#MeToo – गरज तुमची आमची मानसिकता
बदलण्याची
#MeToo
वर गरळ ओकणं, विनोद करणं, अन खाली दिल्यासारखे जावाईशोध लावणे सुरुच आहे. #MeeTo चळवळीवरून रोज सोशल मिडिया वर ढीगाने जोक्स चा पाऊस पडतोय.
काय तर म्हणे “#MeToo मोहीमेचा
उद्या कदाचीत खाजगी व्यावसायिक किंवा उद्योजक आपल्या कंपन्यांमध्ये महिलांना
रोजगार देण्याचं टाळायला लागेल.. तो विचार करेल नकोच ती भानगड, आपण आपले पुरूष कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवू.
भविष्यात दहा पंधरा वर्षानी नसते उपद्व्याप व्हायचे....”
#MeToo
सारख्या चळवळीची आवश्यकताच का पडतेय याकडे कधी लक्ष देणार ही मंडळी.
स्वतःचं घर पेटल्याशिवाय ठिणगीची आग होऊ शकत नाही हे लक्षातंच येणार नाही का...?
कामधंद्यापेक्षा ही स्त्रियांचा आदर सन्मान महत्वाचा. अन
भविष्यात भारतीय व्यावसायिक किंवा उद्योजक आपल्या कंपन्यांमध्ये महिलांना रोजगार
देण्याचं टाळायलाच सुरवात केलीच तर ती त्यांच्या खुज्या मानसिकता अजुन काय करू
शकते....? कारण परदेशी कंपन्या आपली
यंत्रणा कार्यान्वित करून स्त्रियांच्या सुरक्षिततेकरता प्रयत्न करत आहेत.
भारतीयांची विक्रुत मानसिकतेला #MeToo ने धक्का बसलाय हे
नक्की...
प्रत्येक वेळी महिलांशी संबंधित मुद्दा हा विनोदाचा अन
विरोधाचा का होतो. महीलांची चळवळ पुरूष प्रधान म्हणण्यापेक्षा पुरूषसत्ताक
असणाऱ्या समाजाला सुरूंग लावते म्हणून..? हे
आजचे नाही. सतीच्या प्रथेवर बंदी घातली तेव्हा ही विरोधंच झाला. विधवापुनर्विवाह
असो की महिलांना शिक्षणाची दारं उघडली गेली प्रत्येक वेळी हा पुरूषसत्ताक समाज
विरोध करत राहिला.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही परिस्थिती फारशी बदलली
नाही. महिलांना राजकारण, नोकरी शिक्षण आरक्षण द्यावे लागले ही त्याचीच प्रचिती. आरक्षणाने
परिस्थिती आमुलाग्र बदल होत नाही हे खरं असल तरी कासवाच्या गतीने बदल होतोय हे
नक्की.
सध्याच्या परिस्थितीत महिला सुरक्षितेबाबतीत भारतीय लोकांची
मानसिकता ररसातळाला गेली आहे इतकी खालावली आहे. स्त्री भ्रूण हत्या बंदी करता
भारतीयांवर कायदा लादवा लागतो ही शरमेची गोष्ट आहे. चार चार वर्षाच्या
चिमुकल्यांपासून ऐंशी वर्षाची वृद्ध महिला देखील आज तेच भोगतेय. विनयभंग, बलात्कार,
लैंगिक शोषण संबंधित बातमीशिवाय रोजची सकाळ उगवत नाही. कुठेतरी
प्रतिक्रिया म्हणून मोर्चे काढले जातात. आरोपींना अटक होते. पण पुरूषसत्ताक
समाजाच्या मानसिकतेचं काय..? त्याकरता काय प्रयत्न केले
जातात.?
महिला म्हणून फक्त पुरूषाची वासना शमण्याची सोय अन अपत्य
निर्माण करणारं यंत्र ही विचारसरणी कधी बदलणार...? रस्त्यावरून चालणार्या महिलेकडून बघून खवळणारी विकृत मानसिकता कधी अन कशी
बदलणार...? शिवाजी महाराज, संभाजी
महाराज यांच्या नुसती नावं घ्यायची अन कल्याण च्या सुभेदाराचं उदाहरण
फेकण्यापलिकडं आपण काय करतोय..? कुठेही चर्चा रंगताना
महिलांसंबंधित अश्लाघ्य भाषा का निघते. कुठेतरी विचार व्हायला हवाच. कायदे करून
गुन्हेगारांना शिक्षा होते. चळवळीतून गुन्हे उघडकीस येतात. परंतु या सगळ्याच्या
मुळाशी जाऊन गुन्हांच घडू नये या पेक्षा तशीच मानसिकतांच तयार होऊ नये यासाठी
प्रयत्न करणे गरजेचे आहे.
मी आजवर अनेक मैत्रिणींकरता दादा झालो. भाऊ झालो. मित्र
झालो. गरज पडली तिथं पाठीशी उभा राहिलो.
अनेकांना समजावलं प्रसंगी कित्येकांना मारलंही असेल. प्रत्येक वेळी ती सोबतची
व्यक्ती ही माझी मैत्रिण, बहीण, मावशी, आजी झाली. तिथे आदर उभा राहिला. कारण समाज अन
संस्कृती मी माणूस म्हणून जगतोय. म्हणूनच आजही #Meeto वरून
विनोद होताना पाहून चीड येतेय.
जो पर्यंत समाज अन संस्कृती म्हणून लोकांची मानसिकता बदलत
नाही तोवर #Meeto सारख्या कितीही चळवळी
उभ्या राहिल्या अन महिला सुरक्षेचे कायदे केले तरी परिस्थिती तितकी बदलेल वाटत
नाही. फक्त एक होईल की थोड्याफार प्रमाणात का होईना अटकाव लागेल.
गणेश सुवर्णा तुकाराम
१६ ऑक्टोबर २०१८



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा