तिच्या आठवणी....!!!
आज एक जवळच्या मैत्रीणीचं लग्न झालं. हो जवळची मैत्रीणच. मैत्रीच्या पलिकडे जाऊन असं काहीही नाही. पण मैत्रीच्या नात्याची खरी ओळख झाली ती तिच्या मुळेच. आयुष्याच्या एका वळणावर ती भेटली. अन ती भेट आयुष्याला एक वेगळी ओळख कलाटणी देणारी ठरली.
आपल्याला सहसा आपल्या आयुष्यात कुणी ढवळाढवळ केलेली आवडत नाहीच. आणि त्यातली त्यात आपल्या मधे कुणी बदल करण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला सहज शक्य होत नाही. पण आयुष्याच्या ऐन उमेदीच्या काळात तिने ते धाडस केलं. मी आज जे काही आहे त्यात तिचा महत्त्वाचा वाटा आहे. माणसाचा स्वभाव बदलत नाही म्हणतात पण तिने माझा स्वभाव बदलला. इतका की आज विचार केला तर तो नक्की मीच होतो का हाच प्रश्न पडतो. इतका बदल तिलाही अपेक्षित नसेल कदाचित. पण या बदलाची किंमत मात्र खुप मोठी चुकवावी लागली. कदाचित त्यावेळीस मला ही किंमत जाणवली असती तर हा बदल कधीच केला नसता.
आजही तिची शेवटची भेट आठवते. दहावीच्या सराव परीक्षेनंतरच्या क्लास च्या टेरेसवर ती भेटली ती शेवटची. तो दीडदोन तासांचा संवाद आठवला की प्रश्न पडतो की दहावी च्या अल्लड वयात तिच्यात इतका समंजसपणा आणि समजुतदार पणा कसा आला असावा. कदाचित अनुभव हे शिकवत असावा. तेव्हा तिचं वाक्य इतकं मनावर घेतलं नाही. शेवटची भेट कुठं ठरवून होत असते का असं म्हणत तेव्हा ते सोडून दिलं. पण आज त्याची जाणीव होत आहे.
दहावीच्या त्या भेटीनंतर तिला अनेकदा भेटण्याचा प्रयत्न केला. पण कधीच योग आला नाही. तिच्या मैत्रिणींला फोन करून कॉन्टक्ट नंबर मिळाला पण त्यावर कधी फोन रिसीव्ह झालाच नाही. दहावीनंतर डिप्लोमाचं वर्ष होतं. काही काळाने मग तेही मागे पडलं. मीही कॉलेज लाईफ मधे रूळून गेलो. ऑर्कुटचं वेड डोक्यावर होतं. त्यांच दरम्यान वाढदिवसाच्या वेळी तिचा विश करणारा मेल आला. आणि तिथून मग पुन्हा संवाद सुरू झाला. पाच सहा महिने सर्व काही ठीक होते. पण कधी पुन्हा भेट झाली नाहीच. तो संवाद पण संपला. काळाच्या पडद्याआड ती कुठे गडप झाली कळलंच नाही. तिच्याशी बरचंसं बोलायचं होतं पण ते राहून गेलं. पण आजही ती सोबत असल्याचं जाणवतं. कधीही एकटं वाटलं तरी तिच्याशी बोलवसं वाटतं. आज ती सोबत नसली तरी तिच्या आठवणी सोबत आहेत.काही दिवसांपूर्वी एका मैत्रिणीने फोन करून तिच्या एंगेजमेंटची बातमी दिली होती. त्याचवेळी लग्नाचं निमंत्रण पण मिळालं. पण तिचा काही फोन आला नाही. येणारही नव्हता. तसं तिने आधीच सांगितले होतेच. तीने शेवटची भेट अगोदरच ठरवलेली होती. त्यामुळे जरी निमंत्रण म्हणण्यापेक्षा अनाहूतपणे समजले होते तरी मी जाणार नव्हतोच. आणि आज गेलोही नाही. आजवर मनातच तिच्याशी बोलत आलो होतो तसंच तिला मनातच मनापासून शुभेच्छा दिल्या. पण एकदा तिच्या त्याला भेटण्याची इच्छा होती. त्याला सांगायचं होतं की तुला जगातील अशी कोणती सर्वोत्तम गोष्ट मिळाली आहे. पण ती संधी कधी आलीही नाही अन आता यावी असंही वाटत नाही. तिने ठरवलेली कोणत्याही गोष्टीत आजवर मी कधी मोडता घातला नाही आणि भविष्यात घालणार नाही पेक्षा तशी इच्छा नाही. एवढं नक्की की आयुष्यात क्वचित भेटलेली अशी अमुल्य माणसं मनात घर करून रहातात तशी ती यापुढेही कायम राहील.
गणेशदादा शितोळे
(२७ फेब्रुवारी २०१६)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा