मला भेटलेले आनंदयात्री - ओळखीच्या वाटेवरची अनोळखी माणसं...
गेली अनेक दिवस त्याच निगडी-कोथरूड वाटेने प्रवास सुरू आहे. अन अचानक अशाच एका वळणावर ते दोघे भेटतात. खरंतर मला ते अनोळखीच. ओळखीच्या रस्त्यावरून जाताना भेटलेली ती अनोळखी दोघं. समवयस्क असावीत मला. ती स्कार्फ बांधून स्कुटीवर असते. तो हेल्मेट घालून सीबीझेड वर असतो. पंधरा वीस मिनिटांच्या त्या प्रवासात दोघे रस्त्याने चालतानाही गप्पा मारत चाललेले असतात.सुरवातीला दोन दिवस अनावधानाने भेटले असावेत वाटलं. पण नंतर मात्र रोजच दिसू लागले. रोजच्या त्या धाकधुकीच्या प्रवासात, एक्स्प्रेस वे वरच्या वाहनांच्या गर्दीत, हाॅर्नच्या गोंगाटात दोघं गप्पांमधे इतके गुंग होऊन कसे जात असावेत असा प्रश्न पडतो. एकदा दोनदा मी ओव्हर टेक करत बाईक दोघांच्या मधे घालण्याच प्रयत्न करत संवाद थांबवण्याचा प्रयत्न केला. पण नंतर मलाच कसंनुसं वाटलं. आपल्याला कुणी असं डिस्टर्ब केलं तर...हा प्रश्न मनाला ज्या क्षणी पडला तेव्हा पासून आजपर्यंत मी कधी दोघांना ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न पण केला नाही. रोज त्या दोघांच्या मागे चालत न्याहाळत रोजचा प्रवास सुरू आहे. पण त्यांना पाहिलं की जाणवतं नात्यांच्या बंधनापलिकडेही त्यांच्याशी काही बंध जुळून येत आहेत. एखाद्या दिवशी दोघे दिसले/भेटले नाहीत तरी दिवस चांगला जात नाही असं वाटतं.
बघू ओळखीच्या वाटेवरची ही अनोळखी माणसं कधी आपलीशी होतात...
( ओळखीची तर झालीच आहेत...)
गणेशदादा शितोळे
(२५ फेब्रुवारी २०१६)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा