भांडण पेनाचे
एकदा पेन आणि टोपनाचे झाले भांडण,
अन घ्यावा वाटला त्यांना काडीमोड....
दोघेही एकमेकांना निर्वाणीचे म्हणाले,
मला आता एकटं जगायला सोड...
पेन म्हणे टोपणाला,
झिजायचं मी अन मिरवत फिरायचं तू...
मला ठेवणार खिशात झाकून,
अन जगभर दाखवत हिंडायचं तू...
न रहावून टोपण म्हणाले पेनाला,
अडकून लटकायचं मी अन लिहायचा मान घेणार तू...
लोकांच्या दाताखाली चिरडण्याचं दुःख,
नेहमी हातात विसावणारा काय समजणार तू...
सुखदुःख समजल्यावर एकमेकांची,
भांडत म्हणणारं कोणीच उरलं नाही मी आणि तू...
पेन म्हणे मिठीत घेत टोपणाला,
लिहायचा मान घ्यायचा मी अन मुकुटाचा मान घ्यायचा तू...
मिटले एकदाचे पेन आणि टोपनाचे भांडण,
जरी घ्यावा वाटला होता त्यांना काडीमोड....
नव्याने शिकत सुखदुःखाची व्याख्या,
दोघांनीही सांधला मनामधला निखळलेला जोड...
गणेश दादा शितोळे
(२६ फेब्रुवारी २०१६)
(२६ फेब्रुवारी २०१६)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा