सैराटच्या माध्यमातून सामजिक चपराक
निळू फुले यांचे विधान होते की तमाशा पाहून जसा समाज फारसा बिघडत नाही तसाच समाज चांगल्या कलाकृती पाहून फारसा सुधारतही नाही. ते कदाचित त्यांनी त्या काळातील उद्विग्न परिस्थिती पाहून केलेले भाष्य होते. परंतु आज चित्रपटाचे समाजमनावर नक्की परिणाम होतो. त्याचे चांगले परिणाम घडण्याचे प्रमाण कमी आहे हे तथ्य आहे. टाईमपास, सैराट असे चित्रपट पाहून मुलांनी काय करावे काय नाही हे स्विकारले पण पालकांनी आपली जबाबदारी स्विकारायला सपशेल नकार दिल्याचेही दिसते.
चित्रपटातून कोवळ्या वयात प्रेमात पडण्याचे संस्कार घडलेत ही एकमेव भूमिका पालकांना दिसते. परंतु मग अशा पालकांना चित्रपटाचा उद्येशच समजला नाही हेच दिसते. सध्या तरूण पिढी चित्रपटाकडे ओढली जाते. आणि ते न चुकता चित्रपट बघतात. हिंदी चित्रपट नाही परंतु बहुतांश मराठी चित्रपट हे समाजातील जळजळीत वास्तव दाखवत असतात. फॅण्ड्री सैराट चित्रपट हे याचे उदाहरण आहेत.
मुळात या चित्रपटांचा उद्देशच समाजात परिवर्तनाचा होता हे मान्य करायला हवे. उगाच या सामाजिक आशय वगळता चित्रपट विशेष नाही म्हणून नाकरताना त्या मागची सामाजिक भूमिका स्विकारली का हेही मान्य करा की. आपल्याला चित्रपट समजत नाही किंवा त्याच्या भूमिका मान्य करता येत नाही म्हणून चांगल्या कलाकृतीत चूका काढण्याचा धंदा मांडला आहे का हा प्रश्न पडतो. अशा लोकांना प्रेक्षकांनी थेटरात जाऊन जो उदंड प्रतिसाद दिला ही चपराक बसून गाल लाल झाल्याने बहुतेक असे चित्रपट झोंबलेले दिसतात.
प्रत्येक चित्रपट हा प्रत्येकाला समोर ठेवून केला जात नाही. त्यातून एक विशिष्ट प्रश्न सहजपणे हाताळण्याचा प्रयत्न केला जात असतो. आणि तो प्रश्न ज्यांना समजतो ते त्याला प्रतिसाद देतात. ज्यांना आपल्याच विचारसरणीवर सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता आहे ते मग असे समिक्षक उपहास करत चूका काढतात. परंत अशा चुका दाखवणारांनी ते एक बोट दाखवताताना इतकंच लक्षात घ्यायला हवं की जो हात दुसर्याच्या चुका दाखवतो तो हात आपला आहे आणि तोच हात उरलेली तीन बोटे आपण चूक असल्याचेही दाखवतात हेही लक्षात घ्या. बाकी काही बोलण्याची आवश्यकता नाही. ज्या लोकांना आपल्या संस्कारावर विश्वास नाही त्यांनी खुशाल चित्रपटांना दोष द्यावेत. या माध्यमातून आपण काय संस्कार केले हेच दिसून येते. बाकी काही बोलण्याची आवश्यकता नाही. ज्यांना चित्रपट समजतो ते त्याला उत्तम प्रतिसाद देत आहेत.
गणेशदादा शितोळे
(२५ नोव्हेंबर २०१६)