अशी जहाली शब्दांची मोरपिसे...
ही कथा आहे माझी. माझ्या शब्दांची. या शब्दांच्या मोरपीसाची. मी लिहिले त्या प्रत्येक लिखाणामागं असणार्या प्रेरणेची.
दि. २० डिसेंबर २००७. वेळ सायंकाळीची होती. मी डिप्लोमाच्या पहिल्या वर्षाला असताना ची गोष्ट. त्या दिवशी दीड एक महिन्यानंतर घरी चाललो होतो. साधारतः दुपारच्या तीन वाजता रेल्वे स्थानकावर पोहोचलो असेल. गाडीला यायला अवकाश होता. त्यामुळे ट्रेन मध्ये तीन चार तासांच्य् प्रवासात काहीतरी वाचायला घ्यावं म्हणून नजीकच्या बुकस्टॉलवरून एक पुस्तक विकत घेतले होते.
छोटंच होतं. दोनशेच्या आसपास पानं असतील. नाव होतं, "तो अन ती". एका कॉलेजवयीन लेखकानं लिहिलेली एक कॉलेजवयीन कथा. नावावरून जशी ती प्रेमकथा होती तशीच ती पुस्तकातूनही साकारली होती.
साडेतीन च्या आसपास ट्रेन आली. फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे आरामात जागा मिळाली. एक विंडो सीट पाहून मीही एका डब्यात बसलो. नेहमीच्या शैलीत मोबाईलवर मराठी गाणी लावून हेडफोन्स कानात सरकवले अन पुस्तकात मुंडकं घालून पहिलं पान उलटलं. पुस्तक वाचताना लोक प्रस्तावना, लेखकाचं मनोगत फारसं वाचत नाहीत. पण मी अगदी पहिल्या पानावर असणार्या पब्लिकेशन पासून वाचायला सुरवात केली होती. एकूणच लेखकाच्या मनोगतावरून वाटलं की ही तो अन ती ची गोष्ट लेखकाच्या आयुष्यात घडलेली सत्य घटना असावी. प्रस्तावना मनोगत वाचून एकदाचं प्रेमकथेचं पहिलं पान उलटलं.
गाडीने अहमदनगर पार केलेलं होतं. या प्रवासातच नगरमधूनच एक फॅमिली माझ्या सोबत डब्यात बसलेली होती. एक चष्मा लावून बसलेले गृहस्थ अगदी समोरच्या बाकड्यावर बसलेले होते. शेजारी एक मध्यमवयीन महिला होती. बहुतेक पत्नीच होती. दोन विन्डो सिट्सवर मुलगा मुलगी बसलेली होती. समोरच्या व्यक्तीलाही बहुतेक माझ्या सारखंच वाचनाची आवड असावी. मला आवड म्हणण्यापेक्षा वाचन म्हणजे सवड तेव्हा आवड असा प्रकार होता. ती व्यक्तीही चष्मा लावून पुस्तक वाचत होती. कर्मयोगीनी. गाडी मंद आचेवर एखादा पदार्थ तळल्यासारखी सावकाश सुरू होती. नेहमीच्या प्रवासाने या गोष्टीची सवयच झाली होती.
प्रेमकथेच्या सुरवातीला पात्रांची ओळख करून दिली होती. कॉलेजला कसे आले, भेटले, मैत्री कशी झाली वगैरे वगैरे. अर्धा तास झाला असेल की ट्रेन सारोळ्यात क्रॉसिंगला थांबली अन मी पुस्तकात गुरफटलेलं डोकं वर काढलं. हेडफोन्स काढले अन आपसूकच माझ्या तोंडातून एक वाक्य बाहेर पडलं,
“शीट, हे ट्रेनचं नेहमीचंच झालंय. सारख्या क्रॉसिंग.”
तसं तर मी स्वतःशीच फस्ट्रेशनी बोललो होतो. पण तितक्यात समोरच्या व्यक्तीनंही माझ्या हा मधे हा मिसळत उत्तर दिलं.
“हो, नायतर काय, गेली अनेक वर्षे मी प्रवास करतोय पण दरवेळी पहिले पाढे पंचावन्नच...!”
एकंदरीत अशा पद्धतीने आमच्यातील संभाषणाला सुरवात झाली. काही वेळातच ट्रेन सुरू झाली अन आमच्या गप्पाही. ओळख झाली, कोण काय करतंय, ट्रेनच्या प्रवासातल्या आठवणी असं थातूरमातूर बरंच बोलणं झालं.
