माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०१६

काल गेटचा पेपर झाल्यावर येताना ओळखीच्या अहमदनगर शहरात रस्ता चूकला. काही वेळ बावरल्यासारखं झालं. पण पुन्हा एकदा बरोबर रस्त्याने परतीच्या प्रवासाला निघालो होतो. अहमदनगर कॉलेज ओलांडून पुढे जाता जेता जाता काय मनात आलं कुणास ठाऊक गाडी डिप्लोमा कॉलेजच्या दिशेने वळाली. पंधरा वीस मिनिटांच्या त्या काळात सर्व जून्या आठवणी जाग्या झाल्या. जणू कालच घडल्यासारख्याच भेटल्या. कॉलेजमधले दिवस, मित्रमैत्रीणी, सोबत घडलेल्या अनेक घडामोडी क्षणात ज
डोळ्यासमोर येऊन गेल्या. त्यानंतरच्या संध्याकाळच्या प्रवासात झालेली ही कविता....

चूकलेला की चुकवलेला रस्ता...!!!


काल घरी येता येता,
गाडी माझी एक वळण चुकली...
माहितील्या रस्त्याचाच माग,
का जाणे नकळतपणे चुकली...

वाटलं मग एक सिग्नलवर,
आयुष्याची गाडीही होती अशीच चुकलेली...
कोणत्या कुठल्या तरी वळणावरच,
होती काही आपली माणसं इथंच भेटलेली...

विझताच लाल दिवा खांबावर,
थांबलेली गाडी पुन्हा सुरू झाली...
जुन्या आठवणींच्या स्मरणातच,
आपसूकच कॉलेजकडं वळाली...

लांबूनच गेटवर पाहिले अन,
आज सुट्टी असल्याची कळाली...
तीन वर्षांच्या काळाला काही क्षणात,
डोळ्यासमोर उभे करून गेली...

गेली नजर अचानक घड्याळाच्या काट्यांवर की,
उशीर झालेल्याची आठवण झाली...
आठवणींच्या राज्यात हिंडणारी आयुष्याची गाडी,
जुन्या रस्त्यावर नव्याने चालू लागली...






गणेश दादा शितोळे
(२१ नोव्हेंबर २०१६)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा