माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शनिवार, ३१ डिसेंबर, २०१६




मला भेटलेला आनंदयात्री :- अजय भोसले.
.
.
दरवर्षी जसं जातंच तसं म्हणता येणार नाही, परंतु हेही वर्षे मावळतीच्या सूर्यास्ताकडे झुकले आहे. उद्याचा सूर्य नवी पहाट नवी चेतना घेण्यासोबत नवीन वर्षही घेऊन येणार आहे. नुकताच उद्योग विश्वात प्रवेश केल्याने वर्षसमाप्तीपूर्वी ताळेबंदाची काम केली जातात तशाच प्रकारे या मावळत्या वर्षाचा ताळेबंद करायला बसलो आहे.
३६४ दिवसाची पाने पलटून आज शेवटचे पान आले. आयुष्याची ही रोजनिशी उलटून पहायला सुरवात केली की अनेक बर्‍यावाईट आठवणी जाग्या झाल्या. अनेक माणसांच्या भेटी डोळ्यासमोर तरळून गेल्या. पण सगळं काही नियमित वाटलं. दरवर्षी सारखं यात फारसा बदल जाणवला नाही तरी या वर्षाने आनंदाचं नव विश्व दिलं. या वर्षीत असाच आनंद देणारी अनेक माणसं भेटली. काही जुनी पानं गळूनही गेली अन काही नवीन मैत्रीची पालवीही फुटली. पण या सगळ्या भाऊगर्दीत एक माणूस मात्र मला खरा #आनंदयात्री भासला. अजय भोसले सर.
.
या वर्षीच्या सुरवातीला या माणसाची भेट झाली अन एस ए पी नावाच्या नवीन आनंदाच्या माध्यमाचीच जणू भेट झाली. यात प्रायमस टेकसिस्टम्सचाही तितकाच वाटा आहे, ज्यामुळे या आनंदयात्रीशी माझी भेट झाली. प्रायमस टेकसिस्टम्स बद्दल काय बोलायचं अन काय नाही. आज प्रायमस ने काय दिलं असा प्रतिप्रश्न कुणी विचारला तर एका शब्दात उत्तर देईल. जग. प्रायमसने एक वेगळंच विश्व दिलं. ज्या विश्वात फक्त एस ए पी आहे अन एस ए पी संबंधित लोक. या लोकांसोबत या वेगळ्या विश्वात आनंद, समाधान शोधण्याचा प्रयत्न म्हणजे एस ए पी कन्सल्टींग. हे विश्वच इतकं वेगळं आहे की इथं दुसरा विचार पण मनाला शिवत नाही. अगदी स्वतःशीच बोलताना सुद्धा एस ए पी साथ सोडत नाही. ऑक्सिजनची खरेदी अन कार्बन डाय ऑक्साईड ची विक्री हा विचार केवळ एस ए पी च मनात आणू शकते.
.
प्रायमसने हे वेगळे विश्व दिले. हे वेगळे क्षेत्र दिले. जिथे मला माझा वेगळा ठसा उमटू देण्याची संधी दिली. सोबत विविधांगी व्यक्तीमत्वांना भेटत एक वेगळा अनुभव मिळाला. जिव्हाळ्याची माणसं मिळाली. या सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली ती अजय भोसले या व्यक्तीमत्वाने. १ फेब्रुवारी चा मी आणि ३१ डिसेंबर चा मी या दोन व्यक्तिमत्वातील फरकाला घडवणारा व्यक्ती म्हणजे अजय सर. शिक्षक, गुरू म्हणण्यापेक्षा विद्यार्थ्याला मित्रत्वाची भावना जन्माला घालून एसएपीशी मैत्री करायला शिकवणारा हा अवलिया माणूस भेटला म्हणून तो मला आनंदयात्री भासतो. आनंदयात्री या करता की नवीन गोष्टीतही आनंद घ्यायला शिकवत या आनंदाच्या प्रवासात कधी वाटाड्या तर कधी सहप्रवासी होणे हे फार थोड्या लोकांना जमतं. म्हणूनच स्वप्निल जोशीच्या पुणेरी भाषेतील हा आनंदयात्री मला #मितवा सारखाच वाटतो.
.
तो मित्र आहे,
तो तत्वज्ञ आहे,
तो वाटाड्या आहे,
.
मित्र या करता की आंतर्वासियता प्रशिक्षण काळात हा माणूस शिक्षक कधीच वाटला नाही. एक मित्र ज्या अधिकाराने सांगतो अशा मित्रत्वाच्या भावनेतून या माणसाने प्रत्येक गोष्ट सांगितली शिकवली.
.
तत्वज्ञ याकरता की या माणसात नम्रता, संयम अशी बरीच तत्वे शिकण्यासारखी मिळाली. कोणत्याही गोष्टीच्या खोलापर्यंत जाऊन शेवटपर्यंत पोहचेपर्यंत प्रयत्न करत रहाणे ही गोष्ट सहजासहजी माणसात सापडत नाही. ती मला पुर्णपणे शिकणे अजून तरी शक्य झालं नाही. पण त्या दिशेने प्रयत्न करण्यास एक दिशा मिळण्यास मात्र अजय सर निमित्त ठरले हे नक्की.
.
वाटाड्या या करता की १ फेब्रुवारीला आलेल्या मला एसएपी हे विश्वच नवीन होतं. अशा माझ्या सारख्याच अनेकांना आपल्या आयुष्याला योग्य दिशा दाखवणारा भेटणेही तितकेच महत्त्वाचे असते आणि अजय सरांनी ती भूमिका बजावत आजवर अनेकांना एसएपी विश्वाची वाट दाखवली.
.
या वर्षीचा ताळेबंद करताना या अशा आनंदयात्री सोबतचा हा प्रवास तसाच पुढील वर्षाच्या पानवर सुरू रहावा हीच सदिच्छा आहे.



गणेशदादा शितोळे
(३१ डिसेंबर २०१६)


मंगळवार, २७ डिसेंबर, २०१६

वधू परीक्षा की व्यंग परीक्षा...!!!

 

   


                                    घरातील तरूणाने विशी पंचवीशी ओलांडली की घरातील जेष्ठांना तरूणाच्या लग्नाचे डोहाळे लागतात. मग सुरू होते गोत्र, देवकं आणि पत्रिका-कुंडल्या बघण्याची लगबग. स्थळ पहाणे आणि दाखवण्याच्या कार्यक्रमापूर्वी या संस्कृतीच्या नावाखालच्या उठाठेवी चालू असतात. यातून एखाद्या भटजीकडून परीक्षेपूर्वीच गुणतपासणी झाली आणि उत्तीर्ण झाले की पुढचे सोपस्कार पार पाडायला मोकळे. मंगळ, राहू, केतू च्या घरातून सुटलं की मग येतो पाहुणे होऊन जाण्याची वेळ. वधू परीक्षेला जाण्याची वेळ. 

                                       घरातील जेष्ठ, गावातील एखादी मोठी व्यक्ती, मामा आणि शेवटी ज्याच्या लग्नाच्या नावाखाली या परीक्षेचं आयोजन केलं जातं तो तरूण. सगळ्या मंडळींने पाहुणे होऊन होणार्‍या वधूच्या घरी जाण्याचा कार्यक्रम ठरतो. या मंडळींमधे सगळे प्रश्न ठरवलेले असतात. म्हणजे कुणी काय विचारयचं ते. पाहुणे होऊन गेले. चहा, नाश्ता झाला की वेळ येते मुख्य परीक्षेची. वधू परीक्षा. घरातील मुख्य जागेत, मोकळ्या जागेत हा परीक्षेची व्यवस्था करण्यात आलेली असते. पाहुणे होऊन आलेले सगळे मुख्य अतिथी असल्याने मध्यभागी बसलेले असतात. त्यांच्या पासून समोरच जवळच्या जागेत एका गालिचावर पाठ मांडलेला असतो.

                                       समोर आणलेला नारळ आणि एखादा गोड पदार्थ ठेवलेला असतो ताटात. पाटाचीही दिशा ठरलेली असते. तो पूर्व-पश्चिम दिशेलाच तोंड करुन बसता यावे असा असावा. घरातील एका कोपर्‍यात मुलीचा बाप पडक्या चेहर्‍याने उभा असतो.  सगळे जण आपापल्या जबाबदारीने तयारीत असतात.  नवर्‍या मुलीने साडी नेसून मोकळ्या जागेत मांडलेल्या पाटावर बसायचे. मुलगी आतल्या दारातून पाटावर बसण्याकरता येण्यासाठी निघाली की वधू नव्हे व्यंग परीक्षेचा पहिला अंक सुरू होतो. या मंडळींपैकी नेमुन दिलेल्या जबाबदारी सारखे काहीजण तिच्या चालण्याच्या लकबीकडे बघत असतात. उद्देश काय तर म्हणे मुलगी पायने आधू (लंगडी) आहे का पहाण्याचा हा सोपस्कार. यात उत्तीर्ण होऊन पुढे पाटावर बसताना कशी बसते, डोक्यावर पदर घेऊन बसते, की अमुक तमुक प्रश्नाच्या अंदाजावर मुलीवर केलेल्या संस्काराची परीक्षा होते.                              

                                       पाहुणे होऊन आलेल्यापैकी एक जण मान लावून पाटावर बसलेल्या वधूच्या परीक्षेचा पुढचा अंक घेण्यासाठी पुढे येतो.                               

                                       ताटात ठेवलेल्या पंचपाळातील हळदी कुंकू लावून पहिल्या प्रश्नाला सुरवात होते. 

                                       नाव काय...?                              

        वधूच्या माहिती असलेल्या उत्तराकडे या मंडळींचं टक लावून लक्ष असतं. ती बिचारी उत्तर देते. त्यावरून आलेली मंडळींची खात्री होते की मुलगी बोलण्यात बोबडी नाही, ऐकण्यात कानाने बहिरी नाही. व्यंग परीक्षेचा दुसरा अंक संपतो. प्रश्नोत्तराच्या दरम्यानच आलेल्या मंडळी कडून वर्णतपासणी, नाकशारपणाचीसुद्धा तपासणी केली जाते. या सगळ्या व्यंगतपासणी नंतर निरोप कळवतो सांगून ही परीक्षा संपते. कोपर्‍यात बसून असलेला मुलीचा बाप सुटकेचा निश्वास सोडतो आणि या सगळ्या व्यंगतपासणीला मुकसंमतीने स्विकारतोही.

                                       एकंदरीत दीड दोन तास चालणाऱ्या या प्रकराला सोज्ज्वळपणे संस्कृती ह्या गोंडस नावाखाली सर्रास स्विकारले आहे. पण या सगळ्या प्रकाराला संस्कृती म्हणावे की विकृती हे न समजणारे आहे. ही नेमकी वधू परीक्षा केली जाते की व्यंग परीक्षा...? कारण या सगळ्या प्रकारात केवळ व्यंगाचीच तपासणी केली जाते. मुलगी लंगडी आहे की नाही म्हणून चालवले जाते. अगोदरच उत्तरं माहिती असलेल्या प्रश्नांना विचारून बोबडेपणा अन बहिरेपणा तपासढ्यापलिकडे काहीही केले जाते नाही. हा गैरसमज असता तर चांगले असते. पण पाहुणे म्हणून जाणार्‍यांमधील अनेक जेष्ठांकडून यापलिकडे दुसरे उत्तर मिळत नाही. काहींनी तर केवळ याच कारणासाठी वधू परीक्षा केली जाते.

                                       दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या मागे अजून एक गोष्ट असते तो म्हणजे अविश्वास. ज्या व्यक्तीशी नवीन नाते जोडायचे आहे त्याच व्यक्तीवर अविश्वास दाखवून नव्या नात्याची सुरवात करणे म्हणजे धक्कादायक बाब आहे. आणि हा असा प्रकार संस्कृतीच्या नावाखाली चालणे तर अजूनच धक्कादायक आहे. वधू परीक्षेच्या नावाखाली हा चाललेला व्यंगतपासणीचा प्रकार नक्कीच क्लेशदायक आहे.

गणेश दादा शितोळे
(२६ डिसेंबर २०१६)