नाव होतं, श्री. अशोक बाळासाहेब पाटील. मराठी विषयाचे शिक्षक होते. रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत. पत्नीही शिक्षकाच होत्या. चारपाच वर्षांपूर्वी बदली झाली अन नगरला स्थायिक झालेले. शेजारच्या खिडकीत बसलेली दोन मुलं. श्रीकांत अन प्रिया. समवयस्कच होते मला. श्रीकांत गेल्या वर्षी दहावी पास झाला होता. अन प्रिया दहावीला होती.
ओळख परेड झाल्यावर आमचा विषय आला पुस्तकावर. सर अहिल्याबाई होळकरांचं कर्मयोगीनी पुस्तक वाचत होते. सरांनी मला माझं मराठी भाषा अन मराठी पुस्तकावरचं मत विचारालं. म्हणजे मला नेमकं काय वाटतं.? नेमकी कोणती पुस्तकं वाचलीत...? असं. मीही नुकताच दहावी पास होऊन आलेलो असल्याने मी काय मत देणार..? अन वाचनचं तर सवड तर आवड असंच असल्याने मी जरा गोंधळलोच. शाळेत असताना ग्रंथालयातून घेऊन काही पुस्तकं वाचली होती. त्यातली फारशी नावंही आठवत नाहीत. पण ती प्रामुख्याने गोष्टींची. अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा. टारझन. वगैरे काही.
सरांनाही बहुतेक माझ्याकडून हेच उत्तर अपेक्षित होतं. त्यामुळे माझ्या या बोलण्यावर त्यांनी फारशी प्रतिक्रिया दिली नाही. नंतर त्यांनी तो अन ती पुस्तकाबाबत विचारलं. पढ मीच आत्ताच वाचायला घेतलं असल्यानं त्याबाबतंही फारसं माहिती नव्हतं. लेखकानं मनोगतात सांगितलेलंच मीही सांगितलं.
काही वेळ अशी चर्चा सुरू राहिली अन मग सरांनी विषयाला हात घातला.
माझ्याकडून मराठी साहित्य, मराठी भाषा, साहित्य, कवी , लेखक यांची जमेल इतकी माहिती काढून घेतली. मग सरांनी कथा कादंबर्यांविषयी सांगितले. कर्मयोगीनी चा जीवनपट मांडला. कोणत्या लेखकांची कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत असं बरंचसं मार्गदर्शन केलं.
आमच्या या गप्पात गाडी पुन्हा क्रॉसिंगला बेलवंडी स्टेशनला थांबली होती. सरही काही वेळानं पुस्तक वाचण्यात रमून गेले. मीही पुन्हा तो अन ती मधे डोकं खुपसलं. निम्मं पुस्तक संपलं होतं. पण माझं पुस्तकात लक्ष लागत नव्हतं. सरांच्या बोलण्यावर मनात विचारचक्र चालू होतं. लेखक पुस्तक अन कथा कादंबर्यांभोवतीच बर्याच वेळ डोकं अन मेंदू भिरभिरत होता.
ट्रेन सुरू झाली अन पुन्हा मी पुस्तकात डोकं घातलं. पुस्तकात हॉस्टेल लाईफवर गॅदरींग मधे सादर करण्यात आलेले एक गीत होते.
‘मना सज्जना तू हॉस्टेल वरतीच रहावे..’
पुर्ण गीत तर नव्हतं. पण हे गीत वाचताना डोक्यात विचार चालू होता की हे गीत नक्की पुढे कसं असेल. एकंदरीत हॉस्टेलवरच्या सात आठ महिन्यांत आलेल्या अनुभवावर अन ऐकलेल्या माहितीवर मी मोबाईलच्या ड्राफ्ट मधे लिहीण्याचा प्रयत्न करत होता. तोडकं मोडकं लिहिण्याचा प्रयत्न करत होतो. माझं पुस्तकातलं डोकं मोबाईलमधे गेल्याचं पाहून सरांनी कटाक्ष टाकून मला सहज काय करतो विचारलं. मी पुस्तकातलं नाव अन मोबाईल सरांकडं सोपावला. त्यातली एकेक ओळ ऐकून सर हसत होते. सरांच्या हसण्यासरशी मला हूरूप येत होता. च्यायला आपण चांगलं लिहिलंय की. ड्राफ्ट वाचून झाल्यावर सरांनी माझ्या कडं बघून विचारलं,
“कधी पासून लिहीतोस रे...? ”
मी उत्तर दिले, “पहिलाच प्रयत्न. ”
“चांगलं लिहितोय.”
बहुतेक मला खुश करण्यासाठी सर असं बोलले असावेत असं समजून मी गप्प बसलो. सर बोलत होते.
“चांगला प्रयत्न आहे तुझा. हळूहळू लिहियला शिकशील. वाचन वाढव, लिखाण आपोआप वाढतं. चित्रपट बघत असशीलच ना. मीही बघायचो अन बघतोतही. पण प्रत्येक चित्रपटाबाबत काय वाटतं हे लिहिण्याची सवय लावून घेतली आहे. परिणामी माझा प्रत्येक चित्रपटाकडं बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. विविध अॅन्गलने विचार करायला लागलो. काळासोबत मराठीचा प्राध्यापक असल्याने वाचन वाढलं अन सोबत लिखाणाचीही सवय वाढली. तूही असंच काहीसं करं. नक्की यशस्वी होशील. इथून मागं नसतील पुस्तकं वाचली. पण आता वाच. या पुस्तकापासून टिपणं लिहिण्याचा सराव ठेवं. नक्की चांगलं लिहिशील. व्याख्याने ऐकण्याची सवय असेल तर अधिक चांगलं आहे.
आपल्या नगरच्या सहकार सभागृहात आयोजित होतात सारख्या व्याख्यान माला. तू आता शिकतोय. अभ्यास असेलही. पण यातूनही जेवढा वेळ मिळेल तेवढा सत्कारणी लाव. मी श्रीकांतलाही हेच सांगतो. वाढत्या वयानुसार तुम्ही याकडं दूर्लक्ष करता पण स्वतःला ओळखा. प्रत्येकात एक लेखक वाचक असतो. तो शोधता आलं पाहिजे. मराठी सारखी समृद्ध भाषा नाही. बरीच पुस्तकं, ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. गावी कदाचित पुस्तकं मिळत नसतील. पण इथं नगरमधे अनेक वाचनालयं/ग्रंथालयं आहेत. एखादं जॉईन करं. नाहीतर महिन्यातून एकदा घरी जात असशीलच ना. प्रत्येक वेळी नवीन पुस्तक विकत घेऊन वाचण्याला काय हरकत आहे. सोबत हा बोअरींग प्रवास आहेच की निमित्त.
माझ्या घरीही अनेक पुस्तकं आहेत. अधून मधून वाचतो मी. प्रवासात एकवेळ जेवणाचा डब्बा नसेल पण पुस्तकं नक्की असतं. बघ तू परत येशील नगरला तेव्हा बघं ये एखाद्या दिवशी घरी आला तर. बोलू या विषयावर. पुस्तकातले विचार म्हणजे ना मोरपीस आहे. जून्या वहीत जपून ठेवतो ना तसं. हे विचार आपण मनात जपून ठेवतो अन ठेवायला पाहिजेत. बघं तुला काय जमंतय. बराच वेळ घेतला. काय करणार मराठीचा शिक्षक आहे अन मुलांना रोजच समजून सांगायला लागतं. आज सुट्टी च्या दिवशी तुला समजून सांगितले. बघ विचार कर या शब्दांच्या मोरपिसांवर. पण मला वाटतं तू लिहावं. माझ्या शुभेच्छा. बराच वेळ झाला. वाचूया पुस्तक. नायतर तू म्हणायचा काय माणूस आहे. स्वतःही पुस्तक वाचेना अन मलाही वाचून देईना...!!!”
सरांनी असं मिश्कीलपणे हसून विषयाचा समारोप करत पुस्तकात ठेवण्यासाठी एक मोरपिस सोपावला. ट्रेनही भीमा नदीचा पुल ओलांडून दौण्ड स्टेशनच्या जवळ आली होती. मला दौण्डलाच उतरायचं होतं. सर पुढे पुण्याला जाणार होते. मी दुमडलेल्या पानात तो मोरपिस घालून पुस्तक सॅक मधे टाकलं. सरांचा फोन नंबर घेऊन निरोप घेत मी स्टेशनवर उतरलो अन घरचा रस्ता धरला.
सरांनी दिलेली नगर दौण्ड प्रवासात दिलेली शब्दांची मोरपिसं मनावर खोलवर गेली. नंतरच्या काळात यावर बराच विचार झाला अन शेवटी माझ्या शब्दातील या मोरपीसांना रेखाटन्याचा नवा प्रयत्न सुरू झाला आहे. तो वाचकांना कसा वाटतो याची प्रतीक्षा आहे. असो.