलं. जणू काल परवाच शाळेत गेल्याचीच भावना दाटून आली.
पाचवीला असताना साधना विद्यालय, हडपसर हे केवळ नाव ऐकले असल्याने प्रवेश घेतलेल्या मला शाळेने कधी परकेपणाची जाणीव करून दिली नाही. गाव सोडून शहरात आल्यावर जी भिती वाटते तसा कोणताही भितीदायक प्रसंग शाळेने दिला नाही. जे काही दिले ते केवळ आणि केवळ संस्मरणीय अनुभव होते. मग तो अल्पावधीतच शिक्षकांचा आवडता विद्यार्थी होणे असू की स्थानिक विद्यार्थ्यांसोबत झालेल्या वादामुळे घ्यायला लागलेला शाळेचा निरोप. सर्वच अगदी लक्षात राहिलेलंच.
साधना शाळेने शिक्षणाच्या साधनेसोबत मित्र परिवाराची साधनाही करून दिली. अनिकेत पटने सारखा मित्र याच शाळेने दिला. रोहन हिंगे, सागर लडकत, अक्षय निंबाळकर, विवेक वाघ, अक्षय खवले, कार्तिक उडताले, विशाल देशमुख, विपुल गिरमकर, ओंकार काळभोर, अशा मित्रांची साथ या शाळेत लाभली. अजूनही बरेच होते. पण बर्याच दिवसांचा कालावधी गेल्याने चेहरे लक्षात असले तरी नावं तितक्या लवकर ओठांवर येत नाहीत. आज जेव्हा शाळेचं गेट पाहिलं तेव्हा हा मित्र परिवार जणू माझी वाट पाहत असल्याचेच जाणवले. शाळेची घंटा वाजत आहे आणि नवीन तास सुरू होताना समोरून सर मॅडम एकत्र येत आहेत ही भावनाच मनाला दहा बारा वर्षांपूर्वीच्या काळात घेऊन जात होती.
पाडवी सरांनी शिकवलेला इतिहास आजही नकळत ओठावर आला. कुंभार मॅडमने गणित शिकवलेले गणित सुटल्यावर होणार आनंद चेहर्यावर उमटत होता. सोब अधून मधून त्यांनी आणलेला डबा खातानाच्या आठवणी तृप्त झाल्याचा ढेकर देऊनही गेल्या. काटे सरांच्या हिंदी शिकवण्यापेक्षा आणि राऊत सरांच्या इंग्रजी पेक्षा दोघांची परस्पर विरोधी दाढी पाहून निखळ हसू आजही आवरलं नाहीच. भूगोलापेक्षा प्रतिभा रामचंद्र गवते मॅडम आणि माझा बरेच दिवस राहिलेला अबोला मला आठवला. जिन्यावरून पडताना मुळे सरांनी तोल सावरताना दिलेला हात आजही आधार देणाराच भासला. जोंधळे मॅडमनी गायलेली 'आई तुझी आठवण सांग कशी विसरू' कविता पापण्यांना ओल देऊन गेली. सोबत या शिक्षकांचा निकालादिवशी घेतलेला निरोप जणू दुःखाच्या गाभार्यातच लोटून गेला.
दहा पंधरा मिनिटांच्या शाळेजवळील रस्ताने केलेला प्रवास पुन्हा एकदा शाळेत जाण्याची भावना देऊन गेला. ओस पडलेला शाळेचा तो बाक जणू आर्त हाक मारत होता. या आठवणींच्या गर्तेत रेंगाळत असतानाच सूर्य मावळतीला गेला आणि मी नातेवाईकांच्या घराकडे परतलो.
या शाळेतील मित्र परिवार दहा वर्षांनंतरही सोशल नेटवर्किंग साइट्स मुळे पुन्हा एकदा मिळाला या बद्दल फेसबुकचे मनापासून आभार. आजवर त्या मित्रांची प्रत्यक्ष भेटीचा योग लवकर यावा हीच अपेक्षा. सोबत शिक्षक परिवाराला भेटण्याची इच्छा व्यक्त करत मी इच्छित ठिकाणी पोहचलो.
गणेश दादा शितोळे
(२४ नोव्हेंबर २०१६)
(२४ नोव्हेंबर २०१६)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा