माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शनिवार, २७ ऑक्टोबर, २०१८


माझी मलाच पत्र लिहीताना...!!!

तुला तुझा मार्ग योग्य वाटतोय अन मला माझा. काहीही झालं तरी मी तु माझ्या सोबत असशील ही खात्री होतीच. अन तू कधीच माझी साथ सोडणार नाही हा विश्वास होता माझा. पण ठरलं होतं ना आपलं. अगदी काल परवा. हातात हात धरून आपण सुर्यास्त पहात बसलो होतो तेव्हा.

आपल्यात मतभेद होतील, आपण रागवू, रुसू, अगदी भांडू सुद्धा. पण काही झालं तरी पुन्हा एक होऊ. मग का असा वागतोयस. खरेपणा आपल्या एकत्र जगण्याचा आत्मा आहे. तिथेच तडजोड करायची वेळ आली की संपलो ना माझ्यातला मी. नाही का मी नाराज होणार? नाही का मी माझं म्हणणं तुला पुन्हा पुन्हा सांगणार.

खरं आणि खोटं असे करकरीत दोन भाग नसतात आयुष्यात. ते एकमेकात मिसळलेलं असतं अनेकदा.

दूध आणि पाणी देखील मिसळलेलं असतंच की, पण तरी ही राजहंस ते वेगळं करतोच ना. अनेकदा कठीण प्रश्नांची उत्तरं देताना तू राजहंस झालाय.

एका गोष्टीवर आपली मतं वेगळी आहेत. आपण त्याचा आदर राखू शकतो. पण ती मतं एकमेकांच्या विरोधी असतील तर.? ते सगळं विसरून आपण आयुष्यात काहीच नाही करू शकत. कारण तो विचार म्हणजे आपण. त्याला पूरक गोष्ट असती तर आपण स्विकारली असती.

दोन तलवारी एका म्यानात राहू शकत नाहीत हे जसं खरं आहे तसं दोन विभिन्न विचारांना घेऊन आपण पुढे वाटचाल करू शकत नाही. शेवटी काय तर आपला आतला आवाज काय सांगू लागलाय हे महत्वाचे. तो कधीच खोटं बोलत नाही. भावनिक होऊन गुंतून पडत नाही. तो केवळ स्वार्थी असतो. अन केवळ आपल्या भल्याचाच विचार करतो.

आधी मी अर्ध्या रस्त्यात आलो तरी कळायचं की मी आलोय. विचारांसह तुझी चालण्याची लय सुद्धा बदलली आहे. नाही पटली ओळख.

पण तू तर पुर्ण पणे माझाच आहेस. सुरवातीपासूनच आपण आपल्या माणसांना नाकारत असतो. स्वतःच्या आयुष्याला स्वतःच घडवायचं असतं. असं कुणी हताश झाले की मला राग येतो. दुसर्‍यानं काय केलंय यापेक्षाही मी स्वतः सर्व पूर्ण केलंय का हे खूप महत्वाचं.

गणेश सुवर्णा तुकाराम
२७ ऑक्टोबर २०१८



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा