Happy_Birthday_FACEBOOK
#Thanks_MARK....
फेसबुक...
एक अफाट लोकप्रियतेचं जग...
अन एक वेगळंच विश्व...
आज फेसबुकने 12 वर्षे पूर्ण केली. जेव्हा फेसबुक हे नाव कानावर पडलं तेव्हा ऑर्कुटचं फॅड होतं. त्यामुळे सुरुवातीला ऑर्कुट वापरणं म्हणजेही स्टेटस सिंबॉल बनलं होतं. माझा आणि फेसबुकचा खरा संबंध आला डिप्लोमा कॉलेज नंतरच. इंटरनेटच्या महाजालावर विविध विषयांवर माहिती पाहताना फेसबुकचीही ओळख झाली. अकाऊंट तयार झालं. सुरवातीला कोणी मित्र परिवार जॉईन नसल्याने काही दिवस आजवर भेटलेल्या अनेकांची नावं आठवली की फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली जात होती. काही अंदाज बरोबर लागले काही चुकलेही. अनेक अनोळखी माणसं फेसबुक फ्रेण्ड झाली. सुरुवातीला असणारी क्रेझ कालांतराने अजूनच वाढत गेली. रोज नवीन ग्रुप्स, पेजेस, लाईक्स वाढतंच गेलं. अगदी फेसबुकचं वेडं म्हणतात ना तसं वेडंच लागलं.
खरंतर माझं लिखाणाचा छंद वाढवण्यात फेसबुकचा अधिक जास्त हात आहे. नवीन नवीन ग्रुपमध्ये जॉईन झाल्यावर नवीन पोस्ट वाचनात येऊ लागल्या. मलाही मी लिहिले होते ते पोस्ट करण्याची संधी फेसबुकच्या माध्यमातून मिळाली. मग वाढत्या लाईक्स कमेंट्स मुळे लिहिण्याचा अधिक हुरूप येत गेला. मीही काही ग्रुपचा नियमितपणे वाचक झालो. अन माझ्या ही पोस्ट्सचे काही वाचक होत गेले. यातूनच नवीन मित्रांशी ओळख वाढली अन कधी हक्काची माणसं होऊन गेली माहिती नाही.
इंजिनिअरींग कॉलेजच्या सुरुवातीला वाटणारी हे फेसबुक वेड नंतर नंतर कमी झालं. काही काळ तर थांबलंच होतं. माझा अधिक कल माझ्या लिखाणात आणि वाचणाकडं झुकला होता. दरम्यानच्या काळात हा तुटलेला संवाद पुन्हा सुरू झाला. कॉलेजमधल्या गॅदरींग निमित्ताने होणार्या सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांच्या आयुष्यावर बोलु काही या कार्यक्रमाची माहिती फेसबुक वरूनच समजली. मी डिप्लोमा पासूनच संदीप-सलील जोडीचा फॅन होतोच. संदीप-सलील प्रेक्षकांमधून आलेल्या फरमाईशी सादर करतात हे माहित असल्याने कॉलेजमधल्या कार्यक्रमासाठी तयारी म्हणून मी सलील कुलकर्णी यांच्या मिस्टर स्पायडरमॅन या गाण्याच्या ओळी वापरून एक वेगळंच गाणं तयार केले होते. मिस्टर छोटामॅन. कॉलेजमधे ते गाणं संदीप-सलील यांनी सादर करण्याची संधी काही कारणाने हुकली. त्या गाण्याला फेसबुकच्या आयुष्यावर बोलु काही पेजवर पोस्ट केल्यावर मिळालेला तुफान प्रतिसादच माझी फेसबुकशी पुन्हा नाळ जोडण्यास कारणीभूत ठरला.
सुरवातीला असणारी फेसबुकची क्रेझ कमी झाल्यावर एकदा सहज फेसबुकच्या दुनियादारीत आपल्या कडंही पहायला गेलो तर एक आढळून आले. सुरुवातीला पाठवलेल्या फ्रेण्ड रिक्वेस्ट मुळे फ्रेण्ड लिस्ट कधीची चार हजारांवर पोहोचली होती. त्यातील काही जणांशी फ्रेण्ड रिक्वेस्टच्या पलीकडे काही शेअरींगच झाले नाही. त्यामुळे हळूहळू ही गर्दी कमी करण्यासाठी अनेकांना अनफ्रेण्ड केले. जशी जशी मॅच्युरिटी वाढत गेली तसतशी काय लाईक/शेअर/पोस्ट करावे काय नाही याची जाण येत गेली.
या दरम्यानच्या काळात फेसबुकच्या माध्यमातून काही चांगल्या गोष्टही घडल्या. एक तर माझ्या जून्या शाळेतील (साधना विद्यालय, हडपसर) मित्रांशी फेसबुकच्या माध्यमातून पुन्हा भेट झाली. ( या गोष्टीला दोन तीन वर्षे उलटून गेली तरी अजूनही ती भेट ऑनलाईनच घडली आहे. प्रत्यक्षात कधी भेट होणार आहे पाहू. नुकताच एक मित्र कॉलेजवर भेटलाही. असो.)
दुसरी गोष्ट म्हणजे मला माझ्या लिखाणाला सादर करण्याची संधी फेसबुकच्या माध्यमातून मिळाली. त्याद्वारे मिळणारा प्रतिसाद पाहून नुकतेच नवीन वर्षाच्या निमित्ताने मी माझे स्वतःच्या लिखाणाचे शब्दांची_मोरपिसं हे फेसबुक पेज सुरू केलं. अल्पावधीतच त्याला काही प्रमाणात रिस्पॉन्स मिळाला आहे. फेसबुकवर अनेक चांगल्या साहित्याशी संबंधित ग्रुप/पेजेस शी संलग्न झालो आहे. याच फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून मला 89 व्या साहित्य संमेलनाच्या करीता कविता पाठवून निवड होण्याची संधी मिळाली. काही कारणाने ती सादर करता आली नाही. असो. पण त्यानिमित्ताने साहित्य क्षेत्राशी एक वेगळी नाळ जोडण्यास यश आलं आहे.
फेसबुकवर मित्रांच्या वाढदिवसाला पोस्ट करणार्या कॅप्शन (क्योट्स) मुळे #कॅप्शनकिंग अशी वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अनेकदा मित्रांचा प्रतिसाद येत असतो की त्यांच्या टाईमलाईनवरची कॅप्शन त्यांच्या मित्रांना एवढे आवडले की चौकशी करत असतात. काही फ्रेण्ड रिक्वेस्ट फक्त या कारणावरूनही आल्या आहेत.
फेसबुकच्या माध्यमातून नाती दुरावतात असं म्हणतात पण मला कधी तसं वाटलं नाही. उलट फेसबुकच्या माध्यमातूनच अनेक माणसं जवळ येत गेली. "रिश्तोंमे दुरीया बढनेसे ज्यादा फासलो की दुरिया बढकर भी गहरायीया आयी."
मैत्री मधला तुटलेला संवाद पुन्हा साधण्यास फेसबुकमुळेच शक्य झालं.
आज फेसबुकच्या जोडीला #व्हाटसअप आलं आहे. पण त्यामुळे माझ्या तरी फेसबुकच्या प्रेमावर काही फरक पडल्याचं जाणवत नाही. आजही व्हाटसअपपेक्षाही फेसबुक जवळंच वाटतं. जणू फेसबुक जवळचा मित्रच आहे. फेसबुकसोबतच आनंद, दुःख, राग, द्वेष, प्रोत्साहन असं बरचं काही शेअर केलं. या निमित्ताने मंगेश पाडगावकर यांची कविता आठवली. #मन_मोकळं_मोकळं_करावं
मला जेव्हा जेव्हा मन मोकळं करावंसं वाटलं तेव्हा याच फेसबुकच्या वाॅलवर मोकळं केलं. काही गोष्टी कोणाला स्पष्ट सांगता आल्या नाहीत त्या फेसबुकच्या माध्यमातून त्या व्यक्तीला पोहचल्या. मग तो "आनंदही अश्लील झाला आहे, मी मैत्रीचा निरोप घेतोय, माफ कर मित्रा, राग, आठवणींच्या हिंदोळ्यावर, चुकलेल्या वळणावर " अशा कितीतरी कवितांच्या माध्यमातून मला जे ज्या व्यक्तीला सांगायचे होते ते पोहचले. अजून काही बाकी आहे तेही फेसबुकच्या माध्यमातून पुढे येईलच.
मार्क झुगेरबर्गने चार मित्रांच्या साथीने 4 फेब्रुवारी 2004 ला फेसबुक जगासमोर आणले आणि अनेक लोकांना जोडण्याचं काम केले याचा आनंद वाटतो. हा दूवा साता समुद्रापलिकडची अनोळखी माणसं आपलीशी करणारा महत्वाचा दूवा ठरला आहे. नुकतेच एका भारतीय तरुणाच्य् लग्नाला फेसबुकच्या माध्यमातून ऑनलाईन "आई" नात्याचा बंध निर्माण होऊन एक परदेशी महिला उपस्थित होती. हे केवळ फेसबुकच्या उपलब्धतेमुळेच. आज फेसबुकच्या वर्धापनदिनानिमात्ताने हा फेसबुकच्या साथीने मैत्रीचा प्रवास असाच सुरू रहावा हीच अपेक्षा आहे.
गणेश दादा शितोळे
(४ फेब्रुवारी २०१६)